आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjushri Kulkarni Article About Helping Blind People

उंच माझा झोका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणापासूनच एका निराळ्याच झुल्यावर मी झुलत होते. खरं तर सभोवती असणारं वातावरण श्रीमंती थाटातलं! मन मात्र यात का रमलं नाही किंवा वातावरणापेक्षा खूपच वेगळ्या विचारांच्या दिशेला माझा झोका का जात राहिला हे आजही उमगलेलं नाही. कदाचित माझ्या आईला जे करावसं वाटत होतं, पण करू शकत नव्हती, ते सारे विचार तिने गर्भसंस्कारातून दिले असावेत. माझ्या वडिलांची परोपकारी वृत्तीही मला झुलवत राहण्यासाठी कारणीभूत ठरली असावी. वयानुसार झोकाही उंच जात राहिला. दृष्टिक्षेपात आलं ते खाऊनपिऊन सुखी असणारं एक घर, त्या ‘अंगणात’ दिसली तीच व्यक्ती जी ‘जोडीदार’ या शब्दाच्या माझ्या व्याख्येत बसत होती. त्या नजरेतही माझं झुलणं भरलं, परस्परांचे हात हाती आले तर ‘जीने में मजा आ जायेगा’ ही खात्री पटली. सप्तपदीच्या सात पावलांसह आधी घरातली कर्तव्यं, मुलांचं उत्तम संगोपन आणि नंतर जन्माचं सार्थक होईल असं काम करण्याची शपथ आम्ही घेतली. पहिल्या दोन गोष्टी उंबरठ्याच्या आतल्या होत्या. प्रेम-विश्वास या गुंतवणुकीवर सुखाची मिळकत आम्ही मिळवत होतो. उंबरठ्याबाहेरची तिसरी गोष्ट करण्यासाठी सुदैवाने मुलगा आणि मुलगी पूर्ण तयार होऊन सोबत होते.


अर्थात उंबरठ्याबाहेर जाऊन काही करायचं तर सणवार, लग्न-मुंजी, सोहळे, नातेवाइकांकडे जाणे वा त्यांचे येणे, संकटाच्या वेळी धावून जाऊ न शकणे, दु:खाच्या प्रसंगी सांत्वनाला न जाऊ शकणे, मित्रमैत्रिणींचा सहवास - यात समाविष्ट असणा-या मनोरंजनपर गोष्टी अशा सगळ्याच सीमा ओलांडाव्या लागणार होत्या. कारण जन्माचं सार्थक या सीमित गोष्टींमध्ये नव्हतं. हे सारं करणं सोपं नव्हतं, पण ‘सीमोल्लंघन’ करायचं ठरवलं. मुलगा अमित बारावीत उत्तुंग यश मिळवून पुढील शिक्षणासाठी घराबाहेर पडला. त्याने निघताना ही मुहूर्तमेढ हाती ठेवली. ‘आई, आता तुझा वेळ तुझ्या हाती आला आहे. तू जे ठरवलं होतं ते करण्याची वेळ आली आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि कामाला लाग, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत!’ माझ्या झोक्याने गती घेतली. थेट पोहोचले माझ्या श्रद्धास्थानी; आनंदवन, वरोरा या ठिकाणी. बाबा तेव्हा देहातीत झालेले. साधनातार्इंजवळ मन मोकळं केलं. त्यांनीही छान झुलवलं! ‘तुझ्या गावातच आनंदवनचा एखादा तुकडा वसव!’ तेवढ्यात समोर आली ती अंधत्वाच्या शापावर संगीताचा मिळालेला उ:शाप स्वीकारून जीवनगाणे गाणारी उज्ज्वला! तिला पाहून, भेटून ठरवलं अंध मुलांची ‘काठी’ व्हायचं!
‘तीर्थक्षेत्री’ गेले होते, घरी परतल्यावर ‘मावंदं’ केलं ते ब्रेल लिपी शिकून. घराजवळच्या उमाला ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथासारखे ग्रंथराज वाचून दाखवायला जाऊ लागले.

सीमोल्लंघनाची पूर्वतयारी झाली. तिच्याकडून तिच्या अनेक ‘बांधवांना’ ही वार्ता कळाली. मीही अनेक ठिकाणी जाऊ लागले. पण ही भ्रमंती थांबवून एका ठिकाणी हे काम सुरू व्हावं या ईश्वरी इच्छेनुसार सक्षम (समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल) या संस्थेच्या नागपूर शाखेचे अविनाश संगवर्क आणि शिरीष दारव्हेकर यांची भेट झाली. त्यांनी सक्षमची साथ घेऊन अधिक सक्षम होऊन काम करण्याचा सल्ला दिला आणि पाठीशी उभेही राहिले.


17 जून 2009 हा दिवस प्रत्यक्ष सीमोल्लंघनाचा दिवस! अंध व्यक्तींनाही विरंगुळा/मनोरंजन हवं म्हणून चांगली पुस्तकं वाचून दाखवत होते, त्यांना शक्य होतं त्या हस्तकलेच्या वस्तू शिकवत होते म्हणून विरंगुळा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला. आता कामाची गरज कळली, गती वाढवणं क्रमप्राप्त होतं.


मग कळलं की अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचून दाखवायलाही कुणी मिळत नाही. सातवीपर्यंत ब्रेल पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण घ्यावं लागतं अन् आठवीपासून ब्रेलचा संबंधच उरत नाही. कारण सर्वसामान्य शाळांमधून शिक्षण घ्यावं लागतं. 100 मुलांच्या वर्गातलं एखादं अंध मूल दुर्लक्षितच राहतं. (याला काही अपवाद जरूर आहेत) मग नाइलाजाने ते हात ‘पाटी’ सोडून कटोरा हाती घेतात. ग्रामीण भागातले हे कठोर सत्य समोर आले आणि ‘विरंगुळा व अध्ययन केंद्र’ हे स्वरूप आले. रोज अभ्यास घ्यायचा, प्रयोगवह्या भरून घ्यायच्या, परीक्षा देण्यासाठी लेखनिक मिळवून द्यायचे, शिक्षण अपुरं राहिलेल्यांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसवायचं. अभ्यासक्रमाचं ध्वनिमुद्रण करून द्यायचं. अडचणीनुरूप मार्ग सुचत गेले.


अभ्यास झाला की बुद्धिबळ, योगासनं, सामान्यज्ञानाची माहिती देणं हा विरंगुळाही होताच. वर्षभरात खूप घडामोडी झाल्या. परीक्षाही देऊन झाल्या. सारेच निकाल आनंदोत्सव साजरे करावे असे लागले. दहावी-बारावीतली 22 मुलं-मुली 75%च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाली. एक मुलगी 83% घेऊन अंध विद्यार्थ्यांत पहिली आली. हा आनंद विरंगुळा केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लोकांसमक्ष आणायचा ठरवला. इच्छा तिथे मार्ग या उक्तीनुसार माणुसकीचा वसा जपणारे एक पत्रकार मदतीला धावून आले आणि वर्धापन दिन थाटामाटात साजरा झाला. अनेक सहकार्याचे हात उत्स्फूर्तपणे सोबतीस आले. आता थांबणं शक्यच नव्हतं. मधल्या काळात अगदी जवळच्या व्यक्ती सोडून इतरांनी खूप टीकेचा आहेर केला. पण त्याचा कामावर परिणाम होऊ दिला नाही.


कामाचं क्षितिज विस्तारत गेलं, विरंगुळा केंद्राचं नामकरणच ‘क्षितिज’ झालं! अध्ययन विरंगुळा याही पुढे जाऊन पुनर्वसनाचं पाऊल उचललं. कागदी पिशव्या, राख्या बनवून त्याचे ठिकठिकाणी स्टॉल्स लावणं, मुलांचे आवाज आणि संगीताचं उपजत ज्ञान यांची सांगड घालून सांस्कृतिक कार्यक्रम देणं सुरू केलं. उत्पन्नाचे ‘थेंबे थेंबे साचणारे तळे’ पाहून मुलांचाही उत्साह वाढला. अगदी गरीब घरच्या मुलांसाठी वसतिगृहही सुरू केले.


मुलं घराबाहेर पडली की आईला एकटेपण खायला उठतं. रिकामा वेळ कसा घालवावा समजेनासं होतं. कारण सारे छंद, आवडीनिवडी हातातून निसटून गेलेल्या असतात. याच काळात मेनोपॉजही आपले जाळे पसरवायला लागतो. परिणामस्वरूप अनेक व्याधी वास्तव्यास येतात. त्यातून सुटका कशी तर टीव्ही मालिकांमध्ये रमणे, फार तर (समदु:खी) मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जाणे! हा आनंद क्षणिक अन् ‘मी काय करते आहे?’ हा त्रागा अधिक, अशी अवस्था प्रत्येकीची होते. या त्राग्याचं सावट संपूर्ण घरावर पडतं, परिणामांबद्दल काय बोलावं? म्हणून समाजोपयोगी काही सत्कार्यात गृहिणींनी सहभाग घेतला, शिक्षणाचा, कोमल अंत:करणाच्या वरदानाचा, वेळेचा सदुपयोग केला तर कुणाला काही देण्यापेक्षा स्वत:ला मिळण्याचंच प्रमाण अधिक आहे हे कळून येईल. काही दुखतंय हे वाटायला वेळच उरणार नाही, दवाखान्याच्या पाय-यांपासून आपसूकच सुटका होईल. काहीतरी वेगळं करतोय या समाधानाने रोज कराव्या लागणा-या दैनंदिन कामामध्येही ‘राम’ वसू लागेल. सायंकाळी घराकडे परतणा-या पावलांत ‘ओढ’ निर्माण होईल आणि स्वत:ला आरशात न्याहाळताना जाणवेल इतके दिवस पार्लरमध्ये जाऊनही येऊ शकला नाही तो तजेला चेह-यावर विसावला आहे! मेनोपॉजच्या बाऊचा तर ‘आला होता का?’ इतकं विस्मरण होईल.


नोकरी न करता, पैशाच्या मागे न धावता, मी आणि माझे आप्त या चौकटीत न गुंतता, थोडक्यात काय तर सर्वसामान्य प्रवाहासोबत न वाहता सीमोल्लंघन करून आज ज्या वाटेवर मी उभी आहे तिथे सुखदेवताच माझं औक्षण करायला सामोरी आली आहे. अजून काय हवं?