आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकड बनून जगायचं नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय असतं राजकारण? कशासोबत खातात ते? अठरा वर्षांच्या वरचे झालोय आम्ही म्हणून मतदानाचा हक्क मिळवलाय खरा; पण राजकारण, सरकार, प्रशासन हे सगळं कळावं, एवढी पात्रता नाही आली अंगी.

‘मुन्नाभाई’ चित्रपटाच्या निमित्ताने गांधीजी आठवले होते चुकून. नाही तर कार्यालयातल्या ओलसर भिंतीवर अडकवलेल्या फोटोव्यतिरिक्त कुठे जपता आले आपल्या नेत्यांना आणि आपल्यालाही गांधी? ‘खादी’ जाऊन ‘लिनन’ आलंय आता, झोकात मिरवण्यासाठी! ‘दांडीयात्रा’ कधीचीच संपली. ‘दांडी’ तेवढी राहिली कार्यकर्त्यांच्या हातात, विरोधी पक्षांची डोकी फोडायला, कार्यालयाच्या काचा फोडायला! ‘सत्याग्रहाला’ ग्रहण लागलं. ‘असत्य’ अन ‘राजकारण’ एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून प्रचलित झाल्या! ‘अहिंसा’ नावाचं काहीतरी बर्‍याच वर्षांपूर्वी लुप्त झालं, डायनासोरच्या प्रजातींप्रमाणे. आता ते कुठेच दिसत नाही.

नेत्यांनी चक्क माकड करून ठेवलंय जनतेचं. करोडोंचे घोटाळे आम्हाला दिसत नाहीत. कानाला लोभस वाटणारी आश्वासनं ऐकली काय न ऐकली काय, कारण मुळातली पूर्ण होणाराय कुठे. भ्रष्टाचार कितीही होत असला आजूबाजूला, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागला तरी आम्ही चिडीचूप. कारण कुणी तरी सांगून गेलंय ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो!’

‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ अंगीकारलेला तो महात्मा. आजच्या नेत्यांनी सोयीस्कर बदल केला त्यात. ‘प्रत्येक वाढदिवशी, प्रत्येक सणी, शुभेच्छा र्होडिंगवरुनि.’ दररोज कारण शोधून मोठमोठे फ्लेक्स प्रिंट करायचे, चौकाचौकात सर्वात ‘उच्च’ जागा शोधून ते लावायचे, तेही सोन्याच्या साखळ्यांनी मढवलेले गळे आणि दोनी हात जोडून चेहर्‍यावर साळसूदपणाचा आव आणलेल्या फोटोसकट. किती ‘महान’ विचारांचे हे प्रदर्शन!

‘चरखा’ चालवणं आणि सूत कातणं याच्या उलट अनुकरण राजकारण्यांचं. नेते आधी ‘सूत’ जुळवतात आणि आपआपल्या पचनशक्तीप्रमाणे ‘चर’ नाही तर ‘खा’... ‘चर’ नाही तर ‘खा’... चालू आहे चक्र अखंड. गांधींनी त्यांच्या सूत्राद्वारे एक वाट दाखवली होती आणि आज सगळ्यांनी ‘वाट’ लावलीय देशाची. का आपल्याला स्वदेशी वापरण्याची लाज वाटावी? का प्रत्येक ठिकाणी राष्ट्रभाषेऐवजी इंग्रजीचा मान पहिला? का आपण मतदानाचा अधिकार बजावल्यावर माहितीचा अधिकार विसरतो? का निवडून दिलेल्या नेत्याला प्रश्न विचारायला घाबरतो? का मूठभर नेत्यांचं राजकारण आपल्या रोजच्या समस्याचं कारण व्हावं? का या भाऊगिरी, दादागिरीसमोर गांधीगिरीने गुडघे टेकावेत?

आता पुरे झालं की ‘चलता है’ म्हणणं. you must be the change you want to see in the world. ज्याला वाटतंय ‘आता पुरे’ तो येईल पुढे साथ द्यायला. बदलण्याची सुरुवात जरी एकाने केली तरी साथ महत्त्वाची आहेच आणि 125 कोटी भारतीयांच्या आवाजापुढे कुणाची बिशाद तोंड उघडून खोटी आश्वासने देण्याची! वेळ लागेल. धैर्य लागेल. संयम लागेल; पण वाट सोडायची नाही. माकड बनून जगायचं नाही.
(manju.mundada@gmail.com)