आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manohar Sonwane Article About Book Review, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रध्‍देवर खुसखुशीत प्रहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ईश्वर डॉट कॉम’ची कथा देवनगरीत घडते. ही देवनगरी संस्कृतिनिष्ठ, धर्मरक्षक, परंपराप्रवण आहे. इथे तीन धर्मांचे लोक राहतात आणि ते आपापल्या धर्मांचे अभिमान बाळगतात. या तिन्ही धर्मीयांना आपापल्या धर्मांच्या श्रेष्ठत्वाची खात्री आहे, मात्र सार्वजनिकरीत्या परस्परांचा उपमर्द न करण्याची सहिष्णुता ते बाळगत आहेत. कोणाचा धर्म सच्ची श्रद्धा शिकवतो, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी देवनगरीतल्या तिन्ही धर्माच्या कट्टर अनुयायांनी निर्णायक आंतरधर्मीय लोळणस्पर्धा आयोजित केली होती. रस्त्यावरच्या घाणीत लोळून जिंकण्याऐवजी शर्यत हरलेलं बरं, असे मानून इतर दोन धर्मीयांनी स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे ही स्पर्धा हिंदू जिंकले. विजयाच्या या उन्मादात पुराणात उल्लेखलेल्या ब्रह्मास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन त्यांनी जल्लोष केला.
देवनगरीत य. म. मारकुंडेंची शुद्ध घी ब्रिगेड संस्कृतिरक्षक म्हणून वावरते आणि देवनगरीवर आक्रमण केलेल्या ‘परक्यां’ना निखंदून टाकण्याचे आवाहन करते. नॅथन अल्बुकर्क हा म्हातारा संस्कृतिरक्षक सांस्कृतिक पोल्युशन करणा-या पाश्चात्त्य पर्यटकांच्या ढॅणढॅण म्युझिक पार्ट्यांवर सडक्या दुर्गंधीयुक्त अंड्यांच्या बॉम्बचे हल्ले करून धुमाकूळ माजवतो, तर नगरीत अंगप्रदर्शन करत फिरणा-या पाश्चात्त्य पर्यटक युवतींवर कपडे चढवण्याच्या अभिनव अभियानाची कल्पना करतो आणि अशी ‘वस्त्रसेना’ उभी करण्याची आशा बाळगतो. या नगरीत विल्मा बर्रेटोचा करिष्मॅटिक ग्रुप आहे. जिझस् ख्राईस्ट शक्तीने प्राप्त होणार आहे, अशी या ग्रुपची धारणा आहे. म्हणूनच ‘द व्हॉयलंट टेक इट बाय फोर्स’ अशा आरोळ्या ठोकून ते हवेत वार करून हवेची हिंसा करतात. देवनगरीतल्या वातावरणात धार्मिकता अशी ओतप्रोत भरली आहे.
धार्मिक बजबजपुरीत नवोत्तर विचारसरणी मानणा-या प्रोफेसर व्हिक्टर डिसूझांचा एक वैचारिक ग्रुप आहे. ‘नवा विचार करणं म्हणजे काम करणं’ असं त्यांचं मत आहे. धर्मश्रद्धेचा प्रादुर्भाव झालेल्या देवनगरीत देवाचे अस्तित्व काय आहे? ईश्वराचे प्रयोजन काय आहे? ‘प्रों’च्या माध्यमातून लेखकाने हे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘माणसाचा तारणहार विवेकच असेल, समता हाच त्याचा ईश्वर असेल आणि प्रेम हीच त्याची टिकाऊ परंपरा असेल’, अशी त्रिसूत्री मांडणा-या प्रोफेसरांच्या स्टडी सर्कलमध्ये आठ नवे युवा-युवती दाखल झाल्यानंतर विचार करणे हेच काम मानणा-या प्रोफेसरांना कृतिप्रवण झाल्याशिवाय गत्यंतर उरत नाही आणि रेड्याला बळी देण्याची अकरा हजार वर्षांपासून चालत आलेली परंपरा उद्ध्वस्त करण्याची मोहीम त्यांची टीम यशस्वीपणे पार पाडते. ‘‘व्यवस्था पटत नसेल तर तिला भोकं पाडत राहा, तिच्या पायवाटा खणत राहा, धिस इज द मिनिंग ऑफ बिइंग अ रिअल इंटलेक्चुअल टुडे’’ हा ‘प्रों’ना झालेला रहस्यशोध अखेरीस ही कादंबरी अधोरेखित करते.
देवनगरीतला परंपराप्रिय, धर्म-संस्कृतीचा अभिमान बाळगणारा आणि परकियांना शत्रू मानणारा त्रिधर्मीय समाज आणि ‘बर्फाची लादी झालेला देवनगरीतला हा अनादी अनंत काळ केव्हा तरी वितळेल’ अशी आशा बाळगणारा, विवेकाचा आणि नव्या विचारांचा पुरस्कर्ता असा प्रो. डिसुझा यांचा अभ्यास गट अशा दोन बाजू इथे ठळकपणे समोर येत असल्या तरी देवधर्माच्या वाढत्या प्रस्थाचे अनेक कंगोरे त्यातून उजागर झाले आहेत. ‘प्रों’चा अभ्यासगटही एकसंध नाही, त्यातही अंतर्विरोध आहेत. वेगवेगळ्या प्रवृत्तींचे लोक आहेत. पीटरला जिझस भेटल्याचा साक्षात्कार झाला आहे, तो पूर्णत: ईश्वरवादी आहे. सिरिल, मारिओ हे ‘प्रें’च्या ग्रुपचे मूक सभासद विल्मा बर्रेटोच्या करिष्मॅटिक ग्रुपमध्ये हवेत हात फिरवत उत्स्फूर्त आरोळ्या ठोकतात. अजगराची उशी करून झोपणारा, ब्रह्मज्ञानाबद्दल बोलणारा आणि ‘प्रों’च्या बैठकीत शीर्षासन करणारा विक्षिप्त पॉल ‘मी बायबलमध्ये राहत नाही, मी चालू काळात राहतो’ असे प्रतिपादन करतो.
दत्तारामला हिंदू संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान आहे, साव्हिओला तो ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे आणि तरीही ते ‘प्रों’च्या गटात आहेत. दत्तरामला बौद्धिक देवाणघेवाणीत आणि प्रत्यक्ष कृतीत रस आहे. म्हणूनच बहुधा ‘प्रों’च्या ‘रेडा बळी’ मोहिमेत सामील होण्यास सुरुवातीला नकार देणारा दत्ताराम प्रत्यक्ष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवतो. पापभीरू साव्हिओ मात्र देवनगरीत धार्मिक संघर्ष नको म्हणून या मोहिमेपासून दूरच राहतो. मॅगी, लुईझा या गटात नव्या दाखल झालेल्या मुली विचारांमध्ये आक्रमक आहेत, तर योगिनीसारखी राहणारी शांती आणि रेश्मा शांत-तटस्थ प्रवृत्तीच्या आहेत. जॉन, रॉय आणि मेंडिस हे त्रिकूट फारसं गंभीर नाही. मौजमजा आणि गमतीत त्यांना रस आहे. या सा-यांमध्ये एकटे प्रोफेसरच त्यांच्या स्वत:च्या नवविचारांचे खरे अनुयायी आहेत. अपवाद या गटात सामील असलेल्या या कथेच्या निवेदकाचा; पण तो प्रामुख्याने निरीक्षकाच्या भूमिकेतच आहे. प्रोफेसर मुळात उदारमतवादी आहेत, म्हणूनच अशा सा-या भिन्न प्रवृत्तींची मोट त्यांनी बांधली आहे आणि अखेरीस देवनगरीत धुमाकूळ माजवणारी क्रांती त्यांना साधली आहे. मात्र परंपरेला भोक पाडण्यात ते पूर्णत: यशस्वी झाले का, हे काळच ठरवणार आहे.
विश्राम गुप्ते यांनी चितारलेल्या देवनगरीतल्या वृत्ती-प्रवृत्ती, संगती-विसंगती, द्वंद्व-अंत:द्वंद्व आपल्या अवतीभवती आहेत. देव-धर्म-श्रद्धा यांचं झालेलं सवंगीकरण, उत्सवीकरण आपण अवतीभवती पाहात आहोत. मार्केट, मीडिया, मॅनेजमेंट, मनी आणि मेडिटेशन या पाच ‘म’कारांच्या अधीन पारपंरिकता, धार्मिकता बोकाळताना दिसत आहे. त्यातील निरर्थकता किंवा अर्थशून्यता दिसत असूनही दिसत नाही, अशी स्थिती आहे. या स्थितीत ‘स्वच्छ विचार करणं हा खरा धर्म, नव्या काळात पुढे जायचं असेल तर जुनी उत्तरं नकोत. नव्या प्रश्नांना नव्याच उत्तरांनी भिडायचं असतं. ही नवी उत्तरं अपारंपरिक विचारसरणीतून उगवतात.’ असे विचार केवळ वैचारिक वर्तुळातच शोभतात, आम दुनियेत त्यांना अनुयायी मिळणं किती कठीण आहे, हे आपण जाणतो. त्यामुळेच समतेचा, अहिंसेचा, प्रेमाचा व विवेकाचा धर्म स्थापू इच्छिणारे प्रोफेसर यशस्वी होतील का, हा लेखकाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. विश्राम गुप्ते यांनी नर्मविनोदी शैलीच्या या कथनात विचारांचे अनेक सुरुंग पेरले आहेत, त्यांचे स्फोट जितके गुदगुल्या करणारे आहेत तितकेच अंतर्मुखही! manohar.sonawane1959@gmail.com
ईश्वर डॉट कॉम - विश्राम गुप्ते
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे - 292, रु. 300/-