आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हस्तलिखितांपासून सुरू झालेली साहित्याची झेप खिळे जोडणी, संगणक या अद्ययावत तंत्रानंतर आता मोबाइलवर येऊन ठेपली आहे. बदलत्या काळात किंवा आजच्या ‘रेडी टू कुक’च्या जमान्यात साहित्याचीही उपलब्धता कधीही, कुठेही व्हावी, असे प्रयत्न होताना दिसताहेत. ई-मेल, मेसेज, व्हॉटसॅपच्या या जमान्यात पत्रलेखनाचे महत्त्व संपून गेले आहे. आता साहित्यही या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी या तंत्राचा वापर करताना दिसते आहे. त्याचा उपयोग मराठी पुस्तकांसाठीही होऊ लागला आहे. त्यात ई साहित्य प्रतिष्ठान ही संस्था अग्रेसर आहे. प्रतिष्ठानने आता मोबाइलवर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अॅप्स आणण्याचे ठरविले आहे. या महिन्यात हे अॅप्स लाँच होण्याच्या तयारीत आहे. ही मराठी साहित्याची वाचकांसाठी एक मोठी उपलब्धताच म्हणावी लागेल. हा प्रयोग मराठी वाचकांनाही विशेषत: तरुण पिढीला साहित्याकडे आकर्षित करणारा आहे.
ई-साहित्य प्रतिष्ठानचा उपक्रम...
नवोदित मराठी लेखकांना प्रोत्साहन देणारा
सध्या इंटरनेटवर फिरणारी ई साहित्य प्रतिष्ठानची साहित्य सेवा लोकप्रिय होऊ लागली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रतिष्ठानने 310 च्या वर ई-पुस्तके प्रकाशित करून ती या माध्यमातून वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे या कालावधीत त्यांना दोन लाखांवर वाचक मिळाले. तेवढ्या लोकांनी या माध्यमातून साहित्याला पसंती दिली. मराठी साहित्य वाचनाची आवड कमी झाल्याचे एकीकडे म्हटले जाते, तर दुसरीकडे बदलत्या काळाशी एकरूप होऊन निर्माण होऊ लागलेल्या साहित्याला मागणी असल्याचे दिसते. वाचनालयात जावून पुस्तके वाचण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत निश्चितच कमी झाले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात तेवढा वेळ कुठे आहे.?. मात्र ई-साहित्य प्रतिष्ठानचा उपक्रम नवोदित मराठी लेखकांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यांचे साहित्य घेऊन ते इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा चांगला उपक्रम सुरू झाला आहे. त्याची दखल घेतली जावू लागली आहे. आता अॅप्स आल्यानंतर त्याची व्याप्ती वाढेल.
प्रतिष्ठानची ज्ञानेश्वरीची 40 हजार सीडींची विक्री
या प्रतिष्ठानने ज्ञानेश्वरीची सीडी उपलब्ध करून दिली आहे, परवा सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात ती हातोहात खपली, जवळपास 40 हजार जणांनी ती विकत घेतली. त्याचे ई-पुस्तकही प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे कामसूत्रचेही ई-पुस्तक प्रकाशित केले गेले आहे. ई-प्रतिष्ठानच्या वेबसाइटवरून त्याची मागणी केली की ते मोफत ई-मेलद्वारे उपलब्ध होते. ही सेवा महाराष्टÑ, भारतातच नव्हे तर 40 देशांत पोहोचली आहे. बदलत्या जमान्यातील ही ई-प्रकाशन संस्थाच म्हणावी लागेल.
300 वर पुस्तके संगणकाच्या जवळपास 2 लाख डेस्कटॉपवर सेव्ह
साहित्यात रमणार्या लेखक, कवी आदींनी मिळून एक ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून ई-साहित्याची वाटचाल 2007 सालापासून सुरू झाली. विदर्भातील माणसांना कोकणी जेवण माहिती नसते तर सोलापूरकरांना खान्देशी, पण ई-साहित्याने संपूर्ण महाराष्टÑ एकमेकांशी परिचित करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव, निपाणी, इंदूर, बडोदे येथील नवलेखक, वाचक या माध्यमातून जोडले गेले आहेत. आता अॅप्स आल्यानंतर त्याची व्याप्ती तर वाढेलच पण साहित्याच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण आणखी सोपी होणार आहे. साने गुरुजींची इटुकली-मिटुकली, रत्नाकर महाजनांचे पंख तसेच बालनेटाक्षरी अशी जवळपास 300 च्या वर पुस्तके संगणकाच्या जवळपास 2 लाख ‘डेस्कटॉपवर सेव्ह’ झाली आहेत, आता ती मोबाइलवरही सेव्ह व्हायला लागतील.
पुढे वाचा, कधीही वाचता, साठवता येते...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.