आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँड, बाजा और बंदूक! (रसिक स्पेशल)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नसोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात सहसा फटाक्यांची आतशबाजी केली जाते. साध्वी देवा ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी हरियाणा राज्यातल्या करनाल इथल्या एका लग्नसमारंभात उत्तर भारतीय बाहुबली प्रथेला जागून खऱ्याखुऱ्या बंदुकींचा वापर करून गोळीबार केला. आनंदधुंद अवस्थेत झालेल्या गोळीबारीत लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी एक महिला दगावली. काही जखमी झाले. अखिल भारतीय हिंदू महासभेची उपाध्यक्षा म्हणवत भगव्या वस्त्रात वावरणारी ही साध्वी यथावकाश पोलिसांना शरणही गेली. पण, नोटाबंदीच्या महाघटनेत ही घटना क्षणात वाहून गेली. या पार्श्वभूमीवर सरंजामी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतून आलेल्या उद्दाम प्रवृत्तीचे प्रच्छन्न दर्शन घडवणाऱ्या उत्तर भारतातल्या बंदूक संस्कृतीचा अस्वस्थ करणारा हा लेखाजोखा...

एक वर्षापूर्वीची म्हणजे ४ ऑक्टोबर २०१५ची ही घटना. उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातल्या छावणी क्षेत्रातल्या तुर्सी प्राथमिक शाळेत अचानक अंदाधुंदी माजली. कारण का, तर शाळेत शिकवायला येणाऱ्या एका ‘शिक्षण मित्रा’च्या परवानाधारक(!) बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ही सुटलेली गोळी वर्गात शिकणाऱ्या रिंकी नावाच्या विद्यार्थिनीच्या डोक्यात शिरली. रिंकी तत्क्षणी मरण पावली. पोलिसी प्रथेप्रमाणे त्या शिक्षक मित्राला ताब्यात घेतले गेले. या घटनेनंतर प्राथमिक शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले की, ‘कुणाही शिक्षकाने शाळेत येताना बंदूक घेऊन येऊ नये...’ पण शिक्षक आणि बंदुकीचा संबंध काय? हा शिक्षक मित्र बंदूक घेऊन येत होता, त्याला शाळा व्यवस्थापनाने यापूर्वीच का रोखले नाही?

सहा महिन्यांपूर्वी गोरखपूरच्या बाजारात एकाचं फळविक्रेत्यासोबत देण्या-घेण्यावरून भांडण झालं. सोबत त्याची बायकोसुद्धा होती. तिरमिरीत या गृहस्थाने काय करावं? कंबरेला खोचलेलं पिस्तुल काढलं. पण ते बघून बिथरलेल्या त्याच्या बायकोनं अडवण्यासाठी म्हणून त्याचा हात रोखला. पण त्या झटापटीत गोळी सुटली आणि बायकोच्या पोटात घुसली. तिला ताबडतोब बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला नेण्यात आलं, पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत...

हरियाणातल्या करनाल इथे साध्वी देवा ठाकूर आणि तिच्या आडदांड साथीदारांनी ‘सावित्री मॅरेज पॅलेस’मध्ये आयोजित लग्नसमारंभात आनंदाच्या भरात केलेल्या गोळीबारीत एक महिला ठार आणि चार-पाच जण जखमी झाल्याची बातमी आली आणि उत्तर प्रदेश-बिहारमधल्या भयावह बंदूक संस्कृतीशी जोडलेल्या घटना डोळ्यांपुढे सरसर येऊन गेल्या. आपण सोफ्यावर रेलून अमेरिकतल्या गन कल्चरवर मोठा आव आणत चर्चा करतो. पण भारतात विशेषत: उत्तर भारतात पिढ्यान‌् पिढ्या रुजलेल्या बंदुकराजबाबत आपलं काहीच म्हणणं नसतं.

एरवीसुद्धा भारतातले लग्नसोहळे प्रतिष्ठेचं, संपत्तीचं आणि सत्तेचंही ओंगळवाणं दर्शन घडवत असतात. गेल्या वर्षी मी बिहारमधल्या सिवान जिल्ह्यात आयोजित नातेवाइकाच्या लग्नासाठी गेलो होतो. पाहतो तर काय, फायरिंग करणारे लोक आले नाहीत म्हणून वरात हटून बसलेली. पण हे दृश्य उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नित्याचंच असतं. लग्नसोहळा श्रीमंती थाटात करणं आणि आमच्या लग्नात फायरिंग करायला अमुक इतके लोक आले होते, हे अभिमानानं सांगणं इथे प्रतिष्ठेचं मानलं जातं. किंबहुना, या बंदूकधारी मंडळींचं लग्न समारंभात मोठ्या प्रेमाने आगत-स्वागत होतं. त्यांना मोठा मान दिला जातो. या मंडळींनी मांडवाला भोकं पाडली की, यजमान सुखावतो. त्यात कोण मेलं, कोण जिवंत राहिलं, याच्याशी उपस्थितांना देणंघेणं नसतं.

सेलिब्रेटरी फायरिंगसाठी लग्न हे तर एक मोठं निमित्त. पण इतर वेळीदेखील उत्तर भारतात वैध-अवैधरीत्या लांबसडक बंदुका-पिस्तुल-कट्टे घेऊन फिरणाऱ्यांची कमतरता नसते. किराणा मालाच्या दुकानांप्रमाणे हत्यार विक्रीची अधिकृत-अनधिकृत दुकानं ही गरज पुरवत असतात. केवळ नेता, ठेकेदार नव्हे तर शिक्षक, पत्रकार, सर्वसंगपरित्यागाचं प्रतीक असलेले साधू-साध्वी असे सगळे लोक बंदुका हाती घेऊन वावरत असतात. बंदुका घेऊन फिरण्यातच त्यांना मोठा अभिमान वाटत असतो. आजूबाजूला कायम पाच-दहा बंदूकधारी रक्षक नसले तर या मंडळींना जणू आपली इभ्रत मातीमोल असल्याचं वाटत असतं. आता, रामाची जन्मभूमी असलेल्या पावनक्षेत्री सारं कसं नीती आणि न्यायाला धरून असायला हवं. भीतीविरहित असायला हवं. पण, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या नोंदीनुसार, अयोध्येमधल्या ३९१ साधूंकडे परवानाधारी बंदुका आहेत. याचं एक स्पष्टीकरण असंही दिलं जातं की, अयोध्येत मठ-मंदिरांची सर्वाधिक संख्या आहे. भाविकांनी दिलेल्या देणगीचा ओघ प्रचंड आहे. परिणामी, इथे संपत्तीवरून कायम झगडे होत असतात. लुटालुटीच्या घटना घडत असतात. हत्या होतात. त्यामुळे बहुतेक सर्वच साधू-महंतांकडे बंदुकीचा परवाना असतो. अयोध्येतले माझे एक परिचित आहेत, साधू युगुलकिशोर शास्त्री. आता त्यांचं वय झालंय. तब्येतही साथ देईनाशी झालीय. म्हणाले, अयोध्येत मी सोडून सगळ्यांकडे बंदुका आहेत. मी स्वत:ला निर्भय मानतो. इतर लोक भयभीत आहेत... पण खरं तर, ज्याला देवाचा आशीर्वाद आहे, धर्माचे भरभक्कम पाठबळ आहे, त्या मंडळींना बंदुकींची गरजच का भासायला हवी? हा देव आणि धर्म इतका कमजोर आहे का, जो आपल्या भक्ताचं रक्षण करू शकत नाही? तिथलेच एक पत्रकार मित्र आहेत. ते या प्रकरणावर म्हणाले, ‘यहाँ जो लोग भगवान पर भरोसा रखते है, उन्हीं के पास बंदुक नजर आती है...’

भगवे वस्त्र आणि भगवा फेटा धारण करणाऱ्या साध्वी देवा ठाकूर यांचं बाह्यरूपही देवा-धर्माशी नातं सांगणारं आहे. व्यक्तिमत्त्व धाडसी आहे. मात्र या धाडसाला उद्दामपणाचीही जोड आहे. उद्दामपणा अंगी आहे, म्हणूनच करनालमध्ये त्यांनी बेपर्वा गोळीबार केला. आपल्या या कृत्यामुळे एक बाई दगावलीय, चार-पाच जण जखमी आहेत, याकडे दुर्लक्ष करून पसार झाल्या. काही लोक म्हणतात, तुम्ही त्या यजमानांना धरा. त्यांनी बोलावलं म्हणूनच त्या गेल्या. यात साध्वींचा काय दोष? पण मला इथे दोन प्रश्न उपस्थित करायचेत, साध्वी ज्या हिंदू संस्कृतीचं प्रतिनिधित्व करताहेत, त्या संस्कृतीला कट्टरपंथी गटात मोडणाऱ्या बंदूकधारी साधू आणि साध्वी मान्य आहेत का? आणि दुसरा म्हणजे, हिंसेच्या जोरावर सत्ता हस्तगत करण्याचा कट्टरपंथी हिंदूंचा छुपा अजेंडा ही मंडळी उघड करत आहेत का?
हे खरंच की, बंदूक संस्कृती ही काही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही. हिंदू समाजात जसे बंदूक बाळगणारे आहेत, तसेच मुस्लिम समाजातले जमीनदार, नेता, ठेकेदार वगैरे लोकही बेधडक ‌वैध-अवैध बंदुकींचा वापर करणारे आहेत. काही महिन्यांपूर्वी शामली जिल्ह्यातल्या बाजारातून समाजवादी पार्टीच्या नफिसा नावाच्या स्थानिक महिला नेत्याची मिरवणूक चालली होती. बाजारात मिरवणूक पोहोचली तशी नफिसाच्या समर्थकांनी रायफल आणि गावठी कट्ट्याचा वापर करून बेधुंद फैरी झाडल्या. त्यातल्या एका गोळीने बाजारात आईसह उभ्या आठ वर्षांच्या मोहम्मद शामीचा बळी घेतला. नंतर यथावकाश चौकशीचे आदेश सुटले. नफिसाला पार्टीतून काढून टाकल्याचे जाहीर झाले, पण कुणीही बंदूक संस्कृतीच्या धोक्यांकडे लक्ष वेधले नाही.

अलीकडेच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की, २०१० ते २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत देशात सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गोळीबारीमुळे १७४९० लोकांचा बळी गेला. त्यातले ६९२९ बळी एकट्या उत्तर प्रदेशातले होते. यातले केवळ ७०१ जण परवाना मिळालेल्या बंदुकीच्या गोळीने मरण पावले होते. याचा अर्थ, ६२२८ जण अवैधरीत्या वापरात असलेल्या बंदुकींचे बळी होते. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक बळी जाणाऱ्यांची संख्या बिहार राज्यात आहे. चार वर्षांच्या कालावधीत बिहारमध्ये ३५८० जण बंदुकीचे बळी ठरले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण उत्तर प्रदेश पोलिसांकडे जितकी हत्यारं आहेत, त्यापेक्षा पाचपट अधिक परवाना असलेली हत्यारं या लोकांकडे आहेत. यात ४० हजार महाभाग असे आहेत, ज्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे आणि ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंदले गेले आहेत. २०१० ते २०१४ या कालावधीत देशात आर्म्स अॅक्ट अंतर्गत जवळपास ३ लाख केसेस दाखल झाल्या. त्यातल्या दीड लाख केसेस एकट्या उत्तर प्रदेशात नोंदल्या गेल्या होत्या. २०१४ या एका वर्षात युपी पोलिसांनी २४ हजार ५८३ हत्यारं जप्त केली. त्यातली ६० टक्क्यांहून अधिक हत्यारं अवैधरीत्या वापरात होती. इतर ठिकाणचे तपशील फारसे सांगत बसत नाही. परंतु उत्तर प्रदेशातल्या ज्या पूर्व भागात (गोरखपूर-बस्ती-देवरिया-महाराजगंज आदी) मी राहतो, या भागाची लोकसंख्या जवळपास दोन कोटीच्या घरात आहे. या दोन कोटी लोकसंख्येत परवानाधारकांची संख्या ५८ हजाराहून अधिक आहे.

हे एकट्या उत्तर प्रदेशचं चित्र आहे. मात्र, बिहार-हरियाणाची अवस्था याहून वेगळी नाही. तिथेही बडे जमीनदार, बाहुबली नेता, सत्तेशी जवळीक असलेले ठेकेदार यांच्या अवती-भवती बंदुकधारींचा सतत वावर आहे. ही दोन्ही "शस्त्रास्त्रधारी समाज' असलेले राज्ये आहेत. या राज्यांमध्ये क्षत्रिय ब्राम्हण आणि काही मागासलेल्या पण ताकदवान जमातीतल्या लोकांमध्ये बंदुकाचा वापर सर्वाधिक होतो आहे. याशिवाय गेल्या पंधरा-वीस वर्षांत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आला आहे. त्यांच्यामध्येही बंदुका बाळगण्याची क्रेज वाढतेय. म्हणजे, हे लोक आधी महागड्या गाड्या खरेदी करतात. ते झालं की, बंदुकीचा परवाना मिळवतात. मध्यंतरी उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयाकडे सादर प्रतिज्ञापत्रामध्ये असे जाहीर केले होते की, राज्य सरकारने आतापर्यंत ११,०२,११३ इतक्या जणांना ११,२२,८४४ हत्यारांचा परवाना जारी केला. त्यात काही महिन्यांतच परवाना मिळवलेल्यांनी ११.०४,७११ हत्यारं खरेदीसुद्धा केली. यातून उत्तर भारतीयांची बंदुकप्रियता उघड झालीच, पण प्रत्येक १८१ जणांमागे एकाकडे परवाना असलेले हत्यार आहे, ही धक्कादायक बाबही समोर आली. गोरखपूर विश्वविद्यालयातले मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. ए. के. सक्सेना म्हणतात, जो माणूस आतून असुरक्षित आहे, तोच आजच्या काळात बंदुका, रायफली आदींचा सर्वाधिक वापर करतोय. पूर्वीच्या काळी सत्तेचं प्रतीक म्हणून जमीनदार लोक घोडे-हत्ती आणि बंदुका बाळगायचे. आता लोक लक्झरी गाड्या आणि बंदुका बाळगतात. काळ बदललाय. मानसिकता तशीच आहे. जुनीपुराणी. म्हणूनच ती भयावह आहे. याच भयावहतेचा एक चेहरा साध्वी देवा ठाकूरच्या निमित्ताने समोर आला आहे. जो कमालीचा हिंस्र आहे आणि असंस्कृतही.

अवैध हत्यारांचा ढीग
अवैधरीत्या बंदूक-रायफली किंवा पिस्तुल बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र हा सर्व कागदोपत्री मामला ठरावा, अशी परिस्थिती देशात असल्याचा निष्कर्ष नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालाने काढला आहे. एनसीआरबीने २०१२ ते जानेवारी २०१५ या कालावधीत जमा केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, उत्तरप्रदेशातून १६ हजार ९२५ हत्यारं ताब्यात घेतली गेली आहेत. हीच संख्या बिहारमध्ये २२८३, प. बंगालमध्ये २०४२, जम्मू आणि काश्मीरमध्ये १८३०, आसाममध्ये १५७७, महाराष्ट्रात ११९३ आणि ईशान्येकडच्या मणिपूरमध्ये ११३६ इतकी आहे. अवैध हत्यारं बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्यांमध्येसुद्धा अर्थातच उ. प्रदेश आघाडीवर आहे. २०१५ पर्यंत विनापरवाना हत्यारं बाळगल्याप्रकरणी उ. प्रदेशातून २०१२० जणांना अटक करण्यात आली. हा आकडा बिहारमध्ये ११०३, प. बंगालमध्ये १९२७, जम्मू आणि काश्मीरमध्ये १९४, आसामध्ये ११५५, महाराष्ट्रामध्ये ९०५ आणि मणिपूरमध्ये १०७० असा आहे.

मनोजकुमार सिंग
manoj.singh2171@gmail.com
(लेखक गोरखपूर येथील "गोरखपूर न्यूज लाइन'चे संस्थापक- संपादक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...