आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजमनाची वस्तुनिष्‍ठ चिकित्सा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी कधी असे होते, की निव्वळ कुतूहलाने एखादे पुस्तक हातात घेतले जाते व वाचताना माहितीचा एक मोठा खजिनाच हाती लागतो. हेही पुस्तक कुतूहलापोटी हातात घेतले होते. वाचतानाच लक्षात आले होते की, मराठा जातीबद्दल ब-यापैकी चांगले विश्लेषण वाचायला मिळणार आहे व पुस्तक वाचल्यावर ही अपेक्षा पुरी झाली. वाचताना असेही वाटू लागले, की यावर चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. या पुस्तकाचे संपादक आहेत राम जगताप व सुशील धसकटे! अनेकदा असे बघण्यात येते की, एखाद्या विषयावरील काही लेख गोळा करून, ते वाचण्याची तसदीही न घेता, संपादित पुस्तक प्रकाशित केले जाते. त्यामुळे सर्वच लेखात पुनरुक्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. परंतु हे संपादन विषयाच्या जिव्हाळ्यापोटी व दुसरी कुठलीही आकांक्षा (वरील पद अथवा श्रेणी) न बाळगता केलेले असल्याकारणाने पुनरुक्ती टाळून पुस्तकाची वाचनीयता वाढलेली आहे. हे श्रेय संपादकांना निश्चितच द्यायला हवे. शिवाय त्यांची भूमिका त्यांनी मनोगतातच स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणतात, ‘तरुणवर्गाला जर काही भरीव कामगिरी करून दाखवायची असेल तर ‘संस्कृतीच्या अपरिवर्तनीय भ्रमापासून’ आणि ‘प्रादेशिक-भाषिक-जातीय अस्मिते’पासून त्यांनी दूर होण्याची गरज आहे.’ त्यासाठी या संग्रहात निवडलेले सर्वच लेख कठोर शब्दात मराठा माणसाची चिकित्सा करणारे आहेत. सर्व लेखांचा परामर्श घेणारी डॉ. सदानंद मो-यांची प्रस्तावना मुळातूनच वाचावी इतकी सुरेख आहे. या संग्रहात त्यांचा ‘मराठ्यांचे नायक’ या विषयावर एक सुंदर लेख आहे. त्यांनी तसेच इतरांनी सयाजीराव गायकवाड व महर्षी वि. रा. शिंदे यांच्या कामगिरीकडे मराठा नेत्यांनी व पर्यायाने मराठा समाजाने केलेल्या दुर्लक्षाविषयी लिहिले आहे.


लेखसंग्रहाचा उद्देशच मराठा समाजाला स्वमग्नतेतून व निष्क्रियतेतून जागे करणे हा असल्याने बहुतेक लेखांची भाषा कठोर आहे व ती तशी असणे गरजेचेच होते. डॉ. बाबा आढावांनी ब्राह्मणेतर चळवळीतील त्रुटी दाखवताना, शाहू महाराजांच्या भूमिकेतील त्रुटीही दाखवल्या आहेत. काळाच्या मानाने शाहू महाराज कितीतरी पुढे होते. परंतु स्वत:ला क्षत्रिय सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्यांच्याही प्रागतिक कृतींना मर्यादा पडल्या. आढाव म्हणतात की, जिथे शाहू महाराजांना मर्यादा पडल्या तिथे ब्राह्मणेतर चळवळ ब्राह्मणांना विरोध या पलीकडे जाऊ शकली नाही.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी- त्यात ब्राह्मण असता कामा नयेत- ही पूर्वअट बाबासाहेबांना मान्य नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे ब्राह्मण्य व अब्राह्मण यात फरक करणे ब्राह्मणेतर चळवळीला जमले नाही. त्याचप्रमाणे फुल्यांच्या सत्यशोधक समाजाला अभिप्रेत होते ते ब्राह्मणेतर जातींचे एकीकरण.
स्वत:च्या जातीबाहेर पडू न शकल्याने मराठ्यांना तेही शक्य झाले नाही. म्हणूनच ही चळवळ फक्त श्रीमंत व स्वत:ला शहाण्णव कुळी समजणा-या मराठ्यांचीच राहिली. हे म्हणणे आढावांप्रमाणेच इतर अनेक लेखांतून पुढे येते. आ. ह. साळुंखे यांनी मराठ्यांची सत्ता गेली हे बरेच झाले, असे एका टप्प्यावर प्रतिपादन केले आहे. त्यामागे त्यांची भूमिका स्वच्छ आहे. त्यांनी, रंगनाथ पठारे व शेषराव मोरे यांनीही हे वेगवेगळ्या शब्दांत म्हटले आहे की, मराठा समाजात शिक्षणाला महत्त्व नाही. साळुंखे म्हणतात की, सगेसोयरे आमदार, खासदार असल्याने त्यांच्या वशिल्याने नोकरी मिळेल; तेव्हा शिक्षणासाठी फारशी तोशीस घ्यायची जरूर नाही, असाच कल मराठा समाजातील तरुणांचा असतो. त्यामुळे त्यांचेच नुकसान होते. शेषराव मोरे यांनी स्वत:च्या कुटुंबाची व नातलगांची उदाहरणे देऊन ही बाब स्पष्ट केली आहे. एकेकाळी मो-यांच्या आजोबांच्या जवळ बरीच जमीन असली तरी आता वाटणी होता होता इतकी थोडी जमीन या पिढीच्या वाट्याला आली आहे, की त्यावर कुटुंबाची उपजीविका चालणे शक्य नाही. तरीही शिकण्याकडे कल नाही. पठारे म्हणतात की, शेतीत काबाडकष्ट उपसणा-यांची तरुण मुले शहरात शिकायला आल्यावर त्यांच्या दशांशानेही शिक्षणासाठी मेहनत घेत नाहीत. यामुळे बहुसंख्य मराठा समाज हा मागासलेला, गरीब व परंपरागत राहिला आहे. अविद्येने किती नुकसान होते ते फुल्यांनी सांगून ठेवलेच आहे. दीपाकर गुप्तांचे म्हणणे या प्रतिपादनाला छेद देणारे वाटते. त्यांच्या मते, महाराष्ट्राचा ग्रामीण भागही बदलला आहे व शिक्षणाविषयी आस्था व निकड वाढीला लागली आहे. तसेच असेल तर चांगलेच आहे. अर्थात, हे त्यांचे मत सर्व जातींविषयी असण्याची शक्यता आहे व मराठ्यांची स्थिती अजूनही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असण्याची शक्यता आहे.


स्त्रियांच्या स्थितीबद्दल ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्याशिवाय डॉ. बाबा आढावांचा दुसरा लेख ‘देशमुख मराठा स्त्रियांचे दास्य’ असा आहे. मराठ्यांचा खानदानीपणा स्त्रीच्या दास्यावरच टिकून आहे, हे या दोन्ही लेखांनी स्पष्ट केले आहे. स्त्रीच्या डोक्यावरचा पदर ढळता कामा नये, त्यांनी जास्त शिकण्याची गरज नाही, त्यांनी नोकरी करणे खानदानीपणाला बाधा आणते, विधवाविवाहाला मान्यता नाही, हे आजही मानले जाते. यापेक्षा वेगळा विचार आजही समाजमान्य नाही. अर्थात, जिथे अनैसर्गिक रूढींचे प्राबल्य असते तिथे भानगडींनाही भरपूर वाव असतो. या प्रकारांमुळे इतरही अनेक प्रश्न- जसे दासी वंश व रांडेच्या अवलादी- उभे राहतात. आढावांनी आपल्या लेखात अशी बरीच उदाहरणे दिली आहेत. कुमार सप्तर्षि आपल्या लेखात लिहितात की, ज्या दिवशी मराठा मुली पदवीपर्यंत शिक्षण पुरे करतील, अठराव्या वर्षानंतर लग्न करतील, त्या दिवशी मराठा समाजाच्या बदलाला सुरुवात होईल. आढाव म्हणतात तसे हे सर्व आपोआप कधीच होत नसते. कारण समाज बदलाला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे लागते.


या पुस्तकात ब्राह्मण व महार समाजाचे उदाहरण दिले आहे. या दोन्ही समाजात शिक्षणप्रसार एखाद्या चळवळीप्रमाणे फैलावल्याचे आढळेल. कारण एखाद-दुस-या व्यक्तीच्या शिक्षणामुळे समाज बदलत नसतो, त्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणावर हे बदल स्वीकारावे लागतात. त्याऐवजी बाळासाहेब विखे-पाटील म्हणतात, ‘राखीव जागा याच आपल्या विकासातील अडसर आहेत, अशी धारणा घेऊन हा समाज वावरतो आहे. नव्या वाटा शोधण्याऐवजी राखीव जागांना विरोध हेच राजकारण झाले, शिवाय राजसत्ता हाती असतानाही मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची तसदी या समाजातील नेत्यांनी कधी घेतली नाही.’ विखे-पाटील पुढे म्हणतात, की पुढा-यांनी तरुणांना फक्त स्वत:च्या मागे उभे राहून ‘बोंबा’ मारायला तेवढे शिकवले. सामाजिक सुधारणा व शिक्षण हे चळवळीसारखे समाजात पसरले पाहिजे, असा सूर यातील लेखांचा वाटतो.
मराठा समाजाने अंतर्मुख होऊन विचार करावा, असे बरेच या लेखसंग्रहात मिळेल. तरीही कोकणी मराठ्यांविषयी यात काहीच नाही. त्यांची परिस्थिती आणखी वेगळी आहे. कदाचित एवढी वाईट नसावी. अर्थात कोकणाव्यतिरिक्तही मराठा समाज खूप मोठा आहे व संपादकांनी म्हटल्याप्रमाणे या समाजाने प्रगती केल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणे अशक्य आहे अथवा सध्या चाललेली अधोगती थांबवणेही अवघड आहे. म्हणूनच मराठी समाजाविषयी आस्था बाळगणा-या प्रत्येकाला हे पुस्तक वाचावेसे वाटावे व त्यावर चर्चा करावीशी वाटावी. त्यासाठी परत एकदा संपादकांचे आभार.


मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा
संपादक-राम जगताप, सुशील धसकटे
राजहंस प्रकाशन पुणे. मूल्य- 200 रुपये.