आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ परिचय: सुन्न आत्मवृत्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शस्त्राचं बळ, संपत्तीचं बळ, शब्दांचं बळ यापेक्षाही आत्मबळ किती श्रेष्ठ आणि शाश्वत असतं, याचा साक्षात्कार घडविणारं हे लेखन आहे. यातील शब्दाला घामाचा गंध आहे. प्रेमाचा ओलावा आहे. त्यागाचा स्पर्श आहे. आणि समर्पणाचे तेज आहे.
झुंज या एकाच शब्दात ‘जू’ या आत्मकथनाचे वर्णन करता येईल. एका निरक्षर आणि निराधार माउलीने थकणारे हात अन् अभंग मनोबल यांच्या बळावर आपल्या लहानग्यांच्या सोबतीनं सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज दिली आहे आणि संकटांनाच पराभूत केले आहे. तिने झुंज दिली भुकेशी, दारिद्र्याशी, नियतीशी, नात्यागोत्यातील माणसांशी. नवरा म्हणून जीवनात आलेल्या नराधमाशी. जिवापाड सांभाळण्याचा प्रयत्न करूनही विस्कटून गेलेल्या संसाराला चूड लावणाऱ्या साऱ्या विपरीततेशी. ‘जो दु:खाने दु:खी होत नाही तो दु:खाला दु:खी करतो!’ या कविवचनाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे, श्रमदेवता म्हणून पुजावी, अशी ही लेखकाची आई. शस्त्राचं बळ, संपत्तीचं बळ, शब्दांचं बळ यापेक्षाही आत्मबळ किती श्रेष्ठ आणि शाश्वत असतं, याचा साक्षात्कार घडविणारं हे लेखन आहे. यातील शब्दाला घामाचा गंध आहे. प्रेमाचा ओलावा आहे. त्यागाचा स्पर्श आहे आणि समर्पणाचे तेज आहे. ‘आई’ या शब्दाचे विस्तारलेले तेजस्वी आभाळ म्हणजे, हे आत्मवृत्त आहे.
डॉ. द. ता. भोसले यांनी सार्थ शब्दांत ‘जू’ची पाठराखण केलेली आहे. ‘जू’ हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन. नव्या पिढीतला एक आश्वासक कवी म्हणून ऐश्वर्य पाटेकर आता मराठी साहित्य जगताला पुरेसे परिचित झालेले आहेत.
चार माझ्या लेकी चार गावच्या बारवा
अन् माझा गं लेक मधी जोंधळा हिरवा
यातला हिरवा जोंधळा म्हणजेच, ऐश्वर्य पाटेकर, अर्थात ‘भावड्या’ आणि चार गावच्या बारवा म्हणजे, भावड्याच्या चार बहिणी. याच लोकगीताच्या सोबतीने ऐश्वर्य पाटेकर यांनी अनुभवांचं वारूळ खोदून समोर ठेवलं आहे.
माणसाच्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग येत नाहीत, असे नाही; मात्र सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडत नाही, असे जगणे लेखकाची आई, बहिणी अन्् खुद्द लेखकाच्या वाट्याला आलेले आहे. नव्हे परिस्थितीनं त्यांच्यावर लादले आहे. यास प्रतीकात्मकपणे ‘जू’ म्हटलेले आहे. हे ‘जू’ एक नाही, तर असंख्य आहेत, त्यांच्या मानेवर. बाप असूनही बिनबापाचं म्हणत हिणवणारं ‘जू’. अवघड परिस्थितीच्या जुलमाचं ‘जू’. पाची भावंडांचं बालपण हिरावून घेणारं ‘जू’. पाठीपोटावरच्या माराचं ‘जू’. भाकरीचं ‘जू’. व्यथेचं ‘जू’. दारिद्र्याचं ‘जू’. अशी अनेक ‘जू’ मानेवर बाळगणारी आई अन् तिची पाच लेकरं. त्यांची दु:खाच्या विरुद्ध लढण्याची ही गोष्ट आहे.
आपल्या बापाला बाप का म्हणावं? असा प्रश्न पाचही भावंडांना पडावा, असं या गृहस्थाचं वागणं आहे. तसा हा माणूस बऱ्यापैकी शिकलेला आहे, शिवाय पगारी नोकरदार आहे. दुसरा विवाह करून त्यानं लेखकाची आई अन्् तिच्या पाच लेकरांना वाळीत टाकलेलं आहे. लेखकाची आई मात्र त्याच गावात राहून पाचही लेकरांचा कसाबसा उदरनिर्वाह करते आहे. तिच्या या नवऱ्याचं दुसऱ्या बायकोशी भांडण झालं, की तो दोन-चार दिवसांसाठी यांच्याकडे येतो. दारूचा अड्डा जमा करून राजरोस दारू ढोसत बसतो. ज्यांची कवडीची जबाबदारी निभावत नसतानाही; उलट लेखकाच्या आईचे अन् तिच्या लेकींचे मोलमजुरीचे पैसे कधी हिकमतीने, तर कधी हाणमार करून हिसकावून घेतो.
या लेकरांच्या मनातून हा बाप पूर्णतः उतरून गेला आहे. एकदा भावड्या आणि पमी ‘बगळ्या बगळ्या कवडी दे!’चा खेळ खेळत असतात. त्यातील भावड्याचं निवेदन फार बोलकं आहे. ‘पमे, बगळ्यानं माला कवडी देली, नस्ती तं नस्ती देली! म्या त्याला कायी म्हण्लो नस्तो, पण त्यानं बापाला का धाडून देलं? आता आपल्या आईला नाहक मार खावा लागल!’ थोडक्यात सांगायचं, तर या पाचही भावंडांनी बापाला बाप म्हणून मनानं नाकारलेलं आहे. मात्र लेखकाच्या आईनं नवऱ्याला नवरा म्हणून नाकारलेलं नाही. लेकराबाळांच्या मायाजाळाची पक्की पायखुटी तिच्या पायात घातलेली आहे. त्यामुळे तिचा नाइलाज झालेला आहे.
भूक आणि मारझोड पाचवीलाच पुजल्यासारखी. घरात नेहमीच पिठाला मीठ लागतेच, असे नाही. अशा वेळी कधी उपाशी, तर कधी अर्धपोटी राहावं लागतं. कधी शेजाऱ्याकडून मागून आणलेले अपुरे अन्न खाऊन कशीबशी भूक भागवावी लागते. भुकेची अनंत रूपे ऐश्वर्य पाटेकरांनी रेखाटलेली आहेत. आपल्या आईला अन् आक्काला अनेकदा उपाशी राहावं लागतं. म्हणूनच भावड्या म्हणतो, ‘आई अन् आक्काकडून उपाशी राहण्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे!’ या लेकरांना स्वन पडतं तेही भुकेचंच. कुणीही उठावं अन्् अमानुषपणे मारहाण करावी, हे तर नित्याचंच आहे. बाप, आजी, चुलते, आत्या, आत्याचा नवरा हे त्यात सतत भागीदार झालेले दिसतात. नुसताच मार खाण्यासाठी या मायलेकरांचा जन्म झाला आहे की काय? असे वाटायला लावणारे कितीतरी प्रसंग या आत्मकथनात लेखकाने चितारलेले आहेत.
माई आणि आक्काचं आयुष्य आईसारखंच अंधारात बुडालंय. या दोघींच्या तुलनेत तावडी मात्र नशीबवान निघते. एक तर ती ठोशास ठोसा देण्याच्या वृत्तीची आहे. त्यामुळे ती तिच्या खाष्ट सासूची अन् दिराची डाळ कधीच शिजू देत नाही. भावड्याच्या शिक्षणासाठी ती त्याच्यामागे ठामपणे उभी राहते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, तिचा नवरा सालस, निर्व्यसनी आहे. तावडीच्या घरी राहूनच भावड्या मॅट्रिकची परीक्षा पास होऊ शकला. आतापर्यत मानेवर लादलेलं ‘जू’चं ओझं उतरवून ठेवण्याची हिंमत त्याच्यात येते.
भावड्या चौथी इयत्तेत शिकत असल्यापासून कविता लिहू लागला. मात्र त्याच्या कवितांची उपेक्षा झाली. बापानं भावड्याचं कौतुक करावं, म्हणून पमी मोठ्या अपेक्षेनं भावड्याच्या कवितांची वही बापाला दाखवते. मात्र बाप ती वही चुलीतल्या विस्तवात टाकून देतो. ती वही बाहेर काढताना तावडीचा हात भाजतो. पुढे याच तावडीच्या घरी शिकायला असताना देवळ्याच्या हायस्कूलमध्ये भावड्याच्या कवितांची दखल घेतली जाऊ लागते. संस्थाचालक रामराव आहेर सरांनी केलेल्या कौतुकामुळे भावड्याचा ‘ऐश्वर्य पाटेकर’ होण्याच्या दिशेनं दमदार प्रवास सुरू होतो.
‘जू’ची एकूण ५० प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाला अन्वर्थक शीर्षक आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीच्या त्या त्या प्रकरणाच्या आशयाला कवेत घेणाऱ्या काही अर्थपूर्ण, काव्यात्म ओळी आहेत. ३८३ पृष्ठांच्या या
प्रदीर्घ आत्मकथनात आपलं मॅट्रिकपर्यंतचं जगणं पाटेकरांनी शब्दबद्ध केलं आहे. वयाच्या पंधरा-सोळा वर्षापर्यंतचं जगणं एवढ्या प्रदीर्घ स्वरूपात शब्दबद्ध करणारं कदाचित मराठीतलं हे पहिलं आत्मकथन असावं. अनेक घटना-प्रसंगांनी उभं
राहिलेलं हे आत्मकथन वाचकाला अनेक अर्थांनी चक्रावून टाकतं, हे मात्र निर्विवाद!
‘जू’
लेखक : ऐश्वर्य पाटेकर
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
पृष्ठे : ३८३
किंमत : रु. ३७५/-
रा. रं. बोराडे
raosaheborade@gmail.com
बातम्या आणखी आहेत...