आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ परिचय: क्रांतीचा दस्तऐवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मनोविकास प्रकाशन’ने ‘शहीद भगतसिंह समग्र वाङ‌्मय’ हा दत्ता देसाई संपादित ग्रंथ २३ मार्च २०१६ रोजी विस्तारित दस्तऐवजांसह आकारास आणला. दस्ताऐवजांचा मूळ आशय जिवंत ठेवून डॉ. रूचा कांबळे आणि डॉ. रेणुका ओझरकर यांनी केलेला अनुवाद मराठी तरुणांना, अभ्यासकांना भावेल, असा आहे.
फक्त साडेतेवीस वर्षांचा जीवनकाल लाभलेल्या शहीद भगतसिंहांच्या क्रांतिकारी विचारांची ज्योत सर्वांच्या ठायी अखंड पेटती ठेवण्यासाठी न्या. पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील ‘शहीद भगतसिंह जन्मशताब्दी समिती, महाराष्ट्र’ने पुढाकार घेतला. भगतसिंहांचे समग्र वाङ‌्मय ग्रंथरूपाने मराठी वाचकांना अल्प दरात उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे समितीने पाठपुरावा केला. मात्र ‘काही तांत्रिक कारणे’ पुढे करून शासनाने ग्रंथ निर्मितीस अर्थसाहाय्य देण्यात उदासीनता दाखवली. अखेर ठरल्या नियोजनानुसार ‘मनोविकास प्रकाशन’ने ‘शहीद भगतसिंह समग्र वाङ‌्मय’ हा दत्ता देसाई संपादित ग्रंथ २३ मार्च २०१६ रोजी विस्तारित दस्तऐवजांसह आकारास आणला. दस्ताऐवजांचा मूळ आशय जिवंत ठेवून डॉ. रुचा कांबळे आणि डॉ. रेणुका ओझरकर यांनी केलेला अनुवाद मराठी तरुणांना, अभ्यासकांना भावेल, असा आहे.

हा ग्रंथ रंजन करत नाही, तर भगतसिंहांसह त्यांचे समकालीन क्रांतिकारी आणि पारतंत्र्यात भारावलेल्या वातावरणाचे दर्शन घडवतो. प्रख्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. चमनलाल यांच्याकडून १२३ मूळ दस्तऐवज मिळवून, त्यांची घटनांच्या महत्त्वानुसार संपादक देसाई यांनी उत्तमरीतीने मांडणी केली आहे. अभ्यासपूर्ण परिश्रम, गुंतागुंतीचे नि क्लिष्ट संपादनाचे काम पाहता देसाई यांनी ग्रंथाला योग्य न्याय दिल्याचे वाचनांती ध्यानात येते. न्या. पी. बी. सावंत यांनी देशातील आजच्या स्थितीला धरून भगतसिंहांच्या विचारांवर अभ्यासपूर्वक प्रस्तावनेत आजच्या युवकांसाठी केलेले आवाहनही अत्यंत प्रेरणादायी आहे.

विद्यार्थी युवकांसाठी संदेश, स्वातंत्र्यासाठीचे उठाव : इतिहासावर एक दृष्टिक्षेप, राजकीय कार्याचे प्रतिबिंब, आमूलाग्र समाजक्रांतीचा विचार, क्रांतिकारी नैतिकता, धर्म, जात आणि राजकारण, भाषा, साहित्य व समाज, आंतरराष्ट्रीय विचार, क्रांतिकारी चिंतन व अभ्यास, व्यक्तिमत्त्व दर्शन : काही पत्रे, शहीद भगतसिंह : जीवनपट आणि पूरक वाचन यादी अशा बारा प्रकरणांमध्ये हा ग्रंथ विभागला आहे.

स्वातंत्र्यानंतर भारतात समाजवादी लोकशाही निर्माण करून आणि धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याचा शहीद भगतसिंहांचा उद्देश होता. समाजव्यवस्थेतील वर्ग, वर्ण, जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश आणि लिंग यांच्याशी निगडित भेद नष्ट करण्यासाठी त्यांनी समविचारी युवकांचे संघटन करून क्रांतिकारी चळवळीचा कार्यक्रम हाती घेतला होता. केवळ इंग्रजांना हाकलून देशवासीयांच्या हाती सत्ता देणे, हा त्यांचा उद्देश नव्हता. देशात कष्टकऱ्यांचे समाजवादी लोकशाही सरकार निर्मितीचे भगतसिंहांचे ध्येय होते. आजची देशातील स्थिती पाहता त्यांचे सर्वांना स्मरण होणे अपरिहार्य ठरेल.

ब्रिटिशांनी कोणालाही केवळ संशयावरून चौकशीविना अटकेच्या पोलिस अधिकारासाठी ‘रौलेट कायदा’ जाहीर केला. त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सारा देश पेटून उठला होता. त्याच दिवशी १३ एप्रिल १९१९ रोजी चोहोबाजूंनी बंदिस्त जालियनवाला बागेत सभेस जमलेल्या निशस्त्र जमावावर इंग्रज सेनानी जनरल डायर याने अमानुष गोळीबार केला. त्यात महिला, लहान मुले, तरुण आणि शेकडो लोक ठार झाले. भारतभर असंतोषाची लाट पसरली. परिणामी इंग्रजांविरुद्ध भारतव्यापी आंदोलनामध्ये जहाल आणि मवाळ क्रांतिकारकांच्या चळवळीचे दुहेरी मतप्रवाहही उदयास आले.

काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकांना असहकार चळवळीत सहभागी होण्याची हाक दिली. त्या वेळी केवळ तेरा वर्षीय सातवीतल्या भगतसिंहांनी (जन्म : २८ सप्टेंबर १९०७ – मृत्यू : २३ मार्च १९३१) यांनी प्रथम असहकार आंदोलनात उडी घेतली. तरुणांचे प्रभावी संघटन, विदेशी कपड्यांची होळी आणि स्वदेशी खादीचा प्रचार सुरू केला. कौटुंबिक चळवळीचे वातावरण भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांसाठी पूरक ठरले. कर्तारसिंह सराभा यांच्या जहाल विचारसरणीचा प्रभाव भगतसिंहांच्या क्रांतिकारी विचारांना बळ देणारा ठरला. सराभांना गुरुस्थानी मानून भगतसिंहांनी इंग्रज विरोधी चळवळीची दिशा निश्चित केली.

लाहोरला सायमन कमिशनच्या विरोधात ज्येष्ठ राष्ट्रीय नेते लाला लजपतराय यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनादरम्यान लाहोरचे पोलिस प्रमुख स्कॉट याने लाला लजपतराय यांना बेदम लाठीमार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले, पुढे अठराव्या दिवशी १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. इंग्रजांच्या दंडेलशाहीविरोधात भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, राजगोपाल, बटुकेश्वर दत्त आणि चंद्रशेखर आझाद आदी समविचारी तरुणांच्या मनात क्रांतिकारी बंडाची भावना अधिक तीव्रपणे प्रबळ झाली. त्यातूनच स्कॉटच्या हत्येचा कट रचण्यात आला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर महिन्याने हत्येच्या ठरलेल्या दिवशी १८ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर सचिवालयाजवळ भगतसिंह आणि राजगुरू स्कॉटच्या प्रतीक्षेत होते. एक इंग्रज तरुण अधिकारी मोटारसायकलवर येत असल्याचा इशारा मिळताच राजगुरू यांनी स्कॉट समजून त्याला गोळी घातली. तो खाली कोसळताच भगतसिंहानी त्याच्याजवळ जाऊन पुन्हा गोळ्या झाडल्यानंतर तो मरण पावला. मृत पोलिस प्रमुख स्कॉट नसून पोलिस उपअधीक्षक साँडर्स असल्याचे लक्षात आले. लाला लजपतराय यांना मारहाण करताना स्कॉटच्या दिमतीला साँडर्स होता. साँडर्स हत्येच्या समर्थनाची पत्रके वाटून भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव निसटले. भूमिगत राहून भारतीय तरुणांच्या मनात क्रांतिकारी प्रखर विचारांची पेरणी चालूच होती.

दरम्यान, ८ एप्रिल १९२९ रोजी असेंब्लीत औद्योगिक कलह आणि सार्वजनिक सुरक्षा विधेयक पारीत झाल्याचे जाहीर होताच, भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात बाँब फेकला. त्यात केवळ एक-दोघे किरकोळ जखमी झाले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. त्यांना निसटणे शक्य असूनही धूर ओसरल्यानंतर भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. तुरुंगात भगतसिंहांनी ‘आत्मकथा’, ‘दि डोअर टु डेथ’, ‘दि आयडियल ऑफ सोशलिझम’ आणि ‘स्वाधीनता संग्राम में पंजाब का पहला उभार’ अशा चार पुस्तकांचे लेखन केले. पुढे ७ ऑक्टोबर १९३० रोजी साँडर्स हत्येच्या निकालात भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. तिघेही भारताच्या स्वातंत्र्यासाठी २३ मार्च १९३१ रोजी हसतमुखाने लाहोर तुरुंगात फासावर चढले.
हा सगळा क्रांतीच्या पाऊलखुणा नोंदवणारा ऐवज ग्रंथाचे वैशिष्ट्यही आहे आणि वेगळेपणही. अर्थातच याचा उपयोग वर्तमानातल्या समस्यांवर भूतकाळातले उपाय योजण्यासाठी नव्हे तर विचारसरणी आणि कृतीतील ठामपणा कळण्यासाठी व्हावा, ही अपेक्षा रास्त ठरावी.
ग्रंथाचे नाव : शहीद भगतसिंह समग्र वाङ‌्मय
संपादक : दत्ता देसाई
मूळ दस्तऐवजांचा स्रोत : प्रा. चमनलाल
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
मूल्य : रु. ४९९/-
यशवंत पोपळे
yashwant.pople@gmail.com
बातम्या आणखी आहेत...