आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अंडरग्राऊंड' सेनापतीचे सांस्कृतिक (मो)हल्ले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं प्रत्येक दशकात त्या त्या काळाच्या निकषावर मूल्यमापन करीत राहणं, हा समाजाचा स्थायीभाव. त्यावर सातत्यानं संशोधन केलं जात असतं. नवीन संदर्भ शोधले जातात. जुन्या संदर्भांना नवे अर्थ, नवे आयाम प्राप्त करून दिले जातात. हे दशकानुदशके सुरू आहे. मग या संशोधनाचं भवितव्य त्याचे अन्वयार्थ लावून समाजापुढे मांडणार्‍या समूहाच्या सदसद्विवेकबुद्धीवरच अवलंबून असतं. अर्थात, हे संशोधन ज्या समाजासाठी केलेलं असतं, तो त्या भांडारापर्यंत पोहोचतच नाही; किंबहुना तो सहज पोहोचू शकेल अशी यंत्रणाच उभी केली जात नाही. त्याच्यापर्यंत काय पोहोचवलं जातं? सोप्या, साध्या आणि गोष्टीरूपातील अद्भुत घटना पोहोचवल्या जातात. ज्या चारपाच घटना मिळून त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेचं केवळ ‘दैवी’ मूर्त रूप त्या भाबड्या समाजाच्या मनात तयार होऊन जातं आणि त्या घटना म्हणजेच त्या विभूतीचा संपूर्ण इतिहास आहे, असा त्याचा समज होऊन जातो. त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या अजोड विचारांना पारदर्शीपणानं समाजापुढे ठेवण्याऐवजी त्या समाजाला त्या व्यक्तिरेखांबद्दल पूर्णत: श्रद्धाळू बनविण्यात आलं. आणि हे ‘श्रद्धाळूपण’ इतकं घट्ट झालं, की त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वानं ‘माणूस’ म्हणून केलेलं कार्य, मांडलेले विचार त्याच्या भोवताली गुंफलेल्या सुरस, चमत्कारिक कथांच्या गदारोळात हरवून गेले. हे हरवलेलं सत्त्व जेव्हा जेव्हा कलाकृतीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तेव्हा त्या प्रयत्नांवर भाबड्या श्रद्धाळूंच्या चतुर अंडरग्राउंड सेनापतींनी हल्ले चढविले. मग ते कालचं ‘घाशीराम’ असो वा आजचं ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ असो. मग तो हल्ला नाट्यगृहात केलेला असो वा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळानं तपासून परवानगी दिलेली संहिता तपासण्यासाठी केलेली मागणी असो. ही हिंसा आहे. त्याला दुसरं नाव देता येणारच नाही. आणि ती आपण बहुसंख्येनं निमूटपणे सहन करीत बघत आहोत, ही त्याहून लाजिरवाणी बाब.
फॉर्म वेगवेगळे असले तरी प्रत्येक कलाकृती आपल्या ठायी काही वेगळी विचारमूल्ये घेऊन येत असते. शाहीर संभाजी भगत, नंदू माधव ही सामाजिक चाड असलेली कलावंत मंडळी आहेत. पुण्या-मुंबईच्या कुठल्याही नाट्यशास्त्राच्या शाळेत न शिकलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मुलांना थेट बांधावरून रंगमंचावर घेऊन येताना या मुलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची महान विचारसरणी या महाराष्‍ट्रापुढे नव्यानं मांडणं ही खरोखरच काळाची गरज होती, हे ‘शिवाजी अंडरग्राउंड’च्या आजवरच्या असंख्य प्रयोगातून, खेड्यापाड्यातून बहुजनांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून सिद्ध झालंय. हे लोकनाट्य आहे. शाहिरी जलशातून साकारलेलं पारंपरिक विचारनाट्य आहे. लोकपरंपरांपासून, लोककलांपासून दूर गेलेल्या विशिष्ट नागरी समूहाला गावाकडची इरसाल भाषा, मौखिक परंपरेतून चालत आलेलं ज्ञान, त्यातील उपरोध, भाषासौंदर्य, याचा फारसा गंधही नाही. जे काही माहीत असेल, ते ग्रंथातून किंवा अन्य माध्यमातून. अतुल पेठेंनी महात्मा फुलेंवर साकारलेलं ‘सत्यशोधक’ हेही त्याच परंपरेतलं अप्रतिम नाटक. अलीकडच्या काळात आलेली ही दोन्ही लोकपरंपरेच्या बाजातील नाटकं ही ऐतिहासिक थोर पुरुषांचं ‘दैवत्वा’चं पौराणिक आवरण बाजूला सारत त्यांच्यातील लखलखीत विचारसौंदर्याचं या महाराष्‍ट्राला दर्शन घडविणारी होती. भ्रामक कल्पनाविलासात रमलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. राम असो, कृष्ण असो, बुद्ध असो, संत तुकाराम असो, संत ज्ञानेश्वर असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, महात्मा फुले असोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत... प्रत्येक विभूतींना ‘पुराण’कथांमध्ये बंदिस्त करताना त्यांच्यावरच्या संशोधनाच्या वाटाही बंद करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. दैवत्वाचं आवरण देऊन त्यांच्या सामाजिक क्रांतीची, विचारांची चळवळही चातुर्यानं बाजूला सारली गेली. इतिहास हा पौराणिक कथांच्या मनोरंजक, अद्भुत वलयातून शिकण्याची सवय असलेल्या बहुजन समाजाला त्या दैवी भाबडेपणातून बाहेर काढू पाहण्याचे प्रयत्न हे प्रतिगामित्वाच्या आजवरच्या सत्तेला सुरुंग लावणारे असतात. म्हणूनच असे प्रयत्न उधळून लावण्याचे प्रकार घडत आले आहेत. शतकानुशतके असलेली ही ‘दैवी’ सत्ता संपण्याच्या भीतीतूनच हे हल्ले होतात. पुण्या-मुंबईपुरतं मर्यादित असलेलं नाटक आज शेतकरी, कष्टकर्‍यांच्या मुलांपर्यंत पोहोचलंय. हा त्यांचा हुंकार आहे. त्यांचा आवाज आहे. त्यांचा विचार आहे. खूप काळानंतर बोलते झालेयत ते. तेही अभ्यास करूनच.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असलेला बहुजन हिताचा ठाम विचार सर्वसामान्यांपर्यंत फार पोहोचलेलाच नाही. ऐतिहासिक व्यक्तिचित्र गोष्टीरूपातील धड्याच्या माध्यमातून फक्त शिकवलं गेलं. शूर, बुद्धिमान राजाच्या फक्त युद्धाच्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. परिणामी शिवरायांचा आदर्श राखणं म्हणजे जातीचा, धर्माचा अहंकार बाळगत हाती तलवारी घेऊन आक्रमक, हिंसक तरुणांच्या फळ्या उभ्या करणं, असा समज गेल्या काही दशकात पसरत गेला. क्रांतिकारक विचार आणि तत्त्वांची तितकीच ताकदीची बैठक असा अतिशय दुर्मिळ मिलाप असलेलं छत्रपतींचं व्यक्तिमत्त्व आजवर काही अपवाद वगळता एकांगीच चितारलं गेलं. राजे हे सर्वसामान्यांचे, बहुजनांचे कैवारी होते, या वाक्यापलीकडे फारसं पोहोचू दिलं गेलं नाही. महाराजांची सर्वसमावेशकता आणि धर्मनिरपेक्षता बाहेर आली तर बहुजनांवरील आजवरची पकड सैल होईल की काय, अशीच भीती ‘कथित सत्तेला’ वाटत आलीय. महाराजांची आद्य समाजसुधारकाची, धर्मनिरपेक्षतेची आजवर फार बाहेर येऊ न शकलेली लखलखीत बाजू ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या माध्यमातून जगापुढे आणणार्‍या निर्मात्याला, दिग्दर्शकाला, कलावंतांना सार्‍या महाराष्‍ट्रानं गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड दाद दिली आहे. अशा विचारनाट्याला थेट नाट्यगृहात जाऊन हिणकस पद्धतीनं विरोध करणारा हा समूह एक प्रकारे छत्रपतींचाच अपमान करीत आहे. सेन्सॉर संमत झालेल्या आणि छत्रपतींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा फार महत्त्वाचा पदर जगापुढे आणणार्‍या या नाटकाला विरोध करणार्‍यांना आधी मराठी संस्कृती समजून घ्यावी लागेल. शिवकालीन महाराष्टÑ समजून घ्यावा लागेल. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, वैचारिक या सर्व अंगांचा अभ्यास करून ‘छत्रपती’ समजून घ्यावे लागतील. छत्रपती ज्यांनी ज्यांनी उमजून घेतले, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजून घेत समजावूनही दिले, त्यांचा अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजून न घेताही समजावून देण्याचा अट्टहास केला, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. ज्यांनी समजावून घेतले, पण समजावून देताना समजावून घेणार्‍यांच्या भाबडेपणाचा, अडाणीपणाचा गैरफायदा घेत स्वहित पाहत संदर्भच बदलून टाकले, त्यांचाही अभ्यास करावा लागेल. एवढं सारं करण्यासाठी निदर्शक ‘अभ्यासूंना’ आपल्या आयुष्याचा किती काळ द्यावा लागेल, याचा हिशेबही त्यांनी करून ठेवायला हवा. महानगरांपासून खेड्यापाड्यापर्यंतच्या सार्‍या महाराष्‍ट्रानं मनापासून स्वीकारलेल्या, आणि साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी ‘घाशीराम’नंतरचा मैलाचा दगड म्हणून कौतुक केलेल्या या नाटकाला अशा पद्धतीचा असंस्कृत विरोध होणं, ही घटना महाराष्‍ट्रातील या अशा विशिष्ट समूहाचं प्रतिगामित्व अधोरेखित करते. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना आधुनिक काळाच्या निकषावर घासून तपासत राहणं, मूल्यमापन करीत राहणं आणि त्या विचारांचं अस्सलत्व, श्रेष्ठत्व अबाधित ठेवत त्यांच्या कार्याला कृतज्ञ नमस्कार करीत राहणं, हेच खरं सुज्ञ समाजाचं, पुढारलेल्या समाजाचं लक्षण असतं. पण समाजाचं हे असं सुज्ञ होत जाणं आणि सुरक्षित होत जाणं हे अशा तथाकथित संस्कृतिरक्षकांना, त्यांच्या सत्तेला असुरक्षित वाटतं. म्हणूनच समाज सुजाण, सुज्ञ होण्याच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा सांस्कृतिक पातळीवरून असे प्रयत्न होऊ लागतात, तेव्हा तेव्हा ‘वर्चस्व’ गमावण्याच्या भीतीतून अशा प्रकारची सांस्कृतिक हिंसा घडविली जाऊ लागते! कालच्या ‘घाशीराम’पासून ते आजच्या सत्यशोधक, शिवाजी अंडरग्राउंडपर्यंतच्या बर्‍याच नाटकांनी थोर, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना नव्या आयामातून मांडलंय. इतिहास हा ‘पौराणिक कथांच्या भक्तियुक्त आवरणातून’ ऐकण्याची पारंपरिक ‘सांस्कृतिक सक्ती’ मोडीत काढू पाहणार्‍या अशा कलाकृती निर्भीडपणे येत राहणं आणि आपणही सुज्ञपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं, ही काळाची गरज आहे.

dattapatilnsk@gmail.com