आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गूढ तरीही हवाहवासा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या गावामधले राजकारण कुणाचा बळी घेते, कुणाला नादाला लावते, कुणाला दारूच्या आहारी नेते, तर कुणाला सत्ता बहाल करते. हा तसा नेहमीचाच विषय. शिवाय या विषयामध्ये स्त्री पात्र असले तर ‘स्त्री चरित्र खलू न जानती’ म्हणत चित्रपट आणखीनच गूढ होत जातो. या सगळ्या बाबींचा पुरेपूर वापर करून साकारलेला चित्रपट म्हणजे सत्य, सत्यवान आणि सावित्री. सर्वेश परब यांनी या चित्रपटातून दिग्दर्शनाची चुणूक दाखवली आहे. पण दिग्दर्शनापेक्षा कथाच अधिक सशक्त जाणवते. नावावरून चित्रपट पुराणाशी संबंधित वाटला तरी या चित्रपटातले सत्यवान आणि सावित्री हे अत्यंत आधुनिक आहेत. मात्र ही ना पतिव्रतेची कहाणी, ना कुणा सत्यवानाच्या परत येण्याची. या चित्रपटातला मृत, खून झालेला पती परत येत नाही आणि त्याच्या जाण्यावरही खरे तर हा चित्रपट नाही, असे शेवटी शेवटी कळायला लागते. या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यात पूर्णवेळ वाजत असलेले पार्श्वसंगीत आणि मुख्य कलाकारांचा देखणा अभिनय. अमृता पत्की, सचित पाटील आणि श्रुती मराठे या कलाकारांभोवती फिरणारा हा चित्रपट शेवटपर्यंत रहस्य टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो.
हा चित्रपट सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत रहस्याच्या कोणत्याही खुणा स्पष्ट करत नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातली रहस्यमय वळणे ही केवळ एकाच व्यक्तीपाशी येऊन थांबतात, हेदेखील शेवटच्या क्षणापर्यंत उघड करत नाही, ही या चित्रपटाची जमेची बाजू. राजकारणातील मतभेद काही जणांमध्ये क्षणिक वैमनस्य निर्माण करतात, त्यातून खून होतात. त्यात कुठल्याही प्रकारे सहभागी नसलेली निर्दोष पात्रे आपले राजकारण खेळून घेतात. हे राजकारण खेळत असताना स्त्री पात्रांचा केलेला वापर हा जसा खलनायकांना पोषक ठरतो, तसाच नायकांनाही. सचितने निभावलेली सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका ही इन्स्पेक्टरपेक्षा कॉलेजगोइंग तरुणाची वाटावी इतका सचित कोवळा दिसतो. पण तरीही त्याने अभिनय उत्तम केला आहे. त्याच्या भूमिकेला असलेली फ्लर्टिनेसची हलकीशी झाक चित्रपटातला ताण थोडा कमी करते. चित्रपट संपल्यानंतर असलेल्या गाण्यामध्ये सचितच्या बरोबरीने श्रुती व अमृता दोघीही खुलून दिसल्या आहेत. अमृताला संवादफेक मात्र अद्याप जमलेली नाही.
सीआयडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेतून बारीकसारीक निरीक्षणांना चित्रपटात अधिक फोकस केले आहे. मात्र असे करणे चित्रपटाचे गुपित शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. चित्रपटातली अर्धी पात्रे ही गावंढळ भाषा बोलणारी आणि अर्धी पात्रे ही शहरी भाषा बोलणारी. त्यातून त्या त्या पात्राची जपलेली नैसर्गिकताच कधी-कधी कृत्रिम वाटायला लागते. उदा. सचितने सुनील गावसकर नाव धारण करून आपल्या टिपिकल टोनमध्ये शिवी घालणे आणि प्रदीप वेलणकरांनी काकासाहेबांच्या भूमिकेत जाऊन गावठी बोलणे. मात्र कथानकाचा हा महत्त्वाचा भाग नसल्याने त्याकडे फारसे लक्ष जात नाही. पूर्ण वेळ विविध पात्रांवर शंका घेऊन शेवटी गौप्यस्फोट घडवणे या प्रकारातला हा रहस्यपट सत्यवानाच्या सावित्रीची सत्यता तर जपतोच, शिवाय सत्य बाहेर आणताना त्यातली तर्कसंगतीही जपतो. मात्र कथानकातल्या मूळ गुन्ह्याच्या शोधासाठी वापरलेली तर्कसंगती मात्र अत्यंत बाळबोध आहे. तरीही या शोधातल्या तर्कसंगतीपेक्षा कथानकाचा शेवट मात्र अनपेक्षित आहे. श्रावणात ही सत्यवान-सावित्रीची कथा एक चांगली भेट ठरू शकेल.