आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Gazal,singing Taking Sammelan In Village

मराठी गझल, गायकीला गावकुसात नेणारं संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पाचशे घरांच्या आष्टगावात मराठी गझलचे खलिफा सुरेश भट गझलनगरीत ९ आणि 10 फेब्रुवारी रोजी सातवे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन प्रल्हाद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. पहिली सहा संमेलने मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद वाई , पणजी ( गोवा ) येथे झाली. गझलेसाठी आयुष्य वेचणा-या आणि ही संमेलने गझलसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभी करणा-या गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या जन्मगावी यंदाचे संमेलन व्हावे, हे या विशेष होय.

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो या गझलसम्राट सुरेश भटांच्या अमृताच्या रोपट्याला पांचाळेंनी गायकीचे खतपाणी घालून वाढवलेच नाही, तर गझल लिहिणा-या कवींची एक पिढी घडवीत गझलेचा हा वेलू रसिकमान्यतेच्या गगनावरी चढवला. या सर्व देशभर विखुरलेल्या गझलकारांचा सालाना मेळा म्हणजे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन.

उद्घाटक होते गल्फ महाराष्ट्र बिझिनेसचे अध्यक्ष संदीप कडवे (दुबई ). अध्यक्षस्थानी होते माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके. ज्येष्ठ शायर नसीम रिफ़ यत ग्वालियरी, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, न्या. मदन जोशी, विक्रीकर आयुक्त सुभाष इंगळे, गावच्या सरपंच कांता इंगळे यांची उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ‘गझलसागर’ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यात 222 कवींच्या गझला समाविष्ट आहेत.

ग्रामीण जीवन आणि गझलेवर परिसंवाद
अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात डॉ पुरुषोत्तम मालोदे यांनी गझलमध्ये शेती आणि शेतकरी यांच्या पलीकडे असलेले जीवन अजूनही आले नाही, अशी खंत व्यक्त केली. तर शिवाजी जवरे यांनी याउलट मत व्यक्त करीत म्हटले की, वैदर्भीय - मराठवाड्यातील गझलकारांच्या गझलांमधून ते जोरकसपणे आले आहे, पण शहरी सुसंस्कृत निरक्षरांच्या ते ध्यानात येत नाही. आम्ही आयना (उखाणा) या अर्थाने वापरतो, ते आरसा शोधत बसतात. हबीब यांनी अध्यक्षीय भाषणात, शेतक-यांना आत्महत्या न करता जगण्याचं बळ देणारी गझल निर्माण होण्याची मी वाट पाहतो आहे, असा आशावाद गझलबद्दल व्यक्त केला.

विदर्भाची लोकधारा : एक झलक
विदर्भातील लोककलांचा परिचय या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात भुलाबाईची गाणी, महादेवाची गाणी, नागोबाच्या बा-या बहिरमबुवाचा डहाका आणि दिवाळीची गौळण सादर करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्ता गावाचे मोलमजुरी करणारे राम भारती यांनी खास आपल्या व-हाडी बोलीतून करून रसिकांची मने जिंकली.

मुक्तांगण’मध्ये गझलच्या तंत्रावर चर्चा
दुस-या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गझलकारांचे भावविश्व व गझलच्या भावी वाटचालीची दिशा या तीन विषयांवर संदीप कडवे यांच्या अध्यक्षतेत चर्चा, विविध प्रश्न, वादविवाद आणि गजलच्या आस्थेपोटी हिरिरीने बोलणारे श्रोते यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगली. यात संगीता जोशी , घनश्याम भेंडे , ए. के. शेख , शिवराय कुलकर्णी यांचा सहभाग होता.

गझलगायन मैफल
सुनील परळीकर, दत्ता डोईफोडे, सूरज सिंघ (लुधियाना) यांच्यासह भाग्यश्री पांचाळे आणि अकोल्याच्या आठवर्षीय कीर्र्ती पिंपळकरने या मैफलीत रंग भरले. समारोपाच्या मैफलीत भीमरावांसोबत सुधाकर आंबुलकर, गिरीश ठाकूर, जगदीश मिस्त्री , संदीप कपूर यांनी चार चाँद लावले.

नव्या दमाचे गझलकार उदयाला येत आहेत
या संमेलनात दोन मुशायरे झाले. यात नव्या-जुन्या गझलकारांनी आपल्या गझला सादर करून श्रोत्यांची वाहव्वा मिळवीत, गझल सादरीकरणाची नवनवी उदाहरणे पेश केली. यात दिलीप पांढरीपट्टे , अरुण सांगोले, ए. के. शेख , डी. एन. गांगण, ज्योती बालिगा राव, अमेरिकेतून आलेल्या प्राजक्ता पटवर्धन , ललित सोनोने , संजय इंगळे तिगावकर , विद्यानंद हाडके , प्रमोद खराडे (अंध कवी ), विजय आव्हाड यांचा उल्लेख करावा लागेल.
या संमेलनाच्या निमित्ताने पांचाळेंनी आपल्या अजोड स्वरांनी सातासमुद्रापार नेलेली मराठी गझल आपल्या जन्मगावात गावकुसात आणून सोडली अन् तिच्यावर होणारी टीका निरर्थक ठरवीत ख-या अर्थाने गझलेला सामान्य रसिकांच्या दारी आणून सोडले आहे , असे म्हटले तर वावगे ठरू नये .

* गझलेचे शब्द विश्वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत, तसे ते क्रांतीची मशालही व्हावेत. आमची गझल समाजातील दु:ख, दैन्य व दारिद्र्य पाहून कळवळली पाहिजे, चिडली पाहिजे. आजचे गझलकार सुंदर रचना करतात, त्या काळजाला भिडतात. त्यांच्या प्रत्येक शेरावर नतमस्तक व्हावे. गझल विश्वात येत असलेली नवी पिढी ही या क्षेत्राचा अमूल्य ठेवा आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

संमेलनाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे


* ज्या गावाने मला मोठे केले, त्या गावात गझल संमेलन व्हावे हे स्वप्न होते. माझ्या गावासाठी काहीतरी करावे, या तळमळीतून हे संमेलन आयोजित केले . गेल्या 42 वर्षांपासून गझलगायनाचा प्रवास आता निर्णायक वळणावर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावकरी संमेलनासाठी राबत आहेत. दिवसरात्र एक करीत आहेत . गझलेवरील हे प्रेम पाहून भारावलो. महाराष्ट्रातील मराठी गझलांचा आगामी काळ हा सुवर्णकाळ आहे. नवोदितांनी नव्या उमेदीने त्यासाठी तयार व्हावे
गझलनवाज भीमराव पांचाळे

*मराठी गझलेत आमच्या आजच्या वर्तमानाचे, व्यथा-वेदनांचे प्रतिबिंब उमटायला हवे तेव्हाच ती प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि ती व्यापक होईल. महाराष्ट्रातील गझल म्हणजे काही व्यायामासारखा प्रकार नाही, तर ती जिवंत प्रतिमा आहे, हे लोकांपर्यंत पोहोचायला हवे.
माजी संमेलनाध्यक्ष
प्रा. वसंत आबाजी डहाके


* एक तरी गझल संमेलन भारताबाहेर म्हणजे आखातात दुबई येथे व्हावे. संयुक्त अरब अमिरातीचे राजे स्वत: कवी आहेत. तेथील राज्यकर्ते संवेदनशील आहेत. भावनांच्या प्रगटीकरणासाठी गझल हे प्रभावी माध्यम आहे. त्याचा प्रसार झाला पाहिजे.
संदीप कडवे, दुबई ,
गल्फ महाराष्ट्र बिझिनेसचे अध्यक्ष