आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी वैचारिकतेचा गोठलेला प्रवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनाचे जे आयाम आहेत, त्यातील ज्ञान या आयामाविषयीच्या सर्व घडामोडी म्हणजे वैचारिकता होय. मानवी ज्ञानाच्या गुप्तावस्थेत ज्ञानवेदन, सुप्तावस्थेत बुद्धी, प्रकटावस्थेत विचार, जागृतावस्थेत शहाणपण, उन्नतावस्थेत प्रज्ञा आणि मुक्तावस्थेत परमप्रज्ञा अशा सहा अवस्था असतात. वैचारिकतेत ज्ञानाच्या व ज्ञानीच्या या सहाही अवस्थांचा समावेश होतो. कुठल्याही संस्कृतीतील वैचारिकतेत विचारवंत, विचारमंथन, विचारप्रणालीकार आणि विचारकार यांना खास भूमिका असल्या, तरी मराठी समाजावर सर्वाधिक प्रभाव हा विचारप्रणालीकारांचाच आहे. (इथे विचारप्रणाली हा शब्द आयडिऑलॉजी या अर्थाने वापरला आहे.) सर्वसामान्य मनुष्य बुद्धिमान असतो, पण विचारवंत व्हायला तुम्ही काही नवीन विचार मांडणे गरजेचे असते. शहाणपणासाठी मात्र विचारांच्या पलीकडे जावे लागते. हे ‘पलीकडे जाणे’ ज्या विचारवंतांना जमत नाही, ते ज्ञानाच्या क्षेत्रात अनेकदा घोडचुका करतानाही दिसतात.


मराठीत विश्वीयतेने (अध्यात्म, दर्शन आणि धर्म) ज्ञानेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास असे विचारवंत जन्माला घातले असले, तरी विचारप्रणालीकार मात्र 19व्या शतकातच जन्माला आले. यामागची कारणे उघड आहेत. पहिले म्हणजे, विचारप्रणालीकार हा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतो व ज्ञानाची मांडणी करतो. तो शक्यतो संपूर्ण जीवनाच्या अर्थनिर्णयनाला (इंटरप्रिटेशन) कवटाळण्याचा प्रयत्न करतो. मराठी संस्कृतीत इंग्रज येण्यापूर्वी वैज्ञानिक ज्ञानपद्धतीचा दुष्काळच होता. त्यामुळे विचारप्रणालीकार जन्मलाच नाही. दुसरी गोष्ट मराठी संस्कृतीची दर्शन परंपरा ही प्रामुख्याने भक्तिप्रधान होती आणि आहे. भक्तीत देवाची चिकित्सा न करता श्रद्धा ठेवायची असल्याने देवाचे तार्किक विश्लेषण शक्यच नसते. त्यामुळेच ईश्वराची चिकित्सा करणारे एखादे पूर्ण दर्शन या परंपरेत उदयाला आलेच नाही. किंबहुना विचार करतो तो मूर्ख, अशी भक्तांची धारणा असल्याने कुणी विठ्ठल किंवा तत्सम देवाविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्यास, मराठी संस्कृती त्याला आजही पायताण काढून मारायला तयार आहे, असे दिसते. अर्थात, या दोन्हीपेक्षाही तिसरे एक ऐतिहासिक कारण म्हणजे, इंग्रज येण्यापूर्वी भारतात मराठ्यांचे राज्य होते व दिल्ली मराठ्यांच्याच टाचेखाली होती. त्यामुळे साहजिकच इंग्रजांकडून पराभूत होण्याचा फटका हा मराठी बुद्धीला तीव्रपणे बसला. आपण इंग्रजांकडून का हरलो, याची साधकबाधक चर्चा सुरूझाली. यातूनच बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी यांसारखे विचारवंत जन्मले आणि नंतर मराठीतील पहिला विचारप्रणालीकार जन्माला आला, तो म्हणजे महात्मा जोतिबा फुले. ज्या वेळी उच्चवर्णीय विचारवंत आपण इंग्रजांकडून का हरलो याचा विचार करीत होते, तेव्हा जोतिबा फुले यांनी संपूर्ण समाजाच्याच गुलामगिरीचा विचार केला आणि त्यातूनच सामाजिक सत्यांच्या शोधाची चळवळ उभी केली. त्यांच्या या सत्यशोधातून बहुजनवाद ही विचारप्रणाली जन्माला आली. या विचारप्रणालीने प्रथमच प्रस्थापित धर्माची वैज्ञानिक पद्धतीने बौद्धिक चिकित्सा करून ब्राह्मणेतर वर्णांना एकत्रितपणे एक वैचारिक चेहरा दिला.


फुले यांच्याच काळात न्या. रानडे यांनी मराठी संतांच्या भक्तीचळवळीची चिकित्सा केली, मराठी राज्याचा इतिहास शोधला, आणि त्यांच्या या अभ्यासातून एक सर्वसमावेशक उदारमतवाद जन्मला. हा सर्वसमावेशक उदारमतवाद वैष्णवांना धरून होता. त्यातूनच पुढे रानडे, गोखले, टिळक असे वैचारिक त्रिकूट निर्माण झाले आणि त्रिकुटाच्या वैचारिकतेतून काँग्रेसवाद ही प्रचंड मोठी विचारप्रणाली जन्माला आली. या काँग्रेसवादातूनच पुढे काँग्रेस पक्षही आकारास आला. ही सर्व चिकित्सा होत असतानाच प्राचीन भारत म्हणजे जणू काही सुवर्णभूमी होता आणि भारतीय परंपरा ही जगातील सर्वश्रेष्ठ परंपरा होती, असा देशी विचार करणारे काही लोक होतेच. जोतिबा फुल्यांनी जातीच्या अंगाने चिकित्सा केली होती. या परंपराप्रिय लोकांनी धर्माच्या अंगाने चिकित्सा करून हिंदुत्ववादाचा पाया रचला. या पायाच्या आधारे पुढे सावरकर, हेडगेवार, गोळवलकर या मराठी त्रिकुटाने हिंदुत्ववादाची मांडणी केली आणि काँग्रेसला समांतर अशी नवी विचारप्रणाली मराठी वैचारिकतेत अवतरली. बहुजनवाद, काँग्रेसवाद, हिंदुत्ववाद या तिन्ही विचारप्रणाली ईश्वरावर विश्वास ठेवणा-या होत्या. या ईश्वराला नाकारून पाश्चिमात्य देशातील जडवादाशी नाते सांगत श्रीपाद अमृत डांगे, बी. टी. रणदिवे या विचारप्रणालीकारांनी एक नवीन विचारप्रणाली जन्माला घातली; ती म्हणजे, भारतीय मार्क्सवाद होय. दुर्दैवाने हा मार्क्सवाद आवश्यक तितका भारतीय नव्हता. त्यामुळे लोकायत परंपरेशी त्याचे जे नाते जुळायला हवे होते ते जुळलेच नाही. मात्र या विचारप्रणालीने वर्ग ही गोष्ट चर्चेच्या केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न केला, जो आधीच्या विचारप्रणालींनी केला नव्हता.


या सर्व विचारप्रणालींच्या पार्श्वभूमीवर भारतात एक असा समूह अस्तित्वात होता, ज्याला ना धर्माचा अधिकार होता ना वर्गाचा पैसा होता, ना त्याचा वर्णात समावेश होता, आणि जो हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद यांच्यापासून अनेक मैल लांब होता; तो म्हणजे, ‘अस्पृश्यांचा’ समूह! या समूहातून जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व उदयाला आले, तेव्हा त्याला धर्म, वर्ण, जात आणि वर्ग यांच्या सर्वांगीण चिकित्सेची गरज भासली. त्यातूनच जिला ख-या अर्थाने सर्वांगीण विचारप्रणाली म्हणावी अशी विचारप्रणाली जन्माला आली; ती म्हणजे आंबेडकरवाद होय. ही विचारप्रणाली भक्तीच्या नावाने केवळ टीका करून थांबली नाही, तर तिने दार्शनिक परंपरेतील सर्व मराठी पंथांचा त्याग करून नवयान बौद्ध धर्माचा समांतर पर्याय दिला. तत्कालीन बौद्ध धर्मात महायान, हीनयान, वज्रयान असे काही संप्रदाय होते, पण आंबेडकरांनी नवयानाची मांडणी करून पारंपरिक बौद्ध धर्मालाही छेद दिला. हे करत असतानाच फुल्यांच्या विचारप्रणालीला पुढे नेत तिने शूद्र कोण होते आणि अस्पृश्य कोण होते, याचा ऐतिहासिक मागोवाही घेतला. त्यातूनच भारतीय इतिहासाची एक नवीन मांडणी पुढे आली. या विचारप्रणालीने मार्क्सचे जे चांगले आहे तेही शोषून घेतले; मात्र मार्क्सवादातून ध्वनित होणारी हुकूमशाही नाकारून लोकशाही समाजवाद स्वीकारला. एका अर्थाने हिंदुत्ववादाला ठाम नकार, काँग्रेसवाद, बहुजनवाद व मार्क्सवाद यांच्यातील जे जे उत्तम आहे ते आत्मसात करून त्याला अस्पृश्यांच्या भल्यासाठी वापरण्याची युक्ती व तिचा पाठपुरावा या विचारप्रणालीने केला.


भारताच्या आधुनिक वैचारिकतेचा विचार केला तर भारतातील सर्वच महत्त्वाच्या विचारप्रणाली या महाराष्ट्राने द्याव्यात, हा केवळ योगायोग नव्हे. आज भारतात जे काही प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील राजकीय पक्ष आहेत, ते मराठी वैचारिकतेने जन्माला घातलेलेच पक्ष आहेत. अशा वेळी, मराठीतील सर्व वैचारिकतेचा विचार करता म. गांधी नावाचा हा विचारवंत महाराष्ट्रातून यायला हवा होता, पण असे झाले नाही. मुळात गांधी हा फक्त वैश्यपणातूनच जन्माला येऊ शकतो, असा विचारवंत आहे. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात वैश्यांचे प्राबल्यच नव्हते. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून महाराष्ट्रात मराठी वैश्यांच्या हत्या झाल्या. त्या इतक्या, की खुद्द शिवाजी महाराजांनाही आपल्या राज्यात व्यापारवृद्धीसाठी मारवाडी आणि दाक्षिणात्य समाजाला (विशेषत: कर्नाटकातून) आमंत्रण द्यावे लागले. त्यामुळे ज्याला मराठी वैश्य म्हणावे, असे वैश्यच मराठी संस्कृतीत नाहीत. आता जे काही मराठी आडनावाचे वैश्य दिसतात, ते दक्षिणेतून आलेले वैश्य आहेत. मराठी वैश्यच अस्तित्वात नसल्याने मराठी संस्कृतीला वैश्यांविषयी आदर नाही. अध्यात्माच्या ओढीपायी व्यापाराकडे दुर्लक्ष करणारा तुकाराम हा मराठी माणसाचा केंद्रीय आदर्श आहे. उत्तर भारतातही संत मलुकदास झाला, पण तो केंद्रीय पुरुष नव्हता. तुकाराम वाणी मात्र केंद्रीय संस्कृतिपुरुष झाला. सर्वात विचित्र गुंता म्हणजे, पेशवाईच्या काळात पुण्यात राजधानी असूनही वैश्य फारसे नव्हते. पुरोहितांचे प्राबल्य असलेली ही अजिबोगरीब राजधानी होती. त्यामुळे खुद्द राजधानीतच फारसे वैश्य उरले नाहीत, आणि जे उरले ते ब्राह्मणांकडून पैसे वसूल करणारे सावकार होते. त्यामुळे साहजिकच ब्राह्मणांच्या नजरेत वैश्य दूरचेच राहिले. त्यांच्या अस्त पावलेल्या पेशवाईच्या आठवणींतून गांधी जन्मणे शक्यच नव्हते. वैश्य ही एक प्रॅक्टिकल कम्युनिटी आहे. नथुराम गोडसेने फक्त गांधींची हत्या केली नाही, तर वैश्य व्यावहारिकतेची हत्या केली. मराठी वैचारिकता आजतागायत या हत्येत गोठलेली आहे. ही गोठलेली अवस्थाच मराठीची खरी शत्रू ठरलेली आहे...