आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही मराठी बोलता!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ शाळेत म्हटल्या जाणार्‍या प्रतिज्ञेतील ‘सारे भारतीय’ शब्दांचा अर्थ काही वर्षांपूर्वी म्हणजेच लग्नापूर्वी माझे कुटुंब, परिसर आणि महाराष्ट्र इतकाच मर्यादित होता पण, आज तो बंगळुरूत आल्यानंतर विस्तारत आहे. मद्रासी, कानडी, तमिळ, मल्याळी संस्कृती परंपरा, भाषेशी वेगळं नातं जोडत आहे.
दक्षिणेकडील खाद्यसंस्कृती, सोन्या-चांदीची बरकत असणारी धर्मस्थळं, मनाला आल्हाददायक वाटणारा निसर्ग, भाषा आणि त्यावर असणारं संस्कृत आणि इंग्रजी भाषेचं वर्चस्व सुखद, तर कधी अचंबित करणार ठरत आहे. अशी अनेकविध आकर्षणे या परिसरात असूनही वावरताना मराठी भाषा आणि मराठी मन यांना भेटण्यासाठी माझी अवस्था ‘सागरा प्राण तळमळला’ यापेक्षा वेगळी नसते.
मी एकदा पार्कमध्ये राउंड मारत असताना ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’ स्वर कानी पडले आणि मी क्षणभर थबकले. जवळ जाऊन विचारले, ‘काकू, तुम्ही मराठी बोलता?’ ऐकून त्यांचीही अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. त्या वेळी प. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश की कानडीमिश्रित मराठी बोलणारे कर्नाटकी यांचा काहीही संबंध नव्हता. फक्त आणि फक्त ‘समभाषक’ भेटल्याचा आनंद होता.अशीच माझ्यासारखी अवस्था अनेक मराठी मनांची झाली असेल ना?
बाहेर फिरताना लहान मुलाने मारलेली ‘आई’ हाक ऐकून सहजच प्रश्न विचारला जातो - ‘तुम्ही मराठी बोलता?’ कोणत्याही प्रकारचा भाषिक मतभेद न ठेवता किंबहुना भाषेला कमी-जास्त न लेखता मला ओढ फक्त ‘मातृभाषेची’ असते. प्रादेशिक भाषा, राष्ट्रीय भाषा, आंतरराष्ट्रीय भाषा स्वीकारूनही मी ‘मातृभाषा’ ऐकण्यासाठी आसुसलेली असते. परप्रांतात राहत असताना मराठी संवाद हा कुटुंबाच्या बाहेर खूपच कमी प्रमाणात घडतो. अशा वेळी मी खूप अबोल झाले आहे, कारण बोलायला कुणी नसतेच ना? माझी मुलं खूप एककल्ली बनत आहेत, कारण घरी मोकळेपणाने येणे-जाणे कुणाचे नसतेच, अशा नानाविध तक्रारी ऐकावयास मिळतात. टीव्हीवरील मराठी कार्यक्रम, घरातील ग्रंथालय आणि महाराष्ट्र मंडळ हे एकाकीपण दूर करून ‘संवाद’ घडवण्याचे कार्य करताना आढळतात.
कर्नाटकात अनेक वर्षांपासून स्थायिक झालेली मंडळी ‘पूर्वज’ महाराष्ट्रात असल्याने आमची मातृभाषा ‘मराठी’ आहे, असे कानडी हेल काढून अभिमानाने सांगताना दिसतात. पण, ती कानडीमिश्रित असल्याने शुद्ध नाही म्हणून हळूच चाचरतातही.
कानडी भाषक सासर मिळालेल्या नववधूला भेटलेला मराठी भाषक ‘माहेरचं माणूस’ मिळाल्याचा आनंद देऊन जातो आणि आपसुकच तिच्या तोंडी येतं - ‘तुम्ही मराठी बोलता?’
माझ्या एका मैत्रिणीला कानडी भाषक सासर मिळाले तेव्हा कानडी-मराठी समन्वय साधताना तिने हिंदी हे माध्यम बनवले. म्हणजे राष्ट्रभाषा बोलीभाषा/ मातृभाषा बनली आणि ‘सुकत जाणार्‍या ओंडक्याला नवी पालवी फुटली.’
महाराष्ट्र कार्यक्षेत्र निवडून कार्यपूर्णता करून परत आपल्या जन्मस्थळी परतलेली कानडी मंडळी ही मराठी भाषा, मराठी लोक आणि मराठी चॅनेलवरचे अनेक कार्यक्रम आनंदाने पाहतात आणि त्याबद्दल आदरही ठेवतात. अजूनही झुणका-भाकरी, सुरळीची वडी खाण्याची इच्छा दाखवतात. गंमत अशी की, अनेकांना मराठी भाषा समजते, पण बोलता येत नाही. अशी मंडळी आजूबाजूला कुणी मराठी बोलत असेल तर झटकन कानडीत विचारतात. ‘निवु मराठी माताडतिरा?’ (तुम्ही मराठी बोलता?) ‘ननगे मराठी तुंबा इण्टागिदे.’ (मला मराठी भाषा खूप आवडते.) त्यांच्या तोंडून येणारी महाराष्ट्राची थोरवी ऐकून काय आनंद होतो म्हणून सांगू. ताबडतोब माझ्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वर महाराज उभे राहतात आणि माझा मराठीची बोलु कौतुके...
हो खरंच... अगदी अस्संच!
दुकानामध्ये गेल्यानंतर प्रामुख्याने राजगिरा वडी, शेंगदाणे चिक्की, ज्वारी, बाजरी पीठ आणि हापूस आंबा मागणारा जमाव निश्चितच मराठी किंवा संबंधित असल्याची खात्री पटते आणि हापूसची गोडी चाखल्याच्या आनंदात मी जाऊन विचारते ‘तुम्ही मराठी बोलता?’
दारात आलेला सेल्समन हिंदी-इंग्रजीतून संवाद साधता असताना त्याला आम्ही मराठी असल्याची कुणकुण लागते आणि आपलं प्रॉडक्ट इथे नक्की खपणार या आनंदात तो ‘अरे वा! तुम्ही मराठी बोलता?’ अशी सलगी साधून यथेच्छ पाहुणचार घेऊन कौशल्याने आमच्या गळ्यात 1000-2000ची बॅग टाकतो आणि एक ‘भाषिक व्यवहार’ पूर्ण होतो.
‘दीदी, आप मराठी बात करते है?’ माझे ‘हाँ।’ उत्तर ऐकून ‘मैने महाराष्ट्र में 15 साल काम किया है।’ असे म्हणून पाणीपुरीला आणखी चटपटीत करणारा पाणीपुरीवाला भैया...
बांधकामावर काम करणारा मजूर ‘तुम्ही मराठी बोलता?’ असे विचारून मी महाराष्ट्रात काही वर्षे मजुरी केली हे कानडीतच आत्मीयतेने बोलताना आढळतो.
दुसरी बाजू पाहताना एकाच लिफ्टमधून खाली-वर करताना खेटून उभी असणारी मराठी माणसं, ‘तुम्ही मराठी बोलता?’ हा प्रश्न विचारताना काचकूच करताना दिसतात. ‘त्यात काय एवढं विचारण्यासारखं?’ असे म्हणून खांदे उडवणार्‍याची संख्याही काही कमी नाही. असो...
मराठी माणसांनी इंग्रजीचे प्रभुत्व, इतर भाषांची आक्रमणे होत असतानाही मातृभाषेचा विसर न पाडता भाषा आणि मन सजग ठेवले. त्यावर असीम प्रेम केले आणि तिला फुलवण्याचा केलेला प्रयत्न हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
अशा सर्व प्रांतीय, परप्रांतीयांच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांबद्दलची आत्मीयता पाहून मन भरून येते. तेव्हा ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ गुणगुणले जाते.
महाराष्ट्राच्या काळ्या मातीत बनलेलं रांगडं मन पुरणपोळीऐवजी इथे लालमातीतील इडली, वडा, मसाला डोसा मिटक्या मारत खाताना दिसतं. परप्रांतीयांच्या समवेत परंपरांची, खाद्यसंस्कृतीची देवाण-घेवाण होत असताना, भाषा कशी हो मागे पडेल?
बदल हा स्थायीभाव ठेवून माणूस मातृभाषेला हृदयी धरतो आणि तेव्हा ‘परभाषा’ बोलीभाषा होणे हेच आनंददायी ठरते. तेव्हा सहजच विचारले जाते-
‘निक मराठी (मत्ते) कनडानु माताडतिरा?’
(तुम्ही मराठीही बोलता आणि कन्नडही?)
या क्षणी ‘प्रतिज्ञा’ नक्कीच आठवेल.
त्या परंपरांशी पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
(kulkarni.pournima@gmail.com)