आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव मायबोलीचा - जावई न्हाला वाफा पाणी प्याला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जावई माझा भला, लेकीमागे आला। तो मेला बाईलबुद्ध्या सुनेमागे गेला।।’
काय गंमत आहे पाहा. नवरा मुठीत ठेवणारी लाडकी लेक माहेरी आली, मागोमाग जावई हजर याचा या माउलीला आनंद झाला आहे. मात्र तिचाच मुलगा सुनेमागे तिच्या माहेरी गेला तर तो बायल्या, बाइलबुद्ध्या. कृती एकच, पण पाहणा-याचे तराजू निराळे.
अशा शब्दसमूहांना वाक्प्रचार- म्हणी असे म्हणतात. हा कुठल्या एका भाषेचा विशेषाधिकार नाही. हे जगभर आहे. शिवाय अमुक एके काळी असेही नाही. वेदांमध्येदेखील अशा म्हणी आहेत. भाषा लिपिबद्ध असली पाहिजे अशीही अट नाही. बोलीभाषांमध्ये खूप छान म्हणी आढळतात. या म्हणी म्हणजे भाषेतली रत्ने असतात. काही म्हणींना समानार्थी प्रयोग खूप मोठ्या भूभागावर - काही तर जगभर- आढळतात. तर काही स्थानिक, लहान प्रदेशापुरत्या. हे जग व्यापणे वगैरे त्यात मांडलेल्या ‘सत्या’मुळे घडते. मनुष्य स्वभावातली खूप वैशिष्ट्ये जगभर सारखी (लोभ, असूया, मत्सर, आळशीपणा, खादाडी... वगैरे) असल्याने असे घडते. या म्हणींची काही वैशिष्ट्ये आहेत.
अशा म्हणी सहसा लांबलचक नसतात. (वरील म्हण अपवाद) नेमक्या, थोडक्या शब्दांत सांगणा-या, सूत्रवजा. दुसरे म्हणजे त्यांना काहीतरी सुज्ञपणाचे सांगायचे असते. उपदेश नव्हे, तर अनुभवाचे संचित. शिवाय, यात चटपटीतपणा आवश्यक असतो. थोडी मीठ-मिरची पण. हे तिन्ही असलेले सर्वच शब्दसमूह ‘म्हण’ असतीलच असे नाही. पण हे नसतील तर मात्र ती म्हण ठरणार नाही. आणखी एक फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणी वा वाक्प्रचार हे लोकप्रिय व सार्वत्रिक असायला हवेत. हे मौखिक साहित्य आहे. ते जर विस्तृत पसरलेले नसेल तर वापरलेल्या म्हणीचा अर्थच समोरच्याला / समोरचीला (स्त्रीवादी समीक्षा कुठे घाव घालेल - तेव्हा असो) कळणार नाही. तेव्हा एक वेळ अल्पशब्द, अनुभव व मिरचीमसाला यातले काही कमी-जास्त असले तरी चालेल, पण सार्वत्रिकता-लोकप्रियता नसेल तर म्हण निरर्थकच.
आता सुरुवातच जावयापासून झाली आहे. जरा जास्त खोलात डोकावून पाहू.
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ‘जावई’ हा प्राणी एका बाजूला अपार कौतुकाचा, तर दुस-या बाजूला ‘चिंता’ वाढवणारा म्हणून ज्ञात आहे. मुलीचे सुख, सौभाग्य म्हणून कौतुक, पण याच्या मागण्या न संपणा-या अतएव तापदायक. कन्या ही रास संकटाची, तर शनी हा तर अति त्रास देणारा ग्रह. आता काही म्हणी पाहा.
(1) जावई आले घरी, म्हणून सासू गूळ मागे वाण्याघरी. (2) जावई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट नासलेस रांडे गहू. (अचानक जावई पाहुणा आला म्हणून शेजारणीकडून गहू आणले; पुढे शेजारणीला कळले तो जावई नव्हताच.) (3) जावई न्हाला, वाफा पाणी प्याला. (जावई मंडळी आंघोळीला अतोनात पाणी घेतात, ते तर द्यावे लागते. म्हणून हुशारीने आंघोळीची सोय परसात (किचन गार्डन) वाफ्याजवळ केली म्हणजे जावई खुश व भाजी-शेतीला पाणी.) (4) जावयाचं पोर आणि हरामखोर. (5) यात थोडा ग्रामीण चावटपणाही येतो- अशी लेक हवई की घरोघर जावई. (हवई = चंद्रज्योत-दिवाळीतली. सुंदर पण बाहेरख्याली मुलीसंबंधी.) (6) मात्र याचा कळसाध्याय आहे : जामातो दशमग्रहा:। (नऊ ग्रह राशीला अपुरे (त्रासदायक) म्हणून हा दहावा, तोही नेहमी कन्या राशीस (म्हणजे आपल्या मुलीला छळणारा) असतो.) यावर संस्कृतमध्ये तीन श्लोक आहेत.
1) सदा वक्रा: सदा रुष्ट: सदा पूजाम् अपेक्षते।
कन्या राशि स्थिति नित्यं जामातो दशमग्रह:।।
2) आदित्याद्या ग्रहा: सर्वे यथा तुष्यंती दानत:।
सर्वस्वेपि न तुष्येत जामातो दशमग्रह:।।
3) भारत: पञ्चमो वेद: सुपुत्र: सप्तमी रस:
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमग्रह :
अर्थ सोपा आहे. मात्र शेवटचा श्लोक तुलनात्मक उदाहरणे देतो. त्याचे थोडे स्पष्टीकरण : भारत म्हणजे इथे महाभारत संहिता-पाचवा वेद. सुपुत्र असला तर आयुष्याची रसाळ गोडी वाढते, तो सातवा रस. मूळ सहा. गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट. समुद्रमंथनाच्या कथेत चौदा रत्ने मिळाली, ती सर्व व अधिक एक अशी पंधरा दिली तरी असंतुष्ट तो जावई. चौदा रत्ने अशी : (1) लक्ष्मी (2) कौस्तुभ (3) पारिजातक (4) सुरा (दारू) (5) धन्वंतरी (6) चंद्र (7) कामधेनू (8) ऐरावत (9) रंभा (10) उच्चै:श्रवा (देवलोकातला घोडा) (11) फालकूर (विष) (12) धनुष्य (श्रीकृष्णाचे) (13) शंख आणि (14) अमृत
काही म्हणी काय सांगतायत हे परंपरेने माहीत असते, पण त्या म्हणींचा उगम मात्र कळत नाही. ‘चोरावर मोर’ अशी म्हण खूप वापरात आहे. उगाच आढ्यता, शिरजोरी, उद्धटपणा करणे या अर्थी. आता आधी चोरावर मोर बसेल कसा व हा अर्थ येईल कसा? म्हण मूळची तामिळ आहे. ‘भाकरी/चपाती वाढ ग माये’ हे कुठे कळेल? जिथे ज्वारी-बाजरी-गहू हे मुख्य उत्पन्न (स्टेपल फूड) आहे तिथे. तामिळ प्रदेश तांदूळ-भात खाणारा-भात म्हणजे चोरू.’ मागणा-याला गृहिणीने भात वाढला, त्यावर हा नुसताच भात काय यावर ‘मोरू’ म्हणजे ताक हवे असे म्हणणारा भिक्षेकरी. ‘चोरूवर मोरू’ हे मूळ रूप. समानार्थी मराठी म्हण - अन्नछत्रात जेवताना आमरसांत तूप वाढा अशा अर्थाची.
युरोपीय भारतात येण्याआधी इथली न्यायव्यवस्था निराळ्या पद्धतीची. युरोपीय व्यवस्था किचकट-वेळखाऊ. यावरून पोर्तुगीज गोव्यात अत्यंत विलंब, पैसा बेसुमार खर्च होणे, प्रचंड दगदग हे अनुभवून ‘फिरंगी न्याय घरार पडप’ म्हणजे तळतळाट- ‘तुला फिरंगी न्यायव्यवस्था चक्रातून जावे लागेल’ असे म्हणत. खरे तर आता भारतात अशी समानार्थी म्हण तयार व्हावी असे चित्र आहे.
पाऊस हा भारतभर जिव्हाळ्याचा विषय. जगातला हा एकमेव भाग असा की जिथे हिवाळा-उन्हाळा-पावसाळा हे एका क्रमाने, जवळपास ठरलेल्या काळात येतात. मात्र जर हे चक्र एखाद्या वर्षी तोल सोडून वागले तर? हे ऋतू चंद्राच्या भ्रमणमार्गातल्या 27 नक्षत्रांवरून सांगितले जातात. रोहिणी नक्षत्र असताना प्रचंड तापते व ढग गोळा व्हायला सुरुवात होते. ‘रोहिणी डाजे, मृग गाजे, आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडली घर घर बाजे तूर’ (नगारा) रोहिणी : खूप तापून ढग येणे, मृग : मागून ढगांचा रेटा येतच राहिल्याने टकरी होत गडगडाट, आर्द्रा : प्रचंड पाऊस. हे सर्व नीट झाले म्हणजे धान्य खूप पिकेल, घरोघर आनंदीआनंद. पीक तरारले, दाणा मोठा होऊ लागला म्हणजे कापणीच्या जरा आधी एक हलका, संथ, थोडा पाऊस हवा. हा आला म्हणजे पिकाला ‘बुस्टर डोस’ मिळतो. ‘बरसतिला स्वाती तर पिकतिला मोती.’ या नक्षत्रमालेत दहावे आहे ‘मघा’. हे पावसाचेच आहे पण जरा विश्रांतीचे. या नक्षत्रात जर धुवाधार पाऊस - वारे असे काही झाले तर छान वाढत्या पिकाची वाट लागते. ‘बरसल्या मघा तर चुलीमध्ये हगा.’
‘गाढवाला गुळाची चव काय’, ‘तुला न मला, घाल काळ्या कुत्र्याला’, ‘नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा’ या व अशा अनेकानेक म्हणी आपण रोज उच्चारतो, ऐकतो. साहित्यात जिथे लोकभावना - तीही दूरगामी - व्यवस्थित शब्दबद्ध होते, ती रचना वाक्प्रचार म्हणींमध्ये दाखल होते. ‘दुरितांचे तिमिर जावो’ - ज्ञानेश्वर; ‘स्नेहासाठी पदरमोड कर परंतु जामीन राहू नको’ - अनंतफंदी; ‘जो दुस-यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला’- तुकाराम; ‘धन्य ते गायनी कळा’- रामदास... यादी खूप मोठी करता येईल. मात्र अशा शब्दकळा म्हणी म्हणून स्वीकारण्यासाठी त्याला सार्वत्रिकता-लोकस्वीकृती या पूर्व अटी आहेत.
कुठल्याही काळी, कुठल्याही भागात ‘भाषा’ ही प्रथम मौखिक असते. नवे शब्द, वाक्प्रयोग तिथे घडतात. हे ग्रामीण भागात व बोलीभाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर असते. हे शब्द, या म्हणी हे सर्व संस्कृतीसंचित आहे. फारसे आर्थिक-संस्थात्मक पाठबळ नसताना संपर्क (कम्युनिकेशन) साधने मर्यादित असताना व संगणक हा शब्दही जन्म घेण्याआधी मराठीत आठ खंडी शब्दकोश- अर्थ, व्युत्पत्ती, वापर, संलग्न उपयोग, म्हणी, दाखले अशा सर्वांसह जवळपास 85/90 वर्षांपूर्वीं रचला गेला. हे काम फक्त दोन व्यक्तींनी पदरमोड करून केले. यांनीच दोन मोठे खंड म्हणी व वाक्प्रचाराचेही प्रसिद्ध केले. आज ‘मराठी’ शिकवणारी महाविद्यालये, शाळा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत - विद्यापीठ संलग्नता आहे. यात शिकायला येणारे खेडी-गावे, वाड्या, वस्त्या, लहान शहरे इथून येतात. त्यांच्या घरी, गणगोतात, उत्सवात, धार्मिक विधींमध्ये, व्यवसायात असे खूप शब्द-म्हणी-वाक्प्रचार वापरात असणार, जे संग्रहित नाहीत. हे सर्व गोळा करणे या संस्थांना सहज शक्य आहे. अशा संग्रहातून व्युत्पत्ती शोधणे, वर्गीकरण, प्रसिद्धी याला साधने-पैसा शिक्षण व्यवस्थेत उपलब्ध आहे.
‘म्हणीं’शी संबंधित नसलेला एक मोठा विषय म्हणजे भाषेचे फ्रिक्वेन्सी अ‍ॅनॅलॅसिस. (वारंवारिता तपासणे, पण यातून पूर्ण अर्थ येत नाही.) हे काम साहित्य संस्था व विद्यापीठे यांचे. याला केव्हा हात घातला जातो अल्ला जाने.