आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव मायबोलीचा - लाभले आम्हास भाग्य

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते, तशी एरवी कधीच होत नाही! पडसे झाले की नाकाच्या अस्तित्वाची जाणीव, बोट चिमटले की बोटाच्या अस्तित्वाची जाणीव! तसेच जेव्हा माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हा मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली.
एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने मी मुंबईमधल्या एका व्यावसायिक रेडिओ वाहिनीच्या (एफएम स्टेशन) स्टुडिओमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथे माझा मित्र असलेल्या एका रेडिओ जॉकीला अगदी सहज विचारले, ‘काय रे, तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?’
‘आमची पॉलिसी आहे.’ त्याने उत्तर दिले.
‘तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी न लावण्याची पॉलिसी आहे?’ मी आश्चर्याने विचारले. त्याने मान डोलावली.
‘अशी पॉलिसी तुमची भारताच्या कुठल्या इतर शहरांमध्ये आहे? कोइमतूरमध्ये तामिळ गाणी लावणार नाही अशी पॉलिसी आहे? बंगळुरूमध्ये कन्नड गाणी लावणार नाही अशी पॉलिसी आहे? कोलकात्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही अशी पॉलिसी आहे?’ ‘अरे, मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!’ त्याने मला समजावले. ‘मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे.’
‘मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बंगळुरूही आहे! पण तिथे कन्नड गाणी लागतात की. कारण बंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे. तसे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथे मराठी गाणी लावायची नाहीत, असे धोरण तुम्ही अवलंबता?’
पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. मी पुढे म्हणालो, ‘तुम्ही हिंदी गाणी लावता, त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही पंजाबी गाणी लावता, याचाही आनंद आहे. पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते व्हरनॅक्युलर हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचे ‘बुल्ला की जाणां’ तुम्हाला चालते, पण सलील-संदीपच्या ‘डिबाडी डिबांग’चे तुम्हाला वावडे का?’
हे ऐकल्यानंतर मात्र त्या रेडिओ जॉकीने शस्त्रे खाली ठेवली. तो म्हणाला, ‘अरे, खरे सांगायचे तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांना असे वाटते की मराठी गाणी लावली तर रेडिओ स्टेशनला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल.’
इथे मात्र मी चमकलो. ‘डाउनमार्केट फील’? मराठीमुळे? एखादी भाषा ‘डाउनमार्केट’ असते असे ठरवण्याचा अधिकार या तथाकथित वरिष्ठ अधिका-यांना कोणी दिला? आणि मराठी डाउनमार्केट म्हणजे हास्यास्पद विधान होते!
युनेस्कोच्या एका सर्वेक्षणानुसार जगात सुमारे 6500 भाषा आणि बोली भाषा आहेत. यात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषा क्रमवार लावल्या तर एन्कार्टा विश्वकोशाप्रमाणे मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच ‘डाउनमार्केट’ कशी असू शकते? इतकेच नव्हे तर काही वर्षांपूवी अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने ‘व्हॉयेजर’ नावाचे एक यान अंतराळात पाठवले होते. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक ‘ग्रामोफोन रेकॉर्ड’ अंतराळात पाठवण्यात आली आहे. या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा की परग्रहावरल्या जिवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगाच्या 55 भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे, ज्यामध्ये भारतातल्या 9 भाषा आहेत. या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. इथेच ही कथा संपत नाही. याच ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरचे संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवले आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोप-यातल्या संगीताचा यात समावेश आहे. अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, अझरबैजान, पेरू, चीन, बल्गेरिया, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया अशा विविध देशांमधले संगीत या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचे प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश -‘जात कहां हो’ - ही या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
तात्पर्य काय तर जिथे ‘नासा’ला अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असे वाटते, तिथे महाराष्ट्राच्या राजधानीतच ‘तुमची भाषा ‘डाउनमार्केट’ वाटेल’ असे म्हणणा-या या रेडिओच्या ‘वरिष्ठ’ अधिका-यांचा मला मनस्वी राग आला! बरे, मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठे ऐकायची?
त्या रेडिओ जॉकी मित्राशी फार वाद न घालताच मी बाहेर पडलो आणि मला आढळले की ही परिस्थिती मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये अशीच आहे. मुंबईमध्ये व्होडाफोनसारख्या मोबाइल कंपन्या मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुण्यामधल्या रेडिओ वाहिन्या नवी मराठी गाणी वाजवायला नकार देत होत्या. चित्र विदारक होते! मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला मराठीतून विकत घेता येत नाही, की एका जागेहून दुस-या जागी मराठीतून जाता येत नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही!
प्रश्न फक्त मुंबईचाही नव्हता. मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासीन्य आहे, असे प्रकर्षाने जाणवत होते. मुळातच मराठी ‘डाउनमार्केट’ आहे, हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येते - आपल्याकडून! आणि धोक्याचा इशारा तेव्हाच असतो, जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असे वाटू लागते. आपण राजकारण्यांना शिव्या घालतो, सरकारच्या नावाने ठणाणा करतो, पण या सगळ्या प्रश्नाबाबत आपण काय करतोय? असा आत्मपीडाकारक प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणे करू शकतो, एवढेच एक सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिले.
इतर भाषकांना ‘मराठीचा आदर बाळगा’ असे सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची! जगातले सगळ्यात मोठे गाणे मराठीत करायचे हे ठरले. आपण जे आहोत (आणि आपण मराठी आहोत) त्याबद्दलच आपल्याला आतून चांगले वाटले नाही तर प्रगतीची सगळी दारे बंद होतात हे समजावून द्यायला कोणा मानसशास्त्रज्ञाची गरज नाही. अहिंसक पद्धतीने भाषेचा अभिमान व्यक्त करता येईल असे एकही व्यासपीठ आपण शिल्लक ठेवले नाही. साधे महाराष्ट्रगीताचे उदाहरण घ्या, किती जणांना ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ हे महाराष्ट्रगीत आहे ते माहीत नसते. जी वस्तू वापरात राहत नाही तिला गंज चढतो, हा वैश्विक नियम आहे. महाराष्ट्रगीताचेही नेमके असे झाले आहे. ‘अटकेपरि जेथ तुरंगि जल पिणे’ यात ‘पिणे’ सोडला तर एकही शब्द वापरात उरलेला नाही. तरुण पिढीचा या गीताशी संपर्क सुटत चालला.
सुरेश भटांच्या ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कवितेच्या पहिल्या ओळीतच भाषेबद्दलचा अभिमान ठासून भरला आहे आणि तरी या म्हणण्यात कुठलाही आक्रमकपणा नाही; उलट तृप्तीचा भाव आहे. हे गीत करायचा मानस मी बोलून दाखवला तेव्हा अनेक लोकांनी मला ‘एका गाण्याने काय होणार?’ असा सवाल केला. तेव्हा मी त्यांना म्हणायचो, ‘मी ज्योतिषी असतो तर या प्रश्नाचे उत्तर दिले असते, पण हिमालयाची यात्रा करायची असेल तरी पहिले पाऊल घराबाहेर टाकणे अनिवार्य आहे. माझ्या दृष्टीने हे मी टाकू शकेन असे पहिले पाऊल आहे.
पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की या गाण्याने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे. 27 फेब्रुवारी 2010 रोजी मराठी अभिमानगीताचे लोकार्पण तब्बल 8000 लोकांच्या साक्षीने झाले. 3 शहरे, 9 ध्वनिमुद्रणालये, 12 ध्वनिमुद्रक, 65 वादक, 112 प्रथितयश गायक कलाकार आणि 356 लोकांचे समूहगान असलेले हे भव्य गीत प्रकाशित झाले आणि दुस-याच दिवशी मुंबईच्या बिग एफएम या व्यावसायिक वाहिनीवरून प्रसारित झाले.
15 ऑगस्ट 2010 रोजी अ. भि. गोरेगावकरच्या 1500 मुलांनी हे गाणे त्याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्याबरोबर म्हटले, तेव्हा त्या मुलांच्या पालकांबरोबर साधनातार्इंचाही गळा गाता गाता दाटून आला. ही बातमी पाहून रत्नागिरीच्या दोन शिक्षकांच्या पुढाकाराने पुढच्या 26 जानेवारीला रत्नागिरीमधल्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातल्या 8000 विद्यार्थ्यांनी हे गीत म्हणून 15000 लोकांच्या अंगावर शहारा आणून दाखवण्याची किमया केली. त्यापासून स्फूर्ती घेऊन 1 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी आपापल्या शाळेत 35000 विद्यार्थ्यांनी हे गीत सादर केले. या गीतापासून प्रेरणा घेऊन साक्षात ए. आर. रहमानने एक ‘तामिळ अभिमानगीत’ तयार केले.
विख्यात संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांनी एका ठिकाणी लिहिले आहे, ‘गाणे कशाला म्हणावे - तर ज्याची आवृत्ती करावीशी वाटते अशी धून म्हणजे गाणे.’ पुन्हा पुन्हा म्हणत आवृत्ती करत राहिलो तर एक दिवस ते सत्यात उतरते या सिद्धांतावर माझा पूर्ण विश्वास आहे. मराठी अभिमानगीताची आपण न चुकता आवृत्ती करत राहिलो तर मराठीबद्दलचा आपला गंड एके दिवशी हद्दपार होईल.
या गाण्याची पहिली ओळ आहे -
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
आणि शेवटची ओळ आहे -
येथल्या चराचरात राहते मराठी.
माझा असा ठाम विश्वास आहे की आपण पहिली ओळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने गात राहिलो तर शेवटची ओळ खरी ठरायला वेळ लागणार नाही.
संदर्भ :
1 http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language
2 http://www.nasa.gov/
3 http://voyager.jpl.nasa.gov/
4 http://voyager.jpl.nasa.gov/spacecraft/ goldenrec.html