आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पण, तुम्ही का लिहिता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तु म्ही का लिहिता?’ हा प्रश्न मराठी लेखकाला विचारण्याची प्रथा नाही. याऐवजी ‘तुम्ही काय लिहिता?’ असा प्रश्न विचारला जातो. मराठी वाचन संस्कृती सुबोध प्रश्न विचारण्यात पटाईत आहे. आपल्या लेखकांच्या मुलाखती स्टेजवर, शंभर-दीडशे श्रोत्यांच्या हशा आणि टाळ्यांनी गाजतात. त्यांना ‘साहित्यिक गप्पा’ म्हणतात. या तुलनेत अमेरिकेतून प्रकाशित होणार्‍या ‘पॅरिस रिव्ह्यू’ या साहित्यविषयक साप्ताहिकांमधले लेखकांचे इंटरव्ह्यू भारदस्त असतात.
मराठीत लेखन ही हौस मानली गेल्याने वाचकांचं मनोरंजन करणं क्रमप्राप्त झालं. बहुतांश मराठी लेखक जाज्वल्य इतिहास, समृद्ध परंपरा, धार्मिक कर्मकांड, पूर्वजांचा पराक्रम, ग्रामीण चालीरीती आणि घरगुती कलहांचा वापर करून वाचकांना जे आवडतं तेच देतात. ‘मागणी तसा पुरवठा’ हा बाजाराचा नियम साहित्याला लागू झाला की साहित्य ‘अंधारात बसलेल्या मठ्ठ काळ्या बैला’सारखं हौशी होतं.
हौशी साहित्य परंपरेच्या धाकात राहतं. ते परंपरेला नवता म्हणतं. ते ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या ‘जैसे थे’ वादाचं सौंदर्यशास्त्र रचतं. असं परंपरानिष्ठ, हौशी, कौतुकोत्सुक लेखन वाचकाला नवा विचार देत नाही. जगण्याकडे ‘टाइमपास’ म्हणून बघणार्‍या सामान्य वाचकांना टेन्शन नको असतं. पण खरा लेखक तोच, जो स्वत: टेन्शन घेतो आणि वाचकांमध्ये ते वाटून टाकतो. असं टेन्शन देणार्‍या मराठी लेखकांच्या टीमचे कॅप्टन श्याम मनोहर आहेत.
हौशी साहित्य प्रसिद्धी, मान-मरातब, पुरस्कारांसाठी फील्डिंग लावणे आणि ज्येष्ठांना खुश करणे यामध्ये स्वत:ची ऊर्जा वापरते. ज्येष्ठांनी काल जे सांगितले, त्याला आज अनुमोदन देण्याने ज्येष्ठांबद्दल धाक तर व्यक्त होतोच, पण अनुमोदन देणार्‍याचे हितसंबंधसुद्धा दृढ होतात. मराठी साहित्याचे विश्लेषण केले तर त्याचे प्रमुख विधान ‘पूर्वजांना अनुमोदन देणे’ हेच दिसते. पूर्वजपूजा ही आर्ष समाजांची ओळख असते, आधुनिक समाजांची नव्हे.
मराठी साहित्यात माजलेल्या कळपवृत्तीचे विश्लेषण करताना ज्येष्ठांबद्दल अनाठायी आदर आणि श्रद्धा हे दोन घटक महत्त्वाचे ठरतात. दोन्ही मराठीच्या भक्तिपरंपरेतून येतात. मराठीतले ‘ज्येष्ठ’ म्हणूनच भक्तिपरंपरेला सतत अनुमोदन देतात. त्यामुळे त्यांचा जलवा टिकून राहण्यास मदत होते. भक्तिपंथाची आस बाळगणारे मराठी लेखक व्यक्तिगत हितसंबंधांची पेरणी, लागवड आणि कापणी करतात. हेच मेनस्ट्रीम म्हणजेच ‘टाइमपास’ मराठी साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
याउलट टेन्शनयुक्त साहित्य अनोखा आणि अनपेक्षित विचार मांडत राहते. मराठी पर्यावरणातली बुरसटलेली सांस्कृतिकता आणि निरर्थक कर्मकांडांची दादागिरी मोडून काढणे हा मराठी साहित्याचा बाणा कधीच नव्हता. म्हणून ‘तुम्ही का लिहिता?’ या प्रश्नाचे ‘आम्ही वर्णवर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी लिहितो’ हे दलित साहित्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे.
दलित साहित्याच्या अंतर्गत शोकात्म विरोधाभासांकडे जर दुर्लक्ष केले तर त्याचा मानवमुक्तीचा अजेंडा कुठल्याही लेखकाला नाकारता येणार नाही. संस्कृतीतल्या वर्णश्रेष्ठत्वाची प्रखर समीक्षा दलित साहित्यानेच विकसित केली. त्या तुलनेत साठोत्तरी ‘लिटिल मॅगझिनवाले’, नॉन दलित चळवळे लेखक परंपरेच्याच वर्तुळात उभे राहून परंपरेला नवता म्हणत, व्यक्तिस्वातंत्र्याची गोष्ट करणारे होते. संतपरंपरेसमोर लीन झालेली मेनस्ट्रीम मराठी समीक्षा तर भेदक सांस्कृतिक समीक्षा करायलाच कचरली.
साहित्याचं सरसकट सांस्कृतिकीकरण करणं ही अतिसांस्कृतिकता-वाद्यांची आकांक्षा असते. ही हौशी माणसं इतिहासाचं उदात्तीकरण, परंपरेचं दैवतीकरण आणि कर्मकांडांचं भावुकीकरण करण्यात तरबेज असतात. या सांस्कृतिकरणामुळे पुरुषसत्ताक हिंसक प्रेरणेवर आधारित पौराणिक आणि ऐतिहासिक कथा-कादंबर्‍यांचं स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात अतोनात पेव फुटलं. ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्‍या मराठीत खपतात. कारण सरासरी मराठी वाचक सांस्कृतिक संस्कारांसाठी भुकेला असतो.
या दोन्ही परंपरांचं कौतुकयुक्त वर्णन करणार्‍या लेखकांनी पौराणिक आणि ऐतिहासिक प्रेरणेऐवजी तिसरा, नागरी प्रेरणेचा (civic instinct) पर्याय वाचकांना कधी दिलाच नाही. म्हणून लोकप्रिय मराठी साहित्य सनातनी मूल्यांचं रिसायकलिंग ठरलं. शिळ्या कढीला ऊत आणून नवी संवेदना निर्माण होत नाही. माणसाला पौराणिक किंवा ऐतिहासिक पुरुष नव्हे, तर जबाबदार नागरिक करणं हे नव्या साहित्याचं ध्येय असू शकतं. माणसाचा आधुनिक नागरिक झाला की तो बिघडतो, असं मानणारे जी. ए. किंवा ग्रेससारखे रोमँटिक लेखक मराठी साहित्याच्या जगात एकेकाळी जोरात होते.
अति रोमँटिकता आणि घाऊक सांस्कृतिकीकरणामुळे मराठी साहित्यिक जाणिवेचे वाटोळे झाले. साहित्य म्हणजे प्रस्थापित संस्कृतीशी जुळवून घेणारी एक निरुपद्रवी व्यवस्था, असे मध्यमवर्गीय मराठी लेखक समजले आणि इथेच साहित्य आणि नैतिकतेची ताटातूट झाली. त्यातून साहित्यातले सौष्ठववादी सोकावले आणि रेखीव स्वरूपाचा साहित्यिक रूपवाद निर्माण झाला. ‘तुम्ही का लिहिता?’ या प्रश्नाला ‘आम्ही सौंदर्य निर्माण करण्यासाठी लिहितो’ हे उत्तर साठ आणि सत्तरच्या दशकात ‘मौज’च्या लेखक-लेखिकांनी दिलं होतं.
या रूपवादाचा प्रतिवाद देशीवादी स्कूलने केला. ‘तुम्ही का लिहिता?’ या प्रश्नाला आम्ही ‘नैतिक कृती करण्यासाठी लिहितो’ असं देशीवाद्यांनी म्हटलं. ‘साहित्य म्हणजे परिवर्तनशील नैतिक कृती’ असं प्रथम सार्त्रने म्हटलं होतं. देशीवाद्यांनी ‘साहित्य एक नैतिक कृती आहे’ ही भूमिका मांडली. पण अशी भूमिका मांडणे आणि ती जगून दाखवणे या दोन निराळ्या गोष्टी असतात. लेखन जर ‘नैतिक कृती’ असेल तर लेखकाने ती लिखाणातून आणि वागणुकीतून अहोरात्र सिद्ध करायला हवी. नैतिकतेचे इतके सर्वव्यापी भान किती मराठी लेखकांना आहे?
‘नैतिक कृती’ पोस्टमॉडर्न काळातला पेच आहे. मराठी साहित्याच्या बहुसांस्कृतिक परिसरात नैतिक कृतीचे त्रिविध अर्थ संभवतात. ‘आंबेडकरवादी नैतिक कृती’, ‘गांधीवादी नैतिक कृती’ आणि ‘सावरकरवादी नैतिक कृती’ या तीन कृतींमध्ये परस्पर विरोधाभास आहेत. अस्पृश्यता ही आंबेडकरवादी दृष्टीने मानवी अधिकाराचे हनन ठरते. गांधीवादी दृष्टीने ती देवाविरुद्ध पाप ठरते, तर सावरकरवादी दृष्टीने संघटित हिंदू समाज रचनेच्या आड येणारी ती कटकट ठरते.
वि. स. खांडेकर, मर्ढेकर, विंदा, कुसुमाग्रज, पेंडसे, माडगूळकर, खानोलकर, जी. ए. कुलकर्णी, नेमाडे, चित्रे, कोलटकर, ढसाळ, दया पवार, लक्ष्मण माने, केशव आणि भुजंग मेश्राम, पाठारे, गवस, जयंत पवार आणि सतीश तांबे इत्यादी प्रातिनिधिक लेखकांना नेमक्या कुठल्या नैतिक कृतीची आस होती?
लक्ष्मीबाई टिळक, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, मालतीबाई बेडेकर, गोदावरी परुळेकर, शिरीष पै, विजया राजाध्यक्ष, कमल देसाई किंवा मल्लिका अमरशेख, प्रज्ञा पवार, ऊर्मिला पवार, मेघना पेठे आणि कविता महाजन इत्यादी प्रातिनिधिक स्त्री लेखकांना तरी या त्रिविध नैतिक कृतीपैकी कुठली कृती अभिप्रेत होती?
वरील यादीतल्या ऐंशी टक्के लेखक आणि लेखिका या त्रिविध कृतींपैकी एकाही कृतीच्या आकांक्षेने लिहित्या झाल्या नाहीत. ‘तुम्ही का लिहिता?’ या प्रश्नावर ‘आम्हाला अभिव्यक्तीची आस आहे’ असं बहुसंख्य साहित्यिकांचं उत्तर असू शकतं आणि ते पुरेसं आहे. मी लिहितो ते नैतिक कृती करण्यासाठी, असं जर लेखक म्हणत नसेल तर मग सार्त्रने मांडलेली आणि नेमाड्यांनी अनुमोदन दिलेली लेखकाची नैतिकता नेमकी कुठे शोधायची? तर ती लेखकाच्या मानवी प्रतिष्ठेच्या संकल्पनेत शोधायची.
भारतासारख्या पारंपरिक उतरंडीच्या समाजात मानवी प्रतिष्ठेचा लोचा कायम राहतो. जातिव्यवस्थेचे तात्त्विक किंवा समाजशास्त्रीय समर्थन करून उतरंडीची व्यवस्था मजबूतच होत जाते. माणसांमधली असमता ही निसर्गदत्त आहे, असं म्हणणार्‍या माणसांचं शीर्षस्थान या उतरंडीत जन्मापासूनच ‘बुक्ड’ होतं, हे लक्षात घ्यावं लागतं. अशा वेळी विषम व्यवस्थेला खिळखिळी करणं, नव्या साहित्याचं ध्येय असू शकतं.
दलित साहित्याने हे बर्‍यापैकी जाणलं, पण दुर्दैवाने हे साहित्यसुद्धा अतिसांस्कृतिक समन्वयवादी कौतुक परंपरेला शरण गेलं. या परंपरेत व्यवस्थेशी दोस्ती करणार्‍यांची गर्दी होते. साहित्यिक सत्य नैतिक आणि नैतिक सत्य अंतिमत: मानवी समतेचीच गोष्ट सांगतं. साहित्याचं काही ध्येय असलंच तर ते परंपरेला उजळ करणं हे नसून विषमता नष्ट करणं हेच आहे. काळ कठीणच होत चाललाय. आज नैतिकता, ननैतिकता आणि अनैतिकता यांचं एक व्यामिश्र वास्तव तयार होत आहे. या तीन नैतिक पवित्र्यांमधला ‘ओव्हरलॅप’ पोस्टमॉडर्न काळाचं चिन्हं आहे. तुम्ही का लिहिता? या प्रश्नाला उत्तर देणं म्हणूनच कठीण आहे. पण कठीण असला तरी हा प्रश्न लेखकासाठी ऐच्छिक नाही, अनिवार्य आहे.
vishram.sharad@gmail.com