आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाची नव्हे कापूसकोंड्याची गोष्ट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मुळात पाहून पाहून बोथट झालेल्या आपल्या सिनेमॅटिक जाणिवांमध्ये प्रेमाच्या त्रिकोणाची गुंतागुत झेपेना, अशी अवस्था. इथे दोन जोडपी अन् चार माणसं. त्यामुळे नात्यांची गुंतागुंत समजूनच घ्यावी. पण ‘प्रेमाची गोष्ट’ या नाजूक नावाखाली एकत्र झालेली ही चार माणसं असा काही वेगळाच अनुभव देऊन जातात की, ओल्या सांजवेळीची साद घालता घालता प्रेमाच्या गोष्टीचा हा बागुलबुवा प्रेमाचा ‘घोस्ट’ होऊन जातो...''

महोदय,
रसिक पुरवणीमध्ये मृण्मयी रानडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’वरचा लेख वाचला. त्यानंतर मीदेखील चित्रपट पाहिला असल्याने मला काही गोष्टी याबद्दल लिहाव्या असं वाटलं म्हणून हा पत्रप्रपंच.
या प्रेमाच्या गोष्टीत आहे विभक्त होऊ घातलेलं ‘ए’ आणि ‘सी’ हे जोडपं. त्यांच्याबरोबर आहे ‘बी’आणि ‘डी’ हे आणखी एक विभक्त होऊ घातलेलं जोडपं. अशी ही विभक्त होऊ घातलेल्यांची कथा आहे, हे आपल्याला कळून चुकतं. आणि चित्रपटाच्या यशस्वी प्रमोशनमध्येही हा चित्रपट घटस्फोटानंतरही नवरा- बायकोमध्ये मैत्री टिकू शकते, या उदात्त विषयाभोवती फिरणारा आहे याचे दाखले दिले गेले होते. मुळात चित्रपट पाहिल्यानंतर असं काहीही नाही, असं मला वाटलं. आता ते कितपत योग्य किंवा अयोग्य हे सांगण्याचाच हा एक छोटा प्रयत्न.
मुळात पाहून पाहून बोथट झालेल्या आपल्या सिनेमॅटिक जाणिवांमध्ये प्रेमाच्या त्रिकोणाची गुंतागुत झेपेना, अशी अवस्था. इथे दोन जोडपी अन् चार माणसं. त्यामुळे नात्यांची गुंतागुंत समजूनच घ्यावी. पण ‘प्रेमाची गोष्ट’ या नाजूक नावाखाली एकत्र झालेली ही चार माणसं असा काही वेगळाच अनुभव देऊन जातात, की ओल्या सांजवेळीची साद घालता घालता प्रेमाच्या गोष्टीचा हा बागुलबुवा प्रेमाचा ‘घोस्ट’ होऊन जातो.
ए, बी, सी, डी अशी बीजगणितातल्या काळ-काम-वेगाप्रमाणे प्रेमाची मजुरी करणार्‍या या प्रेमदिवाण्यांची कथा जर अशा बीजगणितीय समीकरणांमधून सोडवता आली असती तर सोडवावी बापडं. पण मग आर्यभट्ट, कणाद आणि आइनस्टाईन आदी थोर गणिती नातेसंबधांवर भाष्य करणारे थोर विचारवंत म्हणून नावारूपाला आले असते. मुळात नातं म्हटलं की ते गुंतागतीचं असणार, हे उघडच आहे. त्यामुळे त्याचं सरळसोट सोल्युशन असू शकत नाही.
पण मला वाटतं, इथेच या चित्रपटाचं सगळ्यात मोठं अपयश आहे. कारण चित्रपट घटस्फोटानंतरच्या नात्यावर भाष्य करण्याऐवजी वेगळाच ट्रॅक धरतो. त्यामुळे पात्र काहीही बोलत असली किंवा काहीही वागत असली तरी आपल्याला ही गोष्ट कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी अनेक वेळा ऐकल्यासारखी वाटत राहते. त्यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, हा चित्रपट नेमका आहे तरी कुठल्या प्रेक्षकवर्गासाठी? कारण चित्रपटातली सगळी पात्र ही उच्चमध्यमवर्गीय वाटत असली तरी त्यांची नाळ जमिनीशी जोडण्याचा अट्टाहास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पण मुळात त्यांचं राहणीमान आणि त्यांचे विचार हे अगदी उच्चमध्यमवर्गीय वाटतात, त्यामुळे ही नाजूक प्रेमाची गोष्ट फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांचीच वाटते...हे असं का होतं... कारण मुळात चित्रपटात अनेक गोष्टींचा रिलेव्हन्सच नसल्याने असं का, असं खरंच असतं का, आणि असं कसं काय असू शकतं, अशाच आशयाचे प्रश्न आपल्याला पडत राहतात.
कथेतले राम आणि रागिणी हे विभक्त होऊ घातलेल्या अवस्थेत आपल्याला भेटतात. त्यांच्यातील मतभेद हे न संपणारे आहेत, अशी आपल्याला साधारण जाणीव होते. पण ते का? या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर दोन-अडीच तासांच्या वेळात दिग्दर्शकाला द्यायला वेळच मिळालेला नाही. पण राम आणि रागिणी हे दोघेही क्रिएटिव्ह असल्याने दोघांच्या विभक्त होण्याची कारणंही क्रिएटिव्ह आहेत, असं समजून प्रेक्षक कथेबरोबर पुढे सरकतो. ‘रागिणीसाठी मी थांबणार आहे...’ असं थेट ‘आय विल बी बॅक’ असं टर्मिनेटरच्या शैलीत सांगणार्‍या रामच्या बलराम निग्रहाला काही दिवसांची ओळख झालेली सोनल कशी काय छेद देते?
कारण या सगळ्या घडामोडींमध्ये रानडे यांनी ज्यांना राम आणि सोनल यांचे आल्टरइगो म्हटले आहे ते स्वराज आणि मीरा संधी मिळाल्यापासून या दोघांनाही ‘तुम्ही एकमेकांच्या प्रेमात तर पडला नाहीत ना?’ असंच विचारताना दिसतात. यातून लवकरात लवकर प्रेमात पडा... असंच साधारण त्यांना सुचवायचं असतं. मग लगेच पडायचं ना... हा सगळा प्रपंच कशाला?
यात अजूनही अनेक प्रश्न पडत जातात... राम आणि रागिणी हे विभक्त होण्याचा निर्णय घेतात, कारण दोघांमधील मतभेदांबरोबर रामचं वैयक्तिक आयुष्यात फारसं यशस्वी नसणं हेदेखील एक कारण असतं. पण राम स्वत:च्या गोष्टीवर सिनेमा करणार, हे कळताच रागिणी सगळे मतभेद विसरून स्वत:च्या स्वार्थासाठी रामला भेटायला येते. कारण यामुळे राम यशस्वी होणार हे तिला कळलेलं असतं. मग हे पाऊल राम आधीच का उचलत नाही? तो सोनलच्या सल्ल्याची वाट का पाहात राहतो? आता मुळातच लेखनप्रकियेचा ओ का ठो माहीत नसलेली सोनल रामच्या आॅफिसमध्ये कामाला लागणं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराबद्दल बोधीवृक्षाखाली बसलेल्या गौतम बुद्धासारखं प्रगल्भ होत थेट एखादा स्क्रिनप्ले लिहिणं, रामला कथा प्रोड्युसरला देण्याबाबत सल्ला देणं हा सगळा घटनाक्रमच न पटणारा आहे.
बरं, हे सोडा; राम आणि सोनलच्या नात्याचा ट्रॅकच कळत नाही. कारण दोघांच्याही स्वभावाची जातकुळीच पूर्णपणे वेगळी आहे. जितकी स्वभावाची तितकीच अभिनयाचीसुद्धा. अर्थात, सागरिका घाटगेचा सिनेमातील जो वावर आहे त्याला अभिनय म्हणायचं तरी कसं? अतुल कुलकर्णीचा पहिला रोमँटिक सिनेमा अशा पद्धतीने जाहिरात करण्यात आलेल्या या सिनेमात अतुलही भाव खाऊन जातच नाही. उलट अशा पद्धतीचा सिनेमा आणि त्यातील भावनिक गुंतागुंत ही कशी योग्य आहे, हे पटवून देत असलेला अतुल फसवा वाटतो.
कारण सध्याच्या काळात प्रेमासारखी गोष्ट ही प्रॅक्टिकॅलिटीच्या रुक्ष जाणिवेबरोबर ‘एक पे एक फ्री’सारखी येते. त्यामुळे जे साधं, सरळ आणि सोपं रसायन ही फिल्म विकायचा प्रयत्न करते. ते रसायन विकत घेताच येत नाही. कारण आपण प्रॅक्टिकल जगात वावरतो, तर फिल्म मात्र हीच नाळ तुटल्यासारखी वावरताना वाटते.
ऐसपैस घर...प्रशस्त आॅफिस..आणि एका तरुणीला नोकरीवर ठेवण्याची श्रीमंती असलेला राम मोपेडवर का फिरतो? आॅफिसच्या टपरीवरचा चहा-खारी का खातो? आपली नाळ मातीशी जुळलेली आहे, हे दाखवण्यासाठी; की ‘क्रिएटिव्ह’ माणसं अशी वावरतात, हे दाखवण्यासाठी?
पण असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण मुळात गोष्ट प्रेमाची आहे. भौतिक गोष्टींपलीकडच्या नात्यांची आहे. आता इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत नसताना ही प्रेमाची गोष्ट तुम्हाला पटत नाही. मला तरी नाही पटली. तुम्हाला पटली असेल तर चांगलंच...
या सगळ्या गोष्टी पाहताना तुम्ही इतके गलितगात्र होऊन जाता, की तुम्ही मिटलेल्या डोळ्यांनी आणि जांभयांनीच दिग्दर्शक सतीश राजवाडेला कुर्निसात देऊन टाकता. ब्राव्हो...! असं म्हणणार्‍या स्वराजचा चार्म चित्रपटात दिसला असता तर खरंच जरा बरं झालं असतं. असो...!