आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोहाची सर्वसमावेशक नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोस्टमॉडर्निझम एक पाश्चात्त्य आणि ननैतिक (किंवा अनैतिक) विचारदर्शन असून त्याचा शिरकाव मराठी साहित्यात होणे उचित नाही, असा सूर बरेच मराठी साहित्यिक लावताना दिसतात. खरे साहित्य हे मातीतून उगवलेले, सांस्कृतिक मूल्यांची बूज राखणारे आणि देशीवादीच असावे, ही मेनस्ट्रीम मराठी साहित्याची धारणा असल्याने मूल्यपतनाला मूल्यपरिवर्तन म्हटले की इथे जाणकार डोळे वटारतात. संस्कृती म्हणजे सामुदायिक वर्तणुकीचे नियम आणि श्रद्धेची प्रतीके असे मानले तर कुठली सांस्कृतिक मूल्ये राखायची आणि कुठली बदलू द्यायची, याचा निर्णय भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात करणे सोपे नाही. मध्यमवर्गीय हिंदू आदिवासींची ‘घोटूल’ जीवनपद्धती स्वीकारतील? डेटिंगची फॅशन मुस्लिम स्वीकारतील? अभिजन, बहुजन, हरिजन, गिरिजन या तुकड्यांमध्ये विभागलेल्या भारतीय समाजात संस्कृतीची एकच व्याख्या चालणार नाही. खरं तर संस्कृतिवैविध्य ही भारताची ओळख आहे.

या वैविध्याचे भान सुटल्यामुळे चिपळूणच्या साहित्य संमेलनाला दरवर्षीप्रमाणे यंदाही गालबोट लागले. पृथ्वीची रचना कशी झाली हे भूगर्भशास्त्राने सप्रमाण सिद्ध केल्यानंतरसुद्धा अमुक एका पुराणपुरुषाने अमुक एक प्रदेश निर्माण केला, ही मिथक कथा चिपळूणच्या साहित्य संमेलनात इतिहास म्हणून स्वीकारली गेली. त्यातून अतिसांस्कृतिकतावाद्यांचे फावले आणि परशुरामाच्या सांस्कृतिक प्रतीकाचा वाद उद्भवला.

एका संस्कृतीची प्रतीके दुस-या संस्कृतीला पचत नसतात. म्हणून अशा प्रतीकांऐवजी सगळ्यांना पटतील अशी समन्वयवादी प्रतीके प्रचलित व्हावी. शांतीचे प्रतीक मानले गेलेले कबुतर बायबलच्या जुन्या करारात भेटते. प्रलयाच्या पाण्याची शीग उतरली की नाही हे बघायला नोहा त्या कबुतराला आकाशात उडवतो. ते ऑलिव्हची डहाळी चोचीत घेऊन नोहाकडे परतून येते. प्रतीक असावे तर असे. त्याऐवजी आपले सांस्कृतिक प्रतीक दुस-यांवर लादून अतिसांस्कृतिक (hyper-cultural) गट सामाजिक हिंसेचे सूतोवाच करतात. हिंसा बहुसांस्कृतिक (multi-cultural) समाजातली शांती बिघडवते. पोस्टमॉडर्न काळात अतिसांस्कृतिक मानसिकतेचा बहुसांस्कृतिक मानसिकतेशी टकराव होतो. एकाच गटाच्या सांस्कृतिक प्रतीकांच्या अधिसत्तेला आव्हान मिळते.

संस्कृतीच्या संदर्भात अंतिम सत्य काही नसते. सांस्कृतिक सत्ये गटसापेक्षच असतात, हे ‘परशुराम विवादाने’ सिद्ध केले. तुमचं सत्य माझं सत्य नाही हे तुम्ही मान्य करा आणि माझं सत्य तुमचं सत्य नाही हे मी मान्य करतो, अशी सापेक्षतावादी पण समजूतदार वैचारिक मांडणी पोस्टमॉडर्न काळाची गरज आहे. ही केली की अतिसांस्कृतिक अभिनिवेश आणि हिंसक भाषा विरून जाऊन पोस्टमॉडर्न सहिष्णू संवेदनशीलतेचा अध्याय सुरू होतो.

‘आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचा नीट अभ्यास व्हायला हवा,’ हे यंदाच्या अखिल भारतीय संमेलनाध्यक्षांचे मत मराठी साहित्याच्या बहुसांस्कृतिक जगात महत्त्वाचे आहे. मात्र सांस्कृतिक प्रतीकांना भक्तिभावे पुजणारे, पण त्यांचे विश्लेषण टाळणारे मराठमोळे सामूहिक मन नागनाथ कोत्तापल्ल्यांचा हा विचार दुर्लक्षित करेल.

साहित्य संमेलनात जर वर्णवर्चस्ववादी प्रतीकांची प्रतिष्ठापना झाली तर संमेलनाध्यक्षांच्या ‘तोंडाला काळं’ फासू, असे ‘उपरा’चे लेखक लक्ष्मण माने म्हणाले. एखाद्याचा निषेध करण्यासाठी त्याच्या तोंडाला काळं -निळं किंवा पिवळं नव्हे - फासणं अनिवार्य केव्हापासून झालं? वर्णाधिष्ठित समाजात गोरा रंग काळ्या रंगापेक्षा उच्च समजला जातो. भारतासारख्या बहुसंख्य सावळ्या जनतेच्या देशाने हा वर्णविचार स्वीकारलाच कसा?

वर्णवर्चस्ववादी समाज - मग ते भारतीय असो की अमेरिकन, - तिथे मानवी प्रतिष्ठा राखली जात नाही. काळी त्वचा हीन तर गोरी त्वचा श्रेष्ठ, ही सांस्कृतिक थाप सावळ्या लोकांनी निमूटपणे स्वीकारल्याने सनातनी प्रतीकांची सत्ता चालू राहते. सन्मानाचा रंग गोरा, अपमानाचा रंग काळा, हे कोणी ठरवले? वर्णवर्चस्ववादी प्रतीकांचा विरोध करणा-या माने यांनी हा प्रश्न विचारला असता तर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मूलभूत चर्चा झाली असती. मानेंची समतेची भावना उदात्त आहे, पण त्यांची निषेधाची भाषा चुकली. सनातनी प्रतीकांचा गर्भित अर्थ लक्षात घेतला नाही तर पुरोगामी लोकांचीही गोची होते. त्यामुळे प्रस्थापित वर्णविचारच सशक्त होतो. मानवी संबंध सत्तेवर आधारित असतात, ही मार्क्सवादी भूमिका पोस्टमॉडर्निझमचेही गृहीतक असल्याने पोस्टमॉडर्न दर्शन सांस्कृतिक सत्तेची निर्भय चिकित्सा करते. प्रस्थापित सांस्कृतिक प्रतीकांची सत्ता उलथवून त्याऐवजी विस्थापितांच्या प्रतीकांची वर्णी लावणे, हे पोस्टमॉडर्न दर्शनाचे ध्येय आहे.

ब-याच मराठी लेखकांना वाटतो तसा सापेक्षतावादी पोस्टमॉडर्न विचार ‘सब कुछ झूठ’ असा सामाजिक शून्यवाद प्रसवत नाही. सांस्कृतिक अधिसत्तेची भेदक चिकित्सा करणारे हे नवोत्तर दर्शन समतावादी आहे. ‘तुमचं सत्य वैश्विक नाही. माझंही तसं नाही’ हा विचार स्वीकारला की विरोधकांना इजा करण्याची गरज उरत नाही. मग शोषित आणि शोषकांची परस्पर मारक हिंसा बाद ठरते. शोषण व्यवस्थेत आजचे शोषित उद्याचे शोषक होतात, म्हणून लढाऊ शोषितांची साधनशुचिता महत्त्वाची ठरते. शोषितसुद्धा अखेरीस शोषकांच्याच वर्चस्ववादी वर्तणुकीचे अनुकरण करतात; म्हणून शोषक आणि शोषित दोघांचेही अमानुषीकरण होते, असं ब्राझिलियन शिक्षणतज्ज्ञ पाउलो फ्रेरे म्हणून गेला.

परस्पर हिंसेऐवजी परस्पर संवाद निर्माण करायची जबाबदारी शोषक आणि शोषित दोघांवरही आहे. त्यासाठी विवेकनिष्ठ विचारसरणी आणि परस्पर सहिष्णुता हवी. भारतीय समाज हा मूलत: युक्तिवादप्रवण, ‘ऑर्ग्युमेंटेटिव’ आहे, हे अमर्त्य सेन यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या हौशी आणि आनंदी जत्रेत सेन यांना अनुयायी मिळणे कठीण आहे. पण जत्रेची गंमत संपल्यानंतर प्रस्थापित साहित्य-संस्कृतीची चिकित्सा करणे गैरसाहित्यिक नाही.

मराठी साहित्याच्या अतिसांस्कृतिक पर्यावरणात लेखकांनासुद्धा स्वत:ची सांस्कृतिक अस्मिता निर्धारित करण्याची घाई होते. मग ते स्वत:च्या अस्मितेची प्रतीके ठरवतात. म्हणून ब्राह्मण लेखकांना परशुराम, क्षत्रियांना शिवाजी, शेतक-यांना तुकाराम, तर दलितांना गौतम बुद्ध या प्रतीकांबद्दल पुळका वाटतो. जागतिकीकरणानंतर सांस्कृतिक संकर सुरू होऊन प्राथमिक अस्मितांची सरमिसळ झाली. तरीही जुनकट अस्मितांचा आणि प्रतीकांचा दुराग्रह मराठी साहित्यात धरला जातो.

असे दुराग्रह मराठी साहित्यापुरतेच मर्यादित नाहीत. डोस्टोव्हस्कीसारख्या थोर कादंबरीकारानेसुद्धा रशियन श्रेष्ठत्वाची भावना जोपासताना युरोपीय संस्कृतीला कमी लेखले होते. लेखकाला जेव्हा आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपली भूमी सर्वश्रेष्ठ वाटते; तेव्हा भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अस्मितांची मोर्चेबांधणी होऊन हिंसेला आपसूकच सूट मिळते. साहित्याने एक वेळ सत्य नाही सांगितलं तरी चालेल; पण त्याने हिंसा प्रायोजित करू नये, असे कळकळीने नोंदवावेसे वाटते.

जागतिकीकरणानंतर नवे वैचारिक प्रवाह मराठी साहित्यात आले. ज्ञान, माहिती, सत्ता आणि उपभोगाचे लोकशाहीकरण झाले. आजचे मराठी साहित्य या लोकशाहीकरणाची गोष्ट सांगते. पण ती सांगताना असे लोकशाहीकरण हितकारक की हानिकारक याचा निर्णय नवा लेखक करू शकत नसल्याने तो मूल्यपतनावर शोक करतो. पोस्टमॉडर्न काळात सरंजामशाहीवर आधारित मूल्यांची सर्वसत्ताक नजरेने चिकित्सा होते. मराठी मेनस्ट्रीम साहित्यातले गावगाड्याचे, गावातल्या चिरेबंदी वाड्यांचे, तिथल्या रोमँटिक परंपरांचे कौतुक गावातल्या भूमिहीनाला, बलुतेदाराला, लोहाराला किंवा कुंभाराला असू शकत नाही, हे समजणे म्हणजे सापेक्षतावादी पोस्टमॉडर्न संवेदनशीलता आत्मसात करणे.

पोस्टमॉडर्निझमचा विचार युरोप-अमेरिकेतून आला; म्हणून तो टाकाऊ मानणा-या मराठी साहित्यिकांना एक बातमी :
भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली तेव्हापासून म्हणजे, सुमारे दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच जैनांनी सापेक्षतावादी पोस्टमॉडर्न विचार भारतात प्रसृत केला होता. कुठल्याही पदार्थाचे अंगभूत गुण स्थिर नसतात, ते बदलत असतात. म्हणून चिरंतन पदार्थ किंवा सत्य संभवत नाही. एखादा गुण विशुद्ध रूपात एखाद्या पदार्थात वसतो, ही भ्रामक समजूत आहे. हे पदार्थमय जगत अस्थिर आहे. या विचारसरणीला जैन साधक ‘अनेकान्तवाद’ म्हणतात. म्हणजे न-एकान्त. सत्य त्रिकालाबाधित नसते. कारण त्या सत्याचे गुण देश, काल आणि परिस्थितीनुसार बदलतात, असे ‘अनेकान्तवाद’ सांगतो. यातून सर्वसमावेशकतेचा विचार दृढ होतो. पृथ्वीवरच्या पापी माणसांना धडा शिकवण्यासाठी बायबलमधला कोपिष्ट ज्यू देव पृथ्वीवर महाप्रलय आणतो. तेव्हा पुण्यवान नोहा स्वत:च्या बायकामुलांना आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक प्राणी, पक्षी आणि कीटकाच्या नरमादीच्या जोडप्याला आपल्या नावेत सामावून घेत सगळ्यांचा जीव वाचवतो. ज्या नोहाने जगाला शांतिमय कबुतराचे प्रतीक दिले त्यानेच सर्वसमावेशक नावेचे प्रतीकही दिले. मराठी साहित्याची नाव जेव्हा नोहाच्या नावेसारखी सर्वसमावेशक होईल, तेव्हा ती ख-या अर्थाने ‘अखिल भारतीय’ होईल.

vishram.sharad@gmail.com