Home »Magazine »Akshara» Marathi Wangamay Mandale For Language ,Liteature

भाषा, साहित्याच्या आवडीसाठीच मराठी वाङ्मय मंडळे!

वंदना महाजन | Jan 09, 2013, 12:22 PM IST

  • भाषा, साहित्याच्या आवडीसाठीच मराठी वाङ्मय मंडळे!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी सर्वांगीण जाण विकसित व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ कार्यरत असते. वाङ्मय मंडळातर्फे भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा असते; पण ब-याचदा हे उपक्रम मराठी भाषेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित राहतात. इतर विषयाच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश नसतो. त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर उपक्रमांपेक्षा वाङ्मय मंडळाच्या उपक्रमांना कमी महत्त्व दिले जाते, अशी परिस्थिती अनेक महाविद्यालयांमध्ये निदर्शनाला येते.

मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि विकासाचा प्रश्न अत्यंत जटिल बनत चालला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रचंड वाढ होत आहे; पण मराठी माध्यमाच्या शाळा मात्र बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे भाषा आणि साहित्याच्या अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

तांत्रिकदृष्ट्या जगाला सुखी करण्यासाठी आज अनेक साधने उपलब्ध आहेत; पण समाजाचे नैतिक अध:पतन रोखू शकणा-यांची संख्या मात्र कमी होत आहे. समाजाला विचार देणा-या प्रामाणिक अभ्यासकांची, संशोधकांची आणि साहित्यिकांची गरज आहे. साहित्य हे विचार देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मराठी वाङ्मय मंडळावर असते. विज्ञान, वाणिज्य किंवा अभियांत्रिकी शाखेत शिकणा-या विद्यार्थ्यांनासुद्धा भाषिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. या विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मराठी वाङ्मय मंडळ विविध उपक्रम राबवू शकते. भाषा जगवायची असेल तर भाषा आणि आर्थिकता यांची सांगड घालणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना चांगली नोकरी, व्यवसाय उपलब्ध झाले तरच विद्यार्थी या विषयाकडे वळतील.

वृत्तपत्रांपासून वाहिन्यांपर्यंत तसेच चित्रपटांपासून नाटकांपर्यंत मराठी भाषेची उपयोगिता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या क्षेत्रामध्ये भाषेच्या अभ्यासकांना मिळू शकणा-या विविध स्पर्धांची ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. यातूनच चांगले लेखक, नाटककार, कलाकार निर्माण होऊ शकतात.

- विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे

Next Article

Recommended