आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Wangmay Mandal Working For Marathi Literature

साहित्याचा ‘प्रतिभांकुर’ फुलवणारे मराठी मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयात 1984 पासून मराठी वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. विद्यार्थिनींना लिखाणाची गोडी लागावी, वैचारिक पातळी उंचावण्यास मदत व्हावी, या उद्देशाने मंडळातर्फे वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुत्सद्दी अन् शिस्तप्रिय प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. रघुनाथ कश्यप हे या मंडळाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळत आहेत. गजल, काव्यलेखनात समरस झालेले प्रा.कश्यप यांनी मंडळाला नवा आयाम देण्याचा ध्यास घेतला आहे.
सभोवतालच्या जगात काय चाललं आहे? याचा विद्यार्थिनींना अचूक वेध घेता यावा, डोळसपणे विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी म्हणून मंडळातर्फे ज्वलंत विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम तर गेल्या दशकभरापासून राबवला जात आहे. आपण ज्या सारस्वतांचं साहित्य वाचतो ते नेमके कसे बोलतात? कोणत्या विषयांवर त्यांचा अधिक पगडा आहे? याबाबत बारकावे माहीत व्हावेत म्हणून या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनीच लेखक - लेखिकांशी मुक्त संवाद साधतात. चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर, राहुल सोलापूरकर, निसर्गकवी ना.धों.महानोर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, मुंबई येथील स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या शारदा साठे, गीतकार प्रवीण दवणे, मधू साळी, प्रा.डॉ.किसन पाटील, संगीताचे गाढे अभ्यासक जयंत काटे, कवयित्री माया धुप्पड, गजलकार शिवाजी जवरे अशा अनेक नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थिनींनी घेतला आहे.
’ ‘प्रतिभांकुर’ हस्तलिखित मंडळाचा आत्मा : ‘दौतीत केवळ लेखणीचे टोक बुडवून लेख होत नसतात. विषयात काळजाचे टोक बुडवून जिवंत साहित्य, जातिवंत साहित्य जन्माला येत असते’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थिनींना लिहिते करण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे. लिखाणाची आवड असलेल्या विद्यार्थिनींची प्रतिभाशक्ती किती आहे? याचा शोध घेण्यासाठी मंडळ ‘प्रतिभांकुर’ हे हस्तलिखित पाक्षिक प्रकाशित करते. स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण, हुंडाबळी, जलसंधारण, बालमजुरी, नैसर्गिक आपत्ती असे ज्वलंत विषय या हस्तलिखितातून हाताळले जातात. त्यातील लेखांसाठी लागणारे स्केच हे विद्यार्थिनी स्वत:च काढतात. त्यांच्या कुंचल्यांचे फटकारे या उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या नजरेसमोर येतात हेच या ‘प्रतिभांकुर’चे खरे यश आहे.
’ ‘पदम्’ विद्यार्थिनींचा साहित्यिक दागिना : विद्यार्थिनींच्या वाङ्मयीन कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयातर्फे ‘पदम्’ हे वार्षिक नियतकालिक गेल्या अडीच दशकांपासून प्रकाशित केले जात आहे. यात मराठी वाङ्मय मंडळाचा सिंहाचा वाटा असतो. नियतकालिकाची वैचारिक उंची वाढवण्यासाठी विद्यार्थिनींनी रंजनवादी नव्हे तर समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे वास्तववादी लिखाण केले पाहिजे, अशी अपेक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांची आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षभरापासून या नियतकालिकातील बहुतांश विषय हे संवेदना बोथट झालेल्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.
’ विद्यार्थिनींना बोलते करणारे उपक्रम : मराठी वाङ्मय मंडळ हे कोटेचा महिला महाविद्यालयाचा आरसा व विद्यार्थिनींचे चालते बोलते व्यासपीठ आहे. वाचनाच्या क्षेत्रात जत्रेतल्यासारखं भटकू नये. प्रत्येक पुस्तक रुची घेऊन वाचावं. वाचलेल्या पुस्तकावर मित्रमंडळीत बोलावं. एखादं टिपण तयार करून चर्चा घडवून आणली पाहिजे, हा संस्कार रुजवण्यासाठी मंडळातर्फे पुस्तक परीक्षण, नव्या पुस्तकावर मतमतांतरे व्यक्त करणे, काव्यलेखन अभिव्यक्ती कार्यशाळा, कथालेखन कार्यशाळा, कविसंमेलन, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जातात.
नाट्यअभिरूची निर्माण व्हावी म्हणून एकांकिका, एकपात्री नाट्यप्रयोग स्पर्धाही घेतल्या जातात. मंडळाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते प्रा.डॉ. रघुनाथ कश्यप, प्रा.संध्या राजपूत, प्रा.नीलेश गुरचळ यांनी यंदा लवकरच ‘पावसाच्या रेशिमधारा’ हा ऋतुवेल्हाळ कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे.