आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षम लढ्याची ‘दीक्षा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडापटूंसाठी असणार्‍या कुठल्याच विशेष सुविधा तिच्या गावात नाहीत. किंवा मुलींनी ‘असे’ खेळ शिकण्यासारखं पोषक वातावरणही. कुठल्याही ग्रामीण भागातल्या खेळाडूंच्या मनात असतो तसा न्यूनगंड सुरुवातीला तिच्याही मनात होता. सोयी-सुविधांच्या अभावी सरावासाठी येणार्‍याअडचणी तिनेही अनुभवल्या. स्वत:ला सिद्ध करण्याची तिचीही संधी अनेकदा थोडक्यात हुकली. मात्र, या गोष्टी तिला निराश करू शकल्या नाहीत. वाट्टेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी आणि अधिकाधिक सराव करण्याचा संयम तिने बाळगला. तिच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याची. यामुळेच ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करू शकली. हा प्रवास आहे दीक्षा मनीष बनकरचा.
बीड जिल्ह्यातलं चौसाळा हे अवघ्या काही हजार वस्तीचं गाव. खेळ म्हणजे फक्त गल्ली क्रिकेट हेच समीकरण माहिती असलेलं; पण याच ग्रामीण भागात वाढलेल्या दीक्षाने तायक्वांदो खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. फारशा सुविधा नसताना तायक्वांदोसारख्या संपूर्ण विदेशी आणि पुरुषी खेळात तिने मिळवलेले यश इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
तायक्वांदोची आवड
भावासोबत गंमत म्हणून दीक्षा तायक्वांदोच्या क्लासला जायची. हळूहळू तिलाही या खेळात आवड निर्माण झाली. मग चौथीत असतानाच तिने तायक्वांदोचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला सुरुवात केली. प्रयत्नातलं सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दीक्षाने अनेक पदकांची लयलूट केली आहे.
तायक्वांदोमध्ये अष्टपैलू चुणूक दाखवणारी दीक्षा अभ्यासातही हुशार आहे. शालेय जीवनात असताना तिने विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये सहभागी होत पारितोषिकं पटकावली आहेत. शाळेत सलग तीन वर्षं सर्वोत्तम विद्यार्थिनीचा पुरस्कारही तिच्याच नावावर होता. सध्या दीक्षा चौसाळा येथे बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. दीक्षाची आयपीएस अधिकारी व्हायची इच्छा आहे. तायक्वांदोला पॅशन मानणार्‍यादीक्षाला पोहण्याची आणि संगीताची आवड आहे.

तायक्वांदोने शिकवलं खूप काही
तायक्वांदो हा केवळ क्रीडाप्रकार नाही, त्याने जगण्यासाठी ध्येय दिलं असल्याची दीक्षाची भावना आहे. तायक्वांदोने आपल्यामध्ये काय बदल घडवले याबद्दल दीक्षा भरभरून बोलते. ‘या खेळाने संयम शिकवला. स्पर्धांच्या ठिकाणी अनेकदा वयाने आपल्यापेक्षा लहान असलेल्या खेळाडूंना सांभाळून घ्यावे लागते, त्यामुळे आपली सहनशक्ती वाढली,’ असं ती सांगते. रोज सकाळ-संध्याकाळ दोन तास सराव करणारी दीक्षा, तायक्वांदोमुळे निर्णयक्षमता वाढल्याचं आवर्जून नमूद करते. स्पर्धांमध्ये सुरुवातीला अनेकदा पराभवही झाला. मात्र त्या वेळी स्वत:तल्या चुका शोधून त्यात सुधारणा करायला तायक्वांदोमुळेच शिकल्याचं दीक्षा सांगते.
खेळाडूंमधला सांघिकतेचा अभाव खटकतो
स्पर्धेच्या निमित्ताने देशात तसंच परदेशातही दीक्षाने सफर केली आहे. वेगवेगळ्या खेळाडूंचं निरीक्षण करण्याची, त्यांचा खेळ जवळून पाहण्याची संधी तिला या निमित्ताने मिळाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार्‍यादीक्षाला एका गोष्टीची खंत वाटते. इतर भागातील शहरी खेळाडूंमध्ये सांघिक भावना असते. एकमेकाला मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. पण मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये या भावनेचा अभाव दिसतो. ‘मी’, ‘माझं-तुझं’ यातच ते अडकून पडतात. खेळाडूंनी सांघिकतेने खेळल्यास नक्कीच यश मिळेल असे दीक्षाला वाटते. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातल्या गुणवान खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते उज्ज्वल यश मिळवतील असा तिला विश्वास आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमधल्या पदकानंतर बीडमध्ये झालेलं स्वागत ही दीक्षाच्या आयुष्यातली अविस्मरणीय आठवण आहे.
पालकांचा विश्वास सार्थ ठरवला
मुली वयात यायला लागल्यानंतर, पालक त्यांच्यावर निर्बंध लादतात. त्यांच्या छंद-आवडीनिवडीवर मर्यादा घालतात. दीक्षाचे वडील मनीष बनकर हे आरटीओमधील वरिष्ठ लिपिक तर आई सुनीता गृहिणी. बीड जिल्ह्यातलं वातावरणही अतिशय पारंपरिक. मात्र याही परिस्थितीत, मनीष-सुनीता यांनी दीक्षाला तायक्वांदो शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आम्ही दीक्षाला अडवलं असतं, तर ती इथपर्यंत पोहोचू शकली नसती. पालकांनी मुलींवर विश्वास ठेवायला हवा. मी माझ्या मुलीच्या बाबतीत लोक काय म्हणतील याचा कधीच विचार केला नाही. त्यामुळेच दीक्षाने आमचा विश्वास सार्थ केल्याचा अभिमान वाटतो, असं मनीष म्हणतात.
तायक्वांदो आणि स्वयंसिद्धा
महिलांना स्वसंरक्षणाचं महत्त्व कळावं, कुठल्याही परिस्थितीचा सामना करता यावा, या उद्देशानं सरकारतर्फे स्वयंसिद्धा उपक्रम चालवला जातो. त्यात तायक्वांदोच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. मूळ कोरिअन क्रीडाप्रकार असेलल्या तायक्वांदोमध्ये हातापायांच्या योग्य संतुलनाने स्वसंरक्षणासाठीचे पंच मारले जातात. अचानक झालेल्या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी तायक्वांदो अत्यंत उपयुक्त ठरतो. बीडमध्ये या उपक्रमांतर्गत तायक्वांदोचं प्रात्याक्षिकही दीक्षा देते.
पोषक वातावरण, सुविधांची चंगळ आणि संधींचा सुकाळ असेल तरच दर्जेदार खेळाडू तयार होतात ही समजूत खोडून काढत दीक्षाने सातासमुद्रापार झेंडा फडकवलाय. तिनं मिळवलेलं हे यश अभिमानास्पद नक्कीच आहे. मात्र मराठवाड्याच्या मातीतले खेळाडू सांघिकतेत कमी पडतात हे तिचं मत विचार करायला लावणारं आहे.
vandana.d@dainikbhaskargroup.com