आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योग नाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैलाने अठ्ठाविसाव्या वर्षात पदार्पण केले आणि तिचे आई-वडील मुलीच्या काळजीत बुडून गेले. तीन वर्षांपासून राबविण्यात आलेली तिच्या लग्नाची मोहीम पूर्णत: अयशस्वी ठरली होती. घराघरातील मुलींच्या वरसंशोधनाची मोहीम ज्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या गोष्टीपासून सुरू होते त्या ‘पत्रिका’ नावाच्या प्रकरणापासून तिच्याही लग्न ठरविण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला.
हस्तरेषा, कुंडली, पत्रिका, गुण, नाड्या, भविष्य, चहा, पोहे, दाखविण्याचे कार्यक्रम, विचारून गुळगुळीत झालेले प्रश्न, खालच्या मानेने देऊन झालेली तितकीच गुळगुळीत उत्तरं, खेदाचा खोटा मुखवटा लावलेला ‘योग नाहीत’ या गोंडस शब्दातील नकार या एका न संपणा-या दुष्टचक्रात एका सुशिक्षित व स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या तरुणीची ससेहोलपट होऊ लागली. लग्नाचे योग नक्की केव्हा आहेत हे खात्रीलायकरीत्या सांगू शकणा-या सर्व शक्यता पडताळून बघण्यास सुरुवात झाली. स्वत:ची विचारसरणी व जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी असलेल्या शैला नावाच्या एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वावर स्वत:चे भविष्य जाणून घेण्यासाठी कधी एखाद्या महाराजांच्या, तर कधी बुवांच्या पायावर डोके टेकवण्याची वेळ आली. ‘शैलाचं लग्न’ ही एक जागतिक समस्या असल्याच्या थाटात घरीदारी सर्वत्र केवळ तिचीच चर्चा होऊ लागली. आज काय करता येईल यापेक्षा भविष्यात काय घडणार या काळजीत पूर्ण घर त्याचं घरपण हरवून बसलं. पत्रिका, गुण वगैरे सर्व काही जमूनही मुलं आपल्या मुलीला नकार का देतात हे आई-वडिलांना कळेना, तर पैशामागे वेड्यागत धावणारी आजची मुलं आपल्यासारख्या कमावत्या मुलीला नकार का देतात हे शैलाला कळेना. शैलाच्या आॅफिसातील संगणक विभागात काम करणारा विलास नावाचा एक हुशार तरुण तिचा केवळ सहकारीच नव्हे, तर हितचिंतकही होता. त्याच्या सल्ल्यानुसार ती जेव्हा मार्गदर्शनासाठी ‘दिलासा’मध्ये आली. आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीचं ते एक मूर्तिमंत उदाहरण होतं. तिची कर्मकहाणी कळल्यानंतर तिच्यात अंतर्बाह्य बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्याच्या काळजीने खचून गेलेली मुलगी वर्तमानकाळात आनंदाने जगण्यास शिकली. तिच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाल्यानंतर एक दिवस विलासने तिला लग्नासाठी चक्क मागणी घातली! दोन वर्षांपूर्वी संगणकतज्ज्ञ विलासबरोबर विवाह झाल्यानंतर अमेरिकेला गेलेल्या शैलाचा आज न्यूयॉर्कहून फोन आला तिने मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी देण्यासाठी! असे आम्ही कसे? घर, अर्थप्राप्ती, लग्न, संतती, प्रमोशन, अचानक धनलाभ इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक, बुवा व महाराज यांच्यामागे आम्ही इतकी धावपळ करतो की उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आजचा दिवस चांगल्या त-हेने व्यतीत करणे आवश्यक आहे हे विसरूनच जातो. भूतकाळात रमण्यात अर्थ नसतो व भविष्यात काय घडणार आहे व खरंच घडण्याची शक्यता आहे का याच्या काळजीने निर्माण होणा-या तणावाखाली सतत वावरून डोळ्यासमोर दिसत असलेला वर्तमानकाळ मात्र आपण हातातून घालवत असतो. भविष्याच्या काळजीने अत्यंत चिंताग्रस्त झालेल्या शैलाच्या व्यक्तिमत्त्वातील प्रसन्नता तिला सोडून दूर पळून गेली होती. आत्मपरीक्षण केल्याने, वर्तमानकाळात जगण्याचं महत्त्व पटल्यामुळे तिचा कायापालट झाला. तिच्या आयुष्याला आश्चर्यकारक कलाटणी मिळाली.
भविष्याबद्दल रात्रंदिवस काळजी करत बसण्याऐवजी भविष्याच्या योजना तयार करून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी वर्तमानकाळात कृती करणा-या व्यक्तीच आयुष्यात ख-या अर्थाने यशस्वी होत असतात हे आमच्या केव्हा लक्षात येणार?