आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नांची गोष्‍ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलयांकित व्यक्तींच्या खासगी आयुष्याबद्दल जनसामान्यांमध्ये नेहमीच आकर्षण असते. त्यातही लोकप्रिय नट-नट्यांचे लग्न हा हमखास कुतूहलाचा विषय असतो. परंतु बहुसंख्य वलयांकित व्यक्तींचा ‘प्रायव्हसी’ जपण्याकडे कल असल्याने, गॉसिप पातळीवरील ख-या-खोट्या गोष्टींनाच अधिक प्रसिद्धी मिळत राहते. प्रत्यक्ष त्या-त्या सेलिब्रिटीने स्वत:च्या तोंडून आपले आयुष्य वा लग्नाबद्दलच्या गोष्टी इतरांशी ‘शेअर’ करण्याचा प्रसंग अभावानेच येतो. योगेश्वर पब्लिकेशन्स प्रकाशित आणि किशोर धारगळकर लिखित ‘लग्नसंकर’ हे पुस्तक ऐकीव गोष्टींवर विसंबून न राहता प्रत्यक्ष सेलिब्रिटीच्या तोंडून त्यांच्या लग्नाच्या रंगतदार तसेच खात्रीलायक कथा वाचकांपर्यंत पोहोचवते.


भाग्यश्री पटवर्धन ही महाराष्‍ट्रीय श्रीमंत घरात, मोजक्या माणसांत, स्वातंत्र्यात वाढलेली. हिमालय मारवाडी कुटुंबातला. त्याचे घर म्हणजे मोठा कुटुंबकबिला. दोघांची ओळख शाळेपासूनची. पुढे मिठीबाई कॉलेजमध्येही एकत्र शिक्षण. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि वयाच्या अठराव्या वर्षीच भाग्यश्रीने हिमालयशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीने मारवाडी मुलाशी लग्न करण्याला भाग्यश्रीच्या आईवडलांचा विरोध नव्हता, पण भाग्यश्रीने इतक्या लहान वयात तेही घाईघाईने आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय घ्यावा, याला त्यांचा ठाम विरोध होता. कालांतराने हा विरोध मावळला.


दूरदर्शनवरील ‘सुरभि’ कार्यक्रमातून सर्वपरिचित झालेली रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाची गोष्टही अशीच मजेशीर. रेणुका महाराष्‍ट्रीय, तर आशुतोष मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून हिंदी चित्रपटसृष्टीत जम बसवण्यास आलेला. ती नास्तिक, मूर्तिपूजा वगैरे मान्य नसलेली; तो मात्र शंकराचा भक्त, देवावर गाढ विश्वास असणारा. पण दोन धु्रवांवरील या दोघांचा सुखी संसार दृष्ट लागण्यासारखा आहे.


प्रेम कुठेही, कसेही, कोणावरही, कधीही होऊ शकते. अगदी तुरुंगातही! किरीट सोमय्या आणि मेधा ओक यांची प्रेमकथाही तुरुंगातूनच सुरू झालेली. आणीबाणीच्या काळात दोघांनाही अटक झाली होती व तुरुंगात दोघांची ओळख झाली. पुढे जनता पक्षाचे काम एकत्रितपणे करताना ओळखीचे रूपांतर प्रेमात व पुढे लग्नात झाले. सासू-सास-यांच्या पाठिंब्यामुळेच मेधा घर व शिक्षण या दोन्ही आघाड्या सांभाळू शकल्या.


सलीम खान-सुशीला चरक हे सलमान खान या प्रसिद्ध सिनेअभिनेत्याचे आईवडील. 1964 मध्ये त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला व सुशीला ‘सलमा’ झाल्या. त्यांना सलमान, अरबाझ, सोहेल हे मुलगे व अलविरा ही मुलगी आहे. पुढे सलीम यांच्या आयुष्यात हेलन आल्यानंतरही सलीम-सुशीला यांचे नाते टिकून आहे ते परस्परांवरील विश्वास व प्रेमामुळेच.


‘लग्नसंकर’ पुस्तकातल्या या काही रंजक ‘लग्नांच्या गोष्टी’. समाजातल्या ‘प्रथितयश’ वर्गातल्या अशा कितीतरी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या गोष्टी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमधील सदरात धारगळकर यांनी घेतलेल्या मुलाखतींवर आधारित हे पुस्तक आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह हे आता अप्रूप वा कुतूहलाचे राहिलेले नाही. असे विवाह पालक तसेच समाजही उमद्या मनाने स्वीकारू लागला आहे. पण किरीट सोमय्या-मेधा ओक, तबस्सुम-विनय गोविल, सलीम खान-सुशीला चरक, जान्हवी पणशीकर-शक्ती सिंह, राज बब्बर-नादिरा बब्बर यांच्या विवाहाचा काळ लक्षात घेता, अशा विवाहाचा निर्णय घेणे धाडसाचेच म्हणावे लागेल.


पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी; मांडणीही तशीच, गोष्टीच्या पुस्तकासारखी. या लोकप्रिय जोडप्यांची नावे वाचूनच पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढते. प्रत्येक जोडीविषयी अगदी नेमक्या शब्दांत, नेटकेपणाने लिहिले आहे. प्रत्येकाची कौटुंबिक छायाचित्रे पुस्तकाची रंगत आणखी वाढवतात. अतिशय हलकेफुलके असे हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल.
mayekarpr@gmail.com

लग्नसंकर, किशोर धारगळकर - लेखक
योगेश्वर पब्लिकेशन्स - प्रकाशक, किंमत 210 रु.