आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित स्त्री व पुरूष व्यक्तिमत्त्वांचा अभ्‍यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवाच एक पुस्तक वाचनात आलं. ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन फ्रॉम व्हीनस’. स्त्री-पुरुषांमधल्या महत्त्वपूर्ण बंधाचं एक सुरेख, वास्तववादी व मनाला पटणारं वर्णन लेखकाने त्यात केलंय. काही वेळा स्त्रियांच्या वागण्यात एक वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न (ढाचा) दिसून येतो आणि लगेच सभोवतालून एक रिअ‍ॅक्शन येते, टिपिकल बायकी वृत्ती. या वृत्तीचा किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला तर अनेक धागेदोरे, जुळते बंध दिसून येतात. तिच्या वागण्यातील नीटनीटेकपणा, सहनशीलता व त्याच जोडीने येणारी धीरोदात्त वृत्ती असलेली, कधी इमोशनल झाल्यावर डोळ्यात पाणी येणारी, पण प्रसंगी कठोरपणे आणि प्रसंगावधान राखून वागणारी ती ‘स्त्री’.


यानंतर एक विवाहित स्त्री व विवाहित पुरुष यांचे व्यक्तिमत्त्व, एका विशिष्ट टप्प्यावर अभ्यासावे हा एक विचार पुढे आला. खरेतर आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर थांबून, विसावून स्वत:कडे आपल्याच चष्म्यातून पाहावं इतकीही उसंत, वेळ नाही. पण जेव्हा आपल्या व आपल्या जोडीदाराच्या चष्म्यातून त्याकडे पाहावयाचे ठरवले व अनेक गमतीजमती व काही गंभीर बाबी पुढे आल्या.


लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळातील ती दोघे (पती-पत्नी काही वर्षांनंतर खूप परिपक्व बनतात किंवा एकमेकांचे विचार न बोलताच एकमेकांना समजतात व जाणून घेतात). पण तेच जर लग्नानंतरच्या प्रवास, कुठे तरी अविश्वास, ईर्षा, द्वेष यांसारख्या कुबड्यांवर विसावला असेल तर त्या दोहोंचं कुटुंब म्हणजे एक छानसं घरकुल बनतच नाही आणि या सहजीवनाचा (?) अभ्यास करायचा म्हटलं तर अनेक घटक विचारात घ्यावे लागतील.


साधारण 20-25 वर्षांपूर्वी लग्नाचे वय 20 ते 25, जास्तीत जास्त 27 वर्षे (मुलांच्या बाबतीत) ठरलेलं असायचं. मुलं ग्रॅज्युएशन झालं, थोडी चांगलीशी नोकरी मिळाली की लग्नाच्या बाजारात सेलेबल असत. तर उपवर मुलीबाबत सौंदर्य, घरकामाची सवय व असलीच तर एखादी छोटी-मोठी नोकरी पुरेशी असायची. त्या आधारावर तिला कोणीही सद्गृहस्थ मागणी घालील; पण काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढली. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात मुलींनी कर्तृत्व दाखवले नाही.


पण हे करताना समाजाचा कणा मोडकळीस यायला लागला, समाजाची घडी विस्कळीत तर झाली नाही ना, अशी भीती काही हितचिंतकांच्या किंवा सो कॉल्ड सामाजिक अभ्यासकांच्या मनात यायला लागली. कारण आता विविध क्षेत्रांतील प्रगतीमुळे स्त्रीचे एक पाऊल घरात, तर एक दाराबाहेर पडायला लागले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात ठिकठिकाणी मुलांचे संगोपन, वडीलधा-यांचे आजारपण, सासरच्यांची मर्जी सांभाळणे, मुलांचा अभ्यास व त्यांच्या वेळा सांभाळणे अशा सगळ्या आघाड्यांवर स्त्रीला आपल्या जोडीदाराच्या सहकार्याची गरज भासू लागली. याचा परिणाम पुरुषांच्या मानसिकतेवर व्हायला लागला. आपली पत्नी केवळ गृहिणी म्हणून न वावरता एक कर्तबगार स्त्री म्हणून प्रगल्भ व विकसित होतेय याचा आनंद होताच, पण त्यामुळे काही तोटे तर होणार नाहीत, आपली विवाह संस्था डामडौल तर होणार नाही, अशी एक शंकाही त्यामध्ये डोकावत होती. त्यातूनच स्त्री-पुरुष ही संसाररथाची दोन तुल्यबळ चाके या विचारातून विवाह संस्था पूर्वीइतकीच खंबीर आहे वा नाही हा विचारही पुढे आला.


आज प्रत्येक मुलीच्या जीवनाविषयी काही अपेक्षा आहेत. जेव्हा ती शिक्षण घेते, करिअरचा विचार करते तेव्हा प्रसंगी विवाहाच्या गुंत्यात, मुलाबाळांच्या चक्रात न अडकता स्वत:चे व्यक्तिमत्त्व व त्याचा परिपूर्ण विकास व त्यातूनच स्वत:चे व्यावसायिक जीवन अधिक महत्त्वाचे मानते. त्याचाच परिणाम पुरुषांवरही होताना दिसतो. पूर्वीसारखे सर्व क्षेत्रांत आपले वर्चस्व ते दाखवू शकत नाहीत. बरेचदा कुटुंबाच्या व व्यावसायिक जीवनातील आनंदाकरिता, समाधानाकरिता काही तडजोड करावी लागते. ही तडजोड कायमस्वरूपी राहते की क्षणिक? त्याचा दोघांच्या वैयक्तिक, वैवाहिक व व्यावसायिक जीवनावर कसा व कोणता परिणाम होतो. तो परिणाम सकारात्मकतेकडे नेणारा की त्यातून वैवाहिक जीवनाच्या अपयशाचीच शक्यता अधिक?


या सर्व प्रश्नांचा जीवनातील विशिष्ट टप्प्यांवर (विवाहपूर्व, विवाहोत्तर तसेच स्थिरावलेल्या व अजून स्थिरावल्यास वाव आहे अशा व्यावसायिक जीवनात) कसा व कोणता परिणाम होणार आहे किंवा त्यामधून नेमके काय निष्पन्न होईल. तसेच त्या निष्कर्षांवर आधारित काही मार्गदर्शन/उपाय या आजच्या समाजात वावरणा-या व्यक्तींना आपण सुचवू शकतो का याबद्दलचे एक संशोधन सध्या चालू आहे. विविध वयोगटांतील तसेच विविध क्षेत्रांत (सेवा व उद्योगधंदे) कार्यरत असणारे, अनुभवसंपन्न व नव्यानेच व्यवसायात शिरलेले, अशा सर्व स्तरातील व्यक्तींची मते विचारात घेण्याचा एक मानस आहे. तरी त्याबद्दलची मते, प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात.