आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मटका ते बेटिंग व्हाया रतन खत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्टकरी, कामगारवर्गाचे प्राबल्य असलेला मुंबईतील परळ नाका... रस्त्याच्या दुतर्फा उभ्या-आडव्या पसरलेल्या चाळी... दोन चाळींमध्ये अगदी अरुंद, अंधारी बोळ... अक्षरश: एखादा माणूस जेमतेम जाऊ शकेल... याच बोळात 10-15 स्टुलांवर ओळीने बसलेले ‘रायटर्स’ आणि त्यांच्या पुढ्यात उत्सुकता आणि चिंतेचे संमिश्र भाव चेहर्‍यावर असलेले ‘खेळाडू’... या रायटर आणि खेळाडूंमध्ये अत्यंत सावध हालचाली चाललेल्या... कुणी खेळाडू रुपया, कुणी दोन रुपये देतोय आणि ‘रायटर’ त्यांच्या हातात लाल, पिवळ्या, पांढर्‍या रंगाची चिठ्ठी कोंबतोय... 70 ते 90च्या दशकात सकाळी सहापासून अगदी रात्री बारापर्यंत रायटर आणि खेळाडूंमध्ये हा सावध ‘खेळ’ मुंबईभर रंगत असे...
दिवसाची बेगमी करून देण्याची आशा कष्टकर्‍यांमध्ये जागवणार्‍या या खेळाची पोलिसांच्या दप्तरी ‘मटका’ म्हणून नोंद होती आणि समाजामध्ये या मटक्याबद्दल प्रचंड कुतूहल होते. परंतु मटका हे नाव कसे रूढ झाले, याची कुठेही नोंद नाही. काही जणांच्या मते, ‘आकडे’ हे मातीच्या मडक्यात पत्ते टाकून काढीत असत, म्हणून मडक्याचा हिंदी शब्द ‘मटका’ असा रूढ झाला.
रतन खत्री... पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती. हिंदी सिनेमाला नेहमीच अशा वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची गरज आणि कुतूहलदेखील वाटत असते. रतन खत्री त्याला अपवाद नव्हता. रतन खत्री याच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ हा चित्रपट आला तर ‘रंगीला रतन’ हा चित्रपट रतन खत्री याने स्वत:च निर्माण केला. असा पोलिस आणि समाजाच्या नजरेत ‘गुन्हेगार’ असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून होता. सकाळी सहा वाजता मटक्यावर पैसे लावणार्‍या खेळाडूंची गर्दी धंद्यावर होत असे ती त्यामुळेच. साधारण सकाळी नऊ वाजता पहिला ‘आकडा’ जाहीर होत असे, याला मटक्याच्या भाषेत ‘ओपन’ म्हणून संबोधत. त्या काळात फोनव्यतिरिक्त कोणतीही आधुनिक सुविधा नसतानादेखील ही ‘खबर’ जाहीर झाल्या झाल्या, अक्षरश: काही सेकंदांत सगळ्या धंद्यावर पोहोचत असे. अगदी परदेशातसुद्धा...! आणि ताबडतोब त्याची वाटणीदेखील होत असे. त्यानंतर पुन्हा रात्री बाराच्या सुमारास ‘क्लोज’चा आकडा काढला जाई.
या संदर्भात जुने-जाणते धंदेवाले आणि खेळाडू सांगतात की, मटक्याचा आकडा हा बावन्न पत्त्यांमधून काढतात. मात्र या बावन्न पत्त्यांतील गुलाम, राणी, राजा हे पत्ते आधीच काढून टाकलेले असतात. उरलेल्या पत्त्यांमधून तीन पत्ते काढून आकडा जाहीर केला जातो. उदा. एक्का, पंजा आणि छक्का आल्यास त्याची बेरीज ही बारा होते. म्हणजेच शेवटचा आकडा दोन म्हणून ‘दुरी’ हा आकडा म्हणून जाहीर केला जातो. या धंद्यातील बोलीभाषासुद्धा वेगळी असते. उदा. सात या आकड्याला ‘लंगडा’ तर सहाला ‘छक्का’ म्हणतात. दहा या आकड्याला ‘मेंढी’ म्हणतात, तर चारला ‘चौका’ म्हणून ओळखतात. आजही सर्वसामान्यांच्या तोंडी हेच शब्द रूढ झाले आहेत.
तीन एक्के, तीन नव्वे असे एकसारखे पत्ते आले की त्याला ‘संगम पाना’ तर 2,2,4 किंवा 2,2,8 असे आकडे आले तर ‘डी. पी. पाना’ म्हणतात. 1,3,9 किंवा 2,4,9 याला ‘सिंगल पाना’ म्हणून ओळखत. हे शब्द बोलीभाषेत प्रचलित कोणी केले, हे मात्र अजून कोणालाही माहीत नाही. रतन खत्रीच्या ‘मेन बाजार’च्या मटक्याला पैसेदेखील चांगले मिळत. ‘संगम पाना’ म्हणजेच तीन एक्के किंवा तीन नव्वे लागले, तर 1 रुपयाला शंभर रुपये मिळत, तर डीपी पानाला एक रुपयाला अडीचशे रुपये मिळत. एका पांढर्‍या, पिवळ्या, लाल, हिरव्या अशा साध्या चिठ्ठीवर लिहिलेला आकडा घेऊन खेळाडू आपल्या रायटरकडे गेल्यावर कोणतीही चौकशी न करता लागलेल्या आकड्याच्या प्रमाणात ताबडतोब पैसे मिळत.
कालांतराने ‘कल्याण मटका’ नावाचा समांतर मटका मुंबईत आला. हा मटका मुुलुंड, कल्याण, वरळी येथून चालत असे. कल्याण भगत नावाच्या एका कच्छी तरुणाने हा मटका सुरू केला होता. तरीही जुन्या खेळाडूंच्या मनात रतन खत्रीच्या मटक्याचे स्थान कायम होते. कारण काही जुन्याजाणत्या खेळाडूंच्या मते, रतन खत्री लोकांच्या समोर बावन्न पत्ते पिसून आकडा काढत असे, तर काही असेही सांगतात की, रतनशेठ गर्दीतील एखाद्या अनोळखी माणसाच्या हातून आकडा काढत असे.
काही असले तरीही म्हणूनच ‘मेन बाजार’ म्हणजेच रतन खत्रीचा मटका हा मुंबईतील ‘कल्याण’ मटक्यापेक्षा अधिक विश्वासू मानला जाई. कल्याण भगतचा मटका कल्याण मटका आणि वरळी मटका अशा दोन नावांनी ओळखला जाई. आज हा धंदा मुंबईतील काही गँग्जच्या ताब्यात गेला आहे. अगदी कालपरवापर्यंत मुंबईतील काही वर्तमानपत्रांमधून शुभांक म्हणून हे आकडे जाहीर होत. या धंद्यातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या तिजोरीमध्ये जात नसे, म्हणून शासनाने स्वत:ची अधिकृत लॉटरी सुरू केली. आज या धंद्यात रतन खत्रीचा पूर्वीइतका दबदबा आणि सहभागही राहिलेला नाही. बंद झालेला नसला तरीही मटकासुद्धा फारसा चर्चेत नाही. मात्र, आता कष्टकर्‍यांच्या मटक्याची जागा उच्चभ्रूंच्या बेटिंगने घेतली आहे. विविध क्षेत्रांतले नामचिन लोक ‘बेटिंग’मध्ये सहभागी होऊन थेट क्रिकेटसारखा सभ्य गृहस्थांचा खेळ नासवत समाजातील अस्सल क्रिकेटप्रेमींच्या भावना दुखावत आहेत... vikas.naik@gmail.com