आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामीण साहित्‍यातील लेखनात सकसता कमी झाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या कानाकोप-यांत ग्रामीण साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले जात असल्याची माझी माहिती आहे, परंतु त्यात पुरेशी सकसता नाही, हे माझे दु:ख आहे. अर्थात जे साहित्य माझ्यापर्यंत पोहोचते आणि माझ्या नजरेखालून जाते, त्याविषयीच मी हे म्हणू शकतो. राज्याच्या कानाकोप-यात शिक्षणाचा प्रसार होत असल्याने लिहिण्याची ऊर्मीही नव्याने जागते आहे. पण सकस लेखनासाठी जो अनुभवांचा विशाल पट हवा, त्याचा अभाव आजकालच्या ग्रामीण लेखनातून जाणवतो, असे माझे निरीक्षण आहे. ग्रामीण साहित्यलेखनाची गती मंदावली नसून, त्यामधील गुणवत्ता उणावली आहे, असे म्हणावे लागेल. उत्तम लेखनासाठी निष्ठा, अभ्यास, विषयाचे गांभीर्य, वाचनातील सखोलता या गोष्टी आवश्यक असतात. नेमक्या या गोष्टींचे प्रमाणच नगण्य झाल्याने ग्रामीण साहित्यात फारसे भरीव योगदान देणारे लेखन गेल्या काही वर्षांत झालेले दिसत नाही.
ग्रामीण लेखनाविषयीची उत्सुकता, जिज्ञासा ज्या प्रमाणात पूर्वी दिसायची त्यातही घट झाल्याचे दिसते. विशेषत: ग्रामीण लेखन सध्या स्थानिक पातळीवरील वृत्तपत्रे, पुरवण्या, नियतकालिके, साप्ताहिके, विशेष अंक यापुरतेच मर्यादित झाले आहे. ते संकलित स्वरूपात पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येण्याची क्रिया मंदावली आहे. शिवाय ते विखुरलेल्या स्वरूपात होत असल्याने त्यात एकसंधता नाही. कादंब-या - कथा लिहिल्या जातात, असे मी ऐकतो. काही मंडळी मला त्यांचे लेखन पाठवतात, पण त्यातही योगदान म्हणता येईल, असे फारसे काही आढळत नाही. दिवाळी अंकातूनही बरेच ग्रामीण साहित्य छापले जाते. मराठवाडा, कोकण, खान्देशातील दुर्लक्षित भागात ग्रामीण लेखन होते आहे, पण ते मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्याचे मूल्यमापन करणे अवघड आहे. नव्या पिढीतील ग्रामीण लेखन करणा-यांना, करू पाहणा-यांना कुणी मार्गदर्शन करणारी अधिकारी मंडळीच मिळत नाहीत, ही समस्याही मोठी आहे. पुण्या-मुंबईकडे सारे स्रोत एकवटले त्यांच्या लेखनातील चुका, कमी-अधिक गोष्टी दुरुस्त करणारेच कुणी नाही. नव्या लेखकांनी ही आव्हाने समजून त्यांचा सामना करत सकस लेखन करण्याचा प्रयत्न हवा.
- शब्दांकन : जयश्री बोकील