आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाधिक भाषांतरे झाली पाहिजेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्‍ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचा यंदाचा वीर नर्मदा पुरस्कार कविवर्य पद्मश्री ना.धों.महानोर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ते जालन्यात आले असताना गुजराती भाषेने केलेला त्यांचा हा गौरव आणि मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा देण्यासंदर्भात सुरू असलेली चर्चा, भाषांतराची कक्षा वाढवावी हे सांगताना त्यांनी दुस-याच्या भाषेमध्ये जे चांगले असेल ते घेतले पाहिजे त्यामुळे ती समृद्ध होते हे नमूद करून अनेक विषयांवर त्यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला.. तो त्यांच्याच शब्दात.


भाषांतराची कक्षा वाढवावी :
माणसाला समृद्ध होण्यासाठी लेखक, कवींना समृद्ध व्हावे लागेल, त्यासाठी एका दुस-याच्या भाषेमध्ये जे चांगले असेल ते घेतले पाहिजे त्यामुळे ती समृद्ध होते, परंतु माझे म्हणणे असे आहे, थेट हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत जेवढी राज्य आहेत, त्या त्या राज्यांमधील भाषेतील साहित्य कथा, कविता, कादंबरी वैचारिक, सामाजिक, राजकीय असे हे साहित्य किंवा लोककविता हे सर्व त्या त्या भाषेचे वैभव आहे. गोदावरी इथून खाली तीन राज्यांमध्ये जाते ना.. जे चांगले असेल सुंदर असेल किंवा दु:ख असेल ते एकमेकापर्यंत घेऊन जाता आले पाहिजे. असे असताना आपल्या भाषेतील साहित्य तिकडे गेले पाहिजे तिकडचे साहित्य आपल्याकडे आले पाहिजे. त्यासाठी भाषांतराची कक्षा वाढली पाहिजे.


साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्टसारख्या संस्थांना मर्यादा :
साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांसारख्या काही संस्था आणि प्रकाशने जाणीवपूर्वक चांगल्या साहित्याची भाषांतरे करीत असतात. होत नाही असे नाही मात्र त्यांना मर्यादा आहेत. कारण, त्या शासनाच्या मदतीवर चालतात त्यांना अनेक मर्यादा आहेत. तरी? त्यांनी चागले काम केले. संबंध देशातील अनेक चांगल्या साहित्याचे भाषांतरे त्यांनी केली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी मराठीतील चार कादंब-या वाचल्या, पाच कवी वाचले याच्याबरोबर मी भारतीय साहित्यातील किती वाचले हे पाहिले पाहिजे. तुम्ही इंग्रजी वाचता ते कशासाठी वाचता, नुसत्या रंजनासाठी नाही ना..रंजन तर आहेच मात्र त्यात एक शक्ती आहे. ज्या कलाकृतीमध्ये प्रगल्भ अशी शक्ती असते ती घेतल्याने आपल्यामध्ये ऊर्जा तयार होते. भारतीय साहित्यात ही फार मोठी शक्ती आहे. म्हणून आपण म्हणतो ना केरळच्या अमूक एका कादंबरीत जे लिहलेय तेच माझ्या खेड्यात होतेच ना.. जे उत्तर प्रदेशमध्ये अराजक आले आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढली ते एका पुस्तकात आहे ना. मी पाहतो 10 वर्षांत माझ्या खेड्यात काय चालले आहे तेच चालले आहे ना. त्याचच प्रतिबिंब आहे, असे जे संगळे येते मग आपण लिहितो. पण त्या लेखकांनी जी मांडणी केलेली असते ती आपल्याकडे आणि आपली तिकडे गेली पाहिजे.


गांधारीचे भाषांतर भेट दिले :
मी गुजरातला गेलो तेव्हा त्यांना भेट म्हणून माझ्या कविता तर दिल्याच, परंतु 10 वर्षांपूर्वी भारती वैद्य या लेखिकेने माझ्या गांधारी नावाच्या कादंबरीचे भाषांतर केले आहे. त्यांना इतका आनंद वाटला. त्याचा खप तिथे खूप चांगला आहे. 90 ला जेव्हा मला पद्मश्री मिळाली तेव्हा नॅशनल बुक ट्रस्टने जो अहवाल दिला त्यात हिंदी मध्ये गांधारीच्या सव्वा लाख प्रती गेल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. गांधारीत भरडलेल्या ज्या स्त्रिया होत्या. स्वातंत्र्याच्या नंतर सहकार, राजकारण, समाजकारण यात उत्तम करणा-याला खोडून काढणे त्याची पाळेमुळे छाटणे हे गांधारीचे मूळ स्वरूप आहे. ते बघू नये पुन्हा गांधारीसारखी पट्टी बांधावी इतके अराजक माजत असेल अनैतिकता रस्त्यावर चालत असेल कुणी काही करू शकत नसेल. असा गांधारीतला मुख्य स्रोत आहे. स्वातंत्र्यानंतर 1972-74 ला 25 वर्षांमध्ये खेडे कसे झाले हे मी त्यात लिहिले आहे. हे सर्व हिंदीच्या भाषांतरात काही लोकांनी वाचले त्यावर जेव्हा चर्चा झाली, त्यांनी प्रतिक्रिया दिली ‘ये जो मराठीने लिखा है उससे तो जादा गजहब उत्तर प्रदेश में है.’ म्हणून हिंदी बेल्टमध्ये ती कादंबरी जास्त गेली. मी त्यांना सांगितले, सयाजीराव महाराज गायकवाड यांनी पहिल्यांदा पुस्तकांचे फिरते ग्रंथालय सुरू केले.


माझे साहित्य 14 भाषांमध्ये भाषांतरित :
त्यामुळे मला असे वाटले हे सर्व माझे ज्येष्ठ लोक आहे त्यांचाच मला आशीर्वाद आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार घेताना आनंदोत्सव अनुभवायला मिळाला. माझे 14 भाषेत भाषांतरे झाली आहेत मला गोव्यानेही पुरस्कार दिला होता पण खूप आनंद वाटला. त्यामुळे भाषांतर खूप झाली पाहिजे, भाषांतरित पुस्तके गं्रथालयांमध्ये आली पाहिजे असे मला वाटते. तिथेही मी हेच बोललो नुसता पुरस्कार मिळून काय उपयोग उत्तमोत्तम मराठी साहित्याचे भाषांतर होणे महत्त्वाचे. साहित्य संमेलनाचा विषय मी डोक्यातून काढून टाकलाय. त्यावर मी इतक्या वेळा बोललो आहे की त्यावर पुन्हा बोलणार नाही. उसाचा चोथा झालेला भाग आपण पुन्हा चरख्यात घालत नाही. त्यामुळे मी याच्यावर एक शब्दसुद्धा बोलणार नाही.


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावाच मात्र तिचा दर्जा आपणच टिकवला पाहिजे :
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गोष्ट चांगलीच आहे, परंतु तिचा दर्जा आपणच टिकवला पाहिजे. त्यासाठी घरी, दारी जे आहे ते पाहाता आपल्या व्यवहारात मराठी भाषा शुध्द बोलणे, शुद्ध वागणे हे महत्त्वाचे आहे. अडाणी लोक होते तरीही त्यांचा लहेजा जो होता तो प्रेमाचा होता. आता ढोबळ मानाने जे आहे ते पाहता मराठी पहिल्यांदा शुद्ध पद्धतीने लिहिली पाहिजे. त्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झालेय.


नुसता वरून दर्जा मिळण्यात काय अर्थ :
आय.टी.चे कौतुक झालेय, अमेरिकेत गेले त्यांचे कौतुक झाले मला आंनद आहे. की ही किती टक्क्यांची गोष्ट आहे. 15 टक्क्यांची गोष्ट आहे. 15 टक्क्यांची जी गोष्ट आपण एवढी सांगता... परंतु नगरपालिकेची शाळा, जिल्हा परिषदेची शाळेत, खेड्यांमधील शाळेत जी मुले आहेत शिक्षकांनी, पालकांनी स्वत: लक्ष घालून आणि विद्यार्थ्यांकडे ज्या पद्धतीने मराठी भाषा, मराठी साहित्य, इतिहास, भूगोल जे असेल ते नीटपणे संपादन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. आज सातवीतील मुलांना जर काही येत नसेल, चौथीच्या मुलांना भाषा वापरता येत नसेल, मॅट्रिकची मुले एकसुद्धा शब्द शुद्ध लिहित नसतील आणि शिक्षकांनाही ती भाषा येत नसेल.. कुसुमाग्रज कोण आहेत हे माहिती नसेल केशवसुत कोण आहे हे माहीत नसेल तर, तुमच्या वरून दर्जा मिळण्याला कार्य अर्थ आहे. आपला मराठी भाषेचा जो पाया आहे त्यावर स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी तुम्ही जर लक्ष केंद्रित केले नाही. नुसते पाठ्यपुस्तके नाही, त्याशिवाय ग्रंथालय, पूरक वाचन इत्यादीवर लक्ष दिले जावे जुन्या काळामध्ये त्या खाली लिहिलेले असे, झेल्या वाचला पण तुम्ही माणदेशी माणसे वाचा, अमूक वाचले पण शंकर पाटलांचे टारफुला वाचा, रणजित देसाईचे स्वामी वाचले परंतु तुम्ही रायगडाला जेव्हा जाग येते वाचा. विशेष म्हणजे शिक्षक जरूर हे सांगायचे. मी जो वाढलो तो केवळ उत्तमातले उत्तम शिक्षक होते आणि शाळा होती म्हणून. त्याचे श्रेय त्यांना जाते.


कविता-अवांतर वाचन विद्यार्थ्यांना हवेच :
मी सातवीत उल्का वाचली, आठवीत खलील जिब्रान वाचला. माधव ज्युलियनांची गजलांजली मी त्या वेळी वाचली. संबंध मराठी साहित्य जे चांगले आहे ते सर्व मी वाचले. माझे मत असे की काही गुण अवांतर वाचनासाठी ठेवले पाहिजेत. त्यानुसार त्याची भाषा तपासली पाहिजे, त्याच्याकडून कवित्या म्हणून घेतल्या पाहिजे. जुन्या काळात शिक्षक सातवी किंवा मॅट्रिक शिकलेला असताना तो ज्या पद्धतीने आपले म्हणून सर्वंकष प्रयत्न करायचा. भाषा आणि व्याकरण हा विषय असायचा. आज तीन तीन महिने जर पाठ्यपुस्तके बदलताहेत का तर यात दोष होता,त्यात दोष होता. अत्यंत विद्वान मंडळी जर तिथे संपादक मंडळावर आहेत तर मग या चूका राहिल्या कशा.त्याच्यामुळे आपण तळापासून गेले पाहिजे, असे मला वाटते.


भाषेसाठी दोन समित्या चांगल्याच, पण प्राथमिक शाळेपासून दर्जा पहा, पालकांनीही लक्ष द्यावे :
तिकडून काही मिळाले आणि भाषेसाठी दोन समित्या करुन काही झाले तर चांगलीच गोष्ट आहे, काही शंभर दोनशे कोटी मिळाले तर नकोय का? उलट आग्रह पाहिजे परंतु ते ‘तुझे आहे तूजपाशी परी तू जागा भुललाशी’ त्याप्रमाणे प्राथमिक शाळेपासून दर्जाचे पहा. यात केवळ शिक्षकाचा दोष नाही. शिक्षक उत्तम पाहिजे प्रशिक्षित पाहिजे दुसरी गोष्ट मुलांमध्ये ती आपुलकी पाहिजे आणि तिसरी गोष्ट पालकांनी मुलगा शाळेत पाठवून दिला तर त्याची जबाबदारी शिक्षकाची आहे. तो कोणत्या वर्गात आहे त्याने काय केले काय लिहिले यासाठी एक तास दिला पाहिजे. त्याला कार्यान्वित केले पाहिजे. त्याला सांगा तू मला गिरीशांची कविता म्हणून दाखव, काय बिघडतं आई वडिलांना जर ऐवढा वेळ नसेल तर मग शिक्षकांना, शिक्षक संस्थेला आणि शिक्षण व्यवस्थेला दोष देऊन उपयोग नाही.
शब्दांकन - कृष्णा तिडके, जालना