आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prerana Mayekar Writes About A Ragpicker\'s Rise In Life

कचऱ्यातून उद्योजकतेकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंदारी (कचऱ्याची झोळी) खांद्याला लटकवून कचराकुंडीवरील कचरावेचकांकडे बघण्याची समाजाची नजर तिरस्काराचीच. यातील या स्त्रियांना वेगळे पर्याय उपलब्ध करून देऊन किमान माणूसपणाचे जगणे जगता यावे, यासाठी मुंबईतील स्त्री मुक्ती संघटना प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणावी अशा सुशीला मोकल यांची ही कहाणी.

‘मी १९९९ मध्ये स्त्री मुक्ती संघटनेत आले, तेव्हा मला धड वाचताही येत नव्हते. पण आता मी चांगले वाचते. माझ्या कामाचा अहवालही लिहिते. इतर महिलांनाही लिहा-वाचायला शिकवते. सीप्झमध्ये माझ्याबरोबर काम करणाऱ्या महिला सुरुवातीला पगाराच्या रजिस्टरवर अंगठा टेकायच्या, आता चक्क सही करतात. मी तर आता इंग्रजीतही सही करायला शिकले आहे...’ सुशीला मोकल हसऱ्या चेहऱ्याने अभिमानाने सांगतात.
वडील अकाली गेल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची. त्यामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये कचरा वेचणाऱ्या आईबरोबर लहानगी सुशीलाही शाळा सोडून कचरा वेचायला लागली. वयाच्या बाराव्या वर्षी नकळत्या वयात आईच्या एका कचरावेचक मैत्रिणीच्या मुलाशी लग्न झाले. तो रेल्वेत नोकरीला आहे, असे मैत्रिणीने सुशीलाच्या आईला सांगितले होते. पण लग्नानंतर कळले की, तो रेल्वेत काय कुठेच काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन तर होतेच. कसाबसा सुशीला संसाराचा गाडा रेटू लागल्या. कालांतराने तीन मुले झाली. मग उदरनिर्वाहासाठी त्याही सासूबरोबर पुन्हा कचरा वेचू लागल्या. कचरावेचकांच्या आयुष्यातली ससेहोलपट पाठ सोडत नव्हती. एखाद दिवस कचरा मिळाला नाही तर उपासमार ठरलेली.
सुशीला रमाबाई कॉलनीत राहायच्या. एकेदिवशी स्त्री मुक्ती संघटनेच्या काही कार्यकर्त्या वस्तीवर आल्या. वंदना गांगुर्डे, कल्पना गायकवाड या सहयोगिनींनी संघटनेच्या परिसर विकास उपक्रमाची माहिती दिली. बचत गटांचे महत्त्व सांगितले. वस्तीतल्या काही महिलांच्या सोबत सुशीला संघटनेच्या गोवंडी कार्यालयात बचत गटाची सदस्य होण्यासाठी आल्या आणि आज संघटना हेच त्यांचे कार्यक्षेत्र बनले आहे. आजची त्यांची प्रगती थक्क करणारी आहे.
संघटनेने सुरुवातीला दहा-दहा महिलांचा एक असे बचत गट बांधले. या बचतगटांना सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतर्फे अनुदान मिळवून दिले. महिलांना बागकाम, ओल्या कचऱ्यापासून खत बनविणे आदी प्रशिक्षण दिले. सुशीला यांनी अतिशय कमी वेळेत खत बनवण्याचे तंत्र आत्मसात केले. परिसर विकासच्या समन्वयक सुनीता पाटील यांनी सुशीलांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. सुशीलांची या कामातली आत्मीयता बघून त्यांना खत बनवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. सुशीलांनी स्वत: आत्मसात केलेले खत, बागकामाचे ज्ञान इतर सख्यांना देऊन त्यांनाही या कामात जोडून घेतले. आयपीसीएल कंपनीच्या नागोठणे येथील प्रकल्पात ‘शून्य कचरा’ मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षक म्हणून सुशिला संघटनेतर्फे गेल्या होत्या. ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. शिक्षण कमी असूनही संघटनेचे पाठबळ आणि आत्मविश्वास या जोरावर सुशीला कितीही मोठ्या समूहासमोर भाषण देतात. आवाज खणखणीत असल्यामुळे संघटनेच्या कलापथकात सहभागी होतात.

२००५मध्ये चार-चार बचतगटांची एक सहकारी संस्था तयार करण्यात आली. वसुंधरा सहकारी संस्था या पहिल्या नोंदणीकृत संस्थेची सचिव म्हणून सुशीला मोकल यांची सर्व महिलांनी एकमताने निवड केली. सहकारी संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील टाटा कॉलनीसारख्या निवासी वसाहतींमध्ये महिलांना साफसफाई, कचरा गोळा करणे, ओल्या कचऱ्याचे खत तयार करणे, बागकाम इ. कामे मिळवून दिली. सुशीला यांनी सोसायटीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना भेटून, त्यांना आपले काम पटवून देऊन बरीच कामे मिळवली व अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला.

अंधेरी येथील सीप्झ या औद्योगिक संकुलात वेगवेगळ्या उद्योगांचे ३०० कारखाने आहेत. तेथे दररोज दोन-तीन टन कचरा तयार होतो. जवळजवळ एक लाख कामगार येथे काम करतात. त्यामध्ये ४० हजार स्त्रिया आहेत. स्त्री मुक्ती संघटनेच्या पर्यावरणस्नेही उपक्रमाने प्रभावित होऊन सीप्झच्या विकास आयुक्त अनिता अग्निहोत्री (आयएएस) यांनी सर्वप्रथम वसुंधरा या स्त्रियांच्या सहकारी संस्थेला सीप्झमध्ये कचरा वर्गीकरणाचे काम एक वर्षासाठी दिले. सुशिला मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी हे काम एवढ्या चोखपणे करून दाखवले की, आता सीप्झने या सहकारी संस्थेबरोबर तीन वर्षांसाठी करार केला आहे. कचरा संकलन, वर्गीकरण करून कचरा पुनर्वापरासाठी पाठवणे हे होतेच. आता बायोगॅस प्रकल्पही सीप्झमध्ये सुरू झाला आहे. तेथे २४ महिला काम करतात. सीप्झप्रमाणेच इतर १७ ठिकाणी या सहकारी संस्थेस काम मिळाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या ४० महिलांना नियमित रोजगार, आठवड्याची रजा, नियमित वेतन मिळाले आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान व विहंग ग्रुप ऑफ कंपनीजचा शिवगौरव पुरस्कार, तसेच रोटरी क्लब-ठाणे यांचा उद्योजिका पुरस्कार सुशिला मोकल यांना मिळाला आहे. आपल्यासोबत वस्तीतल्या इतर महिलांनाही प्रगतीच्या मार्गाकडे नेणाऱ्या सुशीला यांच्या जिद्दीला सलाम.
स्त्री मुक्ती संघटना १९७५ पासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर काम करीत आहे. कचरा गोळा करण्याचे काम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे; पण सामाजिकदृष्ट्या उपेक्षित. १९९९पासून संघटनेने मुंबईतील कचरावेचक महिलांना संघटित करून ‘परिसर विकास’ उपक्रम सुरू केला. कचरावेचक महिलांना ‘परिसर भगिनी’ अशी सन्मानजन्य ओळख दिली. या उपक्रमाचा विस्तार नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतही झाला आहे. जैविक खत निर्मिती, घरगुती स्तरावर खत निर्मिती करण्यासाठी मॅजिक बकेट, खत कुंडी, रोपे, खताचे चर/पिट्स, बायोगॅस प्रकल्प, मुंबई विद्यापीठाची ३५ महाविद्यालये अशा प्रकारे जवळपास १०० ठिकाणी शून्य कचरा मोहीम संघटना राबवत आहे.
mayekarpr@gmail.com