आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी ओळख ‘मी’च

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी एक गृहिणी. पती मोठ्या हुद्द्यावर. मुलगा-सूनही आपापल्या क्षेत्रात रुळलेले. एक गोंडसशी नात. पण माझी स्वत:ची अशी ओळख काय? आता कुठे माझे स्वत:चे असे आयुष्य सुरू झालेय. डोक्याला याआधीच भरपूर किल्ली देऊन ठेवली आहे. त्याप्रमाणे हात चालतात. वाचनाबरोबरच लिहिण्याची आवड असल्यामुळे, कशावर लिहावे बरे असा खूप विचार केला. काल्पनिक कथा रंगवण्यात रस नव्हता. एकदम डोळ्यांसमोर उभी ठाकली माझी अकरा महिन्यांची बाहुली. अन् विचारांना गती मिळाली. प्रतिभेला ऑक्सिजन मिळाला. ती जेव्हा वयात येईल, तेव्हा या आजीचा अनोखा बटवा तिच्यासाठी खूप गुणकारी ठरेल. मग डोके भन्नाट चालू लागले. दोन्ही हातांची बोटे कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर सराईतपणे नाचू लागली. अन् गोष्टीरूपाने आपल्या पूर्वजांचा इतिहास, पुढच्या पिढीसाठी सरसर समोर स्क्रीनवर अवतरू लागला. जेणेकरून तिला आपली वंशावळ कळावी. तिच्या आधीच्या पाच पिढ्यांनी समाजात स्वकष्टांवर कसे मानाचे स्थान मिळवले, बदलत्या वातावरणात स्वत:ला अ‍ॅडजस्ट करताना, त्यांनी कसे बदल केले, समाजात अग्रगण्य टिकून राहण्यात ते कसे यशस्वी झाले, हा सगळा ‘आदर्श’ तिच्या भावी जीवनासाठी विणून ठेवण्यात मन कसे रमून गेले आहे. हे सर्व लिहिताना हळूहळू माझी भाषा समृद्ध होते आहे. अनेक लोप पावलेल्या म्हणी संधी मिळताच पुन्हा लयीत रुणझुणत, हळूहळू थिरकू लागतात.
माझाही भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होतोय. विनोदी घटना लिहिताना माझ्यातील कल्पकता फुलतेय, संकटाचे वर्णन करताना मन मला खंबीरपणा शिकवतेय; तर गंभीर प्रसंगाची विस्तृतता ठाम निर्णय घेण्याचे धाडस देतेय. पूर्वजांकडून झालेल्या चुकांपासून धडा मिळतोय. चांगल्या गोष्टी शिकण्याची वेळ कधीच गेलेली नसते, या माझ्या विचारशैलीचे प्रत्यंतर मी अनुभवतेय. प्रत्येक प्रकरणाच्या अंतिम टप्प्यात त्याबद्दलची माझी समीक्षा, सखोल विवेचन, बारीकसारीक गोष्टींचे विश्लेषण करण्याची व लिहिण्याची सवय मला आपसूकच लागली आहे. माझ्या बालपणी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टी लिहिताना तर आतासुद्धा अगदी पूर्वीसारखीच मज्जा येते. आपली श्रद्धास्थाने असलेले संत, देव-देवता, यांची वर्णने करताना अगदी सहजतेने, सोप्या भाषेत थोडे आध्यात्मिक दाखलेही देता येतात. निरनिराळ्या मुद्द्यांवर चिंतन करण्याची आपोआपच सवय जडली आहे. असे माझे व्यक्तिमत्त्व घडवणे एरवी मला जमले असते का?
माझ्या सास-यांनी म्हणजे माझ्या छकुलीच्या पणजोबांनी, दुस-या महायुद्धात गाजवलेल्या पराक्रमाने माझ्याइतकीच तिचीही मान अभिमानाने ताठ व्हावी, एवढा त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केलाय. यात वेळ तर छान जातोच, पण तो सार्थकी लागल्याचे समाधानही मिळतेय. पुढच्या पिढीला आकार देण्यात आपलाही हातभार लागतोय, या कल्पनेने मन सदा प्रफुल्लित राहते. माझ्या या लिखाणात सहज, तरल जिवंतपणा कसोशीने टिकवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. हे लिखाण पूर्ण व्हायला आणखी एक-दीड वर्ष लागेल. तोवर मी ख-या अर्थाने समृद्ध व परिपक्व झालेली असेन. माझी पुढची पिढी जसजशी मोठी होईल, तेव्हा कदाचित मी असेन किंवा नसेन, पण त्यांच्यासाठी जमा केलेल्या या अमूल्य ‘ठेवी’ने मला आज माझी ओळख दिली आहे.