आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीचा सुवर्णकाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅपटॉपवर काम करत बसलो होतो. इतक्या वेळ जवळच्याच खुर्चीत बसून आयपॅडवर राइम्स ऐकत बसलेली माझी नात मला मागून येऊन चिकटली आणि काही समजायच्या आत तिने माझ्या गालाचा पापा घेतला. ‘अगं, किती लाड करशील या आजोबाचे!’ अडीच वर्षांची चिमुरडी म्हणते कशी, ‘आजोबा, तुम्ही पण माझे किती किती लाड करता, हो की नाही?’ तिने पुढची फर्माईश ऐकवली, ‘चला, आता काम बंद करा पाहू, मला आपली ती भोपळ्यातून जाणारी त्या आजीची गोष्ट दाखवा बरं.’ लॅपटॉपवर तिच्यासाठी खास स्टोअर करून ठेवलेल्या गोष्टी लावून दिल्या. मलाही आमच्या निवृत्त अधिकारीवर्गाच्या मीटिंगसाठी निघायचेच होते.


शनिवारी दुपारी तीन वाजताची मीटिंग. तब्बल दहाएक महिन्यांनी बोलावली होती. अर्थात, निवृत्तांचे इश्यूज तरी काय असतात म्हणा. ओळखीचा कुणी दिसतोय का म्हणून माझी नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. अनोळखी प्रांतात एखाद्दुसरा सोडून कुणीच ओळखीचा वाटत नव्हता. एक कोपरा बघून बसलो. खूपसे टक्कल पडलेले, पूर्ण पांढरे केस असलेले, काही कलप लावून आलेले, काहीसे कोमेजलेले, सुरकुतलेल्या चेह-याचे, काही कॅज्युअल टी-शर्टमध्ये, तर काही फॉर्मल्समध्ये चाळीसेक निवृत्त अधिकारी जमले असतील.


प्रास्ताविकानंतर, दरम्यानच्या काळात मॅनेजमेंटबरोबर केलेल्या काही पत्रव्यवहाराची चर्चा झाली. नंतर पंचाहत्तरी पूर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात येत होता. पाच-सहा सत्कार झाले असतील. शेवटचा एक मानकरी उभा राहिला. भारतातल्या तसेच विदेशातल्या शाखांतून त्यांनी केलेल्या कर्तबगारीचा आलेख ऐकवला गेला. त्यांनी नोकरी करतच कायद्याची पदवी मिळवली तीही युनिव्हर्सिटी टॉपर म्हणून. दणकट म्हणता येईल अशी शरीरयष्टी असलेल्या त्या गृहस्थाने पंचाहत्तरी गाठली आहे हे सांगितल्याशिवाय कुणाला कळले नसते. सत्काराबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून तो गृहस्थ उभा राहिला. भारदस्त आवाजात, अस्खलित इंग्रजीत, त्यांनी भाषणाला सुरुवात केली.


‘माझ्या दृष्टीने पंचाहत्तरी गाठणे हा माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यातला एक मैलाचा दगड आहे एवढेच. तरीदेखील आपल्याच सहकारी बंधूंकडून झालेला हा निरपेक्ष सत्कार मला खूप मोलाचा वाटतो. त्याबद्दल सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. माझ्या फिटनेसबाबतीत आणि विशेषकरून माझ्या सेकंड इनिंगबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या जुन्या सहकारी मित्रांनी आग्रह केला आहे म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे.’ आपल्याच मित्रांच्या समोर मनोगत मांडताना, मी फार वेगळे, विलक्षण असे जीवन जगतो आहे, असा आविर्भाव नाही, किंबहुना बडेजाव तर नाहीच.


‘मित्रांनो, मला माझ्या एका मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. सुरुवातीला देवाने मनुष्य, बैल, कुत्रा आणि वटवाघूळ या प्राण्यांना चाळीस वर्षांचे समान आयुष्य दिले होते. बैल, कुत्रा आणि वटवाघूळ मात्र देवाच्या निर्णयावर नाखुश झाले. देवाने त्या तिघांना विचारले, ‘तुम्ही तिघे नाराज दिसता, कशासाठी?’ बैल पुढे येऊन देवाला म्हणाला, ‘देवा, काय करायचे आहे मला हे चाळीस वर्षांचे आयुष्य? नुसते राबराब राबायचे, वीस वर्षे पुरे आहेत.’ कुत्रा म्हणाला, ‘देवा, मलाही नको आहे चाळीस वर्षांचे आयुष्य, नुसते भुंकत तर बसायचे, मलाही वीस वर्षे पुरेत.’ वटवाघूळही म्हणाले, ‘देवा, आयुष्यभर स्वत:ला उलटे टांगून, टकमक बघण्याव्यतिरिक्त मी दुसरे काही करूच शकत नाही. मलाही वीस वर्षे पुरेत.’ हे सगळे ऐकून धूर्त मनुष्य लगेच म्हणाला, ‘देवा, मला द्या ना त्या तिघांच्या वाट्याची वीस वीस वर्षे.’ देव ‘तथास्तु’ म्हणाला आणि मनुष्याला शंभर वर्षांचे आयुष्य मिळाले! त्यामुळेच की काय, चाळीस वर्षांचे आयुष्यच तो मनुष्यासारखे जगतो. पुढची वीस वर्षे तो कुटुंबासाठी बैलासारखा राबतो, नंतरची वीस वर्षे कुत्र्यासारखा घरादाराची राखण करत बसतो आणि त्याच्या भुंकण्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात. आणि जगला, वाचलाच तर पुढची वर्षे लटकलेल्या वटवाघळासारखे टकमक बघण्याव्यतिरिक्त तो दुसरे काही करू शकत नाही. तात्पर्य, तुमचे वय आणि तुमचा रोल तुमच्या लक्षात आले असेलच. असो.’


‘खरे सांगतो, निवृत्त व्हायच्या आधीच मी मनाची तयारी केली होती. खुर्ची सुटली की आपल्याला कुणीही विचारणार नाही. चाळीस-एक वर्षे या बँकेत इमाने इतबारे नोकरी केली. या नोकरीत पुरेपूर समाधान मिळाल्याने परत कधी नोकरी करायची नाही, हे ठरवून टाकले.’


‘निवृत्तीला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरा गेलो. मनात असूनदेखील आपण इतकी वर्षे ज्या छंदाकडे दुर्लक्ष केले, जे करू शकलो नाही ते करण्यासाठी चालून आलेली ही अपूर्व संधी आहे. वेळ ही सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आता आपल्या हातात आली आहे, त्याचा उपयोग, उपभोग का घेऊ नये, असा विचार केला. फक्त त्यासाठी आपण फिट राहायला हवे. त्याला दुसरा पर्याय नाही, ह्याची खूणगाठ बांधली. त्याचा परिणाम म्हणून की काय, शिस्तबद्ध आयुष्य जगणे ओघाने आलेच. निरोगी जीवनशैलीसाठी संयमित आहार, नियमित विहार आणि योग्य पथ्यपाणी या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करतो. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, हे तर सर्वात महत्त्वाचे आहे. मेडिटेशन आणि संगीतासारखे मन प्रसन्न करणारे दुसरे साधन नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि उत्साह टिकून राहावा यासाठी नेटाने प्रयत्नशील असतो.’


‘जो शिकणे सोडतो तो म्हातारा आहे, तो विशीतला असो वा ऐंशीतला. जो शिकत राहतो, तो तरुण राहतो. जीवनातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्या मेंदूला तरतरीत राखणे, हे हेन्री फोर्डचे म्हणणे मला मनापासून पटते. खरेच वाचन, शब्दकोडी, सुडोकू अशा गोष्टींनी बौद्धिक आनंद तर मिळतोच, शिवाय वेळही छान जातो. इंटरनेटवर वेळ कसा कापरासारखा उडून जातो हे लक्षातच येत नाही. अधूनमधून प्रवास, भटकंती एक वेगळाच फ्रेशनेस देऊन जातो.’
‘आवडीमुळे वकिलीची सनद घेतली. कोर्टात न जाता, बिझी राहता येईल इतकी प्रॉपर्टीसंबंधी कन्सल्टंटची कामे घेतो. खरे सांगायचे म्हणजे, आपल्या अनुभवाचा समाजाला उपयोग व्हावा या उद्देशाने काम करत असलो तरी वेळही छान जातो, शिवाय पैसेही मिळतात.’


‘मुलगा आणि कन्या आपापल्या संसारात छान रमली आहेत. आम्ही दोघेही नातवंडांत खूप रमतो. परदेशांतल्या नोकरीच्या संधी सोडून माझा मुलगा भारतात राहिला, केवळ आमच्याबरोबर राहता यावे म्हणून. आणखी काय हवंय सांगा? आपल्या मुला-नातवांसमवेत राहण्याचे भाग्य लाभते आहे, हेच महत्त्वाचे. आम्ही आमचा मान राखून आहोत. मुलगा आणि सून यांच्या संसारात आमची कसलीच लुडबूड नसते. नाही म्हणायला महिन्याचा लागणारा किराणा माल, भाजी मंडई या गोष्टींच्या खर्चाची आणि आणण्याची जबाबदारी आम्ही स्वत:हून आनंदाने ओढून घेतली आहे. त्यांना झेपत नाही म्हणून नव्हे, तर त्यांच्या संसारात आमचाही छोटासा हातभार हवा म्हणून. बाकी कसलाच उद्देश नाही. त्यांच्यासमवेत अधूनमधून सिनेमाला जातो, तर कधी बाहेर डिनरलाही.’


‘ईश्वरकृपेने कुणाकडून कधीच कसली अपेक्षा केली नाही. जमेल ती मदत केली, तीदेखील परत कुठे वाच्यता न करण्याच्या शर्तीवर. अगदीच विकलांग झालो तर मात्र नाइलाज आहे. खरे सांगतो, स्वावलंबनासारखा दुसरा आनंद नाही. ईश्वराने जे दान दिले आहे त्याचा खूप आभारी आहे. फक्त स्वावलंबनाचे हे लेणे शेवटच्या घडीपर्यंत टिकू दे, हीच ईशचरणी प्रार्थना. पुनश्च सर्वांचे आभार.’ आम्ही सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


औपचारिक आभार प्रदर्शनानंतर साडेचारला मीटिंग संपली. चहाफराळाचा बेत होता. फराळाकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते. बिनसाखरेच्या चहासाठी रांग लागली होती. अगोड चहाचा घोट घेतानादेखील कौतुकाने सर्वांच्या तोंडी त्या पंचाहत्तरीतल्या श्यामसुंदर साहेबांची चविष्ट गोड चर्चा होती.