आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंबरठ्यावरचं वय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभोवतालच्या वातावरणाबद्दल, हवामानाबद्दल, आपण नेहमीच बोलत असतो. पण आपण मुलामुलींच्या शारीरिक व भावनिक आरोग्याबद्दल क्वचितच बोलतो. कुटुंबातील आणि शाळांमधील वातावरण याकडे सर्वांनीच अगदी मनापासून बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चर्चा करतो, त्याच पद्धतीने प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया यामुळे होणारे प्रदूषण, तसेच पालक आणि मुलांमधील विश्वास म्हणजे ‘ओझोन लेयर’ हा कुठे कमी तर झाला नाही ना, हे पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे.

१२ ते १६ वयोगटातील मुलामुलींमध्ये खूप शारीरिक बदल होत असतात आणि त्या बदलांमुळे मुलं कधी कधी भांबावून किंवा गोंधळून जातात. नेमकं काय करावं, हे सुचत नाही आणि कसं विचारावं, या प्रश्नाने अजून अडचण होते. अनेक वेळा अपुरे ज्ञान, वरवरची माहिती, चुकीचा विचार करून स्वतःलाच अनके लेबल लावून घेतात. अगदी मी बुटकी, माझं नाक असं, वगैरे. यामध्ये आपल्या हातात काहीच नसतं. निसर्गाने जे इतकं सुंदर शरीर दिलं आहे, ते स्वीकारण्याची माझी मानसिकता पाहिजे. इथेच खरं तर पालकांची मुख्य भूमिका आहे. आपल्या पाल्याला या वयात खूप काही सांगायचे असते, विचारायचे असते, बोलायचे असते; पण नेमका संवाद कमी पडतो आणि इथेच गडबड होण्यास सुरुवात होते.

आपल्या कुटुंबामध्ये असा प्रयोग करता येईल का? आपल्या घराची एक कौटुंबिक बैठक, अगदी १५ ते २० मिनिटंसुद्धा चालेल, अशी रात्री जेवताना किंवा जेवणानंतर घेता येईल का? यामध्ये आपल्या सोयीनुसार अगदी जनरल गप्पा, घरातील काही विषयांबद्दलच्या सूचनाही करता येतील. जेणेकरून आपलं कुटुंब एकमेकांना समजून घेणारं, एकमेकांची काळजी घेणारं, प्रोत्साहन देणारं आहे, हा भाव अजून घट्ट होईल.

एक उदाहरण बघू या. स्नेहाची दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती. ती आईवडिलांसोबत तिच्या मावशीकडे गप्पा मारायला गेली होती. मावशीचा मुलगा अमृत नुकताच अमेरिकेतून आला होता. सगळ्यांच्या गप्पागोष्टी सुरू होत्या. साहजिकच मुलांचा ग्रुप एकीकडे आणि मोठ्यांचा ग्रुप एकीकडे झाला. अमृतने बोलता बोलता सहज स्नेहाला विचारले, ‘मग काय आता सुट्ट्याच सुट्ट्या. काय करणार आहेस सुट्ट्यांमध्ये?’ ती म्हणाली, ‘दादा, आता आई माझ्या मागे लागेल, हा क्लास कर, तो क्लास कर. मला तर खूप बोअर होतं.’

अमृतने तिला सुचवले, ‘मी अमेरिकेत असताना सुट्टीत पार्टटाइम जॉब करायचो. अर्थात मला जास्तीचे पैसे मिळायचे; पण त्यासोबत व्यवहार ज्ञान, आपण बाहेरच्या जगात कसं वागावं, अशा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि वेळेचासुद्धा योग्य उपयोग झाला. चेंज म्हणून तूसुद्धा असं काही करून बघायला हरकत नाही.’ ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली. काही दिवसांनी स्नेहा भेटली तर ती एकदम खूश होती. तिने सुट्टीमध्ये एक कौन्सेलिंगचा जॉब सुरू केला होता.

ती मोठ्या उत्साहाने सांगत होती, ‘मला इतके पैसे मिळतात. वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याचा अनुभव आला. एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की, पैसे कमवणे ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आता मला कळले, बाबा आमच्यासाठी किती कष्ट घेतात ते.’

आजची पिढी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतूर आहे. समवयीन लोकांनी योग्य गोष्टी सांगितल्या तर त्यांना लवकर पटतात. स्नेहाने तिच्या आईवडिलांशी बोलून घेतलेला योग्य निर्णय तिच्यासाठी एक सुखद अनुभव बनला. काही झालं तर आईवडील आपल्या पाठीशी आहेत, त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आपल्यासोबत आहे, हा विश्वास त्यांच्यासाठी खूप असतो. याच गोष्टींची गरज वयात येणार्‍या मुलामुलींना असते. मुलांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांना मोकळेपणाने बोलू द्या. त्यांना तुमचे दडपण वाटू नये.

बर्‍याचदा पालकांना आपल्या मुलांचे मित्र माहीत नसतात, ती कोणाबरोबर वेळ घालवतात, हे माहीत नसते. मुलं पीअर प्रेशरला बळी पडतात. आपल्या सोबतचे जसे वागतात तसे वागण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस पालकांनी त्यांना योग्य प्रकारे संवादातून मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. केवळ रागावून प्रश्न सुटणार नाही.

किंबहुना संवादाच्या अभावातून दोघांमधील दरी वाढतच जाईल. मुलामुलींनी सकारात्मक विचार कसा ठेवला पाहिजे, आपल्या क्षमता ओळखून त्या कशा वाढवल्या पाहिजेत, याची काळजी पालकांनी घेण्याची गरज आहे. आपल्या पाल्यांसमोर आईवडील हे पहिले आदर्श असतात. मुलं आपलं वागणं अगदी जवळून बघत असतात, तेव्हा पालकांनीसुद्धा आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

आम्ही स्त्री जागरण मंचातर्फे मुलींसाठी व्यक्तिमत्त्व विकास, स्वसंरक्षण शिबिर, पालकांची कार्यशाळा घेतो. एकदा शिबिर संपल्यावर एक पालक म्हणाले, ‘हे शिबिर फार छान झालं; पण माझ्या मुलीला एकदा तुमच्या सोबत ग्रामीण भागात घेऊन जा. तिला समाजातील इतर मुलींच्या समस्या काय आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, हे कळायला पाहिजे.’ नवल म्हणजे, ती मुलगीसुद्धा तयार झाली.

किशोरवयातील मुलं-मुली पालकांच्या डोक्याला ताप आहेत का? नाही. आपण सुसंवादातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला व त्यांना योग्य दिशा दिली तर त्यांच्यात येणारी आव्हाने पेलण्याची ताकद येईल व ती आत्मविश्वासाच्या पायावर खंबीरपणे उभी राहू शकतील.
मेधा देशपांडे, औरंगाबाद
स्त्री जागरण मंच सदस्य
medhasdeshpande@gmail.com