आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medha Kulkarni Article About Importance Of Exercise

फेडावे शरीराचे देणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जिममध्ये प्रशिक्षकाने नवे व्यायाम शिकवले. मजा आली. लहान मुलाला नवे खेळणे मिळाल्यावर वाटत असेल तसेच वाटले. घरी परतताना रोजच्या पेक्षा जास्त उत्साह आणि आनंद वाटला. जिममध्ये जायला सुरुवात केल्याला दोन वर्षे झाली. सुरुवातीला बर्‍याच दांड्या झाल्या. कंटाळा, कधी घरातल्या अडचणी, मुंबईबाहेरचे दौरे वगैरे. जिम घरापासून अवघ्या चार मिनिटांवर असल्याने दांडी मारायला तितकेच सबळ कारण लागते!

घरात वाचनाचा वारसा होता. व्यायामाचा नव्हता, पण नोकरी सोडताना स्व-आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं. रोजचा रेल्वेप्रवास, धावाधाव, ताण संपले. शरीर आळसावायला, सकाळीच कंटाळवाणे वाटायला सुरुवात झाली. बेशिस्त वाढली. दिनक्रमावर नियंत्रण आणायचे होते. आळसाची, वाढत्या वजनाची चर्चा फिटनेस-तत्पर लेकीशी करत असताना तिने ‘समोरच आणि इतक्या जवळ’ असलेल्या जिममध्ये जाण्याबद्दल सुचवले. मी ताबडतोब मनावर घेतले. जिम हे मला नव्या काळातले नवश्रीमंतांचे चंगळवादी फॅड वाटत असे. तसल्या ठिकाणी मी कधी जाईन, त्या वातावरणाशी जुळेल असे कधी वाटलेच नव्हते.

चौकशी करायला गेले. फीचा आकडा ऐकून दचकलेच. त्याखेरीज शूज घ्यायचा खर्च! एकदाची फी भरली. स्वस्तातले बूट घेतले. सकाळचा वेळ ठरवला आणि मनाचा हिय्या वगैरे करून सुरुवात केली. जमिनीवरचे (यंत्रांशिवायचे) व्यायामप्रकारही नक्की शिकून घे असे मुलीने सांगितल्यावर तेही सुरू केले. तरीही मी तिथे एखादे काम उरकल्यासारखेच जात होते. तीन महिन्यांनंतर नीट शिकण्यासाठी जादा पैसे भरून प्रशिक्षक घेतला. हर्षद साखरे हा माझ्या मुलीहूनही लहान वयाचा व्यायामगुरू झाला. माझं वय, कुवत, मूड या सगळ्याचा विचार करून मला शिकवू लागला. सोप्या प्रकारांपासून कठीण, कमी वजनापासून जास्त, एका सेटमध्ये पाचपासून सुरुवात करून 20-25पर्यंत असा व्यायामप्रवास सुरू झाला. प्रगतीही करू लागले. मुळात कुणीतरी आपल्याला काहीतरी शिकवतंय याची मला गंमतच वाटू लागली. ‘आता काय राहिलं शिकण्यासारखं...’ या अहंकाराची ऐशी की तैशी!

व्यायाम आवडू लागला. व्यायामाचे, श्वास उच्छवास घ्यायचे-सोडायचे तंत्र, शरीराची स्थिती-गती, कार्डिओ-वर्कआउट-एरोबिक्स करण्याच्या पद्धती, कंटाळा येऊ नये म्हणून व्यायामप्रकारात बदल करायचे कळले. जिममध्ये योगा, साल्सा, किकबॉक्सिंग, स्पिनिंगही शिकवलं जातं. मी योगाही सुरू केलं. प्रशिक्षक सुजाता निकम ही चाळिशीतली शांत मुलगी. मजा आणखी वाढली. आपल्या शरीराला हात-पाय, मान-खांदे, मांड्या-टाचा इत्यादी अवयव आहेत; एवढंच काय... सूर्यनमस्कार घालताना पाठीमध्ये कणा आहे, प्राणायाम शिकताना छातीत श्वसननलिका असल्याचेही नव्याने जाणवले! सुरुवातीला गुडघे दुमडून पालथे-उपडे बसणे दोन सेकंदही जमत नव्हते. आता अर्धा तासही आरामात बसते. शरीर आपलेच असते. त्याला जीव लावला की ते सहकार्य करायला सुरुवात करते. आपण दुर्लक्ष केले की मात्र ते मख्ख! जराही लवचीकपणा दाखवत नाही. पाय समोर ठेवून गुडघ्याला डोकं लावताना शरीर वाकत नसे. आता अगदी सहज कपाळ गुडघ्यापर्यंत पोचते. आता एखादा अवघड व्यायामप्रकार शिकताना शरीर जेव्हा साथ देते; तेव्हा मी मनोमन त्याचे आभार मानते. शरीराशी असा संवाद सुरू झाला, आयुष्यात प्रथमच!

पाच-सहा महिन्यांत शरीराच्या मोजमापांत काही इंचांचा फरक पडायला सुरुवात झाली. डाएटची जोड होती. वजनही घटायला सुरुवात झाली. स्पाँडिलायसिस नियंत्रणात आला. उच्च रक्तदाब प्रतिबंधक औषधाची गरजच उरली नाही. कोलेस्टेरॉल नॉर्मलवर! याहूनही मोठा लाभ झाला. मी दिवसभर प्रसन्न राहू लागले. ताणांचा त्रास कमीकमी होणे सुरू झाले. आळस-कंटाळा कुठच्या कुठे गायब! चालायला, शरीरश्रम करायला मजा वाटू लागली.

जवळपासच्या बाजारात, बँकेत पूर्वी मी रिक्षाने जात असे. आता पायी जाऊ लागले. दिवसातून कितीही वेळा बाहेर जायला लागले तरी त्याचे काहीच वाटेनासे झाले. पायी फिरू लागल्याने आसपासच्या परिसराशीही एक नाते जुळू लागले. सकाळ-संध्याकाळी इमारतीच्या आसपास येणारा पोपटांचा थवासुद्धा याआधी मी नीट पाहिला नव्हता. आमच्या गृहनिर्माण संकुलातील अस्वच्छता टोचू लागली. महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या समस्यांबद्दल जागरूक राहणार्‍या मला आमच्या परिसरातल्या समस्यांची नीटशी ओळखच नसणे खटकू लागले. रहिवाशांनी एकत्र येण्याची निकड वाटू लागली. समविचारी रहिवाशांशी हे बोलायला सुरुवात केल्यावर त्यातून आमच्या संकुलात नागरिक मंचाची स्थापना झाली. मंचाने सफाईचे, परिसर व्यवस्थापनाचे काम हाती घेतले, माझा यात पुढाकार राहिला. शरीर-मन सक्रिय राहिल्याने हे घडले.

जिम माझ्यासाठी महागडी आहेच. पण फीमधला काही भाग तिथल्या तरुण प्रशिक्षकांना मिळतो याचे समाधान. कारण या क्षेत्रातली मुले-मुली सामान्य, अल्पशिक्षित घरांमधून आलेली असतात.

आता मी दररोज आठ-दहा किमी सहजच चालू शकते. कोकणात पावसातला, सिक्कीमला बर्फातला हलका ट्रेकही करू शकले. आता चालण्यातली मजा कळली आहे; हे महत्त्वाचं.

मी जिमला जाते ती सकाळची वेळ स्त्रिया-पुरुषांसाठी सामायिक असते. तिथल्या तरुण तुर्कांमध्ये आम्ही नववृद्ध उठून दिसतो. सुरुवातीला अवघडल्यासारखे व्हायचे, पण तिथे येणार्‍यांचे लक्ष्य ठरावीक वेळात जास्तीत जास्त चांगला व्यायाम करणे हे असते. अनोळखी स्त्री-पुरुष एकत्र आल्याने येणार्‍या अवघडलेपणाला तिथे मुळीच थारा नसतो. मुलामुलींनी तोकडे कपडे घातले तरी तिथे कुणी कुणाच्या उघड्या शरीराकडे बघत बसत नाही. सेक्सच्या पलीकडचे मोकळे वातावरण असते. अण्णांचे आंदोलन, नवा चित्रपट, सचिन तेंडुलकर अशा गप्पाही चालतात. फिटनेस-डाएट यावर मात्र भरपूर बोलणे. माझेही या विषयांवरचे वाचन वाढले. गांधीजी-विनोबांच्या विचार-आचारांचे मोल नव्याने वाटू लागले. विनोबा लिहितात- ‘प्रभाते कर दर्शनम्’पेक्षा ‘प्रभाते मल दर्शनम्’ महत्त्वाचे! किती खरे आहे ना!

मी रोज सकाळी 7-7.30ला घरातून जिमचे सामान घेऊन निघते. आत गेल्यावर बूट घालते. मोबाइल बाजूला ठवते. फ्लोअरवर प्रवेश करते. ओळखीचा माहोल, यंत्रे आणि माणसे यांचे एका गतीत संचलन, तालबद्ध गाण्याचे सूर. शरीर सवयीच्या लयीत काम सुरू करते. तास-सव्वा तास भरपूर व्यायाम. अध्यात्मात निर्विचार मनोवस्थेचे वर्णन असते. केशवसुतांनी वर्णिल्यानुसार ‘विसरुनि गेलो अखिला भेदा, ऐकत असता दिड दा दिड दा’ अशीच काहीशी अवस्था. व्यायाम संपतो. घामाने निथळल्यावर अगदी ‘पवित्र’ वाटते. ज्या शरीराच्या माध्यमातून आपण सगळी सुखे भोगतो त्या शरीराचे देणे फेडले जाते. छान वाटते. म्हणूनच दुसर्‍या दिवशी पुन्हा जावेसे वाटते.

kulmedha@gmail.com