आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्री विचारवंतांच्या साखळीतील आजचा दुवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेजमधून निवृत्त होताहोताच, पुष्पाबाई विविध कामांमध्ये नोकरीपेक्षाही जास्त गुंतत गेल्या. विद्यापीठांमध्ये स्त्रीअभ्यास शाखा, य.दि. फडके संशोधन केंद्र, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, अनुवाद केंद्र, भारत-पाकिस्तान फोरम, आणि त्यांचं लाडकं मृणाल गोरे केंद्र, अशी न संपणारी यादी. महाराष्ट्रात सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवा उपक्रम पुष्पाबाईंच्या मार्गदर्शनाविना पुढे जात नाहीच.
 
आठ-दहा दिवसांतून एकदा पुष्पाबाईंना फोन होतोच. माझा नाही गेला, तरी त्या करतात. कधीही फोन केला तर बाई त्यांच्या कामांची यादीच देत असतात. सामाजिक कृतज्ञता निधीच्या बैठकीसाठी पुण्याला जायचंय. तिथून येणार. मग पुन्हा कोल्हापूर. नंतर चार दिवस असेन मुंबईत. पण मृणाल गोरे केंद्राच्या कामात गुंतलेली आहे. बँकाॅकच्या मीटिंगसाठी पेपर तयार करायचाय. अमक्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायचीये. साहित्य अकादमीसाठी नवोदित कथा लिहिणाऱ्यांशी बोलायचंय.  अधनंमधनं तपासणीसाठी डॉक्टरकडे जाणं सुरू असतंच. हे सगळं बोलताना सकाळी भाकरी, ताजं लोणी, चटणी असा नाश्ता केल्याचं आणि दुपारसाठी खास मासे केल्याचंही सांगतात. फोन ठेवण्याआधी माझी, माझ्या कामाची, आई-नानांच्या तब्येतीची विचारपूस करतात.
 
हे रुटीन वर्षानुवर्षं सुरू आहे. पण ते आताही सुरू आहे, याला कोणत्या शब्दांत दाद द्यावी? आताही, म्हणजे दोनेक वर्ष त्यांचा दीर्घ आजार, सक्तीची विश्रांती यानंतर त्या आता पुन्हा पूर्वीसारख्याच कामाला लागल्यात. मधुमेहामुळे पायाचं दुखणं लक्षात येण्यात वेळ गेला. आणि पावलांचं थोडंफार नुकसान झालंच. ते टळू शकलं नाही. जखमा भरायला महिनोनहिने नर्सिंग होममध्ये राहावं लागलं. पावलं जमिनीला टेकवायचीच नसल्याने सगळे व्यवहार बेडवरच करावे लागत होते. त्यांचं आजारपण जवळून बघितलेल्यांना बाईंच्या पराकोटीच्या सोशिकपणाची ओळख झाली. स्वतः उत्तम स्वयंपाक करणारी, इतरांना खिलवणारी बाई, दिवसच्या दिवस हॉस्पिटलमधलं जेवण जेवतेय, हे बघणंदेखील त्रासदायक असायचं. मी एकदा न राहवून विचारलं की, या जेवणाचा कंटाळा आला असेल ना? त्यावर अगदी नेहमीच्या स्वरात त्या म्हणाल्या, तसं बरं असतं जेवण. आणि त्यामुळे शुगर नियंत्रणात राहातेय ना!’ जराही त्रागा नाही, त्रासाचा उच्चार नाही, परिस्थितीला दूषण देणं नाही. उलट हॉस्पिटलच्या ड्युट्या करणार्यांचीच त्यांना काळजी. बेडवर असतानाही त्यांचं वाचन, उशीला टेकून टेकून लेखन, स्वतःला अपडेट ठेवणं सुरू होतंच. 
 
बाईंच्या त्या दीर्घ आजारपणादरम्यान वाटायचं, यातून उठून, स्वतःच्या पायांनी चालायला मिळेल ना यांना. नर्सिंग होममधून घरी परतल्या आणि त्यांनी हळूहळू आधी घरातलं रुटिन पूर्वपदावर आणलं. स्वयंपाक करणं, दारावरच्या भाजीवाल्याकडून भाज्या घेणं वगैरे. मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत कुठे टॅक्सीने जाण-येणं सुरू केलं. त्यानंतर पहिला मोठा प्रवास पुण्याचा. आणि आता त्यांच्या कामाची गाडी पूर्वीच्याच वेगाने धावू लागली आहे. वयाने पंच्याहत्तरी ओलांडलीये. अलिकडे डॉक्टरांच्या परवानगीने त्या गुआहाटीलासुद्धा जाऊन आल्या.
सामाजिक कृतज्ञता निधीच्या त्या अध्यक्ष आहेत. नरेंद्र दाभोलकरांच्या पश्चात सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामाची त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्याखेरीज, सध्या ध्यास घेतल्यासारखं त्या काम करत आहेत, एका नव्या, त्यांच्याच पुढाकाराने साकारत असलेल्या संस्थेचं. ‘मृणाल गोरे इंटरऍक्टिव्ह सेंटर फॉर सोशल जस्टिस अँड पीस इन साउथ एशिया’ या संस्थेचं नेटवर्क वाढवणं, कामाला दिशा देणं, निधी जमवणं आणि कार्यक्रम आखणी यात, आता आजारातून उठून हिंडू-फिरू लागल्यापासून त्या खूपच गुंतल्या आहेत. त्यासाठी गोरेगावच्या केशव गोरे ट्रस्टमध्ये त्यांचं येणं-जाणंही वाढलंय. मृणाल गोरे हा पुष्पाबाईंसाठी हळवा कोपरा आहे. आपण ओळखत असलेल्या मृणालताईंच्या पलीकडचे त्यांचे नेतृत्वगुण, त्यांची दूरची आणि व्यापक दृष्टी पुष्पाबाई नेहमीच छान उलगडून सांगतात. बाईंच्या मते दोन देशांमध्ये शासकीय डिप्लोमसी सुरूच राहाते. मात्र ‘पीपल टू पीपल’ संवाद महत्त्वाचा असतो. तसं दक्षिण आशियायी देशांमध्ये सुरू व्हावं, हा या केंद्रामागचा हेतू आहे. 
 
मृणाल गोरे केंद्राने दोन वर्षांपूर्वी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’बरोबर पहिला सेमिनार आयोजला होता. पण, बाई सांगतात की,  हे काही सेमिनार करणारं सेंटर नाही. विषय घ्यायचे आणि त्यातले ‘पीडित’ आणि ‘अभ्यासक’ एकत्र आले पाहिजेत असं बघायचं, असं कामाचं स्वरूप असणार आहे. ‘ऑनर किलिंग’विषयी या तऱ्हेनं एकत्र येऊन चर्चा हाही एक प्रयोग केला. स्त्रीवाद किंवा स्थलांतराचे प्रश्न हे आजचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर त्यांच्याविषयी अमेरिकेने केलेली मांडणी आपण, म्हणजे साउथ एशियाने जशीच्या तशी का स्वीकारायची? प्रश्न तेच असले, तरी आपली पार्श्वभूमी अमेरिकेहून निराळी, आपला सांस्कृतिक इतिहास वेगळा आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या पद्धतीने शोधायला लागणार आहेत. बाई एक उदाहरण देतात की, हिंसा हा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अंगाने समजून घेण्याचा प्रश्न आहे. अन्नसुरक्षा नसणं, एकाच सामाजिक समुदायाला पुन्हा पुन्हा स्थलांतर करायला लागणं, हे हिंसेचेच प्रकार आहेत. हिंसाचाराचा विचार फक्त हुंडा-बलात्कारापुरता मर्यादित नाही. मृणालताईंचा तर असं फक्त बायकांपुरता विचार करायला सक्त विरोध असायचा. मृणालताई ज्या पद्धतीने विचार करत असत, त्याच पद्धतीने या प्रश्नांचा  विचार हे केंद्र करणार आहे.  कॉलेजच्या नोकरीतून मुक्त होताहोता बाई विविध कामांमध्ये नोकरीपेक्षाही जास्त गुंतत गेल्या. विद्यापीठांमध्ये स्त्रीअभ्यास शाखा, य.दि. फडके संशोधन केंद्र, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, अनुवाद केंद्र, भारत-पाकिस्तान फोरम ही आणखी काही कामं. २००५मध्ये नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या जगभरातल्या एक हजार स्त्रियांपैकी त्याही एक आहेत. महाराष्ट्रात सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्रातला कोणताही नवा उपक्रम पुष्पाबाईंच्या मार्गदर्शनाविना पुढे जात नाही. त्यासुद्धा काट्याकाळजीने सगळ्यांना मदत करत राहतात. संकोचापोटी गैरसोयीही सहन करत राहातात. कागदाचं चिटोरंही हाती न धरता कितीही गुंतागुंतीच्या विषयावर अस्खलितपणे बोलून संबंधित विषयाचं नेमकं भान ऐकणाऱ्यांना देतात. त्यांचं, भाषेचा एकही अलंकार नसलेलं भाषण ऐकताना आपली वैचारिक जळमटं झडतात आणि तो विषय एका स्वच्छ प्रकाशाझोतात दिसू लागतो. मांडणीत कुठेही चलाखी नसल्यानेच की काय, ते विश्वसनीय वाटतं. असं खणखणीतपणे बोलणारी व्यक्ती सध्याच्या महाराष्ट्रात दुर्मिळच! 
 
स्वतःबाबत किंचितही महत्त्वाकांक्षा न बाळगता लोकांना एक दृष्टिकोन देण्याचं काम अथकपणे करणाऱ्या, वंचितांच्या चळवळींना तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान देण्याचं मौलिक काम करणाऱ्या पुष्पाबाई महाराष्ट्राच्या परंपरेतल्या स्त्री विचारवंतांच्या साखळीतला आजचा दुवा आहेत.
 
kulmedha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...