आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय मदत कशी, कुणाकडून मिळवाल?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


1) राज्य सरकारची जीवनदायी आरोग्य योजना : राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जीवनदायी आरोग्य योजना 10 ऑक्टोबर 1990 मध्ये सुरू केली. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला हृदय, कर्करोग, मूत्राशय, मेंदू आणि पाठीच्या मणक्यासंबंधी कोणत्याही विकारावर आधुनिक वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्या या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून 385 प्रकारच्या आजारांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात येतात. भविष्यात रोगांचे प्रकार आणि संख्या वाढवण्याची शक्यता आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तसेच खासगी हॉस्पिटलच्या मदतीने ही योजना राबवण्यात येते. या योजनेत रुपये 1 लाख 50 हजार इतका वैद्यकीय खर्च सरकारतर्फे केला जातो. ही योजना पिवळे रेशनकार्ड धारण करणा-या आणि तहसीलदाराकडून दारिद्र्यरेषेखालील असल्याचे सर्टिफिकेट असणा-या नागरिकांना उपलब्ध आहे.

याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते दहावी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी- विद्यार्थिंनी, तसेच त्यांचे पालक दारिद्र्यरेषेच्या वर असले तरीही या योजनेचा लाभा घेता येतो. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या विधवा यांनाही ते दारिद्र्यरेषेच्या वर असले तरी या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये माहिती अर्ज मिळतो. तसेच एकही रुपया न भरता कॅशलेस पद्धतीने जीवनदायी योजनेत उपचार केले जातात. या योजनेत अर्ज करताना वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे जेथे शस्त्रक्रिया किंवा उपचार केले जाणार आहेत त्या संस्थेचे प्रमाणपत्र आणि खर्चाचे कोटेशन पत्र लागते. तसेच तहसीलदाराच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला आणि अर्जदार दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र लागते. त्याचबरोबर रेशनकार्ड आणि एक शपथपत्र द्यावे लागते.

2)प्रधानमंत्री साहाय्य निधी/ गृहमंत्री साहाय्य निधी/ मुख्यमंत्री साहाय्य निधी/ महापौर निधी/ आरोग्य मंत्र्यांचा साहाय्य निधी : आपल्या देशात वरील मान्यवर पदांवरील व्यक्तींचा एक साहाय्य फंड कार्यरत असतो. या फंडातून हॉस्पिटलायझेशनसाठी साहाय्य मिळू शकते. त्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो. अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणि हॉस्पिटलचे कोटेशनपत्र, रेशनकार्ड प्रत, उत्पन्नाचा दाखला, शपथपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्या लागतात. आपली आर्थिक स्थिती बेताची असून हॉस्पिटलायझेशनसाठी आपल्याकडे पैसे नाहीत, त्यासाठी मदत करावी, असे विनंती पत्र जोडावे लागते. सोबत खासदार, आमदार, नगरसेवक यांचे शिफारस पत्र जोडावे. या निधीमधून मदत मिळण्यास द्रारिद्र्यरेषेची कोणतीही अट नाही. हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाच्या प्रमाणात ही वैद्यकीय मदत प्रत्येक नागरिकाला मिळू शकते. ही मदत खालीलप्रमाणे कमाल मर्यादेत मिळू शकते.

1) पंतप्रधान साहाय्य निधी - 30,000 रुपये 2) गृहमंत्री साहाय्य निधी - 25,000 रुपये 3) केंद्रीय आरोग्य मंत्री साहाय्य निधी- 20, 000 रुपये 4) मुख्यमंत्री निधी - 5000 रुपये 6) महापौर निधी - खर्चाच्या 5 टक्के ते 15 टक्के (महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्तींसाठी फक्त) वरील मदत ही कमाल आहे. ती प्रत्येकाला मिळतेच असे नाही. अर्ज केलेल्या वेळी उपलब्ध असलेल्या निधीनुसार ही रक्कम मिळते.

ही रक्कम रुग्णाच्या हातात दिली जात नाही, तर हॉस्पिटलच्या खात्यावर डायरेक्ट जमा केली जाते. वैद्यकीय प्रमाणपत्रातच हॉस्पिटलचा खाते क्रमांक दिला जातो.
3 )धार्मिक ट्रस्ट : शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धविनायक मंदिर ट्रस्ट आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर निधी तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी मदत करतात. यासाठी दारिद्र्यरेषेची अट नसते. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, खर्चाचे कोटेशनपत्र, रेशनकार्ड, शपथपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी गोष्टी सादर कराव्या लागतात. या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो. त्यावरच अर्ज करावा लागतो. निधी उपलब्धेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यावर रक्कम दिली जाते. काही धार्मिक ट्रस्ट जी वैद्यकीय मदत देऊ करतात त्याची कमाल मर्यादा खालीप्रमाणे आहे.
4) सामाजिक आणि खासगी ट्रस्ट : धार्मिक ट्रस्टबरोबरच दानशूर उद्योगपती आणि सामाजिक संस्थानीही संपूर्ण देशात विविध ट्रस्ट आणि संस्था स्थापन केलेल्या आहेत. या संस्थाही हॉस्पिटलायझेनसाठी मदत देऊ करतात. त्यांची नावे खालीलप्रमाणे-
1. सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई , 2. सर दोराबाजी टाटा ट्रस्ट, मुंबई, 3. जी. डी. बिर्ला ट्रस्ट, 4. महावीर फाउंडेशन. 5. गुडलक नेरोलॅक ट्रस्ट, 6.ए.एच. वाडिया ट्रस्ट, 7. दीपाली बेन मेहता ट्रस्ट, 8. बलदोटा फाउंडेशन, 9. इन्फासिस फाउंडेशन,10.मफतलाल चॅरिटेबल ट्रस्ट, 11. डहाणूकर ट्रस्ट, 12. गरवारे फाउंडेशन इत्यादी.
संपूर्ण देशात विविध शहरात मिळून असे दहा हजारांहून अधिक सामाजिक आणि खासगी ट्रस्ट काम करतात. काही ट्रस्ट विशिष्ट आजारांसाठी मदत करतात. प्रत्येक ट्रस्टचे वर्षाचे बजेट असते. हे बजेट ट्रस्टकडे असणा-या ठेवीवर मिळणा-या व्याजावर आणि त्यांना मिळणा-या देणग्यांवर अवलंबून असते. यातील प्रत्येक ट्रस्ट किमान रुपये 1 हजार ते कमाल रुपये 10 हजार या मर्यादेपर्यंत मदत करते. मदत देताना अर्ज आणि त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. तसेच फोनवरून आणि इतर पद्धतीने चौकशी करून मदत केली जाते.
5) राखीव बेड आणि मोफत उपचार : प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकूण बेड्सच्या 10 ते 20 टक्के बेड्स गरीब आणि गरजू रुग्णांकरिता राखीव असतात. बहुतेक सर्व हॉस्पिटल ही चॅरिटेबल ट्रस्टखाली रजिस्टर झालेली असतात. तसेच केंद्र आणि राज्य सरकारची हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी घेताना एकूण बेड संख्येच्या विशिष्ट प्रमाणात गरीब रुग्णांसाठी मोफत बेड्स उपलब्ध करून देण्याचे बंधन घातलेले असते. त्याच्यावरील उपचारही मोफत आणि किमान खर्चात करणे अपेक्षित असते. हॉस्पिटलच्या कार्यालयामध्ये चौकशी करून आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन ही सुविधा घेता येते. यासाठी प्रोसिजरप्रमाणे हॉस्पिटलमध्ये अर्ज करावा लागतो. यासोबत कागदपत्रे जोडावी लागतात. यासाठी विविध प्रोसिजरप्रमाणे हॉस्पिटलमध्ये अर्ज करावा लागतो. त्यासोबत कागदपत्रे जोडावी लागतात. यासाठी विविध शहरातील रुग्ण हक्क समितीचे कार्यकर्ते मदत करू शकतील.

6) रुग्ण साहाय्य समिती : विविध शहरांमध्ये रुग्ण साहाय्य समिती आणि रुग्णांना साहाय्य व मार्गदर्शन करणा-या सेवाभावी संस्था काम करीत असतात. त्यांचा उद्देश रुग्णांना साहाय्य करणे, त्यांना मानसिक आधार देणे, आर्थिक निधी उभा करायला मदत करणे, रक्त पेढी, वैद्यकीय उपकरणे याबाबत माहिती देणे, हा असतो. यातील कित्येक संस्था आर्थिक मदतही करतात अनेकदा अशा संस्था समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांना आवाहन करून देणग्या गोळा करतात आणि गरजूंना त्या निधीचे आवश्यकतेप्रमाणे वितरण करतात. अशा संस्था मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची गरज आहे.

7) वर्तमानपत्रात बातमी निवेदन प्रसिद्ध करणे : आपल्याला वैद्यकीय मदत हवी आहे, अशी बातमी आणि निवेदन वर्तमानपत्रात प्रसिद्ध करता येते.
8) इंटरनेटवरून आवाहन करणे/ ई-मेल पाठवणे : वैद्यकीय मदतीबाबतचे निवेदन इंटरनेटवरून ई-मेलच्या साहाय्यानेही पाठवता येते. त्यातून हजारो व्यक्तींकडे प्रत्यक्ष पोहोचता येते. सध्या इंटरनेट वापरणा-या ची संख्या वाढत आहे. त्यामुळे या माध्यामाचा उपयोग करूनही वैद्यकीय मदत मिळवता येते.
परिसरातील, ओळखीचे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तेही मदत करतात.