आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद साधत राहणे महत्त्वाचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज स्त्रिया आपल्या भावनांना इंटरनेट, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमांतून वाट मोकळी करून देतात. त्यात जर सांभाळून वागलं नाही तर मोकळं होण्यापेक्षा वादाचीच जास्त शक्यता.
त्यामुळे व्यक्त होण्यासाठी आवश्यक मार्ग दाखविणारी व्यक्तीच हवी, ज्यामुळे मनातील साठलेल्या विचाराचं डबकं वाहतं होऊन शांत-शांत वाटेल.

सध्या दोन विषयांच्या संदर्भात महिला चर्चेत आहेत. एक राजकारणातल्या अन दुसऱ्या फेसबुक वा व्हाॅट्सअॅप या सोशल नेटवर्कमध्ये मन मोकळं करणाऱ्या. या दोघींविषयी जरा बोलू अन वास्तव काय ते पाहू.

सुरुवात करू राजकारणात बळजबरीने आणलेल्या किंवा खुशीने आलेल्या स्त्रियांपासून. अखेर मिळणार की नाही? मिळणार की नाही? असं करता करता २०१२मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५०% आरक्षण जाहीर झालं. राजकीय पक्षात वजन असलेले कार्यकर्ते, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अध्यक्ष, आमदार, खासदार यांच्या घरातील स्त्रियांना लॉटरी लागली. आतापर्यंत चूल अन् मुलात रममाण असणारी, कुटुंबाला आवश्यक तेवढा पैसा नवरा देतोय यात समाधान माणणारी, बाकी तो काहीही करो या मताशी सहमत असणारी, पतीचं राजकारण फक्त आर्थिक फायद्यासाठी चांगलं समजणारी, बाकी त्यातील ओ की ठो न कळणारी स्त्री आता बॅनर-होर्डिंगवर तिने केलेल्या (कागदोपत्री) कामासहित कलर फोटोत झळकू लागली. यातील कित्येक स्त्रियांनी जिल्हा परिषद, नगरपलिका, महानगरपालिकेची इमारतदेखील पाहिलेली नसते. अशीच एका नगरसेवकाच्या पत्नीशी गाठ पडली. मी तिला विचारले, तुम्हाला राजकारण आवडते का? त्यावर ती म्हणाली, मला कुठं आवडतं अन समजतं हो राजकारण. ते आरक्षण की काय, त्यामुळे मला घरच्यांनी उभं केलं. मला नाही म्हणता आलं नाही एवढंच!

भारतीय राजकारणाचा एक अलिखित नियम आहे ज्या स्त्रियांना राजकारण कळतं किंवा अभ्यासू वृत्तीच्या आहेत त्यांना राजकारणापासून दूर ठेवायचे, तिकीटच नाकारायचे. (काही अपवाद वगळता) या देशात स्व. इंदिराजींसारख्या झुंजार स्त्रीलादेखील “यह क्या राज चलाएंगी गँूगी गुडिया” असं म्हणणारे होतेच. निवडणुकीच्या वेळेस महिला कार्यकर्त्या सांगतात, आम्ही इतकी वर्षं काम केलं, आम्हाला डावलून हे पुरुष कार्यकर्ते आपल्या कुटुंबातील महिलेला तिकीट देतात. मला नाही मिळालं तरी चालेल पण दुसऱ्या महिला कार्यकर्तीला तिकीट मिळायला हवं. पण तसं घडत नाही.

महिला कार्यकर्त्या घरातील काम बाजूला सारून वेळेची जुळवाजुळव करून काम करीत असतात. वेळप्रसंगी घरातील लोक नाराज होतात पण वेळेवर तिकीट नाकारून त्यांच्यावर अन्याय केला जातो. पर्यायाने घरात आणि घराबाहेर दोन्हीकडून उपेक्षाच पदरी पडते. मी १०० महिला सरपंचांना भेटले. त्यातील ५% वगळल्यास बाकीच्यांना गावची लोकसंख्या माहिती नसते.

तंटामुक्ती अध्यक्ष माहीत नसतो. त्यांना गावातील विकासकामाबद्दल विचारले तर मला काही माहिती नाही, माझे काम मुलगा, नवरा, सासरा बघतात असे उत्तर मिळते. त्यांना स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनातला फरक समजत नाही. त्यातील ५% महिलांना त्यांच्या सहीची व हक्काची जाणीव होऊन त्यांच्या हातून चार चांगली विकासकामं घडतीलही आणि त्यांच्यातील नेतृत्व, कर्तृत्वगुण बहरून येतील पण त्यासाठी त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण असायला नको?
दुसरा विषय होता स्त्रीमन मोकळं होण्याचा. आज स्त्रिया आपलं मन मोबाइल, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमातून मोकळं करत आहेत.त्यात जर सांभाळून वागलं नाही तर मोकळं होण्यापेक्षा वादाचीच जास्त शक्यता. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी आवश्यक मार्ग दाखविणारी व्यक्तीच हवी. ज्यामुळे आपल्या मनातील साठलेल्या विचारांचं डबकं वाहतं होऊन मनाला शांत-शांत वाटेल. ज्याप्रमाणे भरून आलेले काळेभोर आभाळ धो-धो कोसळल्यावर त्याला जो नितळपणा येतो, मनाला जसे आल्हाददायी वाटते अगदी तसेच!

मन मोकळं करण्याची गरज प्रत्येकालाच असते. मन मोकळं करणं म्हणजे आपलं सुख-दुःख, आशा-आकांक्षा, जय-पराजय, भीती, अनुभव आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीजवळ बोलून मोकळं होणं. असं केल्यास मनाला हलकं-हलकं वाटतं. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त भावनिक असतात. त्यामुळे त्याची त्यांना जास्त गरज भासते. भलेही घरातील पुरुषांना ते क्षुल्लक व निरर्थक वाटत असले तरीही. पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत त्याला मर्यादा होत्या, घरातील सत्तास्थानापुढे त्या बोलू शकत नव्हत्या. म्हणून मग बाहेरून पाणी आणताना, साखरपुड्यात, एखाद्या लग्नात, जवळच्या नातेवाइकांच्या मृत्यूनंतर, उन्हाळ्यात शेवया, पापड, सांडगे करण्यासाठी एकत्र आल्यावर त्या एकमेकींसोबत सुख-दुःख वाटून घ्यायच्या आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायच्या.

आज शिकून सवरून ती काम करू लागली. अर्थार्जनासाठी, उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी घराबाहेर पडली आणि मनाचा कोंडमारा मोकळा करायचे ठिकाण तेवढे बदलले. आता ती कार्यालय, दुपारची जेवणाची वेळ, लोकल, ब्युटी पार्लर कधी फोनवर तर कधी मेलवर व्यक्त व्हायला लागली. हे भाव-भावना, विचार जर आपण बोलून मोकळे झालो नाही तर एखाद्या रद्दीसारखे मनाच्या कोपऱ्यात ते साठून राहतात आणि हळूहळू त्याचं ओझं वाटायला लागतं. या ओझ्यामुळे व्यक्ती शारीरिक व मानसिक आजाराची शिकार होऊ शकते.

घरातील स्त्री कोणत्याही विषयावर बोलायला लागली की पुरुषांना ती नुसती कटकट वाटते किंवा वायफळ बडबड. तरीपण त्या व्यक्त होण्यातून तिला हलकं-हलकं वाटून तिची मानसिक, शारीरिक आजारातून सुटका होत असेल तर यांना त्याचे दुःख का? याला सर्वस्वी पुरुषही जबाबदार धरता येणार नाही कारण भारतीय स्त्रिया कितीही शिकल्या सवरल्या तरीही शरणागती, आधार व सुरक्षितता शोधतात. स्वातंत्र्याचं मोल जाणत नाहीत. घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळही भारतीय स्त्रीत अभावानेच जाणवते. याचे कारण स्त्री म्हणून मिळालेली दुय्यम वागणूक. आपण रोज वर्तमानपत्रात स्त्रीची मुलांना घेऊन आत्महत्या, विष पिणे, जाळून घेणे अशा बातम्या वाचतो कारण जगण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास नाही. पतीने सोडले तर समाज काय म्हणेल, आई-वडील काय म्हणतील या दबावाखाली ती वावरते.
यामुळे संवाद साधण्यासाठी योग्य माणसं आजूबाजूला हवीत, व जमेल त्या माध्यमातून संवाद साधायला हवा, मन मोकळं करायला हवं. अगदी राजकारणातल्या महिलांनीही संवाद जपायलाच हवा, तरच त्यांना राजकीय क्षेत्रातही यश मिळेल.
meenataiwanare2015@gmail.com