Home | Magazine | Madhurima | Meera Sirsamkar writes about Kangana ranaut.

नायिकांची समिकरणं बदलणारी कंगना

मीरा सिरसमकर | Update - Sep 12, 2017, 11:10 PM IST

‘ मला काहीतरी वेगळं करायचंय. वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. त्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आलेय. दिग्दर्शकांचा ‘इगो ’

 • Meera Sirsamkar writes about Kangana ranaut.
  ‘ मला काहीतरी वेगळं करायचंय. वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. त्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आलेय. दिग्दर्शकांचा ‘इगो ’ कुरवाळत बसायला नाही’, असं म्हणत बॉलिवूडमधली अनेक गुपितं उघडी करणारी कंगना सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. जिद्दी,बिनधास्त,हट्टी, बंडखोर, स्वत:चे स्टंटसीन स्वत:च करणाऱ्या अशा या ‘गाँव की छोरी’ नं बॉलिवूड मधल्या नायिकांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद दिलाय....

  ‘कोणत्या खानबरोबर नायिकेचे काम करायला आवडेल तुला?’ ‘कोणत्याही नाही,’ तिने निर्विकार राहून पण ठामपणे उत्तर दिलं तेव्हा करण जोहर थोडा आश्चर्यचकितच झाला. कारण आजवर अनेक नायिकांनी या प्रश्नावर त्याला, एखाद्या खानाची निवड करून लाजत मुरकत उत्तर दिलेले होते. त्याला तशाच पद्धतीच्या उत्तराची अपेक्षा होती. त्याच कार्यक्रमात ती त्याला ‘मूवी माफिया‘ असं म्हणाली, तेव्हाही त्याचे डोळे विस्फारले! अर्थात ही सगळी प्रश्नोत्तरं हलक्याफुलक्या वातावरणात झालेली होती. पण प्रत्यक्षातसुद्धा कंगना स्पष्टवक्ती म्हणूनच ओळखली जाते. फिल्मी दुनियेतल्या प्रस्थापितांच्या कंपूशाहीवर, पुरुष वर्चस्ववादावर आणि दुटप्पी वर्तनावर कोणाचीही भीडभाड न बाळगता जाहीर माध्यमांमधून सरळसरळ टीका करणारी ही कंगना राणावत. हिमाचल प्रदेशातल्या भांबला या अगदी छोट्याशा गावापासून मुंबईच्या बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. एकतर ती स्त्री आणि दुसरे म्हणजे तिच्यामागे कोणतीही फिल्मी कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, ना कोणी तिचा गॉडफादर होता. हिंदी सिनेमात स्त्रियांना किती स्थान असते, त्याची आकडेमोड जगजाहीरच आहे. त्यांच्या कामाच्या वयाचा स्पॅनही पुरुषांच्या कामाच्या वयाच्या स्पॅनपेक्षा तोकडा. त्यांना मिळणाऱ्या भूमिकाही ठराविक साच्याच्या. त्याही दुय्यम प्रकारच्या. मुख्य भूमिकेत कायम पुरुष कलाकार भाव खाऊन जाणार. त्यांचे मानधनाचे आकडेदेखील स्त्री कलाकारांपेक्षा मोठे. पण आज या सर्व परिस्थितीला झुगारून कंगना हिंदी सिनेसृष्टीतली सगळ्यात जास्त मानधन घेणारी, आजवरच्या नायिकांच्या भूमिकेची सगळी समीकरणे बदलायला लावणारी आणि अनेक यशस्वी हट के चित्रपट देणारी नायिका म्हणून ओळखली जातेय. या साऱ्या कर्तृत्वाचं श्रेय तिच्याकडे आणि तिच्याकडेच जातं. ती तशी लहान खेड्यातल्या परंपरावादी एकत्र कुटुंब असलेल्या घरातून आलेली मुलगी. मुलगा / मुलगी हा भेद तिच्या लहानपणी तिने घरातच पाहिलेला आहे. तिच्यात असलेल्या बगावत आणि हट्टीपणापणाचा जन्म त्यातूनच झालाय. अर्थात याचा तिला पुढच्या आयुष्यात फायदाच झाला!

  दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या गँगस्टर या सिनेमातून तिचं सिनेमासृष्टीत पदार्पण झालं. त्या वेळी तिचं वय होतं अवघं सोळा. हा सिनेमा बऱ्यापैकी गाजला आणि तिची भूमिकाही. तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पण सर्वस्वी अनभिज्ञ असणाऱ्या मायावी नगरीत तिच्यासारख्या मुलीला सहजासहजी पुढे जाणं तर सोडाच, साधं वावरणंही कठीण होतं. एकतर ती खेड्यातून आलेली. तिची केशभूषा आणि वेशभूषासुद्धा तिच्या समकालीन नायिकांहून सर्वस्वी वेगळी. तथाकथित ‘अर्बन फिनेस’ तर तिच्यात नावालाही नव्हता. सुरुवातीच्या काळात तिच्या विशिष्ट हेल असलेल्या इंग्रजी भाषेची यथेच्छ चेष्टा केली गेली. जिथे जाईल तिथे, ‘अनवाँटेड ऑब्जेक्ट’ म्हणून तिच्याकडे पाहिलं जाई. त्या दिवसांच्या कटू आठवणी तिच्या मनावर इतक्या दृढपणे कोरल्या गेल्या आहेत की, आज मिळालेले भरघोस यश स्वीकारतानाही ती त्या स्मृती विसरू शकत नाही. पुढे वो लम्हें, लाइफ इन अ मेट्रो आणि फॅशन हे तिचे सिनेमा लागोपाठ आले आणि गाजले. नंतरच्या तनु वेड्स मनू आणि क्वीन या सिनेमांनी ती खऱ्या अर्थाने बॉलीवूडची सम्राज्ञी झाली. फॅशनमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून तर क्वीन आणि तनु वेड्स मनुमधील प्रमुख भूमिकांसाठी तिला राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. हट के भूमिका हे तिचं खास वैशिष्ट्य. तनु वेड्स मनू-२ मधली तिची दुहेरी भूमिका तर फार गाजली. त्यातील त्या हरयाणवी मुलीच्या भूमिकेसाठी ती खास काही दिवस दिल्ली विद्यापीठात गेली. तिथे त्या मुलींसोबत राहिली. विशिष्ट हेल असलेली हरयाणवी भाषा आणि ट्रिपल जंप हा खेळही शिकली. रंगून सिनेमातल्या भूमिकेसाठी तलवारबाजी, घोडेस्वारी, फायटिंग शिकली. डमी न वापरता सगळे स्टंट्स स्वतःच केले. झाशीच्या राणीच्या जीवनावरील मनकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी हा तिचा भावी चित्रपट. त्याचे तर पटकथालेखनही तिनं केलंय. काही दिवसांपूर्वी झालेल्या आप की अदालत या प्रश्नोत्तररूपी कार्यक्रमात तिची जी मुलाखत झाली त्याबाबत तिच्यावर सर्व बाजूंनी स्तुती आणि टीका असे दोन्ही प्रकारचे मोहोळ उठले. अशा प्रकारचे कार्यक्रम बेतलेले असतात हे सर्वश्रुत आहे. सिनेमासृष्टीत मिळणारे पुरस्कार, प्रस्थापित दिग्दर्शक / निर्माते यांची मनमानी, मेल इगो, स्त्रियांना मिळणारी विषम वागणूक, इत्यादि इत्यादिविषयी ती भरभरून बोलली. अनेक दिग्गजांची नावे घेऊन तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाच्यता केली. कोणी म्हणालं की, तिच्या नव्या सिमरन या सिनेमाचं ती प्रमोशन करतेय. तर काहींना वाटलं, ती आपले खाजगी अनुभव जाहीरपणे सांगतेय हेच एक मोठे धाडस आहे. ती गाजलेली अभिनेत्री आहे तर तिला अशा प्रमोशनची काय आवश्यकता ?

  खरं तर स्त्रीपुरुष संबंधांच्या बाबतीत थेट कुणा एकालाच चूक किंवा बरोबर असं ठरवून न्याय लावता येत नाही. त्यात विवाहबाह्य संबंध असतील तर नात्यांचा एक वेगळाच गुंता तयार होतो. त्यात केवळ सत्य किंवा केवळ असत्य असं वेगवेगळ्या पातळीवर काही राहत नाही. ती सरमिसळच असते - नात्यांची, भावनांची, देवघेवींच्या क्षणांची. यात काय अस्सल आणि काय लटकं, ते ओळखणं कठीणच. प्रश्न येतो ही अशी नाती काही कारणांनी संपुष्टात येतात तेव्हा. मग एकमेकांवर आरोप केले जातात, खरंखोटं ठरवण्याचा आटापिटा केला जातो. त्यात हे सिनेमातले कलाकार. तिथलं वातावरणच मुळात अशा गोष्टींना उद्युक्त करणारं. वादविवाद आणि लफडी यांच्या जिवावर तोलला जाणारा हा उद्योग, असा नावलौकिक. त्यांच्या नात्यांचा उपयोग व्यवसायात होतच नाही, असं म्हटलं तरच उलट चूक ठरेल! इथं वापरणं आणि गुंतणं हेच मुळात एकमेकांपासून वेगळं करता येत नाही.

  पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगताना ती स्वतःच्या चुकाही मान्य करते. तिने तिची बाजू मांडली. आणखी एक गोष्ट की, अगदी लहान वयात ती अशा अनुभवांना सामोरी गेली, त्या वेळी तिला मार्गदर्शन करणारे किंवा मदत करणारे जवळचे असे कोणीच नव्हते. आज या सगळ्या अनुभवांमधून ती बाहेर पडली आहे किंवा बाहेर पडू पाहते आहे. पण त्या वेळी ती कुठेही अनावश्यक अपराधांचे ओझे बाळगत नाहीये. ती खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्हीही क्षेत्रातील जीवनांना त्याच भक्कम आत्मविश्वासाने सामोरी जाते आहे. ती स्वतःचं काम आणि व्यवसाय या बाबतीत कोणतीही तडजोड करताना दिसत नाही. तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जराही कुठे हललेला नाही. अशा प्रकारच्या खाजगी चर्चांचा उपयोग सिनेमाच्या प्रमोशनसाठी करायची तिला गरजच नाही. कारण ती तिच्या सिनेमांसाठी वेगळी मेहनत घेतेच आहे. मुळात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर इतके उत्तम चित्रपट देणारी कंगना, अशा चर्चांनी सिनेमा चालतो असं समजण्याइतकी दुधखुळी नाहीच. घडलेल्या गोष्टींबद्दल अकारण मौन न बाळगता ती धीटपणे ते मांडते आहे. हा खरं तर स्त्रीत्वाला एक मोठा आयाम ती देते आहे. याआधीच्या काळात स्त्रीकेंद्रित भूमिका असलेले चित्रपट तयार झालेच नाहीत असेही नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा की, तिने त्याच त्या भूमिकांच्या चाकोऱ्या टाळल्या तर आहेतच शिवाय तिने तिच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून संपूर्ण सिनेसृष्टीला आणि समाजालाही, स्त्री कलाकाराकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवा दृष्टीकोन दिलाय, जो आजवरच्या परंपरेला छेदणारा ठरतोय! सायको किंवा मॅड आहे असे शिक्के तिच्यावर बसतात. कारण आपल्या बुद्धीच्या चौकटीत स्त्रियांच्या वागण्याविषयीच्या पारंपरिक कल्पना ठाण मांडून बसलेल्या असतात. कंगनाने त्या कल्पनांनाच सुरुंग लावला आहे!
  - मीरा सिरसमकर, पुणे,
  meerasirsamkar@yahoo.com

 • Meera Sirsamkar writes about Kangana ranaut.

Trending