आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नख'रेवाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला नेहमी आपल्या सौंदर्यात कशी भर घालावी, असा प्रश्न असतो. सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे आपली नखे. नखे स्वच्छ व निरोगी असतील तर आरोग्यही चांगले राहते. यासाठी आपल्याला नखांची निगा राखणे आवश्यक आहे. नखांची निगा राखण्याची कला म्हणजे नेल आर्ट.

सुंदर नखे व्यक्तिमत्त्वाला वेगळेपण देतात व आत्मविश्वासही वाढवतात. यात तुम्ही भरपूर नवनवीन डिझाइन्स वापरू शकता. परिपूर्ण रंगवलेली नखे तुमचा मूड, विचार आणि कल्पना दर्शवितात. यामध्ये तुम्ही क्लासिक रेड, हॅप्पी यलो, क्रिएटिव ग्रीन, मिस्टेरियस पर्पल हे रंग वापरू शकता. ते नेल पॉलिश आणि तुमच्या कपड्यांसोबत साजेसे दिसतील. तुमची नखे लहान असतील तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की तुम्ही जांभळा, काळा आणि लाल असे डार्क रंगच वापरायला हवेत. यामुळे तुमची छोटी असलेली नखे थोडी लांब दिसतील. त्याचप्रमाणे नेल पॉलिश जास्त दिवस नखांवर ठेवू नये. नेल पॉलिश लावून एक आठवडा झाला असेल तर ते जेव्हा निघेल तेव्हा निघेल, असं म्हणून चालणार नाही. त्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हर वापरा व नेल पॉलिश काढा.

जेव्हा तुम्हाला नखे साफ करायची असतील किंवा कापायची असतील, तेव्हा कापूस, नेल पॉलिश, नेल पॉलिश रिमूव्हर, नेल क्लिपर, नेल फाइल व नेल स्टिक जवळ ठेवा. नखांना आपण दोन प्रकारे आकार देऊ शकतो. एक चौकोनी, तर दुसरा गोल. हा आकार कसा असावा, हे तुमच्या मनावर अवलंबून असते. नेहमी नेल पॉलिश करताना हात स्वच्छ धुऊन टॉवेलने पुसून कोरडे करा आणि नेल पॉलिश लावण्याअगोदर बाटली हातात घेऊन तिला गोल गोल फिरवावी. किमान 25 ते 30 सेकंद त्या बाटलीला गरम करा. नेल पॉलिशची बाटली कधीच हलवू नका. त्यामुळे त्या बाटलीमध्ये बुडबुडे तयार होतात. नेल पॉलिश लावण्याअगोदर नेहमी बेस कोट लावणे आवश्यक आहे. कारण हा बेस कोट तुमचा नेल पॉलिशमधल्या केमिकलपासून बचाव करतो व तुम्हाला सिल्कप्रमाणे नेल पॉलिशचा लुक देतो.

नेल आर्टमध्ये अनेक प्रकार वापरता येतात. रेडिमेड स्टिकर वापरले जातात. यात आपण पेपर प्रिंटेड स्टिकर किंवा प्लास्टिक पेपर स्टिकर किंवा ज्वेल स्टिकर वापरू शकतो. पेपर प्रिंटेड स्टिकर ग्लूने चिकटवले जातात, प्लास्टिक पेपर स्टिकरही अशाच प्रकारे असतात, पण ज्वेल स्टिकरमध्ये ज्वेलरी म्हणजेच खरोखर दागिने नखांवर चिकटवले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन किंवा घुंगरू व हल्ली फॅशनमध्ये असणारे अगदी छोट्या आकाराचे लटकनसुद्धा नखांवर चिकटवले जातात. सध्या अधिक लोकप्रिय असलेला दुसरा प्रकार म्हणजे क्रिस्टल नेल आर्ट. हा खूप लोकप्रिय आणि अगदी साधा प्रकार आहे. यात जेव्हा तुम्ही तुमच्या नखांना नेल पॉलिश लावाल कोणत्याही रंगाचे, तर त्यावर थोडी चमकी लावा व त्यानंतर टॉप कोट लावा. यालाच ग्लिटर नेल आर्ट किंवा स्पार्कल नेल आर्ट असेही म्हटले जाते. या प्रकारात तुमच्याकडे चमकी नसेल तर तुम्ही नेल पॉलिश लावल्यावर लगेच त्यावर थोडे थोडे साखरेचे दाणे टाका व त्यावर टॉप कोट लावा.

सोबतच तुम्ही यामध्ये पोलका प्रिंट किंवा फुलांचे डिझाइन्स किंवा कलर ब्लॉकिंगही वापरू शकता. कलर ब्लॉकिंग म्हणजे भौगोलिक आकारांमध्ये एकमेकांना साजेसे रंग वापरून सुंदर दिसण्याचे नियोजन. या प्रकारात तुम्हाला हवे तेवढे रंग तुम्ही वापरू शकता. तुम्हाला नैसर्गिक रंग आवडत असेल म्हणजे साधारणत: आपल्या नखांचा जो नैसर्गिक रंग असतो, तर त्यासाठी तुम्ही फिकट गुलाबी रंग वापरू शकता व त्यावर तुम्ही ज्वेल वर्क किंवा सेक्विन्स वर्क करू शकता. अशाच प्रकारे वेगवेगळ्या नेल पॉलिशच्या रंगांत तुम्ही वेगवेगळी डिझाइन्स करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रिंटही वापरू शकता. उदा. टायगर प्रिंट किंवा झेब्रा प्रिंट. तुम्हाला काही वेगळे डिझाइन हवे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीही नखांवर सुंदररीत्या उतरवू शकता. एखाद्या व्यावसायिक नेल आर्ट डिझायनरला भेटा व तुम्हाला हवे तसे सुंदर व क्रिएटिव डिझाइन तुमच्या नखांवर करून घ्या. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल व तुमचा आत्मविश्वासही वाढेल. म्हणून एकदा तरी नेल आर्ट नक्की करून बघा.
(mghsnsre@rediffmail.com)