आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुऱ्हाळें उदंड जाहली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोनमध्ये डोकं खुपसून बसलेल्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक बोलत असतात, उरलेल्या दोन तृतीयांश लोकांपैकी अर्धे लोक काही ना काही पाहात असतील; पण उरलेले एक तृतीयांश लोक काय करत असतात, असं तुम्हाला वाटतं? 
 
भाषा म्हणजे बोलणं, ऐकणं, लिहिणं आहे; तसंच वाचणंही आहे. या वाचनसवयीचं काय झालं आहे माध्यमक्रांतीच्या काळात?

चश्मिष्ट नजरेनं बघून, मान खेदानं हलवत ‘ह्यॅ:! आजकाल कुणी वाचतच नाही...’ अशी हळहळ व्यक्त करणार असाल, तर सबूर! ही हळहळ पार कालिदासाच्या काळापासून गुटेनबर्गाच्या काळापर्यंत होती. आजही असेल. वाचणारे लोक कायमच कमी होते. आपले मेंदू वाचनासाठी उत्क्रांत झालेलेच नाहीत. अष्टावधानी मेंदूला धरून-बांधून घालत, नजर बळंच एका बिंदूवर रोखत वाचन करायचं आणि ते सखोल समजून घ्यायचं म्हणजे, कष्टाचं काम. ते करणारे लोक कमी असायचेच. सध्याचं चित्र वरकरणी मात्र या उलट दिसतं. फोनमध्ये डोकं खुपसून बसलेल्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक बोलत असतात, असं आपण गृहीत धरू. उरलेल्या दोन तृतीयांश लोकांपैकी अर्धे लोक काही ना काही पाहात असतील- सिनेमा, यूट्यूब, चित्रफिती, फोटो किंवा चित्रं- असंही आपण अंमळ वाढीव अंदाजातच धरून चालू. तेही लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटर वापरणारे लोक वगळून. पण उरलेले एक तृतीयांश लोक काय करत असतात, असं तुम्हाला वाटतं?

ते वाचत असतात. दचकलात? पण थांबा. वाचन म्हणजे साहित्य, असं धरून चालला असलात, तर तुम्ही भाषा आणि साहित्य एकाच मापात मोजणाऱ्यांच्यात मोडाल. त्यामुळे हे सगळे लोक साहित्य वाचत नसतात, हे आधी स्पष्ट करून घ्या. पण मग ते नक्की वाचत तरी काय असतात? ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मजकूर वाचत असतात. ‘वाचत असतात’ हेही जरा चुकीचंच. व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, एसएमएस, इमेल, नेटवरचं सर्फिंग... अशा सगळ्या माध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोचणारा मजकूर ते ‘प्रोसेस् करत असतात’ उर्फ गुऱ्हाळत असतात. तो मजकूर पाहणं, वाचणं, समजून घेणं, त्यावर प्रतिक्रिया लिहिणं, तो मजकूर साठवणं, पुढे ढकलणं, त्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं, आपल्या बोलण्याचा सूर आणि आपली देहबोली पलीकडच्या व्यक्तीला कळत नसल्याचं विसरून वाद वाढवणं आणि मग तो निस्तरताना नवीन मजकुराला जन्म देणं, गैरसमज टाळण्यासाठी आधुनिक कथ्याचा (narrative) अविभाज्य भाग असलेल्या स्मायल्यांची पखरण करायला शिकून घेणं... अशा निरनिराळ्या प्रक्रिया, म्हणजे हा मजकूर गुऱ्हाळणं.

हे मजकुराचं गुऱ्हाळ सध्या प्रचंड वाढलेलं आहे. यात चिंता करण्यासारखं काय आहे, असं तुम्हाला वाटेल; पण आहे. पूर्वीच्या कागदी वाचनक्रियेमध्ये गृहीत धरलेली एकाग्रता, सलग वाचनाचा आताच्या तुलनेतला दीर्घ कालावधी, मेंदूने सर्जनशीलपणे पचवलेली सखोल माहिती- हे या गुऱ्हाळातून हळूहळू कमीकमी होतं आहे. एका लिंकेवरून दुसऱ्या लिंकेवर, एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर, एका उपकरणावरून दुसऱ्या उपकरणावर...अशी आपली धरसोड खूप वाढलेली आहे. परिणामी आपल्या आकलनामध्ये, सखोल विचारक्षमतेमध्ये आणि एकाग्रतेमध्ये लक्षणीय घट झाल्याचं संशोधकांनी नोंदलं आहे. कारणं अनेक आहेत. आपल्या जगण्याची वाढलेली गती, तंत्रज्ञानाची वाढलेली उपलब्धता आणि वेग, मजकुराच्या मांडणीतही झालेला बदल... पूर्वी कागदी पानावरचा मजकूर वाचताना खुद्द त्या मजकुरात वा आजूबाजूला क्लिक करण्यासाठी कसलीही प्रलोभनं नसत.
 
फोनमधून सतत कसली ना कसली नोटिफिकेशन्स वाजत नसत. फार काय, स्वतःचा अंगभूत असा प्रकाश पुरवून कागद थोड्या वेळानं आपल्या डोळ्यांना दमवतही नसे. त्यामुळे साध्या राहणीखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या, गरीब घरातल्या सालस आणि शहाण्या पोराप्रमाणे आपला मेंदूही समोर दिसेल ते मन लावून वाची. पण आता? आताच्या मेंदूंचे पालक जणू भलतेच श्रीमंत आहेत! ते त्यांना अनेक आकर्षक, चकचकीत, भुलवणाऱ्या गोष्टी अष्टौप्रहर पुरवत असतात. नाही रमलं मन, घे बाबा दुसरं काही हाती! परिणामी मेंदूबाळं लाडावून बिघडलेली आहेत आणि त्यांचं हॉरिझॉन्टल थिंकिंग उर्फ आपल्या प्राथमिक शाळेतल्या बाई ज्याला ‘कशातच धड लक्ष नसणं’ म्हणत, ते वाढलेलं आहे!

इतक्यानं झालं नाही. एखादी बातमी, विधान, चित्र, शेरा वाचल्यावाचल्या त्याबद्दल ताबडतोब काहीतरी म्हणणं किंवा करणं- उदाहरणार्थ फॉरवर्ड- आपल्याला सक्तीचं वाटायला लागलेलं आहे. या सक्तीमुळे कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग, सखोल, चौफेर विचार करणं हळूहळू मागे पडतं आहे. सगळी माहिती लगेच हवी आणि आपण त्यावर आपलं मत तत्काळ मांडलं पाहिजे, अशी काहीतरी जबरदस्ती आपल्याला भासू लागली आहे. खरं तर अशी सर्वंकष अद्ययावत माहिती सतत मिळत राहणं आवश्यक नाही, ते शक्यही नाही.
 
तरीही आपण अथक मजकूर चरत राहतो, हे वास्तव आहे. याचे फायदे नाहीत असं नाही. माहितीचा, तसाच ती वेगात रिचवण्याचाही, उपयोग असतोच. पण गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये कमावलेली मौल्यवान कौशल्यं आपण त्या बदल्यात गमावतो आहोत, त्याचं काय? व्यत्यय न आणता वाचन करू देणारी किंडलसारखी उपकरणं, इंटरनेट ठरावीक वेळापुरतं सक्तीने बंद करणारी ॲप्स, रात्री मोबाइल बंद करून दर्जेदार झोप कशी घ्यावी, हे शिकवणाऱ्या कार्यशाळा... या सगळ्या उपायांना आलेला बहर पाहता आपल्या या सततच्या कनेक्टिविटीचा आपल्याला तोटा होतो आहे, हे उघड आहे. पण त्याचं मूल्यमापन करणं दूरच, आपण काही गमावतो आहोत, याचं भानही आपल्याला नाही. 

पारंपरिक छापील माध्यमांना या आकर्षणांशी लढणं आणि आपलं अपील कायम राखणं भाग आहे. ही वाचनसंस्कृतीच्या अस्तित्वाचीच लढाई आहे, हे जगभरातल्या पुस्तकवाल्यांनी ताडलेलं दिसतं. इ-प्रती, ती वाचणारी अॅप्स आणि वाचकाग्रहामुळे हल्ली स्वस्त होऊ लागलेली कागदी पुस्तकं... अशा नाना प्रकारे पारंपरिक माध्यमं जपू पाहण्याचे होत असलेले प्रयत्न पाहिले, तर ते नीट लक्षात येतं.

मराठी पुस्तकविश्व याकडे कसं पाहतं?
मराठी पुस्तकांच्या इ-प्रती उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. पण त्या सरसकट सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत उपलब्ध असतात का? त्या कागदी प्रतींपेक्षा स्वस्त असतात का? टंकाच्या बाबतीत एकवाक्यता आहे का? सगळ्या प्रकाशनांचा त्याला पाठिंबा आहे का? वाचकांचा पुरेसा प्रतिसाद आहे का? प्रताधिकारमुक्त मजकूर डिजिटली उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतात का? सगळ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल नकारघंटाच वाजवावी लागते. याचे परिणाम काय होतील? आपली सलग, सखोल, एकरेषीय, विषयात खोल बुडी मारू देणारी, एकाग्र वाचनक्षमता संपेल?

इथे मला एका अगदी निराळ्या चढाओढीची आठवण होते आहे. चित्रपट हे अगदी अलीकडे- शंभरेक वर्षांपूर्वीच- जन्माला आलेलं माध्यम. त्याच्या जन्मापासूनच ‘आता नाटक मरणार’ अशी भीती व्यक्त केली गेली. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. नाटक गेलं-संपलं-मेलं, अशा हाकाट्या उठल्या, आणि नाटकानं पुन्हा उसळी घेतली.
 
हे पुन्हापुन्हा घडलं, घडत राहिलं. हेच कागदी वाचनाच्या बाबतीतही घडणार नाही कशावरून? प्रत्यक्ष नटांना आणि नाट्यनिर्मिती होताना अनुभवण्यातला रोमांच आणि कागदाला स्पर्श करत, न चेतलेली-शांतवणारी अक्षरं नजरेनं पीत एका संपूर्ण निराळ्या जगात बुडी घेण्यातला रोमांच यांत साम्यस्थळं आहेत, बलस्थानंही आहेत. ती रुपेरी वा डिजिटल पडद्यात नाहीत, पण त्यांची स्वतःची निराळी ताकद आहे. बदलत्या जगात काही प्रमाणात तीही आवश्यक आहे. दोन्ही माध्यमांनी परस्परांसह नांदावं, अशीच परिस्थितीची गरज आहे. वाचनक्षमतेच्या बाबतीतही हे होणार नाही कशावरून? अशा सहअस्तित्वाचेही काही फायदे आहेतच. त्याबद्दल पुढच्या भागातून.
संदर्भ:
1. http://www.newyorker.com/science/maria-konnikova/being-a-better-online-reader
2. http://www.sciencedirect.com/science/article/pii/S0883035512001127
 
संपर्क : ९९६७१९४१५४
meghana.bhuskute@gmail.com
बातम्या आणखी आहेत...