आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल: \'उगा ताकाला जाऊन भांडं का लपवता?\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्नोग्राफीची चर्चा अमाप होते. कधी आडून, कधी थेट. कधी उथळ, कधी संयत. मात्र, आपण मान्यवर लेखक-तज्ज्ञांना लिहितं करून याच विषयाचा सांगोपांग वेध घेणारा विशेषांक प्रकाशित करू या, असा विचार सहसा कुणी करत नाही. पण ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाने तसा विचार केला आणि प्रत्यक्षातही आ‌णला. मराठीच्या परिघात ‘आइसब्रेकिंग’ ठरलेल्या या प्रयत्नांची प्रक्रिया उलगडणारा हा लेख...
इसवी सन २०१६ : मी मुंबईसारख्या मेट्रोपोलिटन शहरात राहणारी, आधुनिक म्हणवणाऱ्या समाजातली, सज्ञान स्त्रीलिंगी स्त्रीवादी उदारमतवादी व्यक्ती. पॉर्नसारख्या थोड्या आडवाटेच्या विषयावर गंभीरपणे काही लिहू-बोलू बघते, त्याबद्दल मोकळेपणाने प्रश्न विचारते आणि माझा दृष्टिकोन जाहीरपणे मांडते- यावर मला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात?
‘धाडसी आहेस हो.’
‘पण पॉर्न म्हणजे - ते तसलं - तसलं छापलं आहे थेट?’
‘तुझ्या आईबाबांना माहीत आहे?’
‘मज्याशी मयत्री करनंर का?’ (‘Will you be my friend?’चा हा मराठी सोशल साइट्सवरचा अवतार.)
‘मग? खूप अभ्यास केला असेल ना? हॅहॅहॅ!’
प्लीज नोट- र. धों. कर्व्यांचा कार्यकाळ संपूनही, थोडीथोडकी नाही ५३ वर्षं उलटून गेलेली आहेत. असो. आडवळणानं न बोलता मुद्द्यावर येते. ‘ऐसी अक्षरे’ या वेबसाइटच्या माध्यमातून मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी मिळून ‘पॉर्न’ या विषयावर एक विशेषांक नुकताच प्रकाशित केला. त्या दरम्यान आणि त्याबद्दल मिळालेल्या या प्रतिक्रिया.
या प्रतिक्रिया मिळेपर्यंत आपण काही जगावेगळं करतो आहोत, याची मला फारशी जाण नव्हती, याचं कारण माझ्या कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीमध्येही असणं सहजशक्य आहे. जोवर आपण दुसऱ्या माणसाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करत नाही, तोवर आपल्या स्वतःला योग्य वाटेल अशी कोणतीही कृती करणं चूक नाही, असं मानणाऱ्या कुटुंबात मी वाढले. अनेक स्वातंत्र्यं मला आपसूक मिळाली, मला त्यांच्याकरता अजिबात झगडावं लागलं नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत निदान लिखित-शाब्दिक अभिव्यक्तीसाठी तरी संपादकशरणता होती. पण इंटरनेटनं त्याही अवलंबित्वाची वासलात लावली. कुणीही आपल्याला हवं ते मत व्यक्त करू शकतं आणि ते प्रकाशित करू शकतं, ही माझ्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींच्या पथ्यावर पडलेली वस्तुस्थिती. या पार्श्वभूमीवर आम्ही पॉर्नोग्राफीसारख्या विषयावर एक विशेषांक करतो आहोत, यात मला सुरुवातीला तरी काहीच स्फोटक वाटलं नाही.
पण पॉर्नोग्राफी या विषयावर एक लहानसा सर्व्हे तयार करून तो आपल्या वर्तुळातल्या लोकांपर्यंत पोहोचवताना, मुलाखतींसाठी सेक्सॉलॉजिस्ट्ससारख्या तज्ज्ञांचा शोध घेताना, क्वचित ऑफीसमधून या कामासंदर्भात फोनवर बोलत असता तोंडून एखादा शब्द मोठ्यानं गेलाच - तर आजूबाजूच्या उंचावलेल्या भुवया पाहून शरमिंदं होताना, आपल्या शाळेतल्या मित्रांना याबद्दल काही शंका विचारल्यावर “तुला काय करायचीय ही माहिती?” असं दरडावत “राखी-बांधके-निकले-हुई-भाई-मोड’मध्ये शिरलेलं पाहताना विषयाचा स्फोटकपणा हळूहळू लक्षात येत गेला. आपलं म्हणणं लोकांनी गंभीरपणे ऐकायला हवं असेल, तर त्यात अमुक एका प्रमाणापेक्षा अधिक मूर्तिभंजकत्व असता कामा नये, याचंही भान येत गेलं.
पुढे अंकासाठी सामोरं आलेलं साहित्य निवडताना या साक्षात्कारांची कसोटी लागली!
***
अशी कसोटी लागण्याचं प्रमुख कारण होतं - पॉर्न या शब्दाची संदिग्धता. तिचा प्रचंड आवाका आणि तिचा होत गेलेला अर्थविस्तार. पॉर्न म्हणजे संभोगदर्शन हा त्या संज्ञेचा मूळ अर्थ. भोगाची अनावर लालसा आणि कामव्यवहार यांच्यातलं नातं दाखवणारा. ही लालसा जोवर फक्त कामव्यवहाराशी निगडित होती, तोवर तो योग्यही होता. पण भोग आता कामव्यवहाराची वेस ओलांडून आपल्या आयुष्यात यत्र-तत्र-सर्वत्र घुसला आहे, हे जाणवलं तेव्हा आपण किती मोठ्या आव्हानाला हात घातला आहे, ते जाणवून दडपून जायला झालं. त्याचं झालं असं - या विषयाची चौकट एका सहकारी मित्राला समजावून सांगायची होती. कळली-कळलीशी वाटणारी ही गोष्ट - व्याख्या करायला बसल्यावर मात्र काही केल्या हाती येईना. कामव्यवहार आणि पॉर्नमधला संबंध तर सरळसोटच होता. पण तितक्यानं संपत नव्हतं.
लहान मुलांच्या नृत्यस्पर्धेत ९-९ वर्षांच्या कोवळ्या पोरी जे उन्मादक हावभाव करत होत्या, ते बघताना अंगावर शहारा येई. पण त्यातलं नक्की काय अंगावर येतं, त्यावर बोटही ठेवता येत नव्हतं. त्या हावभावांमध्ये काय वाईट होतं? हेच कतरिनाने केलं की सुंदर, या लहानशा पोरीनं केलं की वाईट? का? मला संस्कार-शुभंकरोति-मूल-फूल आणि तत्सम गोष्टींबद्दल कधीच काही पडलेली नव्हती. मग यात नक्की काय खटकत होतं? मग यात नक्की काय खटकत होतं? तर - एक लहान मूल नाचतं आहे, त्यात गळेकापू स्पर्धा आहे, यशस्वी होण्यासाठी त्या पोराच्या आईवडिलांनी बराच पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावलेली असणार आहे, त्यासाठी प्रसंगी त्या पोराला त्याच्या वयाला न शोभणारे हावभाव करावे लागले तरी त्यात कुणाला काहीच चूक वाटत नाहीये; आणि हे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, मी जेवत-खात असता; दर्जेदार मनोरंजन अशा लेबलखाली माझ्या घरात माझ्या अंगावर येऊन आदळणार आहे - हे सगळं मिळून - मला खटकत होतं. म्हणजे शृंगार खटकत नव्हता; तर एखादी गोष्ट लोकप्रिय आणि/किंवा हमखास यशस्वी व्हावी म्हणून तिचा शृंगाराशी जोडला जाणारा निरर्थक-निर्लज्ज संबंध खटकत होता.
या धाग्याची अनेकानेक रूपं आजूबाजूला दिसत होती. मादक हावभाव करत आंब्याचा रस पिणारी कतरिना, पुरुषी डिओडरन्टच्या गंधामागे कामविव्हल होऊन धावत सुटलेली बेभान गृहिणी, कबड्डी या खेळाला मिळालेला ‘पुरुषदेह पाहण्याची संधी’ हा एक नवा अन्वयार्थ…
दुसऱ्या एका मित्राशी बोलताना - विवाहसंस्था आणि बाजार यांतला संबंधही योगायोगानं त्याच सुमारास उलगडला. एका जुन्या वळणाच्या नातेवाइकांच्या घरात, टीव्हीवर सहकुटुंब-सहपरिवार ‘टायटॅनिक’ पाहण्याचा योग आला. जॅक रोझचं चित्र काढत असताना आम्हाला कुणालाच अजिबात अवघडल्यासारखं न होता आम्ही तो प्रसंग प्रेक्षकांच्यात ७०+ वर्षं वयाची दोन माणसं असतानाही बघू शकलो… म्हणजे दस्तुरखुद्द शृंगाराशी कुणालाच वावडं नव्हतं - नसतं, हा साक्षात्कारही तेव्हाचाच.
ही अनुभवांची साखळी एकात एक विणली गेली, ती पॉर्नांकाबाबतचं माझं आकलन त्या सहकारी मित्राला समजावून सांगताना. ती विणताना शृंगार आणि पॉर्न या दोन गोष्टींचा एकात एक अडकलेला पाय अलगद सुटला. तीन पायांची शर्यत संपली.
कामव्यवहाराचं वर्णन- मग ते सौंदर्यवाचक असो वा आरोग्यासाठीचं, राजकीय विधान असो वा साहित्यातून जीवनदर्शन घडवणारं- ते पॉर्न नाही, यावर शिक्कामोर्तब झालं. शृंगार नसलेल्या- पण शृंगार होऊ पाहणाऱ्या निर्लज्ज अंतहीन भोगाबद्दलचं साहित्य अंकात असेलच; पण शृंगारावरचं हे किटाळ दूर करणारं कामसाहित्यही अंकात असेल- हा दुहेरी गोफ तेव्हाच विणला गेला. पुढे हरेक निर्णय घेताना- अमुक एक गोष्ट अंकात समाविष्ट करणं योग्य आहे की नाही, असा प्रश्न आला रे आला की लगेच - मी तो हाती घेई. कधी गोष्ट फक्त चावट-शृंगारिक गमतीची-कामुक सौंदर्य दाखवणारी असे. तसं असल्यास सुलटा पीळ. या उलट ती कोणत्याही प्रकारची भोगलालसा जागी करणारी असल्यास उलटा पीळ. या पिळामागची कारणं, परिणाम, परिस्थिती… असे सगळे ताणेबाणे भोवताली.
***
आवाक्याचं आकलन करून घेण्याचा हा एक टप्पा. पुढे प्रत्यक्ष अंकाचं संकलन, संपादन, प्रकाशन ही निराळीच हातघाई होती!
एकतर छापील माध्यमांहून ऑनलाईन माध्यमं निराळी असतात. एकाहून जास्त प्रकारांनी. छापील माध्यमांमध्ये एका विशिष्ट वेळेपर्यंत मजकुरावर संस्कार करायला वेळ असतो. तो गोठणबिंदू उलटला - की संपादक "साई सुट्ट्यो!’ म्हणून मोकळे होतात. त्याचं दडपण अर्थात असतं, कारण मग चुका अपरिवर्तनीय होतात. पण ऑनलाइन प्रकाशनात तसं नसतं. एकतर आम्ही संपूर्ण अंक एकसाथ प्रकाशित करत नाही. एखाद्या प्रकल्पाचा रोल-आउट जसा टप्प्याटप्प्यानं होतो, तसं आम्ही टप्प्याटप्प्यानं प्रकाशन करतो. एखादा आठवडाभर हे प्रकाशन चालतं. हे प्रकाशन झाल्यावरही लेखक त्यातल्या काही चुका, बदल, सुधारणा, काटछाट, भर… याबद्दल आमच्याशी सतत संपर्क साधत असतात. वाचकांनाही मजकूर उपलब्ध झालेला असल्यामुळे तो एकाच वेळी जाहीरही असतो आणि माफक संपादनासाठी उपलब्धही असतो. याचं दडपण प्रचंड असतं. म्हटलं तर ती मजकूर अधिकाधिक परिष्कृत करण्याची संधी असते आणि म्हटलं तर कुठे थांबावं हे ठरवण्याच्या निर्णयाची गळ्याशी असलेली सुरी असते.
या अंकात पॉर्नसारखा स्फोटक विषय असल्यामुळे हे सगळं दडपण किमान दुपटीनं तरी वाढलेलं होतं!
अंकाच्या ‘विषय’वस्तू(!) खेरीज प्रत्यक्ष अंकाला मिळालेला स्वागतशील प्रतिसाद पाहता ते आम्ही यशस्वीपणे पेललं, असंच म्हटलं पाहिजे.

विषय (सॉरी, दर वेळेला मी ‘पन, (नॉट) इंटेन्डेड!’ असं नाही लिहिणारेय!) संयतपणे हाताळला गेला…
पॉर्नच्या बदलत्या आणि व्यापक व्याख्या सुस्पष्ट करून घ्यायला मदत झाली…
अनेक गुंतागुंतीच्या तपशिलांना आणि विसंगतींना न्याय देण्यात आला…
रधोंसारख्या काळाच्या कितीतरी पुढे असणाऱ्या माणसाचं लेखन आजही काळाच्या पुढेच भासतं - हे सुदैव की दुर्दैव, अशा विचारात पडायला झालं…
म्हटलं तर या अंकाशी थेट संबंध नसलेल्या - पण दुरन्वयानं संबंध राखत - महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करणाऱ्या - लावणीसारख्या विषयांच्या बदलत्या प्रारूपाबद्दल चर्चा झाली…
अशा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. काही ठळक दोषही दाखवून देण्यात आले. मुखपृष्ठ आणि अंक यांच्यातला निसटलेला दुवा, अंकाचा क्वचित काही ठिकाणी ढळलेला रोख (focus), काही विसंगत-अनावश्यकरीत्या मूर्तिभंजक वाटू शकेल असं साहित्य - यांबद्दल नापसंती व्यक्त केली गेली.
पण, सगळ्यांत मोठं फलित काही असेल, तर या विषयाकडे पाहण्याचा अनेकांचा - आपल्यासकट अनेकांचा- दृष्टिकोन लख्ख आरपार दिसणे. सुरुवात करताना या विषयाबद्दलची फक्त गृहीतकं आणि समज आणि मतमतांतरं तेवढी गाठीशी होती. सर्व्हे करायचा ठरवला, तेव्हा या सगळ्याला ओलांडून जाण्याची इच्छा होती. त्यामागचा मुख्य हेतूच हा होता, की काहीही गृहीत धरू नये. विचारावं. म्हणूनच सर्व्हेचे प्रश्न काढतानाही ते पॉर्नच्या बाजूने वा विरोधात झुकलेले नसावेत, म्हणून आम्ही कमालीचे सजग होतो. शब्दनिवडीपासून ते थेट प्रश्ननिवडीपर्यंत अनेकच बाबतीत. आणि इतकी काळजी घेऊनही ‘तुम्हांला पॉर्नचं उदात्तीकरण करायचंय ते स्पष्ट सांगा ना! ताकाला जाऊन भांडं का लपवता!’ इथपासून ते ‘पॉर्नला काहीतरी विघातक गोष्ट मानून तुम्ही मोठी चूक करताहात..’ इथपर्यंत प्रतिक्रिया मिळाल्या! हे अतिशय मनोरंजक तर होतंच; पण डोळे उघडायला लावणारंही होतं. आपण मानतो त्या प्रकारचा एकच एक मतप्रवाह असत नाही, लोक ही अतिशय व्यामिश्र अशी गोष्ट आहे, हे भान या आकडेवारीनं अचूक पुरवलं. काही गृहीतकं पक्की झाली, काही साफ मोडली. पण आता एकूण ५४५ लोकांनी दिलेल्या उत्तरांमुळे आमच्या मतांमागे ठोस आधार आला, त्याहीपेक्षा मताकडून काहीएक निष्कर्षाकडे जाण्याची दिशा मिळाली. हे व्यापक सर्वेक्षण नाही, याबाबत अभ्यास होण्याची नितांत गरज आहे, हेही लख्ख दिसलं.
हे फक्त आकडेवारीबाबतच नाही, तर अंकातल्या लेखनाबद्दलही खरं आहे. त्यानंही अनेकवार डोळे उघडले. पॉर्नोग्राफिक सिनेमे म्हणजे निव्वळ गल्लाभरूपणा, असा एक ठाम समज होता. या सिनेमाची उत्क्रांती कसकशी होत गेली आहे, हे सांगणारं लेखन वाचून एका नव्याच विश्वाचं दार उघडलं. उद्योग म्हणून, सौंदर्यशास्त्र म्हणून, लोकशिक्षणाचं एक साधन म्हणून यात किती मोठं पोटेन्शिअल आहे, ते लक्ष्मीकांत बोंगाळेच्या लेखानं सांगितलं. तसंच उत्पल यांच्या पुरुषी लैंगिकतेचा धांडोळा घेणाऱ्या लेखाबद्दलही. उदारमतवाद आणि स्त्रीवाद महत्त्वाचा खरा; पण त्या संदर्भचौकटीत पुरुषी शरीराच्या मागण्या काय असतात, त्यांचं नक्की काय करायचं आणि त्या प्रक्रियेत समाज म्हणून आपण कुठे जात असतो… याबद्दल खोल आणि नेमके प्रश्न विचारणारा तो लेख होता. ही केवळ काही उदाहरणं. वात्स्यायनाच्या उदारमतवादी भूमिकेबद्दल म्हणा, अमेरिकन स्त्रीवाद आणि पॉर्नोग्राफीला त्यांनी केलेला विरोध यांच्यातल्या अंतर्विरोधाबद्दल म्हणा, पॉर्नोग्राफीच्या दुष्परिणामांबद्दल विज्ञानातला आजही असणारा गोंधळ म्हणा… अनेकच प्रकारे स्वतःचे पूर्वग्रह तपासून पाहायला या अंकानं प्रवृत्त केलं.
ही सगळी फार शिकवून जाणारी प्रक्रिया होती. समग्र आकलन आणि जबाबदार - मोकळा आविष्कार यांतली खुमारी या अंकामुळे कळली, असंच म्हटलं पाहिजे. आता विषय कितीही व्यापक आणि आव्हानात्मक असला तरी आम्ही डरणार नाहीच; उलट मुख्य धारेतल्या छापील माध्यमांच्या तोडीस तोड काम करून दाखवू शकू, असा विश्वास आता वाटतो आहे.
मेघना भुस्कुटे
meghana.bhuskute@gmail.com
बातम्या आणखी आहेत...