आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकळावा शब्द निगुतीनें

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटच्या वापराचे दोन प्रकार आहेत. एक - अबोल वापर; ज्यात तुम्ही पुस्तकं, सिनेमे, गाणी उतरवून घेता. कथा-कविता-ब्लॉगनोंदी वाचता. त्यावर काहीतरी बरी-वाईट प्रतिक्रिया लिहिता. पत्रं लिहिता. पत्रांना उत्तरं देता. यात माणसांशी संवाद आहे. पण तो कमी, धीम्या गतीचा, श्वासाला सवड देणारा, गरज पडेल तेव्हा थांबवता येईलसा आहे. दुसरा आहे, बोलका वापर. फेसबुक आणि इतर संवादस्थळं; तिथे तुम्ही मुख्यत्वेकरून माणसांशी बोलत- वादत- उत्तरत- व्यक्त होत असता.
 
 तिथे संवादाचा वेग प्रत्यक्ष संभाषणाइतकाच - कधी कधी त्याहूनही जास्त - असू शकतो. कारण समोरच्याचं ऐकायला थांबायचीही गरज नसते. त्या संवादात प्रत्यक्ष उत्तरदायित्व नसतं. या बोलक्या वापरामध्येच आपण प्रचंड मजकूर गुऱ्हाळतो. त्याहून गंभीर म्हणजे, तिथल्या आपल्या प्रतिक्रिया अधिक तीव्र, वेगवान, काहीशा प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या आणि एकांगीही होत जातात.हा धोकादायक वापर वाढण्याची चिन्हं आहेत.
 
‘नेक्स्ट बिलियन यूजर्स’ या संकल्पनेबद्दल तुम्ही काही ऐकलं आहे का? नेक्स्ट बिलियन यूजर्स उर्फ भावी अब्जावधी वापरकर्ते म्हणजे, देशी भाषेतून माहितीची भूक असलेला, इंटरनेटवर येऊ घातलेला ग्राहकवर्ग. तरुण, साक्षर, खिशात फार पैसे बाळगून नसणारा, फोनवरूनच इंटरनेट वापरणारा, नेटवर्कच्या चणचणीची सवय असलेला आणि देशी भाषा वापरणारा - असा हा वर्ग. त्याला आधी इंटरनेटकडे आणि मग आपल्याकडे ओढण्यासाठी गुगलपासून फेसबुकपर्यंत आणि यूट्यूबपासून इतर अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. 
 
वाय-फाय पुरवणारे थांबे देण्यापासून ते ऑफलाइन व्यवहार करायची सोय करून देण्यापर्यंत अनेक गोष्टी त्या वर्गाला आकर्षून घेण्यासाठी केल्या जाताहेत. या वर्गाच्या भाषिक आवडीनिवडींचे लाड पुरवले जाणार नाहीत, असं शक्य तरी आहे का?
 
ग्राहक म्हणून असलेली या वर्गाची ताकद ज्या आग्रहातून येते, त्याला भाषाप्रेम म्हणणं कठीण आहे. भाषिक अस्मिता + इतर भाषांबद्दलची असुरक्षितता, असं त्याचं वर्णन करता येईल. एरवी, दुकानांवरच्या पाट्या ‘मराठीत लिहा’ अशी घोषणा करत देवनागरी लिपीचा आग्रह धरला गेलाच नसता! पण ग्राहकांच्या बाजूनं हे दिसतं तितकं साधंसरळ नाही. हे ग्राहक आपल्या मायबोलीतला मजकूर मिळवायला हपापलेले आहेत.
 
 हा उघड दिसणारा ग्राहकांचा फायदा आहे - अबोल वापरात मोडणारा. पण हा मजकूर गुऱ्हाळताना - बोलका वापर करताना - तेच ग्राहक आपल्या आवडीनिवडींबद्दल बोलून, वाद घालून, राजकीय चर्चा करून आपल्याबद्दलचा विदा (data) इंटरनेटवर खुला करून ठेवणार आहेत. हेच तर दुकान मांडून बसलेल्या कंपन्यांना हवं आहे. हा ग्राहकवर्ग म्हणजे, एक भलंमोठं घबाड आहे. ते हाती लागावं, म्हणून देशी भाषांचं गाजर दाखवलं जातं आहे.

या सगळ्यात महत्त्वाची आहे, ती भाषेची मध्यवर्ती भूमिका. वाढत जाणाऱ्या बोलक्या वापरात लोक भाषेकडे नक्की कसं पाहतात, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. व्यक्ती, समाज, राजकीय समूह म्हणून असलेलं आपलं मन:स्वास्थ्य या बोलक्या भाषावापराशी थेट निगडित असणार आहे.
 
अडचण अशी आहे, की भाषेबद्दलची स्पष्टता फारशी कुणापाशीच नाही. प्रमाणलेखन पाळायचं की नाही, त्याला प्रमाणलेखन म्हणायचं की शुद्धलेखन, साहित्य सुबोध असावं की दुर्बोध, मराठी शाळा टिकवाव्यात की नाही, साहित्य संमेलनांवर सरकारनं खर्च करावा की नाही, बेळगावची आणि विदर्भाचीही नक्की गोची काय आहे, शिवाजीच्या स्मारकावर किती कोटी खर्चावेत... 
 
असे जे असंबद्ध भासणारे वाद आपल्या सांस्कृतिक अवकाशात खेळले जात असतात, ते याच भाषाविषयक अनागोंदीचे निर्देशक आहेत. या वादांमधली गृहीतकं पाहिली तर असं लक्षात येतं, की भाषा, भाषिक अस्मिता आणि रोजगार निर्मिती करण्याची भाषेची क्षमता या तीन निरनिराळ्या गोष्टी आहेत, याचं भानच मुळी आपल्यापाशी नाही.
 
उदाहरणार्थ, मराठी प्रमाणलेखनाचे नियम संस्कृतशरण नकोत, असं म्हटलं तर तुम्हाला भाषाच अवगत नाही, असा आरोप होतो. किंवा बेळगावबद्दल थोडी अपारंपरिक भूमिका घेतली, तर तुमच्या मराठीपणाबद्दलच शंका घेतली जाते. कारण स्पष्टता नाही, अस्मिता मात्र टोकदार. त्यात भर पडते आहे, ती या अननुभवी ग्राहकांची. हे सगळं फेसबुकासारख्या ज्वालाग्राही ठिकाणी! कयामत का दिन दूर नही!
 
पण याला एक सकारात्मक बाजूही आहे. अभिव्यक्तीच्या या कुंभमेळ्यात सामील होण्याला कुणालाही कोणत्याही प्रकारचा उघड मज्जाव नाही. प्रस्थापितांच्या भाषेवर पक्की पकड असण्यापासून ते इंटरनेटची जोडणी परवडण्यापर्यंत अनेक छुप्या मक्तेदाऱ्या कार्यरत आहेत. पण त्यांचा तोंडवळा मात्र उघडपणे जात, धर्म, वर्ण, लिंग अशा प्रकारच्या जुनाट टप्प्याचा नाही. या गुंत्याची तुलना शहरीकरणाशी केली, तर हे नीट समजून घेणं थोडं सोपं जाईल का? कदाचित.

आधुनिक काळात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण आलं, ते हातात हात घालून. या जोडीनं जात आधारित भेदभावांना उघडपणे तरी थारा दिला नाही. शहरातल्या आयुष्याला काळी बाजू आहे, शोषणाचे अधिक छुपे आणि भेदक संदर्भ आहेत.
 
पण खेडेगावातल्या पिढीजात भवतालात जगणंच अशक्य झालेल्या माणसांना बरंवाईट जगण्याची संधी महाशहरांनी देऊ केली, हेही खरं आहे. समूहाशी असलेला जोडलेपणा खुडून घेतला असेल, पण समूहाचा दबाव उधळून लावत, व्यक्ती म्हणून मोकळेपणा दिला, हेही खरे आहे. हा मोठाच रेटा होता.
 
 अगदी तसाच रेटा इंटरनेट-फेसबुक-स्मार्टफोन्स या त्रयीनं आणि तिथल्या घुसळणीनं भाषाव्यवहाराला देऊ केला. तशीच अनागोंदी; प्रस्थापित आणि होतकरू समूहांचे तेच संघर्ष; तसाच मर्यादित स्वातंत्र्याचा आभास;
 
‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ या म्हणीनुसार, या अराजकाचा फायदा उचलणाऱ्या बड्या कंपन्या आणि त्यातून मिळवलेल्या भावनिक मुद्द्यांवरून आपल्यात सहजी फूट पाडणारे राजकारणी. आपली भाषा या सगळ्यात घुसळून निघाल्याशिवाय राहील?
 
प्रतिशब्द घडणीवरून घातले जाणारे वाद, हे वरवर दिसणारं एक टोक तेवढं आहे. त्यापेक्षा गंभीर असे अनेक बदल होताहेत, होणार आहेत. या बदलांकडे आपल्याला डोळसपणे पाहता येईल?

जनमत खेळवण्यासाठी इंटरनेट (फेसबुक नि व्हॉट्सअॅप) हे माध्यम कमालीचं परिणामकारक आहे. अमेरिकी आणि भारतीय राजकारणात त्याचे यशस्वी प्रयोग पाहिल्यावर, संकुचित देशीवादाला खतपाणी घातलं जाताना आणि लोकांच्यात दुही माजताना जगभर पाहिल्यावर, आता तरी नेट आणि भाषा यांच्या साट्यालोट्याला असलेलं महत्त्व आपल्याला ध्यानी घेता येईल?
 
भाषा हे साधन आणि हत्यार दोन्ही आहे, हे सत्ताकांक्षींनी ओळखलं आहे, राबवलंही आहे. त्याचा आपल्याविरोधात वापर होऊ नये, इतकी पक्की मांड आपल्याला अस्सल आणि आभासी भाषेवर बसवता येईल?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असली तर बरं. नपेक्षा दिवस मोठे कठीण ठाकले आहेत.
 
संपर्क : ९९६७१९४१५४, meghana.bhuskute@gmail.com
बातम्या आणखी आहेत...