आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meghana Shrotri Article About Benarasi And Khadi Fabrics

बनारसिया...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक खूप सुंदर कविता आठवते शाळेत असतानाची. त्यातील ताजमहाल व आगाखान महाल यांच्या परस्पर संवादातून कविता उमलते आणि आपल्याला उमगते एक सत्य. तुलना आहे - काही समान धागे पण हटकून अशी काही विरोधाभासाची ठिकाणं. एक आहे सौंदर्याचं प्रतीक, साधंसुधं नव्हे राजेशाही, सा-या जगाची नजर वेधून घेणारं! मात्र दुसरं... या वास्तूचं सौंदर्य बघायचं नाहीच मुळी, ते जाणवण्याचं आहे. त्याला सौंदर्याची जाण हवी. मन:चक्षू तयार हवेत. बरं. पण त्या सर्वाचं आजच्या आपल्या भेटीशी काय? तर असं आहे की आजच्या आपल्या विषयाशी असणारं याचं साधर्म्य. बनारसी शालू व खादी वस्त्र. जाणवतंय नं?
बनारसी शालू, उत्तर प्रदेशमध्ये तयार होणारा नि भारतभर व भारताबाहेर नावलौकिक असलेला. अनेक सौंदर्यवस्त्रांचे स्फूर्तिस्थान. आपल्याकडे जशी पैठणी तसा तिथे हा शालू, असे म्हणणे जरा वावगे ठरू शकते. कारण मुळात जरी पैठणीची व शालूची विणण्याची पद्धत, मेहनत हे खूप सारखं असलं तरी... किंबहुना या सारखेपणावरून आपल्यास काही लक्षात येतं का? या तर ज्येष्ठा, कनिष्ठा! जसं मुगल साम्राज्यात ‘शालू’ला बराच राजाश्रय, प्रोत्साहन मिळालं तसंच निजामाच्या अखत्यारीत पैठणीला! असं म्हणतात की निजामाची सून निलूफर हिने अनेक वा-या केल्या व पैठणीला शालूसारखं डेव्हलप केलं!
असं म्हणतात की, भगवान बुद्धांना निर्वाण प्राप्त झाले. तद््नंतर त्यांचे पार्थिव ज्या वस्त्रात गुंडाळले गेले ते होते ‘ब्रोकेड’ अर्थात बनारसी! आपल्याकडे देवादिकांच्या वस्त्रांचे (म्हणजे भरजरी) असे जे उल्लेख आहेत तेही वर्णनावरून हेच, असा अंदाज बांधला जातो.
इ.स. 1603मधल्या दुष्काळानंतर अनेक गुजराती विणकर कुटुंबं उत्तर प्रदेशात स्थलांतरित झाली. तेथे त्यांनी आपले उपजीविकेचे साधन अबाधित ठेवले मात्र तिथल्या अंगाने. आता तेही ‘बनारसी’ पद्धतीने विणू लागले. ढंगाने मात्र स्वत:च्या. तोपर्यंत प्रचलित सुती साम्राज्यात त्यांनी रेशीम आणले व त्याची सरशी केली. ‘जर’ही गोवली! जर’ तेव्हा (ख-या) सोन्याच्या वा चांदीच्या तारांची असायची बरं. एक-एक साडी विणायला 1-2 महिनेसुद्धा लागत.
आपल्याला चार मुख्य प्रकार यात बघायला मिळतात. प्युअर सिल्क, ऑरगॅन्झा, कटवर्क, बुट्टीदार. पहिले दोन हे त्यांच्या मूळ ‘बेस’ कापडावरून ठरतात तर दुसरे दोन विणण्याच्या पद्धतीवरून. (सध्या ड्रेस मटेरियलमध्ये या दोन प्रकारांची पुष्कळ चलती आपल्यास दिसते आहे.)
पॉवरलूम्सची झळ पुढे हिला लागायला लागली आणि त्या विणकरांनाही. एक मात्र झालं की हा प्रकार प्रचंड पॉप्युलर झाला. जॅकार्ड लूम्स निघाल्या तसतसे हे कापड फर्निशिंगमध्येही दिसू लागले. आता मात्र मूळ प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यास GI
(geographical index)ची संजीवनी देण्यात आली आहे. जेणेकरून मूळ प्रकार अबाधित राहावा, कळावा, तसेच तो त्या त्या गुणांसकट व त्याच्या मूळ स्थानांवरूनच येतो त्याची खात्री असावी म्हणून. वाराणसी, जौनपूर, आझमगढ, मुझफ्फरपूर ही याची काही महत्त्वाची केंद्र .
आता तर ‘ताज पॅलेसेस अँड रिसॉर्ट्स’नी त्यांच्या स्टाफ युनिफॉर्ममध्ये याचा समावेश केला आहे. जेणेकरून बनारसीला प्रसिद्धी मिळावी व याचा सहजी प्रसार व्हावा.
एकापेक्षा एक असे सर्व वस्त्रप्रकार पाहिले तरी ‘खादी’ हा प्रकार काही आगळाच. एकमेवाद्वितीय! वर्षातले सर्व सण साजरे करताना जसे स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन/ प्रजासत्ताक दिनाशिवाय पूर्णत्व नाही, तसेच खादी नाही तो.
आपण सर्वच जाणतो की हा केवळ वस्त्रप्रकार नसून ही एक चळवळ आहे. स्वातंत्र्य चळवळीचं एक अंग असलेली ही चळवळ, परदेशी गिरण्यांना चोख उत्तर देण्यासाठी म्हणून उभी केलेली बापूजींची एक तटबंदीच होती. देशभरातील सर्व वस्त्रोद्योगांना संरक्षण मिळवून देण्यासाठी मात्र त्यामुळेच की काय स्वातंत्र्योत्तर काळात हळूहळू ती संदर्भहीन होत गेली. एक-एक करता-करता सर्व स्थानिक वस्त्रप्रकारांना पुन्हा तेज प्राप्त होऊ लागलं व त्यामुळे ढासळत्या तटबंदीकडे दुर्लक्ष होत चाललं! एके काळी, सोसवत नसतानासुद्धा आबालवृद्धांनी ही दिमाखाने, देशाभिमानाने ल्यायली तर नंतर तिच्या गैरवापराने ती कुचेष्टेचा विषय बनली. आता हे अग्निदिव्यही पेलून, तावून-सुलाखून निघाली आपली खादी. अनेकविध रंगांत रंगछटांत, तलम, अतितलम, सुती, पॉलिसुती, रेशमी अशा फार मोठ्या रेंजमध्ये उपलब्ध आहे खादी. घरी घरच्यासारखी (राष्ट्रीय एकात्मता जागवणारी) तर परदेशी आपल्याला वैशिष्ट्य बहाल करणारी खादी - हिचे तर अनेक प्रकार आपल्या ‘वॉर्डरोब’मध्ये हवेतच. तरच आपल्या राष्‍ट्रीय एकात्मतेचे ताणेबाणे व्यवस्थित राहतील. मग नवीन वर्षाचा संकल्प हाच म्हणायचा का?