आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशिदा, कांथा, आबला.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भगवान बुद्धांच्या काळची. आश्रमातील एक भिक्षू बुद्धांकडे आला व त्याला हव्या असलेल्या ‘चिवरा’साठी त्याने मागणी केली. बुद्धांनी त्याला विचारले, ‘तुझे जुने चिवर काय झाले?’ ‘ते फार जुने व जीर्ण झाले. मी सध्या गादीवर अंथरूण म्हणून ते घालतो,’ भिक्षू उत्तरला. त्यावर बुद्धांनी विचारले, ‘मग तुझ्या जुन्या अंथरुणाचे काय झाले?’ ‘भगवान, ते अंथरूण वापरून-वापरून फाटले, म्हणून मी उरलेल्या चांगल्या भागाचे अभ्रे केले.’ ‘आधीचे अभ्रे - त्यांचे काय केलेस?’ बुद्धांनी परत विचारले. ‘वापरून-वापरून तेही फाटले. मग उरलेला बरा भाग जोडून मी त्याचे पायपुसणे केले.’ भिक्षूने उत्तर दिले. ‘पण आधीचे पायपुसणे?’ बुद्धांनी अधिक खोलात जात विचारले. ‘त्याच्या पार दशा झाल्या वापरून... मग मी त्या सर्व सुट्या करून, संध्यासमयी पणती लावायला, त्यातील ‘वाती’ म्हणून त्यांचा उपयोग केला.’
हे ऐकून बुद्धांनी समाधानाने व संतोषाने स्मित केले व त्या भिक्षूला नवे चिवर देण्याची सोय केली. अशी आपल्याकडची ‘युज-रियुज-रिसायकल-रिप्लेनिश’ची संस्कृती आहे. निरासक्तीचे बाळकडू मिळालेले असताना, प्रत्येक गोष्ट जपून वापरणे, तिला-तिचा पूर्ण मान देत विनियोग करणे हे आपल्याकडचे जीवनसूत्र होते. वस्त्रांचे विस्तीर्ण विश्व यापासून वंचित कसे बरे राहील? वस्त्रांच्या विश्वात तर हे सूत्र अजूनही सहज अस्तित्वात आहे. कापड विणण्यात काही उणे राहिलेच तर ते रंगवण्यात झाकले जाते. तसेच रंगवण्यात वा छपाईत राहिले असता पुन्हा रंगवले वा छापले जाते. मात्र या रिपीट प्रोसेसेस अशा असतात, जेणेकरून आधीचे दोष पूर्णपणे झाकले जावेत. उदाहरणार्थ, रंगवणे हे प्लेन डाइंग वा सिंगल कलर डाइंग नसून ब-याचदा टाय-डाइंग केले जाते! त्याचप्रमाणे क्वचित कापड टिकाऊ असते, मात्र उठावदार नसते. अशा कापडाचा ‘भरतकामाची’ जादू करून कायापालटच केला जातो. ही किमया साधण्यातही आपण ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ दाखवली आहे. कशी ते बघू या तर :
०‘कांथा वर्क’ (बंगाल) : या कामालाच अग्रक्रम द्यावा लागेल. पूर्वी एखादी भारी-चांगली साडी जर कुठे ओढली - ताणली गेली/खोच लागला - तर? तेवढ्याच भागात त्यास बरोब्बर मिळतेजुळते कापड घेऊन ‘पॅच’ केले जायचे. पण एवढे करून समाधान होत नसे. कारण ते दृष्टीला सुंदरच दिसले पाहिजे नं? मग त्यावर भरतकाम करायचे, वेलीफुलांच्या नक्षीने नटवायचे. साधा धावदोरा घालायचा असतो. उलट बाजूलादेखील सुलट बाजूचाच सफाईदारपणा. जितका टाका जवळ व लहान व जेवढा जास्त भाग याने व्यापला असेल; तेवढे कौशल्य व मेहनत अधिक व त्यामुळेच किमतीचा आलेखही तसाच चढता. त्या उप्पर जर रेशमी धागा/कापड असेल तर त्याची नजाकत (व किंमतही) त्याजोगतीच.
०आबला (गुजराथ/राजस्थान) : आरसे/मोठ्या टिकल्या लावून त्याभोवती भरतकाम करण्याची ही कला आहे, कच्छ (गुजरात) व राजस्थानमधील.
०आरी : म्हणजे दिसायला साखळी टाक्यासारखाच मात्र ठिकठिकाणी तो घालण्याची पद्धत बदलते. बाराबांकीत (उत्तर प्रदेश) कापड खाटेवर लावलं जातं (खाट ही फ्रेम म्हणून वापरतात) व त्या भोवती बसून कारागीर आरी व इतर भरतकाम करतो. इतर भरतकामात- रेशीमधाग्यांनी केलेल्या अनेक प्रकारच्या टाक्यांबरोबर पोतीचे मणी गुंफणे, टिकल्या, खडे इ. गोवले जातात. आता -हाइनस्टोन्स व स्वारोवस्की क्रिस्टल यांचादेखील यात समावेश झालाय!
आरी वर्क काश्मीरचे असेल तर ते एका हूकवजा सुईने केलेले असते. भराभर वरखाली हालचालीने साकारले जाते. या वेगळ्या प्रकारच्या सुईला इंग्रजीत ‘क्रिवेल’ असे संबोधतात, त्यावरून या वर्कला ‘क्रिवेलवर्क’ असे परदेशातून ओळखले जाते.
आरी वर्क मशीनवरही होते. मुंबईसह इतर शहरांतील निर्यातदारही हे काम करून घेतात.
०बादला : सोन्या-चांदीच्या व इतर धातूंपासून केलेल्या तारेने केलेले भरतकाम!
०मोकैश : सोन्या-चांदीची काहीशी अरुंद, चपटी तार घेऊन त्याचे छोटे-छोटे डॉट्स भरून डिझाइन तयार केले जाते. ऑलओव्हर म्हणजे चांदण्यासारखा दिसणारा हा प्रकार गडद रंगाच्या साड्या, दुपट्ट्यांवर उठून दिसतो. क्वचित बॉर्डर्सना डिझाइनची आउटलाइन म्हणूनही हा केला जातो. सिल्व्हर ऑन ब्लॅक व गोल्ड ऑन रेड ही यातील सर्वात ‘हिट’ कॉम्बिनेशन्स. बरेचदा ‘बादला’ व ‘मोकैश’ यांना एकमेकांसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरतात.
०चिकनकारी : ज्याला आपण ‘लखनवी’ म्हणून ओळखतो, मस्लिनवर (व हल्ली शिफॉन, जॉर्जेट) केलेले पांढ-या कॉटन दो-याने केलेले काम. सहसा आढळतात ते शॅडोवर्क व हेरिंगबोन स्टिचेस. मात्र यात इतरही टाक्यांनी काम केलेले असते. जाली, मुर्री, फंदा हे यातले काही खास. कधी-कधी मोकैश/टिकल्या व याचे कॉम्बिनेशन केले जाते. तर कधी फूल-पत्ती. कधी दोरा रंगीत तर कधी बेस कापड गडद रंगाचे.
०फूल-पत्ती : पॅचवर्क/ अ‍ॅप्लिक व भरतकाम यांचे कॉम्बिनेशन असलेले हे काम. फुलं व पानं ही ऑरगंडी वा तत्सम कापडाने भरलेली असतात व बारीक, देठ-वेलींचं काम रेशमाने भरलेलं असतं. नावाप्रमाणे सहसा विषय हाच असतो. उत्तर प्रदेशमध्ये विशेष करून अलिगड येथील हा प्रकार आहे. मौकेश व टिकलीकाम येथे ही उठावासाठी हजेरी लावते.
०रेशीम वर्क (उत्तर प्रदेश) : केवळ रेशीमधाग्यांनी केलेले भरतकाम. साड्यांचे पदर, दुपट्ट्यांसाठी विशेषकरून वापरले जाणारे.
०एक तार : सिंगल दो-याने केला जाणारा हा प्रकार, क्रिस्टल्ससोबत साकारतो.
०सितारा वर्क (उत्तर प्रदेश) : टिकल्या वापरून केलेले भरतकाम. यात 90-95% टिकल्या असतात व सपोर्टला रेशीम काम.
०जरदोसी (उत्तर प्रदेश) : छोट्या-छोट्या वायर्सने केलेले भरतकाम, मुख्य ‘पानं’ हा विषय. सिल्क, सॅटिन वा वेलवेटवर जरदोसी काम केले जाते.
०लरी-जरी : सोन्याची तार वा रेशीम वापरून केलेले बनारस, बरेली, लखनऊ, आग्रा काम.
०ताइपची ठिपकी : डार्निंग स्टिचने केलेले भरतकाम.
०फुलकारी व बाघ (पंजाब) : नावाप्रमाणेच विषय असणारे हे भरतकाम मूलत: सिल्कच्या धाग्यांनी, लाँग-शॉर्ट, सॅटिन इ. स्टीच घालत साकारलेले असते.
०कशिदा : काश्मीरमधील भरतकामाचा प्रकार. शाली, जॅकेट्स, टोप्या व त्यांच्या पारंपरिक पोशाखांवर आढळणारा. आता मात्र सिल्क साड्या, शिफॉन, जॉर्जेटवरही उपलब्ध असलेला.
०कसूती (कर्नाटकी कशिदा) : सिंगल दोरा वापरून केलेला अत्यंत सुरेख, नाजूक असा भरतकामाचा दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटक येथील कलाप्रकार. डिझाइन व छापता-आखता, ताणे-बाणे मोजून-अचूक प्रमाण साधत केलेला नवलाचा प्रकार! या मोहकतेत गुंतूया आणि आपल्या सौंदर्याचा आलेख उंचावूया