आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहते स्वभावें नेटभाषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत इंटरनेट (आणि कॉम्प्युटर) हे ‘इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी फक्त’ आणि ‘वाईट्ट काहीतरी’ आहे, अशी एक खूणगाठ सर्वसामान्य लोकांनी मारलेली दिसे. ‘त्याच्यामुळे नोकऱ्या जातील’ इथपासून ‘त्याच्यावर पोरं पॉर्न बघतील’ इथपर्यंत अनेक संशयगंड इंटरनेटशी जोडलेले दिसत. तिथून सुरुवात करून, ‘हात तिथे स्मार्टफोन’ येईपर्यंत आपण प्रवासाचा (‘प्रगतीचा’ असं लिहून मग घाईघाईनं खोडलं आहे, हे चाणाक्ष वाचकांनी ध्यानी घ्यावं) भलताच मोठा टप्पा पार केला. या दरम्यान इंग्रजीनं तिचं प्रोटॅगॉनिस्टी स्थान गमावलं नाही. पण तिची मध्यवर्ती जागा हळूहळू काही अंशी तरी बाजूला सरकत गेली आणि देशी भाषांनी परिघाकडून केंद्राकडे अडखळत पाऊल टाकलं. (पूर्णवेळ मराठी वाहिन्यांनी जम बसवण्याचाही हाच काळ, हा योगायोग खास नव्हे.)
या झेंगटात मराठीचं काय झालं आणि होतंय, ते बघण्याचा हा प्रयत्न आहे.

पण तत्पूर्वी थोड्या चौकटी आखून घेणं आवश्यक. कारण साहित्य आणि भाषा या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, हे आपण तत्त्वतः कबूल केलं असलं, तरी व्यवहारात आपण कायम माती खाल्लेली दिसते. (इंटरनेटवरच्या अ-ललित लेखनाला ‘विकिपीडीय’ असं विशेषण वापरतात, ते त्याला हिणवण्यासाठीच. वास्तविक मराठी विकिपीडिया वाढेल तितका उत्तमच आहे की! पण आजमितीस तरी त्याला ‘साहित्यिक’ लेखनाइतकी प्रतिष्ठा नाही.) साहजिकच या ऐतिहासिक गफलतीची छाया आपल्या तपासकामावरही पडणार आहे, याचं भान असू द्यावं, हे उत्तम. दुसरं म्हणजे, हे शासकीय भाषाविषयक धोरणाबद्दलचं मतप्रदर्शन नाही. सर्वसामान्य लोकानुनयी जालीय माध्यमांत काय चालतं, त्याबद्दलची ही ढोबळ निरीक्षणं आहेत. आकडेवारी हवी असेल तरीही निराशाच होईल. इथे काही ठळक शेरेवजा निरीक्षणं तेवढी मिळतील. ती व्यक्तिनिष्ठ (आणि त्यामुळे पुरेशी ठाशीव आणि रंगीत!) असतील, याची मात्र ग्यारंटी.

तर- इंटरनेटवर मराठीतून लेखनवाचन घडवणारी प्रमुख ठिकाणं म्हणजे, ब्लॉग, फोरम उर्फ सं(वाद)स्थळ, विकिपीडिया, छापील नियतकालिकांच्या इ-आवृत्त्या आणि फेसबुक. पैकी नियतकालिकांचं खरं माध्यम काही इंटरनेट नव्हे, ती छपाईतच रमलेली. ती आपण सोडून देऊ. बाकी ठिकाणची मायमराठीतली देवाणघेवाण बघू.

इंटरनेटवर लिहिलेली दैनंदिनी उर्फ डायरी नोंद म्हणजे ब्लॉग. मराठीत ब्लॉग खाजगीकडून सार्वजनिक झाले, हौशी लेखकांत लोकप्रिय होऊन पुढे फेसबुकानं जवळपास गिळंकृत केले; तरीही ब्लॉग या शब्दाला चपखल मराठी प्रतिशब्द जन्मून रुळला नाही. एकूणच मराठीची इंग्रजीशरण (किंवा संस्कृतशरण. एकूण शरण येणं काही चुकलेलं नाही!) भूमिका पाहता हा अतिशय बोलका तपशील आहे. पुढे फोरमसंस्कृती (जिथे सभासदांना एकमेकांशी लेखी आणि मर्यादित जाहीर संवाद, चर्चा, वाद, गप्पाटप्पा करता येतील, अशी वेबसाइट म्हणजे, संवादस्थळ उर्फ फोरम) आल्यावर त्यात थोडा फरक पडला. पण त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोतच. तूर्तास ब्लॉगला मराठीत ब्लॉगच म्हणतात, हे ध्यानी ठेवून पुढे जाऊ. 

ब्लॉगांच्या दिवसात इंटरनेटवर लिहिणं म्हणजे, खरोखर डायरी लिहिण्यासारखंच होतं. कारण तुम्ही सार्वजनिकपणे लिहाल ढीग, पण वाचतो कोण?! सगळ्या वृत्तपत्रांच्या इ-आवृत्त्याही तोवर निघालेल्या नव्हत्या. त्यामुळे इंटरनेटवर मराठी वाचक नामक जमात अगदी कःपदार्थ होती, असं म्हटलं तरी चालेल. जे कुणी लेखक-वाचक होते, ते मुख्यत्वेकरून भाषेकडून उपासमार झालेले एनाराय असत. महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्र मंडळसदृश संस्थांच्या कार्यक्रमांना ‘हौशी’ नामक जे विशेषण लावतात, त्यातही एका विशिष्ट दर्जाचं आणि दर्जापेक्षाही मुदलात ती कृती करायला मिळण्याच्या उत्सवी अप्रूपाचंच सूचन असे. तेच विशेषण या लेखनाला लावलं तरी चालेल. काही फोरम्स अवतरली होती, पण तिथे पाककृतींची देवाणघेवाण (तीही रोमन मराठीतून) हाच मुख्य भाग असे. साहित्यिक लेखन मर्यादित आणि हौशी क्याटेगरीत मोडणारं. ते आपल्या भवतालातल्या कुणी वाचण्याची शक्यता इतकी कमी होती, की ते लेखन आणि वास्तव आयुष्य यांत एक अदृश्य भिंत असे. 

बरहासारखा युनिकोडीय फोनेटिक कळपाट आला आणि मराठी-देवनागरीतून टंकनाचा प्रश्नही सुटला. संपादनाचा तर प्रश्नच नव्हता. कधी असे संपादनाचे प्रयत्न झालेच, तर लोक तत्काळ फुटून नवीन ठिकाणी जात. (मराठीतल्या बहुतांश संस्थळांचा इतिहास पाहिला, तर ही फुटाफुटीची साखळी तपासत पार उगमापर्यंत जाऊन पोहोचता येतं. पण ते जिज्ञासूंनी स्वतंत्र विद्याशाखीय अभ्यास म्हणून करावं.) परिणामी, टोपणनावांसह वा टोपणनावांशिवायही इंटरनेटवर लिहिणं सहजशक्य होतं. ज्यांना इंटरनेट सहज उपलब्ध आहे, अशा किंचित्लेखक आणि चिकित्सक वाचक असलेल्या मर्यादित मराठी लोकांचं एक जाळं विणलं जायला सुरुवात झाली, ती इथपासून. (महाराष्ट्र मंडळांमधल्या हेव्यादाव्यांची आणि गटबाजीची चांगली रुंद किनार याही विश्वाला आहे, हे अनुभवी वाचकांना सांगायला नकोच!)

ब्लॉग आणि पाठोपाठ स्थिरावू लागलेली फोरम्स यांत जालविशिष्ट अशी परिभाषा घडायला लागली. त्यात इंग्रजी संकल्पनांकडून केलेली उसनवार तर होतीच (लॉगाउट- गमन, पर्सनल मेसेज-व्यक्तिगत निरोप); पण मराठीत आजवर न घडलेली लघुरूपं घडण्याची (व्यक्तिगत निरोप-व्यनि, पाककृती-पाकृ, मायक्रोवेव-मावे, मुद्रितशोधन-मुशो) ही सुरुवात होती. मागे एकदा भाई भगतांनी ‘फिल्मोत्सव’ असा एक मिश्र समास केला, तर भलीथोरली चर्चा झाली. पण इथे मात्र ‘वीकान्त’(वीक एंड) आणि ‘धन्स’(धन्यवाद + थँक्स) यांसारखे शब्द बघता बघता रुळले. थिल्लर- थैल्लर्य, उनाड-औनाड्य, बोअर-बौर्य... असला चिटवळपणा करताकरता; ‘सटल्टी’ या इंग्रजी शब्दासाठी ‘साटल्य’ हा शब्द वापरण्यात आला आणि रुळलाच. डिस्क्लेमर- व्याप्तिनिर्देश, डेटा- विदा असे शब्दही घडवून वापरले गेले. पुढेमागे कदाचित तेही रुळतील.

शासकीय परिभाषाकोशांना जे करण्यात अपयश आलं होतं, ते करण्यात इथल्या मंडळींना मर्यादित प्रमाणात तरी यश आलेलं दिसतं ते म्हणजे, मराठी प्रतिशब्द किंवा इंग्रजी शब्दाचं मराठी रूप घडवून, सरसकट वापरून ते रुळवणं. अर्थात ही रूपं इंटरनेटवरच्या वर्तुळापुरतीच मर्यादित होती. पण त्या वर्तुळानं मात्र ही परिभाषा बोजड असूनही सहज आपलीशी केली. शब्द बोजड आहे का नाही, हे(च फक्त) महत्त्वाचं नसून, तो वापरण्याची एखाद्या समूहाची उत्कट इच्छा आणि त्यासाठी समभाषिक पैस उपलब्ध असणं यांचाही शब्द घडण्या-रुळण्यात महत्त्वाचा वाटा असतो, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवणारी ही घटना आहे. तिच्याकडे अजून भाषाभ्यासकांचं म्हणावं तितकं लक्ष गेलेलं दिसत नाही.

इंटरनेटचा आणि पुढे स्मार्ट फोनचा परीघ जसजसा विस्तारत गेला, तसतसं या गटांचं आभासी खाजगीपण आक्रसत गेलं. तरीही फेसबुकाचं आगमन होईस्तोवर, या दोन्ही विश्वांमधली सीमारेषा बरीच शाबूत होती. फेसबुक आलं आणि हे बघताबघता बदललं. राजकीय-सामाजिक घमासान चर्चा पूर्वीही संस्थळांवर होत होत्या. पण मुख्य धारेतले लेखक-पत्रकार-सितारे फेसबुकासह इंटरनेटवर लिहिते झाले, आणि या चर्चांचा पोत बदलत गेला. एकीकडून सर्वसामान्य माणसानं फेसबुकावर वावरायला सुरुवात केलेली असल्यामुळे सेल्फ्यांचा, एकोळी स्टेटसांचा आणि पाडू कवितांचा सुकाळ झाला. तर दुसरीकडून लेखनाचा अनुभव असलेले लोक मैदानात आल्यामुळे ‘हौशी वासरांत लंगडी गाय’ सिंड्रोम कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.

आणिक एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुख्य धारेतल्या लोकांनी इथल्या नियमांची घेतलेली दखल आणि त्यांच्यावर झालेले या विश्वाचे परिणाम. भाषिक आणि रचनात्मकही. त्याबद्दल पुढच्या भागातून.

- मेघना भुस्कुटे
 संपर्क : ९९६७१९४१५४
 
 
बातम्या आणखी आहेत...