आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रेसफुल’ भेटीचा दुवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी. एं. च्या साहित्याचं गारुड वयाच्या बारा-तेराव्या वर्षापासूनच मनावर होतं. अनवट भाषाशैली, कथेची संपन्न परिभाषा यामुळे माझ्यासारख्या ग्रंथप्रेमींना जीएंच्या लेखनाचे आकर्षण नेहमीच राहिले. मराठी भाषा समृद्ध करणार्‍या अशा लेखकांचे समृद्ध साहित्य वाचायला मिळावे, त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळावी, म्हणून मी ठरवून ग्रंथप्रदर्शनात नोकरी करण्याचे ठरवले. शिक्षण घेत घेतच मी अक्षरधारामध्ये आलो. प्रदर्शनांच्या निमित्ताने सारा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकचा मराठी भाषिक प्रांत पालथा घातला.

ग्रेस जीएंना गुरू मानत :
अक्षरधारामध्ये माझे वाचन समृद्ध होत गेले. तेव्हा जीएंच्या साहित्यधर्माशी साधर्म्य असलेल्या लेखकांचा मी शोध घेतला. तेव्हा चि.त्र्यं. खानोलकर यांचे साहित्य आणि कवी ग्रेस यांच्या कविता जीएंच्या साहित्याशी समानधर्मी असल्याचे लक्षात आले. मग त्यांच्याही साहित्याची गोडी लागली. जीएंना मला भेटता आले नाही; मात्र जीएंना गुरुस्थानी मानणारे आणि त्यांचे शिष्य कवी ग्रेस यांना भेटण्याची संधी मला मिळाली. पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने मी एकदा नागपूरला गेलो होतो. सीताबर्डी येथे प्रदर्शन होते. ग्रेस यांना नॉर्मन क्वार्टर्समधील घरी भेटायला गेलो. पहिल्याच भेटीत या विद्रोही कवीशी माझा स्नेह जडला. अगदी अलगदपणे ग्रेस यांनी बोट धरूनच मला जीएंच्या कथांकडे कसे पाहावे, हे शिकवले. एक कवी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून मी ग्रेस यांना अनुभवले.

धारवाडचे जी. एं. यांचे घर आकाश मोगरा आणि अत्तराच्या कुपीत ठेवली पायधूळ :
तीन वर्षांपूर्वी मी घरीच असताना ग्रेस यांचा मला फोन आला. ‘मी तुझ्याकडे राहायला येणार आहे,’ असे ते म्हणाले. ग्रेस हे ‘मुडी’ आहेत, हे मला ठाऊक होते. म्हणून मी त्यांच्या म्हणण्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, त्यांनी पुन्हा पुन्हा फोन करून ‘मला पुस्तकाबाहेरचं बोलायचं आहे आणि मी येतोय’ असं सांगितलं. ग्रेस खरंच येताहेत, याची खात्री पटल्यावर त्यांना काहीतरी ‘ग्रेसफुल’ भेट द्यायचं, मी पक्क केलं. ग्रेस यांनी जीएंवरील गुरुप्रेम मला ठाऊक होते. त्यांना आपल्या गुरूची चिरंतन आठवण राहील, असं काहीतरी भेट देता येईल का, या विचारानेच मी जीएंच्या धारवाड येथील घरी गेलो.

जी एंचा जन्म बेळगावचा. मात्र, नोकरीनिमित्त ते धारवाडला गेले आणि तिथेच ते राहिले. धारवाडच्या कडेमनी कंपाउंड भागात जीएंचं घर आहे. प्रा. वाय. आर. यार्दी यांना सोबत घेऊन मी जीएंचं घर पाहिलं. जीएंच्या कथांमध्ये त्यांच्या घराच्या खिडकीतून दिसणार्‍या आकाश मोगर्‍याच्या झाडाचे वर्णन आहे. ते झाड पाहिले. आपल्या मनावर ज्या लेखकाच्या साहित्याने गारुड घातले, त्या लेखकाचे घर पाहताना एक वेगळाच अनुभव येत होता. जीएंच्या घरात राहणार्‍या भाडेकरूच्या परवानगीने मी त्या घरातील पायधूळ आणि आकाश मोगर्‍यांची फुले सोबत घेतली. कोल्हापुरात आलो आणि अत्तराच्या एका कुपीत जीएंची पायधूळ आणि आकाश मोगर्‍याची फुले ठेवून त्याचे छानसे फ्रेम तयार केले.

हृदयाला भिडेल अशी ग्रेसफुल भेट :
ठरल्याप्रमाणे ग्रेस माझ्याकडे आले. तीन दिवस ते माझ्याकडे राहिले. या तीन दिवसांतही त्यांनी माझ्याशी अनेकदा ‘जीएं’चं साहित्यच शेअर केलं. जीएंना इचलकरंजीच्या फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारायला आलेल्या जीएंनी नरसोबावाडीचे त्यांचे चाहते वाडीकर पुजारी यांची भेट घेतली होती. त्या पुजार्‍यांशी मी ग्रेस यांची भेट घालून दिली. तिसर्‍या दिवशी ग्रेस नागपूरला जायला निघाले, तेव्हा मी त्यांना धारवाडहून आणलेली जीएंची ‘पायधूळ’ भेट दिली. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, हे क्षणभर ग्रेसनाही कळेना. आपण आयुष्यभर ज्या गुरूची उपासना केली, त्याची पायधूळ माझ्यासारख्या एका चाहत्याकडून मिळावी, याचेच त्यांना कौतुक होते. ग्रेस म्हणाले, ‘तू मला काहीतरी भेट देशील, हे माहीत होते. मात्र, हृदयाला भिडेल, असे काहीतरी मिळेल, हे वाटले नव्हते.’ नागपूरला जाताना ग्रेस पुण्यात उतरले आणि ती पायधूळ त्यांनी जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याकडे दिली आणि त्याचे पुढे काय करायचे, ते नंतर ठरवू असे त्यांनी सांगितले.

अशोक माळगी यांची कल्पना :
जीएंचे साहित्य आणि वस्तूंचे बेळगावात संग्रहालय होतंय, हे ग्रेस यांच्या ऐकण्यात आलं. बेळगावच्या शहापूर येथील लोकमान्य वाचनालयाचे अशोक माळगी यांच्या कल्पनेतून हे संग्रहालय साकारत होते. माळगी यांनी या संग्रहालयाला भेट देण्यासाठी ग्रेस यांना निमंत्रण दिले होते. मी, नंदाताई आणि ग्रेस बेळगावला जाऊन ती पायधूळ संग्रहालयाला भेट द्यायचे ठरले होते; मात्र दरम्यानच्या काळात ग्रेस यांना पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेळगावला जाण्याचा ग्रेस यांचा संकल्प अपुरा राहिला.

जीएंची पायधूळ संग्रहालयास भेट :
एके दिवशी नंदा पैठणकर यांचा मला फोन आला आपण ग्रेस यांची इच्छा पूर्ण करू या, असे त्या म्हणाल्या. मग 10 मे 2012 ला आम्ही ग्रेस यांच्या जन्मदिनी बेळगावला गेलो आणि जीएंची पायधूळ त्या संग्रहालयाला भेट दिली. मराठी साहित्यातील अव्वल गुरू-शिष्याच्या या अनोख्या ‘भेटी’चा दुवा बनण्याचे भाग्य मला मिळाले, हा माझ्या आयुष्यातील अनमोल अनुभव होता.


असे आहे जी. ए. संग्रहालय
जीएंच्या संग्रहालयाप्रमाणे मराठीतील साहित्यिकांची अशा प्रकारची संग्रहालये अपवादानेच आहेत. केशवसुत आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर जीएंचे हे स्मारक प्रेरणादायी ठरते. कर्नाटकातील मराठी प्रांतातील जी.ए.प्रेमींनी अनेक वस्तूंच्या रूपात जीएंच्या स्मृती जपल्या आहेत. जीएंचा टेबल, त्यांनी लिखाणासाठी वापरलेली शाईची दौत, त्यांचे हस्ताक्षर, जीएंचा आवाज, त्यांच्या पुस्तकांची कव्हर्स, त्यांचे फोटोग्राफ, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती असे साहित्य या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. दूरदेशीच्या म्हणजे कर्नाटकातील मराठी जनांनी ठेवलेला आदर्श आणि जपलेली मायमराठी ही अशी आहे.