आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योध्‍दा, संन्यासी, देशभक्त... आणि बरेच काही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्राचा मराठीमध्ये ‘अग्निपंख’ या नावाने अनुवाद केलेल्या प्रा. माधुरी शानभाग यांनी भारताच्या या माजी राष्ट्रपतींबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
डॉ. ए.पी.जे.कलाम यांच्या देहांताची बातमी इंटरनेटवर फ्लॅश होत समोर आली आणि घरचे कुणी वडीलधारे गेल्यावर होते तसे मन सुन्न झाले. ‘अग्निपंख’ हे पुस्तक (त्यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्राचा अनुवाद) लिहिताना त्यांचा एकतर्फी परिचय झाला आणि त्या पुस्तकाने माझ्यात बराच बदल घडवला. आपल्याला थोडे ताणले तर हातून अधिक काम होऊ शकते, हे समजले. त्यातील ‘चिंतन’ हे प्रकरण तर रोज वाचावे अन‌् नवी प्रेरक शक्ती घेऊन दिवस सुरू करावा, इतके सुबोध अन‌् प्रात:स्मरणीय आहे. एका गरीब नावाड्याचा मुलगा फक्त आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सावकाश पुढे जात भारतरत्न या पदापर्यंत पोहोचतो आणि एकमताने राष्ट्रपती बनतो, ही घटनाच इतकी अद‌्भुत आहे की, भारतातील असंख्य तरुणांना त्यापासून प्रेरणा मिळावी. मी त्या पूर्वी एकही पुस्तक अनुवादित केलेले नसूनही राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकरानी माझ्यावर विश्वास टाकला अन‌् हे पुस्तक मला अनुवादासाठी दिले. त्यामुळे मी अगदी झपाटून त्या पुस्तकात पूर्ण उतरत त्याचा अनुवाद केला.

त्यातील पहिल्या ‘जडणघडण’ या प्रकरणातून त्यांचे बालपण समोर येते. कुठेही आपल्या गरिबीबद्दल कडवटपणा व्यक्त न करता त्यांनी आपण त्यातूनही कसे शिकत गेलो, हे फार उत्तम रीतीने सांगितलेले आहे. चिंचोके गोळा करून ते दुकानदाराला दिले तर तो पैसे देई अन‌् त्यातून काही विकत घेता येई. तसेच सकाळी उठून पेपर टाकताना वाचता येत नसल्याने काही कळत नसे, पण अनुभव मात्र आले. शिक्षकांनी कसे भरभरून प्रेम दिले अन‌् घरातल्या वडिलधाऱ्यांची माया कशी सतत पुढे जायला उद्युक्त करत होती, वडील आणि रामेश्वरच्या देवळाचे मुख्य पुजारी श्री. शास्त्री यांची कशी मैत्री होती आणि त्यातून नकळत सर्वधर्म समभावाचे, किंवा काम हाच धर्म मानायचे संस्कार कसे होत गेले, हे वाचकांसमोर येते. यामध्ये शिक्षणात आलेल्या अडथळ्यांवर कशी मात करत ते एरोनोटिक्स इंजिनियर झाले, हा भाग येतो. भारतातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या मुलाला कितीही गरिबी असली तरी शिक्षण घेता येते अन‌् स्वकर्तृत्वावर मोठे होता येते, हाच दिलासा यातून मिळतो.

सृजन या भागात त्यांना काम करताना आलेले अडथळे कसे दूर होत गेले अाणि जे होते ते चांगल्यासाठीच होते यावरचा त्यांचा दृढ विश्वास दिसून येतो. वैमानिक म्हणून नोकरीत नाकारले गेल्यावर आत्यंतिक निराशेपोटी ते हृषिकेशला गेले. तेथे स्वामी शिवानंदांनी त्यांना सांगितले की, ‘तुझ्यासाठी काहीतरी वेगळे महत्त्वाचे योजलेले असेल.’ कोणत्याही धर्माच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त न करता त्यांनी हा आदेश शिरोधार्य मानला अाणि संरक्षण खात्यातील नोकरी पत्करली. त्यांना आकाशाची ओढ होती, पण त्यांच्या भविष्यात अवकाश होते म्हणून कदाचित दैवाने त्यांना ही निराशा देऊन परीक्षा पाहिली असेल.

त्यातही बंगलोरला पहिले हॉवरक्राफ्ट त्यांनी स्वत: कृष्णमेनन यांना सोबत घेऊन उडवून दाखवले, पण ते सर्व राजकीय कारणास्तव बासनात गुंडाळून ठेवले गेले. आपण दोन वर्षे खपून जे बनवले ते बासनात गुंडाळले गेले, याचे कुणालाही वाईट वाटेल; पण ‘माझी तंत्रज्ञानाची समज विस्तारली अन‌् आपण मनात आणले तर नवे काहीतरी करू शकतो’, असा धडा ते शिकले अाणि त्यातून एक एक पायरी चढत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. इस्रोमध्ये त्यांना अवकाशात फिरते ठेवायचे उपग्रह अाणि ते पाठवणारी वाहने करायचा अनुभव आला. मग भारताच्या पाच क्षेपणास्त्रांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

"आराधन' या भागात आपण कसे घडत गेलो, त्यात आपल्या वरिष्ठांचा कसा सहभाग होता, हे सांगताना त्यांची विनयशील वृत्ती प्रकट होते. हे सर्व प्रकल्प करताना त्यांनी अगदी पिनपासून सुरुवात केली, अन‌् आकाश, अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, नाग ही पाच प्रमुख अाणि नंतर रशियाच्या सहकार्याने ब्राम्होस (ब्रह्मपुत्रा आणि मॉस्को या नद्यांच्या नावातील पहिली अक्षरे घेऊन हे नाव ठेवण्यात आले.) अशा क्षेपणास्त्राच्या मालिका आल्या. हे सर्व करताना त्यांनी भारतीय तरुणाईचा जो खुबीने वापर करून घेतला, त्याला दाद द्यायला हवी. आपल्या देशात जागतिक पातळीच्या तोडीचे संशोधन होईल का, याबद्दल साशंक असणाऱ्यांना या प्रकल्पांच्या माध्यमातून कलामांनी जणू उत्तर दिले. आय.आय.टी. मुंबई, चेन्नई, दिल्ली, जादवपूर विद्यापीठ अशा काही मोजक्या कॉलेजात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या विविध प्रणालींचे सॉफ्टवेअर विकसित करायला सांगितले. स्वत: भाषणे दिली, संवाद साधला अन‌् आवाहन केले. त्यात या विद्यार्थ्यांना पदव्या मिळाल्या अाणि अत्यंत कमी खर्चात प्रकल्पांचे सॉफ्टवेअर मिळाले. भारतीय तरुणाईवरचा हा त्यांचा विश्वास शेवटपर्यंत राहिला. या प्रकल्पाच्या पूर्तीनंतर त्यांना "भारतरत्न' देण्यात आली. तांत्रिक प्रकल्पाचे व्यवस्थापन हा शब्दही माहीत नसताना कलामसरांनी हे काम पूर्ण केले होते. हा तर स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा प्रकल्प होता अाणि त्यात संरक्षण खात्याच्या प्रयोगशाळांसोबत देशातील जवळजवळ सर्वच संशोधन संस्था निगडित होत्या. आज इस्रो, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, संरक्षण खात्याच्या विविध प्रयोगशाळांतून असे मोठमोठे प्रकल्प राबवून देश अनेक तांत्रिक बाबीत स्वयंपूर्ण होतो आहे, त्याची सुरुवात या आय.जी.एम.डी.पी. प्रकल्पाने झाली, असे म्हणता येईल. त्यांच्या चरित्रातून वैयक्तिक जीवनासोबत देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा इतिहासही उलगडत जातो.
हे सर्व करत असताना त्यांच्यातील कवीही जागरूक होता. चांदीपूरला एक इमारत संकुल बांधताना काही झाडे तोडावी लागणार होती. संबंधित इंजिनिअरने त्यांना आराखडा दाखवला, तेव्हा कलामसरांनी थोडे सौंदर्य बिघडले तरी चालेल पण ही इमारत अशी सरकवली तर ही काही झाडे वाचवू शकू, अशी टिपणी केली अाणि मग तसे करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळचे फिरणे चालू होते, तेव्हा कलाम त्या झाडाखाली आले तेव्हा टपकन चार फुले त्यांच्या माथ्यावर पडली. त्यावर एक छान कविता त्या रात्री त्यांच्या डायरीत बंदिस्त झाली. त्यात ते म्हणतात, ‘त्या झाडांना सर्व समजले म्हणून त्यांनी जणू माझे आभार मानले.’ अग्नि या क्षेपणास्त्रावरची त्यांची कविता तर अभ्यासक्रमातील लेखात आहे. ‘अग्नीला समजू नका फक्त एक क्षेपणास्त्र, ती असंख्य भारतीयांच्या अंतरातील आग आहे’ अशा अर्थाचे शब्द त्या कवितेत आहेत.

त्यांची देशभक्ती तर वादातीत होती. अनेक प्रलोभने आली तरी ते कणभरही वाकले नाहीत.
अत्यंत निस्पृह असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अग्नीचे पहिले प्रक्षेपण फसले. त्यातून चुका शोधून, त्या दुरुस्त करून दुसऱ्या उड्डाणाची तयारी सिद्ध झाली. प्रचंड ताण मनावर होता. मीडियाने या चुकीची खिल्ली उडवली होती. आदल्या दिवशी रात्री समुद्रकिनाऱ्यावरून फिरताना तत्कालीन संरक्षण मंत्री वेंकटरामन यांनी त्यांना विचारले, ‘उद्याच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर तुम्हाला माझ्याकडून काय भेट हवी आहे?’ तर एकच क्षण विचार करून ते उत्तरले, ‘हैद्राबादच्या संकुलात लावण्यासाठी दोन लाख झाडे मला द्या.’

‘तुम्ही धरतीमातेचे आशीर्वाद मागितले, उद्या प्रक्षेपण खात्रीने यशस्वी होणार’ असे मंत्री म्हणाले अाणि तसेच झाले. हैद्राबादचे संरक्षण खात्याच्या प्रयोगशाळांचे संकुल आज हिरवेगार आहे. पुढे मोठमोठ्या सरकारी प्रकल्पांचे सल्लागार म्हणून काम करताना देशाचे हित त्यांनी नजरेसमोरून कधीच ढळू दिले नाही. त्यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घेतले गेले अाणि संपूर्ण देशाने त्याला अभूतपूर्व असा पाठिंबा दिला. त्या पदाला शोभा येईल अशीच ती पाच वर्षे गेली. त्या काळात त्यांनी भारतातील ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, तिथे तिथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना उद्याचा भारत घडवायचे आवाहन केले. आणि तो कसा घडवायचा, यासाठी “व्हिजन २०२०” यातून त्याची रूपरेखाही मांडली. इग्नायटेड माइंड्स यातूनही त्यांनी तरुणाईला प्रेरणा देणारे लिखाण केलेले आहे. राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना फक्त दोन कपड्याच्या बॅगा नेणारे तर ते एकमेव राष्ट्रपती असतील. मिळालेल्या सर्व भेटी त्या पदाला असतात; व्यक्तीला नाहीत, असे सहज उद‌्गार त्यांनी त्या वेळी काढले. जीवनभर तरुणांना प्रेरणा देणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व किती समृद्ध होते, याचा एक किस्सा इथे देण्याचा मोह मला आवरत नाही. ते केंद्रीय मंत्रीमंडळाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांनी सरकारी ५५ प्रयोगशाळांच्या प्रमुखांची एक परिषद पुण्याला आयोजित केली. तेव्हा डॉ. रघुनाथ माशेलकर पुण्याच्या एन.सी.एल. या प्रयोगशाळेचे संचालक होते. त्यांचा सायन्स पेटंट‌्सचा सखोल अभ्यास होता. त्या वेळी नुकतेच जागतिकीकरण होत होते, म्हणून त्यांनी या विषयावर बीजभाषण करावे, अशी सूचना कलामसरांनी केली. माशेलकरानी भाषणाच्या सुरुवातीला कलामसरांचा उल्लेख “मिस्टर टेक्नॉलॉजी” अशी करून नेहमीच्या पद्धतीने अत्यंत तयारीने रोचक, मुद्देसूद असे आपल्या खास शैलीत उत्तम व्याख्यान दिले. त्यानंतरच्या भोजनप्रसंगी कलाम यांनी माशेलकरांना मी पेटंट या बाबतीत निरक्षर विद्यार्थी आहे, अशी सुरुवात करत पेटंटबद्दल अनेक प्रश्न विचारले. देशाला याचा कसा उपयोग होईल, आपले नॉलेज कॅपिटल देशाला समृद्धीकडे कसे नेईल, हे जाणून घेतले. आपल्या सेक्रेटरीला नोंदी करायला लावल्या अाणि नंतर त्यावर कारवाई केली. इथे आपण माशेलकरांचे वरीष्ठ आहोत, तेव्हा त्यांच्याकडे सर्वांसमोर विद्यार्थी म्हणून जाणे उचित दिसणार नाही, असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. जे नवे आहे ते समजून घ्यायला हवे; मग ते आपल्यापेक्षा कनिष्ठ पदावरील माणसांकडून असले तरी चालेल... त्यांच्यातील विद्यार्थी कसा सतत जागरूक होता, अाणि देशाच्या भल्याचे विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत होते, ते यावरून दिसून येते.

त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले की, काम हे माणसाची क्रमांक एकची प्राथमिकता असली अाणि अंगी गुण असले तर कुणी सामान्य परिस्थितीतील माणूसही आपले जीवन सफल करू शकतो, हा आणि असे अनेक धडे त्यांच्या जीवनकथेतून घेता येतात. ते स्वत: इतक्या गरीब परिस्थितीतून कुणीही गॉडफादर पाठीशी नसताना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतरत्न अाणि पुढे देशाचे सर्वात लाडके राष्ट्रपती झाले, ही घटना भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कायमची नोंदली गेलेली आहे.

त्यांचे चरित्र, इतर पुस्तके, व्याख्याने यातून इतक्या तरुणांनी प्रेरणा घेतलेली आहे, की या एका माणसाने लाखो तरुण घडवले, असे सहज म्हणता येईल. त्यांना मृत्यूदेखील व्याख्यान देत असताना आला. माणसाने कसे जगावे, याचा वस्तुपाठ त्यांच्या चरित्रातून मिळतोच; पण शेवटपर्यंत काम करत राहायचे, हा त्यांच्या जाण्याने दिलेला धडाही अनेकांच्या मनावर कायमचा कोरला जाईल. आज असे आदर्श झपाट्याने कमी होत जात असलेल्या काळात त्यांचे जाणे हे अधिक चटका लावणारे आहे. भारतीय तरुणाईवरचा त्यांचा विश्वास येणाऱ्या पिढ्यांनी सार्थ करून दाखवावा आणि त्यांचे स्वप्न “आपला देश २०२० सालापर्यंत महासत्ता बनावा” यासाठी कार्यरत राहावे, हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

shanbhag.mm@gmail.com
बातम्या आणखी आहेत...