आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी दुर्गाआजींच्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत दुर्गा भागवतांचे पोर्ट्रेट समारंभपूर्वक बसवल्याची बातमी वाचली आणि 17/18 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या सहवासाच्या आठवणींनी डोके वर काढले. एका स्तंभाचे शब्दांकन करण्यासाठी पंधरवड्यातून एकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग येई. त्यांच्या गिल्डर लेनमधल्या घराबद्दल वाचलं/ऐकलं होतं. त्या अनेक वर्षे तिकडेच वास्तव्याला होत्या. अगदी पहिल्यांदा गेले ती भीतभीतच. पण त्यांच्याशी बोलताना आजीशी गप्पा मारतेय असंच वाटायचं. पाककला (पाकक्रिया नव्हे) या विषयावरच्या त्या लेखाचं शब्दांकन करणं सोपं असायचं. केवळ तिला हातात पेन धरून लिहिता येत नाहीए, एवढीच उणीव. जसं मुद्देसूद लिहावं, तसं ती सांगायचीही. ही आजी कधीकधी एकदम चिडून कोणाबद्दल तरी बोलायची. ज्यांच्याबद्दल इतिहासाच्या पुस्तकातून धडे असायचे, त्या व्यक्तींबद्दल झणझणीत अपशब्द वापरायची. अतिशय निगुतीने तिचा आवडता ऑरेंज पिको चहा करून द्यायची. क्रोशाची सुई घेऊन वेगवेगळ्या लेस करायला शिकवायची. कधी तरी छानसं काहीतरी खायला करायची. ज्या सहजतेने इंग्रजी साहित्याचे संदर्भ सांगायची त्याच सहजतेने मध्य प्रदेशातल्या आदिवासी/वनवासी वस्तीवर काढलेल्या दिवसांबद्दल बोलायची. कधी कधी ही आजी संध्याकाळी बाहेर पडायची फेरी मारायला. पांढरं सुती नऊवारी लुगडं आणि पायात शाळेतल्या गणवेशाचे मुलींचे काळे पट्टावाले बूट. रस्त्यावरचं एखादं झाड फुललं असेल तर त्या फुलांबद्दल भरभरून बोलायची. त्यांचं ‘ऋतुचक्र’ पदोपदी आठवावं अशा या गप्पा असत.


दुर्गाबार्इंचं वय तेव्हा ऐंशीच्या पुढे होतं. अत्यंत समृद्ध आयुष्य त्या जगलेल्या होत्या. एका संपन्न घरात जन्मलेल्या होत्या. खूप शिकलेल्या होत्या. परंतु या संपन्नतेमुळे वा शिक्षणामुळे इतरेजनांशी त्या तुच्छतेने वागत नव्हत्या, तर त्यांना समजून, त्यांच्यातलं होऊन वावरत होत्या. त्यांना कोणत्याही विषयाचं वावडं नव्हतं. त्यांचं लिखाण आजही महत्त्वाचं तर आहेच, खेरीज वाचनीयही आहे, जुनं झालेलं नाही. बायकांनी कसं राहावं, समाजाची पर्वा करू नये, हा त्यांचा विचार तर काळाच्या पुढचा म्हणावं लागेल. त्यांच्या सान्निध्यात आलेल्यांना त्या कायम लक्षात राहतील ते मात्र लेखनापेक्षा त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वामुळे एवढे निश्चित.