आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानसिक आरोग्याचा दीपस्तंभ : द्विज पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंभीर मानसिक आजारांबरोबरच यशस्वी सामना करणा-या रुग्णांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजना सुरू करावी, या कल्पनेने ठाण्याच्या आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेच्या कार्यकर्त्यांना झपाटून टाकले होते. अमेरिकेमध्ये राहणारी गायत्री रामप्रसाद त्या वर्षी भारताच्या व्याख्यान दौ-यावर आली होती. नैराश्याच्या खोल गर्तेमध्ये रुतली होती ती एकेकाळी. स्वत:चे आयुष्य संपवण्याचे भीषण प्रयत्न केले होते तिने. मनोरुग्णालयाच्या भिंतीआड अनेक दिवस घालवले होते. स्वत:ची इच्छाशक्ती आणि योग्य उपचार यामुळे ती औदासीन्यातून बाहेर पडली, परंतु अशा भावनिक अंधकारामध्ये अडकलेल्या अनेकांना वाट दाखवणारी ‘आशा’ नावाची संस्थाही तिने सुरू केली. अमेरिकेमध्ये ‘वेलकम बॅक टू लाइफ अवॉर्ड’ या नावाने पुरस्कार दिले जातात. गायत्रीलाही असा सन्मान मिळाला.


भारतामध्ये असा पुरस्कार देण्यात यावा, अशी कल्पना गायत्रीने दिली. आय. पी.एच.च्या कार्यकर्त्यांनी पुरस्काराची योजना तयार केली. त्याला शीर्षक दिले गेले ‘द्विज पुरस्कार’. मनोरुग्णाचा आरोग्याकडे प्रवास म्हणजे पुनर्जन्मच. गंभीर मानसिक आजारातून बरे होण्याचा प्रयत्न करणा-या मनोरुग्णासाठी एक नवे नाव रूढ होत आहे... शुभार्थी! जसा विद्यार्थी तसा शुभार्थी ! देवराई या स्किझोफ्रेनिया आजारावर आधारित चित्रपटाच्या दरम्यान विविध आधारगटांमध्ये जे मंथन झाले, त्यातून हा शब्द निघाला. शुभार्थीला मदत करणारे कुटुंबीय, नातेवाईक हितचिंतक शुभंकर! mental patient आणि caretaker या शब्दासाठी वापरले जाणारे हे शब्द आता भारतातल्या स्वमदतगटामध्ये तर वापरले जातातच, परंतु गायत्रीच्या पुढाकारामुळे अमेरिकेतही हेच शब्द स्वमदतगटामध्ये वापरले जातात. सिंगापूरमधला स्किझोफ्रेनियाचा स्वमदतगट हेच शब्द वापरतो.


तीन शुभार्थी आणि दोन शुभंकर असे एकूण पाच पुरस्कार देण्याचे ठरले. डॉ. मोहन आगाशे, डॉ. दिलीप देशमुख (मुंबई), डॉ. शिरीष सुळे (नाशिक), डॉ. प्रदीप जोशी (जळगाव), डॉ. सुधीर भावे (नागपूर) असे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ असलेली समिती स्थापन झाली. पहिल्या वर्षी किती प्रवेशिका येतील यावर सारेच साशंक होते; परंतु गेली चारही वर्षे संपूर्ण महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातून या पुरस्कारासाठी प्रवेशिका आल्या.


गेल्या चार वर्षांमध्ये बारा शुभार्थींना पुरस्कार मिळाला. त्यामध्ये स्किझोफ्रेनिया आजाराचे 6, डिपे्रशनचे 3, बायपोलर डिसऑर्डर्सचे 2, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर्सचा 1 अशा विविध आजारांशी सामना करणा-या शुभार्थींचा समावेश होता. पहिल्या द्विज पुरस्काराची मानकरी होती टीव्ही पत्रकारितेमध्ये काम करणारी मुग्धा समर्थ. चौथ्या द्विज पुरस्काराच्या वितरणाला तिला पाहुणी म्हणून बोलावले होते. तिस-या वर्षी गायत्री रामप्रसादही पाहुणी म्हणून समारंभाला हजर होती. प्रत्येक पुरस्कार सोहळा ऑस्कर समारंभासारखा देखणा व्हावा, असा आयोजकांचा कटाक्ष असतो.
शुभार्थींबरोबरच ज्या 8 शुभंकरांना आजवर पुरस्कार मिळाला, त्यातले बहुतेक जण स्किझोफ्रेनिया आजाराच्या रुग्णांचे कुटुंबीय आहेत. यातील अनेकांची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी तर अतिशय बिकट होती. तरीही आपल्या शुभार्थीला त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. लातूरच्या एका हिंमतवान महिलेला एका वर्षीचा पुरस्कार मिळाला. तिने आपल्या पतीचा मानसिक आजार ओळखला. पुण्याच्या मनोरुग्णालयात आणि नंतर लातूरमध्ये उपचार घेतले. पतीच्या जागी काही महिने नोकरी केली. पती बरा झाल्यावर पुन्हा कामावर रुजू झाला. ही शुभंकर पुन्हा पूर्ण वेळ गृहिणी झाली. पहिल्या वर्षीचा एक विजेता मंदार हा एमबीए-एलएलबी झालेला मुलगा. द्विज पुरस्कारानंतर त्याच्या परिसरातल्या तरुणांनी त्याचा नागरी सत्कार केला. शहापूरला राहणा-या एका विजेतीची टीव्हीवर मुलाखत झाली. ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर्सशी सामना करणारी एक विजेती दीप्ती, उत्तम शेफ म्हणून काम करते.


प्रत्येक वर्षीच्या विजेत्यांची रंगमंचावरून प्रकट मुलाखत घेतली जाते. या कार्यक्रमाच्या सीडी सर्व मनोविकारतज्ज्ञांकडे पाठवल्या जातात. म्हणजे मनआरोग्य प्रबोधनासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. पहिल्या 4 वर्षे या उपक्रमाचे एकमेव प्रायोजक होते यूएसव्ही फार्मा. यंदाही ‘इव्हेंट स्पॉन्सर’ म्हणून त्यांचा सहभाग आहेच. गंभीर मानसिक आजाराशी जवळचा संबंध आलेल्या परिवारातील व्यक्तींनी असे ठरवले आहे की, द्विज पुरस्कारासाठी कायम निधी तयार करण्यात यावा. त्याप्रमाणे यंदापासून पुरस्कार हे ‘पद्मा मनोहर फाटक स्मृती द्विज पुरस्कार’ म्हणून ओळखले जाणार आहेत. एका कुटुंबाने अशा उपक्रमाला केलेली मदत खरेच ‘अर्थपूर्ण’ म्हणायला हवी.


विषम अंक शेवटी असणा-या वर्षी द्विज पुरस्कार द्यायचा, तर सम अंक शेवटी असणा-या वर्षी 50 हजार रुपयांच्या तीन शिष्यवृत्ती शुभार्थींच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहेत. हा उपक्रमही पहिल्यांदाच अस्तित्वात येत आहे. दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहामध्ये द्विज पुरस्कार सोहळा संपन्न होतो. या वर्षी 6 ऑक्टोबर रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी एक तपशीलवार प्रवेशिका तयार करण्यात आलेली आहे. 10 सप्टेंबर ही प्रवेशिका आय.पी.एच. संस्थेच्या कार्यालयात पोहोचणे अपेक्षित आहे. आय.पी.एच.च्या www.healthymind.org या संकेतस्थळावरून प्रवेशिका डाऊनलोड करता येतील. संस्थेच्या पत्त्यावर पत्र पाठवल्यास पोस्टाने प्रवेशिका पाठवल्या जातील. तसेच iph@healthymind.orgया मेल पत्त्यावर संपर्क साधला तर तेथूनही प्रवेशिका पाठवता येतील.


अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आय.पी.एच.), श्री गणेश दर्शन, 9 वा मजला, एल. बी. एस. मार्ग, हरिनिवास सर्कल व तीन पेट्रोल पंपाजवळ, पाचपाखाडी, ठाणे (प.)-602, दूरध्वनी : 9870600098, 9870600075