आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या छेडछाडीमागील मानसिकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नुकत्याच दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमधून प्रकर्षाने समोर येते ती बाब म्हणजे स्त्रियांची होणारी छेडखानी. संदर्भ प्रत्येक घटनेमध्ये वेगवेगळे असले तरी स्त्रीवर होणारे पुरुषी अत्याचार ही त्यामधील सामायिक गोष्ट आहे.निरनिराळ्या रूपांमध्ये वावरणा-या ‘हायड्रा’ नावाच्या एका मायावी राक्षसाचा उल्लेख ग्रीक पुराणकथांमध्ये सापडतो. छेडखानीदेखील ‘हायड्रा’ राक्षसाप्रमाणे विविध रूपात दिसून येते. कधी केवळ एक विशिष्ट शिट्टी, कधी ओझरता स्पर्श, कधी ‘क्या माल है’ वगैरे दिलफेक संवाद, अधी अश्लील चाळे तर कधी बलात्कार अशा विविध रूपांनी हा हायड्रा प्रकट होत असतो. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आता नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये आपण सर्व एखादी तरी घटना वाचतोच. हे का होतंय? केवळ लैंगिक इच्छापूर्तीचा हा भाग आहे की मुलींची कपडे घालण्याची स्टाइल त्याला जबाबदार आहे? समस्येच्या मुळाशी जाऊन विचार केला तर प्रश्न पडतो की पुरुष असं का वागतात?

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून छेडखानीच्या समस्येचा विचार करताना पुरुषी वर्चस्वाची बाब प्रकर्षाने समोर येते. RAlfred Adler Sया मानसशास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती एक न्यूनगंडाची भावना घेऊन जन्माला येते. आयुष्यभर ती व्यक्ती जे काही करते त्यामागे या न्यूनगंडाच्या भावनेवर विजय मिळवणे ही मुख्य प्रेरणा असते. जे पुरुष मुलींची छेडखानी करतात, त्यांच्यामध्ये ही न्यूनगंडाची भावना प्रबळ व जास्त असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. आपल्या मनातल्या न्यूनगंडावर विजय मिळवण्यासाठी मग हे वीरपुरुष रस्त्याने जाणा-या एकट्या-दुकट्या मुलीला आपलं टार्गेट बनवतात. तिला नामोहरम करून हे पराक्रमी पुरुष आपला पुरुषी अहंकार शांत करतात. छेडखानीच्या समस्येचे सामाजिक व सांस्कृतिक पैलूही महत्त्वाचे आहेत. मुलींना लहानपणापासूनच मुकाटपणे सगळं सहन करण्याचे धडे दिले जातात. आपल्या संरक्षणाची जबाबदारी दुस-यांवर सोपवण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. आपल्या समाजात एका बाजूला स्त्रीला आपण देवत्व बहाल करतो आणि दुस-या बाजूला तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर व निर्णयहक्कांवर संस्कृतीच्या नावाखाली गदा आणतो. पुरुषांच्या मनावर लहानपणापासूनच हे बिंबवलं जातं की ते स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपण स्त्रीवर अथवा स्त्रियांवर गाजवता येणारी हुकूमत हा पुरुषत्वाचा मापदंड समजतो.

स्त्रियांच्या छेडखानीविरुद्ध कडक कायदे होणे जरुरी आहे. पण फक्त कायदे करून प्रश्न सुटणार नाही. उपायांची सुरुवात संस्कारक्षम वयापासून करणं आवश्यक आहे. मुलांना फक्त सज्ञान व साक्षर करणं पुरेसं नाही तर त्यांची भावनिक व आध्यात्मिक साक्षरता वाढण्यासाठीदेखील प्रयत्न करायला हवेत.
सध्याच्या इंटरनेट व सॅटेलाइट टीव्हीच्या युगात लैंगिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलं टीव्ही बघणारच, इंटरनेट वाचणारच आणि त्यांना लैंगिकतेसंदर्भात प्रश्न पडणारच. त्यामुळे पालक, शिक्षक व शैक्षणिक धोरणकर्ते या सर्वांची जबाबदारी आहे की, मुलांची लैंगिकता विकृतीकडे न वळता निरोगी व सुदृढ पद्धतीने विकसित व्हावी.

संस्कारक्षम वयातील मुलांवर घरात, कुटुंबात होणारे संस्कार महत्त्वाचे असतात. कुटुंबातील पुरुष स्त्रियांना, मुलींना कशा प्रकारे वागणूक देतात याचे संस्कार मुलांवर होणारच. त्यामुळे सर्व जबाबदार पालकांनी आपल्या वागणुकीचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांचा सहभागदेखील महत्त्वाचा आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या धर्तीवर छेडखानीचा प्रश्न त्यांनी उचलून धरल्यास व्यापक जनजागृती होण्यास निश्चितच मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वसंरक्षण हा शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. पं.नेहरूंनी म्हटले आहे, R" You can tell the state of the nation by looking at the status of the women there" S भारतात दर एका मिनिटाला एक विनयभंगाची घटना घडत असते आणि हे प्रमाण वाढत चाललं आहे!

vmuthe@gmail.comS