आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेपन डिटेक्टर, नाशिकच्या शिक्षक-विद्यार्थ्यांचे संशोधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच नाशकात जिल्हा विज्ञान प्रदर्शन बिटको गर्ल्स हायस्कूल येथे भरले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्या कल्पकतेला वाव देत विविध उपकरणे बनवली. त्यातील श्रीराम विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर चाबूकस्वार व त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेपन डिटेक्टरविषयी :
शासकीय कार्यालयांमध्ये, मॉल्समध्ये जाताना प्रवेशद्वाराजवळ मेटल डिटेक्टर बसवलेले असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही संरक्षण यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. या मेटल डिटेक्टरचे निरीक्षण करून त्याची कार्यपद्धती लक्षात घेऊन चंद्रशेखर चाबूकस्वार यांनी आपल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन वेपन डिटेक्टरची संकल्पना राबवण्याचे ठरवले. सरकारी कार्यालयांमध्ये वा मॉल्समध्ये बसवलेल्या मेटल डिटेक्टरमधील क्ष-किरण धातूवर पडल्यास ते परावर्तित होतात व धातू असल्याचे लक्षात येते; मात्र या पद्धतीत काही मर्यादा असल्याचे चाबूकस्वार व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. हे डिटेक्टर धातूची वस्तू प्लास्टिकच्या, अ‍ॅक्रलिक वा थर्माकोलच्या आवरणात असल्यास डिटेक्ट करू शकत नाही. तसेच एकावेळी एकाच व्यक्तीची हे डिटेक्टर तपासणी करू शकते. शिवाय दहा ते 15 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या व्यक्तीचीच तपासणी करू शकते. या मर्यादांवर मात करून डिटेक्टर बनवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी करायचे ठरवले.
यासाठी त्यांनी अत्यंत साधी अशी साधने वापरली. यात ट्रान्झिस्टर, कपॅसिटर, रेझिस्टर, बझर, ट्रान्सफॉर्मर आणि तांब्याची तार अशी साधने वापरली. कपॅसिटरचे व्होल्टेज वाढले की सर्किट पूर्ण होते आणि धातू आढळल्यास बझर वाजायला लागतो आणि दिवा लागतो. अशी या डिटेक्टरची कार्यपद्धती आहे.

वैशिष्ट्ये
एका वेळी दोन व्यक्तींची तपासणी करू शकते.
वीजपुरवठा खंडित झाला तर बॅटरी बॅक अपची सुविधा आहे.
1 ते दीड फुटापर्यंत जरी व्यक्ती असली तरी हे डिटेक्टर काम करते.
धातूची वस्तू प्लास्टिक, अ‍ॅक्रिलिक वा थर्माकोलच्या आवरणात असली तरी डिटेक्ट होऊ शकते.
अशा वैशिष्ट्यांनी युक्त हे डिटेक्टर बनवण्याची किमया या विद्यार्थ्यांनी चाबूकस्वार यांच्या मार्गदर्शनासह साधली आहे. प्राथमिक स्तरावर हे डिटेक्टर जिल्हा प्रदर्शनात मांडले गेले असले तरी यानिमित्ताने सध्या वापरात असलेल्या मेटल डिटेक्टरच्या उणिवांवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे डिटेक्टर वापरले जाऊ शकते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक चांगला उपाय आहे.