आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरएव्हर पॉप्युलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एम.एफ. हुसेन उर्फ मकबूल फिदा हुसेन नावारूपास येऊ लागले ते साधारण वयाच्या चाळिशीनंतर. 1947मध्ये त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप’ जॉइन केला. त्याअगोदर ते पोस्टर वगैरे रंगवत. ‘सेल्फ टॉट’ म्हणजे स्वत:च चित्रकला शिकलेला हा मनस्वी कलावंत होता. नंतर ते एच. ए. गाडे, के. एच. आरा इत्यादी कलावंतांच्या सहवासात आले. एफ. एन. सुझा, बाकरे आदींनी सुरू केलेल्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपमध्ये हे सगळे एकत्र होते. या चित्रकारांचे वैशिष्ट्य म्हणजे, पारंपरिक बंगाल स्कूलने तयार केलेल्या डेकोरेटिव्ह चित्रांच्या बाबतीत त्यांच्या मनात नाराजी होती. ब्रिटिशांनी भारतात आणलेल्या पद्धतींचा बंगाल स्कूल अवलंब करत असे. जगभर काय चालले आहे, हे माहीत असल्याने या सगळ्यांनी या पद्धतीला विरोध केला. या सगळ्यांवर युरोपीय चित्रकला शैलीचा प्रभाव होता. यांच्या तरुणपणात पिकासो, मातीससारखे अनेक पेंटर कार्यरत होते. कॅलेंडर, पुस्तकांची कव्हर्स या माध्यमातून त्यांची कला यांच्यापर्यंत पोहोचली होती.

प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या सगळ्या चित्रकारांनी पुढे नाव कमावले, पण हुसेनची शैली त्यात वेगळी होती. ती इतकी साधी, सरळ होती की सामान्य माणसालासुद्धा हुसेनची चित्र ओळखता येतात. गॅलरीत न जाणार्‍या माणसालासुद्धा हुसेन माहीत असतो.
असं काय होतं हुसेनमध्ये ज्यामुळे तो देशभर परिचित होता? याची दोन- तीन कारणे आहेत. एक म्हणजे, त्याची चित्रे कळायला सोपी असत. त्यात अमूर्तता नव्हती. हुसेनचे चित्र पाहिल्यावर आपण ओळखू शकतो की, चित्रात काय आहे. उदाहरणार्थ, मदर तेरेसांचे चित्र, ज्यात तिच्या हातात बाळ आहे. त्यात मदर तेरेसाचा चेहरा नाही, पण तरी ती ओळखता येते. मदर तेरेसा त्याने तिथे आईच्या स्वरूपात दाखवली आहे. इथे पॉप्युलर इमेजला पिकासोप्रमाणे तो आयकॉनचे स्वरूप देतो.
पिकासोने पोस्टरवर प्रथम कबुतर हे शांततेचे प्रतीक म्हणून वापरले. मग जगभर कबुतर शांततेचे प्रतीक मानले जाऊ लागले. गांधीजींचे चित्र काढताना हुसेन फक्त पंचा, काठी, घड्याळ इतक्याच गोष्टींतून गांधीजी साकारतो. अशा अनेक इमेजेसना त्याने आयकॉनचा दर्जा प्राप्त करून दिला. दुसरे कारण त्याचे रंग, रंगसंगती अत्यंत साधी असे. मूल जसे पेटीतले रंग आहेत तसे घेऊन रंगवते, तसे अनेक रंग तो मूळ स्वरूपात वापरत असे. ती चित्रे थोडी भडक वाटत असत. पण सिनियर पेंटर्सप्रमाणे तो वेगळे रंग, वेगळी रंगसंगती वापरत नाही. या चित्रकारांचा भर नवे रंग तयार करणे, मूळ रंग न वापरणे, यावर असतो. हुसेन हे करत नाही, पण तरी त्यात वेगळेपण आहे.

तिसरे म्हणजे, त्याच्या चित्रात उत्स्फूर्तता, वेग आणि आवेग असतो; ज्यामुळे त्याला नेमके काय व्यक्त करायचे आहे ते व्यक्त
होते. त्याच्या चित्रांचे विषयही साधे-सोपे. रोजच्या जगण्यातल्या, रोज दिसणार्‍या गोष्टी, प्रतिमा तो चितारतो. उदाहरणार्थ- रिक्षा, पणती, मेणबत्ती. या सगळ्या कारणांमुळे तो कधी दुर्बोध वाटला नाही. एखादा माणूस डायरीत जसे दिसेल ते लिहितो, तसे जगण्यातले कुठलेही विषय तो चितारायचा. त्याची चित्रे म्हणजे एक प्रकारे त्याची डायरीच होती. हुसेनच्या सुरुवातीच्या चित्रात जाड रेषा असे. म्हणजेच त्याच्यावर ‘फॉविजम’चा प्रभाव होता. मातीससारखा चित्रकार जाड रेषांनी बाह्याकृती रंगवायचा, ज्याला समीक्षक ‘फॉव’ म्हणजे जनावर म्हणू लागले. परदेशीच नव्हे, तर गाडेंसारख्या स्वदेशी चित्रकारांचाही त्याच्या चित्रांवर प्रभाव दिसतो. अनेक प्रकार रिचवूनही हुसेनने स्वत:ची शैली निर्माण केली. त्याची तीन प्रकारची चित्रे आपल्याला दिसतात.

एक म्हणजे कॅन्व्हासवरची मोठी चित्रे, रंगीत छोटी चित्रे (‘घाशीराम कोतवाल’ नाटकावरची वॉटर कलरची मालिका- ज्यातील अनेक चित्रे विजय तेंडुलकरांच्या घरी होती), आणि तिसरं हिंदू नसूनही हिंदू संस्कृती, हिंदू मायथॉलॉजी, त्यातील देवदेवता यांच्या प्रसाराचे काम त्याने केले. आपली भारतीय कथनात्मक परंपरा आणि पाश्चात्त्य शैली यातून त्याने त्याची स्वत:ची वेगळी शैली दाखवणारी चित्रे निर्माण केली. त्यामुळे हुसेनचे प्रत्येक चित्र एक गोष्ट सांगते. त्याच्या प्रत्येक चित्रात आपल्याला प्रयोग दिसतो, वैविध्य दिसते.

दुर्दैवाने हुसेन आपल्याला कळू शकला नाही, कारण आपल्याकडे नग्नतेला अब्रह्मण्यम मानले जाते. पाश्चिमात्य कलेत न्यूड आणि नेकेड यात फरक केला जातो... जो तिकडे रुजला होता. हुसेनने केलेल्या देवदेवतांच्या चित्रांवरून वादंग पेटले. या चित्रांत आक्षेपार्ह असे काही नव्हते; पण चित्रांची प्रदर्शने पाहणे, अभ्यासक्रमात त्यांचा समावेश असणे, सार्वजनिक जीवनात ती दिसणे, त्यातून पाहणार्‍यांचे जे प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते भारतीय प्रेक्षकांचे कधीच झाले नाही. त्यामुळेच हे घडले. आधुनिक चित्रकला आपल्या देशात रुजलीच नाही. त्यामुळे हुसेनसारख्या थोर कलावंताला अखेरच्या श्वासापर्यंत कतारचे नागरिकत्व घेऊन राहावे लागले, हे आपले दुर्दैव आहे.